Total Pageviews

Wednesday, 8 January 2020

इराण-अमेरिका युद्ध अटळ की...?-TARUN BHARAT दिनांक 08-Jan-2020


अयातुल्ला अली खामेनी यांनी, ‘खरा बदला अजून बाकी आहे,’ असा अमेरिकेला इशारा दिला आहे. म्हणजेच या दोन्ही देशांमध्ये नजीकच्या काळात युद्धाचा भडका उडणे अटळ, असे म्हणता येईल.
 क्षेपणास्त्र हल्ला ही अमेरिकेला लगावलेली केवळ चपराक असून खरा बदला अजून बाकी आहे,” अशी धमकी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी दिली. अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळावर केलेल्या हल्ल्याच्या व विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ते बोलत होते. तत्पूर्वी अमेरिकेने शुक्रवारी इराकची राजधानी बगदादमध्ये ड्रोनद्वारे हल्ला केला. त्यात इराणचे क्रमांक दोनचे नेते व रिव्हॉल्युशनरी गार्डस् कॉर्पस्च्या कुड्स फोर्सचे कमांडर कासिम सुलेमानी ठार झाले. कासिम सुलेमानींची अमेरिकेने ड्रोन हल्ल्याच्या माध्यमातून निर्घृण हत्या केल्याने इराण व इराणी जनमानस चवताळून उठले. इराणने अण्वस्त्र प्रसारबंदी करारातून माघार घेतल्याचे यानंतर जाहीर केले, तसेच सुलेमानींच्या अंत्ययात्रेत अध्यक्ष हसन रुहानी, संसद अध्यक्ष अली लारीजानी, अनेक लष्करी अधिकार्‍यांसहित हजारो महिला व पुरुष काळे कपडे घालून सामील झाले. अमेरिकेला चिरडून टाका’, ‘इस्रायलला गाडून टाका’, ‘बदला, बदला, बदला’, अशा घोषणा यावेळी जमलेल्या लोकांनी दिल्या. आपल्या लष्करी कमांडरचा मृत्यू अमेरिकेने केल्याने क्रुद्ध झालेली जनता बदल्यासाठी आसुसलेली होती व त्यातच इराणने जामकरन मशिदीवर लाल झेंडा फडकावला. लाल झेंड्याचा अर्थ युद्धाची घोषणा असा होतो आणि त्याचा संबंध करबलाच्या लढाईत हुसेनसाहेबांनी फडकावलेल्या लाल झेंड्याशी जोडला जातो. दरम्यान, इराणने इराकशी झालेल्या युद्धावेळीही कधी कोणत्याही मशिदीवर लाल झेंडा फडकावला नव्हता, पण त्याने तो आता फडकावला. इराणच्या या कृतीतून संपूर्ण जगाला संदेश दिला गेला की, आता युद्ध होईल ते आरपारच! इराणच्या नेतृत्वानेदेखील तसा संकल्प केला. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आगीत आणखी तेल ओतण्याचे काम केले. इराणमधील महत्त्वाची ५२ सांस्कृतिक स्थळे अमेरिका नष्ट करेल, असा इशारा त्यांनी दिला. तद्नंतर इराणने अमरिकेशी लढाईला तोंड फोडले आणि त्या देशाच्या इराकस्थित लष्करी तळावर डझनभर शक्तिशाली क्षेपणास्त्रांचा मारा केला. इराणी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या हल्ल्यात ८० जण ठार झाल्याचे म्हटले जाते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र, या हल्ल्यानंतर ऑल इज वेलअसे ट्विट करत इराणला हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देऊ, इराणपेक्षा आमच्या फौजा अधिक शक्तिशाली व अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहेत, असे म्हटले. त्यालाच उत्तर देताना अयातुल्ला अली खामेनी यांनी, ‘खरा बदला अजून बाकी आहे,’ असा इशारा दिला. म्हणजेच या दोन्ही देशांमध्ये नजीकच्या काळात युद्धाचा भडका उडणे अटळ, असे म्हणता येते. परंतु, इराण व अमेरिकेमधील युद्ध केवळ त्या दोन देशांपुरते मर्यादित राहणार नाही. कारण जग एक खेडे झालेल्या काळात जगाच्या कोणत्याही भागात एखादी घटना घडली की त्याचा परिणाम इतरत्रही होतोच होतो. तो या युद्धाचाही होईलच. पण कसा? इराकच्या संसदेने आपल्या भूमीचा वापर परकीय देशांच्या लष्कराला करू दिला जाणार नाही, असा एक ठराव मंजूर केला. सध्या इराकमध्ये अमेरिकी लष्कराच्या तुकड्या सक्रिय असून संसदेने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी केल्यास अमेरिकन सैनिकांना लगोलग मायदेशी यावे लागेल. अमेरिकेसाठी मात्र हा निर्णय एक धक्का असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच ट्रम्प प्रशासनाने