यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून ब्राझीलचे
अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणे, ही दोन गोलार्धात असणार्या आणि अनेक बाबतीत दोन ध्रुवांइतके अंतर
असणार्या दोन प्रादेशिक महासत्तांना एकत्र आणण्याच्या गंभीर प्रयत्नांची सुरुवात
होती. बोल्सोनारो सरकारमधील ८ मंत्री आणि मोठे औद्योगिक शिष्टमंडळ त्यांच्यासोबत
आले होते. या दौर्यात भारत आणि ब्राझीलने १५ सामंजस्य करारांवर स्वाक्षर्या
केल्या. त्यात ‘द्विपक्षीय गुंतवणूक सहकार्य करार’ हा अतिशय महत्त्वाचा आहे. द्विपक्षीय संबंध ‘स्ट्रॅटेजिक भागीदारी’च्या स्तरावरून जॉईंट वर्किंग कमिशनच्या स्तरावर नेण्यात आले.
यानुसार राजकीय संबंध आणि रणनीतीचे संयोजन, सुरक्षा, शेती, नागरी उड्डयन, विज्ञान-तंत्रज्ञान
आणि नाविन्यपूर्णता, आरोग्य, पर्यावरण आणि तांत्रिक सहकार्य, व्यापार आणि गुंतवणूक तसेच शिक्षण आणि संस्कृती अशा गोष्टींचा
समावेश आहे. भारत आणि ब्राझील यांच्यात दरवर्षी सुमारे ८ अब्ज डॉलर मूल्याचा
व्यापार होतो. तो १५ अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
ऑक्टोबर २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बोल्सोनारो यांचा प्रचंड मताधिक्क्याने विजय झाला. उजव्या विचारांच्या बोल्सोनारो यांनी श्रमिक पक्षाच्या फर्नांडो हदाद यांचा पराभव केला. यामुळे १६ वर्षांनी श्रमिक पक्षाची सत्ता संपुष्टात आली. बोल्सोनारो यांनी ‘सुशेगाद’ म्हणजेच ‘आरामसे’ संस्कृती असलेल्या ब्राझीलला कामाला लावण्याचा चंग बांधला आहे. अमेरिकेसह महत्त्वाच्या औद्योगिक देशांशी संबंध सुधारण्याला त्यांनी विशेष महत्त्व दिले आहे. त्यामुळे डाव्यांनी त्यांच्याविरुद्ध रान माजवणे सुरू केले. बोल्सोनारोंना अॅमेझॉन खोर्यातील राज्यांमध्ये सर्वाधिक मते मिळाली आहेत. त्यांच्या विकासवादी दृष्टिकोनाचा पर्यावरणवादाशी संघर्ष अटळ होता. त्यामुळे त्यांना पर्यावरणविरोधी, वातावरणातील बदल नाकारणारे, स्त्रिया तसेच जनजातीविरोधी मते असलेले नेते, अशी अनेक विशेषणे लावण्यात आली. त्यामुळे त्यांच्या भारत दौर्यालाही येथील अनेक पुरोगामी पत्रकारांनी आणि विचारवंतांनी विरोध केला. प्रजासत्ताक दिनाला आपण एका बलात्कार्याला प्रमुख पाहुणा म्हणून कसे बोलवू शकतो, असे प्रश्न त्यांनी उपस्थित करायला सुरुवात केली. थोडेसे विषयांतर झाले तरी या प्रकरणाचा खुलासा होणे आवश्यक आहे. बोल्सोनारो यांनी सुमारे १५ वर्षं ब्राझीलच्या लष्करी सेवेत घालवली होती. त्यांचा अमेरिकेच्या मदतीने सत्तेवर असणार्या ब्राझीलच्या लष्करी सत्तेला पाठिंबा होता. या काळात ब्राझीलमध्ये राजकीय विरोधकांना दडपून टाकण्यात आले होते. लष्करी राजवटीच्या काळात झालेल्या अत्याचारांबद्दल बोलताना श्रमिक पक्षाच्या संसद सदस्य मारिया डो रोझारिओ यांनी बोल्सोनारो यांना केवळ ते सैन्यात होते म्हणून ‘बलात्कारी’ म्हटले. बोल्सोनारो यांनी संसदेत एका वादळी चर्चेत रोझारिओ यांना उत्तर देताना म्हटले की, “मला बलात्कार करायचा झाला तरी तुमच्यावर करणार नाही, कारण तेवढी तुमची लायकी नाही.” २०१४ सालीही या प्रसंगाचा पुनरुच्चार केला. ही घटना २००३ सालची. या प्रकरणात बोल्सोनारो यांनी आपली पातळी सोडली. त्यांच्या वक्तव्यांतून स्त्रीजातीचा अपमान झाला, यात शंका नाही.
