Total Pageviews

Tuesday 28 January 2020

भारत-ब्राझीलचा हातात हात-TARUN BHARAT- दिनांक 28-Jan-2020



राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताचे आमंत्रण स्वीकारणाऱ्या जायर बोल्सोनारो यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच दोन्ही देश आगामी काळात हातात हात घालून चालतील, असा विश्वासही मोदी व बोल्सोनारो या दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.



गेल्या रविवारी ७१ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात देशभरात साजरा झाला. राजधानी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो उपस्थित होते. तत्पूर्वी शुक्रवारपासून त्यांचा चार दिवसीय भारत दौरा सुरू झाला आणि याच काळात दोन्ही देशांत विविध १५ करारांवर हस्ताक्षर करण्यात आले. राष्ट्रपतीपदी आल्यानंतर आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताचे आमंत्रण स्वीकारणाऱ्या जायर बोल्सोनारो यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच दोन्ही देश आगामी काळात हातात हात घालून चालतील, असा विश्वासही मोदी व बोल्सोनारो या दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, भारत आणि ब्राझीलमधील संबंध आजचे नाहीत तर त्याची सुरुवात सन १५०० पासून झाल्याचे आढळते. परंतु, ब्राझील अनेक वर्षे पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता आणि त्यामुळे गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळी तसेच पाकिस्तानला २००९ साली विकलेल्या एमएआर-१अॅन्टी रेडिएशन मिसाईलवरून दोन्ही देशांत तणावाचे प्रसंगही निर्माण झाले होते. नंतर मात्र, काळ पुढे सरकत गेला, तसतशी ब्राझीलला भारताची बाजू पटली आणि आज तो देश दक्षिण अमेरिका खंडातील प्रमुख भागीदार झाल्याचे दिसते. आताची परिस्थिती तर त्याहून निराळी असून दोन्ही देशांतील संबंध लोकशाही मूल्ये आणि कॉमन ग्लोबल व्हिजनवर आधारित असल्याचे समजते.



ब्रिक्ससंघटनेचे प्रमख सदस्य असलेले भारत आणि ब्राझील दोघेही विकसनशील देश असून परस्परांच्या गरजा भागवण्याची क्षमता दोन्ही देशांत आहे. तसेच दोन्ही देशांत भौगोलिक अंतर कितीही असले तरी भारत व ब्राझील जागतिक मंचावरही एकत्रितरित्या काम करू शकतात, हे लक्षात घेऊनच विकासाच्या व प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी नुकतीच भारत व ब्राझीलने वेगवेगळ्या कार्यक्रम-उपक्रमांना मंजुरी दिली. जैव ऊर्जा, पशुधन, आरोग्य, पारंपरिक औषधी, सायबर सुरक्षा, विज्ञान-तंत्रज्ञान, तेल व नैसर्गिक वायू आणि सांस्कृतिक क्षेत्रात सहकार्यावर दोन्ही देशांनी भर दिला. जैव ऊर्जेच्या क्षेत्रातील नवनवीन संशोधन आणि तंत्रज्ञानासाठी ब्राझील प्रसिद्ध आहे. भारतात मात्र जैव ऊर्जेचा विकास आणि वापर लोकसंख्येच्या तुलनेत पुरेसा झाल्याचे दिसत नाही. ब्राझीलकडून त्यासंबंधीचे तंत्रज्ञान व साह्य मिळाल्यास भारतातील जैव ऊर्जेची उपलब्धता व उत्पादन वाढू शकते. जेणेकरून ओपेकसारख्या देशांवरील अवलंबित्व कमी होईल. पशुधन किंवा दुग्धोत्पादनाच्या बाबतीत तर ब्राझीलचे नाव प्रसिद्धच. उल्लेखनीय म्हणजे एकेकाळी भारतातून गीर आणि कांक्रेज जातीच्या गायी ब्राझीलमध्ये नेऊन तिथे त्यापासून संकरित गायींची पैदास करण्यात आली. आज ब्राझील दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनात अग्रेसर देश आहे, तसेच त्यासाठी नवनवीन साधने-उपकरणांचा वापर करतानाही दिसतो. त्या क्षेत्रातही भारतासाठी ब्राझीलचे सहकार्य महत्त्वाचेच राहिल. भारतीय पारंपरिक औषधीपद्धती आज जगात सर्वमान्य झाल्याचे पाहायला मिळते. आयुर्वेदाने जगभरात स्वतःचा ठसा उमटवल्याचे आपण गेल्या काही वर्षांपासून अनुभवले. ब्राझीलबरोबर यासंबंधातील करार करून भारताने आता आपल्या पारंपरिक औषधशास्त्रासाठी त्या देशाचे दार खुले केल्याचे म्हणता येते. आताच्या काळातील परवलीचा शब्द म्हणजे इंटरनेट, डेटा. परंतु, त्याच्या सुरक्षेची आव्हानेही मोठी असतात. म्हणूनच भारत व ब्राझीलने सायबर सुरक्षेविषयक करार करत या क्षेत्रात सहयोगाचे धोरण स्वीकारल्याचे दिसते. तरीही या सर्वांहून महत्त्वाचे विषय म्हणजे व्यापारी गुंतवणूक आणि सामरिक भागीदारी.