या निर्णयानंतर इराकवर आणखी कठोर निर्बंध लादण्याची धमकी दिली. तसेच इराकमध्ये अमेरिकी लष्कराच्या तुकड्या इसिसया कुख्यात दहशतवादी संघटनेशी दोन हात करत आहे. जर अमेरिकन सैनिक माघारी फिरले, तर इराकी लष्कर इसिसच्या दहशतीवर कितपत लगाम कसू शकते, असा एक प्रश्न उभा राहतो. त्यामुळे इराकसह शेजारी देशांतली परिस्थिती आणखी बिघडू शकते. दुसरीकडे इराण व अमरिकेत युद्ध पेटले, तर ते मध्य-पूर्वेतच होणार, हे निश्चित. कारण, अमेरिका कधीही आपल्या भूमीत युद्ध लढत नाही, तर परकीयांच्या भूमीचाच आपल्या युद्धखोरीसाठी एक खेळणे म्हणून वापर करून घेते. त्याचा परिणाम कच्चे तेल, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायुच्या पुरवठ्यावर, किमतीवर होईल. भारतदेखील यापासून अस्पर्शी राहणार नाही व त्याचा सामना देशातील जनतेलाही करावा लागेल. तसेच आगामी महिनाभरात देशाचा अर्थसंकल्प मांडला जाईल, त्यावेळीही या गोष्टींचा विचार करावा लागेल.
दरम्यान, भारताने अमेरिकेच्या विनंतीनंतर गेल्या काही काळापासून इराणकडून कच्च्या तेलाची आयात जवळपास बंद केलेली आहे. भारत सध्या आपल्या ऊर्जाविषयक गरजांची पूर्तता अन्य आखाती देश व अमेरिकेकडून करत आहे. त्यामुळे इराण-अमेरिका युद्धाचा तेलाच्या वा नैसर्गिक वायुच्या पुरवठ्यावर म्हणावा तितका परिणाम झाला नसला तरी तो किमतीवर नक्कीच होऊ शकतो. परंतु, या केवळ शक्यता आहे आणि जर युद्ध झाले तरच त्या प्रत्यक्षात येऊ शकतात. मग युद्ध होईल अथवा नाही? तर त्याची दोन उत्तरे किंवा त्यासंबंधाने दोन मतप्रवाह दिसतात. पहिला म्हणजे अमेरिकेच्या हल्ल्यात कासिम सुलेमानींचा जीव गेला, हे खरेच. तथापि, त्यांना इराणचे क्रमांक दोनचे सर्वोच्च नेते मानले जात असल्याने त्यांची प्रतिमा सर्वोच्च नेत्याचा प्रतिस्पर्धी अशी झालेली होती, जे तिथल्या नेतृत्वाला पसंत नव्हते. मात्र, जनतेच्या इच्छेखातर दुखवट्याचे पहिले दोन-चार दिवस आम्हीही अमेरिकेविरोधात उभे असल्याचे इराणी नेतृत्वाने दाखवणे गरजेचे होते. म्हणून इराणने अमेरिकेच्या परवानगीनेच बदल्याची कारवाई करत इराकमधील लष्करी तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला, जेणेकरून जनतेचे समाधान होईल. हा झाला एक प्रवाह आणि त्यालाच पूरक ठरेल अशी व युद्ध होणार नाही, असे सांगणारी आणखी एक घटना म्हणजे इराणच्या राजदूताचे म्हणणे. कासिम सुलेमानींच्या मृत्युनंतर अमेरिकेबरोबरील तणाव कमी करण्यासाठी भारतासारख्या शांतताप्रिय देशाने पुढाकार घेतल्यास आम्ही त्याचे स्वागत करू, अशी अपेक्षा इराणचे भारतातील राजदूत अली चिगीनी यांनी व्यक्त केली आहे. त्याचा अर्थ इराणलाही अमेरिकेबरोबरील संघर्ष विकोपाला नेण्याची इच्छा नाही, असे दिसते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध सर्वांनी माहिती आहेत. त्याचा वापर करून मोदींनी हा तणाव वा युद्ध टाळले तर ते जगाच्या व आशियाच्या दृष्टीनेही आश्वासक ठरू शकते.
आणखी एक मुद्दा म्हणजे भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर काही दिवसांपूर्वी आधी अमेरिकेला व तिथून इराणला गेले होते. त्यावेळी अमेरिका व भारताने इराणला नेमका काय संदेश दिला, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, माध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार इराण व भारताने एकत्रितरित्या अफगाणिस्तानच्या स्थैर्यासाठी काम करू, असे म्हटले होते. सध्या अमेरिकेला अफगाणिस्तानातूनही माघारी फिरायचे आहे व भारतासह इराणने तिथे काम करण्याची तयारी दाखवली तर ते अमेरिकेसाठीही फायदेशीर ठरेल. अर्थात ही झाली तणावापूर्वीची बाब. पण, आता इराणच्या विनंतीवरून भारतीय नेतृत्वाने इराण व अमेरिकेबरोबरील तणाव निवळण्यात महत्त्वाची भूमिका निभावली तर ती जगाला दिलासा देणारी, हायसे वाटणारी घटना ठरेल, हे नक्की


No comments:

Post a Comment