बोल्सोनारो आणि रोझारिओही सातत्याने ब्राझीलच्या संसदेत निवडून येत आहेत. रोझारिओंनी हे प्रकरण कोर्टात नेले आणि कोर्टाच्या आदेशावरून बोल्सोनारो यांना माफी मागावी लागली. पण, दुसरीकडे आपण हे विसरू शकत नाही की, बोल्सोनारो हे लोकशाही मार्गाने ब्राझीलचे अध्यक्ष झाले आहेत. केवळ त्यांना बोलावण्यामुळे जर नरेंद्र मोदी टीकेस पात्र होत असतील, तर तोच न्याय सर्वांना लावायला हवा. १९५५ साली जेव्हा पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनी संचलन आयोजित करण्यात आले होते, तेव्हा पंडित नेहरू सरकारने प्रमुख पाहुणे म्हणून पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल मलिक गुलाम महंमद यांना बोलावले होते. १९५८ साली जेव्हा चीन भारताचा हिस्सा गिळंकृत करायचा प्रयत्न करत होता, तेव्हा चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे मार्शल ये जिआनयिंग यांना बोलावले होते. एप्रिल १९६५ मध्ये पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध पुकारले, त्यापूर्वी तीन महिने लाल बहादुर शास्त्री सरकारने पाकिस्तानचे कृषिमंत्री राणा अब्दुल हमीद यांना प्रमुख पाहुणे बोलावले होते. आजवर प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे म्हणून बोलावण्यात आलेल्या सोव्हिएत रशियाच्या अनेक नेत्यांवरही मानवाधिकार हननाचे गंभीर आरोप आहेत. याशिवाय सौदी अरेबिया, इराण ते कझाकिस्तान अशा लोकशाही नसलेल्या देशांच्या नेत्यांनाही बोलावण्यात आले आहे. मग फक्त बोल्सोनारोंनाच वेगळा न्याय का? याचे उत्तर सोपे आहे. राग बोल्सोनारोंवर नाही, नरेंद्र मोदींवर आहे. प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवायचे हा निर्णय एकट्या पंतप्रधानांचा नसतो. त्यात परराष्ट्र मंत्रालय महत्त्वाची भूमिका बजावते. भारताच्या त्या देशाशी असलेल्या संबंधांच्या आधारावर अशी निमंत्रणे दिली जातात. पुरोगामी विद्वानांना हे माहीत असून समजून घ्यायचे नाही. सुदैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा दांभिक पुरोगाम्यांच्या रागाला भीक घातली नाही, कारण भारत-ब्राझील संबंध सुधारण्याची ही सुवर्णसंधी आहे.
ब्राझील जगातील पाचवा मोठा देश आहे तर भारत सातवा. असे असले तरी ब्राझीलची लोकसंख्या जेमतेम उत्तर प्रदेशएवढी म्हणजे २१ कोटी आहे. ब्राझील ही पोर्तुगालची सगळ्यात मोठी वसाहत. गोवा ही बहुदा त्यांची सर्वात छोटी वसाहत असावी, पण १९६१ साली गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यावरून भारत आणि ब्राझीलचे संबंध ताणले गेले. ते पुनर्प्रस्थापित होण्यास अनेक वर्षं लागली. भारत आणि ब्राझील हे ‘ब्रिक्स’, ‘जी २०’, ‘इब्सा’, ‘आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा भागीदारी’ अशा अनेक गटांचा भाग असले, तरी द्विपक्षीय संबंध म्हणावे तेवढे मजबूत नव्हते. ऊस आणि साखरेचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या ब्राझीलला भारताकडून शेतकर्यांना दिलेले अनुदान आणि संरक्षण मान्य नव्हते. त्यासाठी त्यांनी भारताविरुद्ध तक्रारही केली होती. दुसरीकडे ब्राझीलने अनेक दशकांपासून इथेनॉलचा वाहनांतील इंधन म्हणून वापर करून ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णता आणली आणि भारतासाठीही धडा घालून दिला होता. आज खनिज तेलाचे मोठे साठे मिळाल्याने ब्राझील ऊर्जा क्षेत्रातील एक महत्त्वाचा निर्यातदार झाला आहे. अमेरिका आणि इराणमधील वादामुळे संपूर्ण पश्चिम आशियावर वरचेवर युद्धाचे मळभ येते. या पार्श्वभूमीवर भारतासाठी आपले खनिज तेलाचे स्त्रोत अधिक विस्तृत करणे आवश्यक आहे. यामध्ये ब्राझील महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. संरक्षण क्षेत्रातही ब्राझील भारताचा एक महत्त्वाचा भागीदार बनला आहे. याशिवाय वाहन उद्योग, कृषी आणि अन्नप्रक्रिया, रसायने, पर्यटन, शिक्षण आणि सेवा क्षेत्रातही सहकार्याला मोठा वाव आहे. ब्राझील आणि भारतात पर्यटनालाही प्रचंड वाव आहे, पण दोन देशांना थेट जोडणारी विमानसेवा नाही. त्यामुळे ब्राझील आणि एकूणच दक्षिण अमेरिकेत जाणे अतिशय खर्चिक आहे. नाविन्यपूर्णता आणि स्टार्ट-अप क्षेत्रातही ब्राझीलने चांगली कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी अमेरिका आणि चीनच्या खालोखाल सर्वाधिक ‘युनिकॉर्न’ म्हणजे १ अब्ज डॉलरहून जास्त मूल्य असलेल्या कंपन्या ब्राझीलच्या आहेत. या क्षेत्रातील सहकार्यामुळे भारतीय स्टार्ट-अप कंपन्यांना दक्षिण अमेरिकेतील बाजारपेठा खुल्या होऊ शकतील. भाषा ही भारत आणि ब्राझीलमधील एक मोठा अडसर असली, तरी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यावर मात करता येते. अनेक वर्षांपासून भारतीय माहिती-तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी ब्राझीलमध्ये यश मिळवले आहे. बोल्सोनारो यांच्या भेटीने ब्राझील आणि भारतातील संबंधांना नवीन ऊर्जा प्राप्त झाली आहे
No comments:
Post a Comment