Total Pageviews

Friday, 24 January 2020

ब्रेक्झिट आणि सीएए Source:तरुण भारत10 Jan 2020 -रमेश पतंगे

|

जागतिक स्तरावर ब्रेक्झिट हा विषय अतिशय गंभीर चर्चेचा विषय झालेला आहे. त्याच वेळी भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) यावर रणकंदन माजलेले आहे. ब्रेक्झिट म्हणजे काय आणि त्याचा संबंध नागरिकत्व सुधारणा कायद्याशी कसा येतो, हे आपण बघू या!
ब्रेक्झिट हा शब्द ब्रिटन आणि एक्झिट या दोन शब्दांचा मिळून तयार झाला आहे. एक्झिटचा अर्थ होतो बाहेर पडणे. ब्रिटन कशातून बाहेर पडणार आहे? ब्रिटन युरोपियन संघातून (युरोपियन युनियन) बाहेर पडणार आहे. हा युरोपियन संघ काय भानगड आहे, हे समजल्याशिवाय ब्रिटन त्यातून का बाहेर पडणार, हे समजणार नाही.
युरोपातील छोट्या-छोट्या राज्यांचा दहाव्या-बाराव्या शतकापासूनचा इतिहास आपापसात सतत लढत राहण्याचा आहे. आपल्याला पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध माहीत असते. या दोन्ही महायुद्धांची रणभूमी युरोप होती. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर या देशांची आपापसात लढण्याची हौस पूर्ण भागली होती. मग त्यांनी ठरविले की, आपापसात लढत राहण्यापेक्षा आपण आपला एक संघ तयार करू या. देशाच्या सीमा पुसून टाकू या. एक समान चलन निर्माण करू या. न्यायदान करण्यासाठी एक समान न्यायपीठ उभे करू या. प्रथम युरोपियन कॉमन मार्केटची स्थापना झाली आणि नंतर तिचेच युरोपियन युनियनमध्ये रूपांतर झाले.
हे एक आश्‍चर्यच होते. जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, इटली, ग्रीक असे सर्व देश इतिहासकाळात एकमेकांविरुद्ध भीषण लढाया लढत होते. त्यांनी या लढाया थांबविल्या आणि समान कार्यक्रमांवर, विकासाच्या मुद्यांवर, नागरिकांच्या सुखांसाठी त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. (म्हणजे महाविकास आघाडी तयार केली.) १९७३ साली ब्रिटन या युरोपियन मार्केटमध्ये सामील झाली. १९७५ साली ब्रिटनमध्ये या प्रश्‍नावर सार्वमत घेण्यात आले. ब्रिटनने युरोपियन युनियनमध्ये सामील व्हायचे की नाही, या प्रश्‍नावर मतदारांनी मतदान केले. ६७ टक्के मतदारांनी अनुकूल मतदान केले.
हा युरोपियन संघ एक सामायिक बाजारपेठ म्हणून उदयाला आला. त्यामुळे त्यांची वाटाघाटी करण्याची शक्ती वाढली. व्यापाराचीदेखील शक्ती वाढली. त्याचे लाभ युरोपातील समृद्ध देशांना झाले, तसेच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या देशांनाही झाले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर युरोपच्या भूमीत कोणतीही लढाई झाली नाही, हेदेखील एक आश्‍चर्यच आहे.
ज्यांना ब्रिटनचा इतिहास माहीत आहे, लोकांची मानसिकता माहीत आहे, त्यांचा अंदाज असा होता की, ब्रिटन या संघात फार काळ राहणार नाही. २०१६ साली ब्रिटनमध्ये पुन्हा सार्वमत घेण्यात आले. या सार्वमताचा विषय होता, युरोपियन युनियनमध्ये राहायचे की बाहेर पडायचे. ५२ टक्के लोकांनी बाहेर पडण्याचा निर्णय दिला. २०१६ पासून ब्रेक्झिट हा शब्दप्रयोग सुरू झाला. २०१६ साली ब्रिटनला युरोपियन युनियनमधून बाहेर पडले पाहिजे, असे का वाटले?
त्याचे पहिले कारण असे की, ब्रिटिश लोकांना असे वाटू लागले की, युरोपियन संघात राहून आपण आपली अस्मिता आणि स्वतंत्र ओळख नजीकच्या भविष्यकाळात पुसून टाकू. ब्रिटनचा माणूस हा आपल्यासारखाच परंपरावादी आहे. त्याच्या परंपरा तो प्राणापलीकडे जपतो. या त्याच्या स्वतंत्र ओळखीवर युरोपातून येणार्या लोकांचे आक्रमण सुरू झाले. मुक्त श्रमिक बाजारपेठ तयार झाल्यामुळे नोकरी-व्यवसायासाठी युरोपाच्या देशातून लाखांनी लोक ब्रिटनमध्ये आले. ब्रिटनमधूनही दुसर्या देशात गेले. ब्रिटनमध्ये आलेल्या लोकांसंबंधी स्थानिक लोकांची अशी भावना झाली, ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम हैें?’