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्राझील व त्या देशातील गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणुकीचे आवाहन केले. गुंतवणुकीच्या सुलभीकरणासाठी भारताने आवश्यक तो कायदेशीर ढाचा तयार केल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. मोदींचे सरकार सत्तेवर येण्याआधी परकीय गुंतवणूकदारांसाठी भारतात गुंतवणुकीसाठीची प्रक्रिया मोठी किचकट होती. अनेक कायद्यांचे आणि नियमांचे जंजाळ भेदून परकीय गुंतवणूकदारांना भारतात प्रवेश मिळत असे. मोदींनी मात्र सत्तेवर येताच गुंतवणुकीला पोषक असे वातावरण तयार केले आणि त्यामुळेच गेल्या काही वर्षांत भारत परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करणारा अव्वल देश ठरल्याचे दिसते. भारत आणि ब्राझीलमधील व्यापारी व गुंतवणूकविषयक संबंध पाहता असे दिसते की, २०१८-१९ या आर्थिक वर्षांत दोन्ही देशांतील व्यापार ८.२ अब्ज डॉलर्स इतका होता. त्यात भारताची निर्यात ३.८ अब्ज डॉलर्सची, तर आयात ४.४ अब्ज डॉलर्सची होती. विशेष म्हणजे, त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात ७ टक्क्यांनी वाढ झाली. भारत ब्राझीलला कृषी रसायने, सिंथेटिक यार्न, ऑटो पार्ट्स, औषधे, पेट्रोलियम प्रॉडक्ट्सची निर्यात करतो तर कच्चे तेल, खाद्यतेल, साखर आणि खनिजांची आयात भारत ब्राझीलकडून करतो.



दोन्ही देशांतील परस्पर गुंतवणुकीचा विचार करता ते प्रमाण थोडेफार खालीवर असल्याचे दिसते. कारण, २०१८च्या आकडेवारीनुसार भारताची ब्राझीलमधील गुंतवणूक ६ अब्ज डॉलर्स इतकी होती, तर ब्राझीलची भारतामधील गुंतवणूक १ अब्ज डॉलर्स. परंतु, आगामी काळात त्यात आणखी वाढ होण्याची व दोन्ही देश किमान समान पातळीवर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या दृष्टीने मोदी व बोल्सोनारो यांच्यातील करारांचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित होते. जगात सध्या मूलतत्त्ववादी दहशतवादाने थैमान घातल्याचे दिसते. इसिस, लष्कर-ए-तोयबा, तालिबान, अल-कायदा वगैरे धर्मांध इस्लामी दहशतवादाने आशिया खंडातील अनेक देश उद्ध्वस्त केले. पाकिस्तानसारख्या दहशतवादाला पोसणाऱ्या देशातून आलेल्या जिहाद्यांनी भारतातही अनेक घातपाती कृत्ये केली. युरोप, अमेरिकेतही इस्लामी कट्टरवाद्यांनी उच्छाद मांडला. दहशतवाद हा एकूणच मानवतेचा शत्रू असून वर्षानुवर्षांपासून पीडित भारताने त्याविरोधात जागतिक पातळीवर वेळोवेळी आवाज उठवला. आता ब्राझीलनेदेखील दहशतवादाविरोधात भारताच्या बरोबरीने उभे ठाकण्याचे व त्याचा सामना करण्याचे ठरवले आहे. बोल्सोनारो यांनी त्यासंबंधीची भूमिकादेखील मांडली. दरम्यान, भारताला एका बाजूने पाकिस्तान तर दुसऱ्या बाजूने चीनसारखा कुरापतखोर शेजारी लाभला आहे. अशा परिस्थितीत भारताच्या काही सामरिक आणि लष्करी गरजा आहेत. राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात या विषयाच्या अनुषंगानेही करार करण्यात आला. दोन्ही देशांतील सामरिक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी एका बृहद कार्ययोजनेचे अनावरण यावेळी करण्यात आले. तसेच येत्या महिन्यात लखनौमध्ये होणार्या डिफेन्स एक्स्पोमध्ये ब्राझीलचे शिष्टमंडळ भाग घेईल, असेही त्यांनी सांगितले. एकूणच भारत आणि ब्राझीलमधील संबंध राष्ट्रपती बोल्सोनारो आणि पंतप्रधान मोदींमधील वाटाघाटी व करार-मदारांमुळे दोन्ही देश भविष्यात विविध क्षेत्रात एकत्रितरित्या काम करतील, असे वाटते.


No comments:

Post a Comment