या लोकांमुळे आपल्या रोजगारावर आक्रमण होते. येणारे लोक आपल्या संस्कृती, परंपरेशी जुळवून घेत नाहीत. त्यांचे वेगळेच चालू असते. त्यात सीरियातून येणार्या प्रचंड निर्वासितांची भर पडत चालली. आपला देश धर्मशाळा करायचा की त्याची ओळख स्वतंत्र ठेवायची? हा प्रश्‍न इंग्लंडपुढे निर्माण झाला. आणि त्यांनी स्वतंत्र ओळख ठेवण्याकडे आपला कल दिला. आपल्या देशात जसे बौद्धिक गोंधळ घालणारे लोक आहेत, तसे तेथेदेखील आहेत. फरक फक्त एवढाच आहे की, तेथील जनता दूध का दूध आणि पानी का पानी करण्यात तज्ज्ञ आहे. ती अशा लोकांचे बोलणे ऐकून घेते, पण त्यांना शक्ती देत नाही.
या प्रश्‍नावरून २०१६ पासून ब्रिटनमध्ये घमासान युद्ध चालू आहे. पंतप्रधान थेेरेसा मे यांना युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा कार्यक्रम ठरविता न आल्यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. डिसेंबर २०१९ ला तेथे निवडणुका झाल्या आणि कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे बोरीस जॉन्सन प्रचंड बहुमताने निवडून आले. युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा प्रस्ताव ब्रिटनच्या पार्लमेंटने प्रचंड बहुमताने संमत केला. आता ३१ जानेवारी २०२० ही तारीख युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची ठरविण्यात आली. बाहेर पडण्याची प्रक्रिया आता गतिमान झाली आहे.
बे्रक्झिटमधला सर्वात महत्त्वाचा विषय, ब्रिटनच्या अस्मितेचा आहे. आर्थिक विषय त्याच्यामागे आहेत. ब्रिटिश माणूस हा व्यापारी माणूस आहे. व्यापारी माणूस घाट्याचा व्यापार करीत नाही. हा घाट्याचा व्यापार त्याला बंद करायचा आहे. आपली अस्मिता शाबूत ठेवायची आहे. त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा केला नाही. पण, आपले नागरिकत्व, म्हणजे आपली ओळख जर आपल्या भूमीवर येणारे युरोपियन लोक आणि विदेशी लोक पुसून टाकणार असतील तर ते आम्ही सहन करणार नाही, हे त्यांनी मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.
ब्रिटिश माणसाची ओळख कशात आहे? तो प्रथम राजनिष्ठ असतो. राजा किंवा राणीवर त्याची निष्ठा असते. दुसरी गोष्ट त्याला त्याची संसद सदैव सार्वभौम असली पाहिजे, असे वाटते. युरोपच्या कोर्टाचा हस्तक्षेप आपल्याकडे नको, ही त्याची भावना आहे. तिसरी गोष्ट तो प्रोटेंस्टन्ट मूल्यांची जपवणूक करतो. चौथी गोष्ट आपल्या परंपरांचा त्याला खोलवरचा अभिमान आहे. या परंपरा ज्यातून व्यक्त होतात, त्याला ‘कॉमन लॉ’ असे म्हणतात. त्याविषयी तो बांधील असतो.
आपला देश नेहरू-गांधी काँग्रेसने धर्मशाळा करून टाकला. धर्मशाळा तत्त्वज्ञान उभे केले. ब्रह्मदेशातून रोहिंग्या आला, द्या त्याला स्थान. बांगलादेशातून मुस्लिम घुसखोर आले, बसवा त्यांना भारतात. पाकिस्तान, अफगाणिस्तानातून येथील राजवटीला कंटाळून जे भारतात येतील त्या मुसलमानांना बसवा.
हे घुसखोर आपल्या साधन-संपत्तीवर डल्ला मारतात. आपल्या नोकर्या खातात, त्यांच्या आरोग्याची, शिक्षणाची, निवासाची व्यवस्था आपल्याला करावी लागते. ही फुकटची फौजदारी करण्याचे कारण नाही. त्यांचे त्यांचे स्वतंत्र देश आहेत. ते त्या त्या देशाचे नागरिक आहेत. नागरिकांच्या आरोग्याची, जीवनाची, संपत्तीची काळजी करणे, हेच त्या त्या देशाचे काम आहे. ही फुकटची पीडा आपल्या गळ्यात कशासाठी बांधून घ्यायची? मूर्ख लोक सांगतील की, मानवतावादासाठी. मानवतावादासाठी आपण त्या त्या देशांना मदत करू शकतो. त्या त्या देशात दळवळणाची साधने उभी राहावीत, शाळा उभ्या राहाव्यात, उद्योग उभे राहावेत, यासाठी मदत करू शकतो. परंतु, त्या देशातील लोकांना आपल्या देशात वसविणे, हे कधीही करता कामा नये.
ब्रिटनच्या ही गोष्ट जेव्हा लक्षात आली, तेव्हा त्यांनी तो प्रश्‍न जनतेच्या दरबारात नेला. जनतेलाच सांगितले की, तुम्ही याचा निर्णय करा. आपण जर युरोपियन युनियनमध्ये राहिलो, तर दरवर्षी युरोपियन देशांतील लाखभर लोक आपल्या देशात येत राहतील. त्यांची काळजी करायची कोणी? जनतेने निर्णय दिला, मानवतावाद गेला चुलीत, आपण आपले हित बघितले पाहिजे. आपली ओळख कायम ठेवली पाहिजे. जगाशी व्यापार आपल्या हिमतीवर करू शकतो. नाहीतरी एकेकाळी सर्व जगावर राज्य करणारे आपण आहोत. आपल्याला काहीही अशक्य नाही, हे न बोलता, न लिहिता, ब्रिटिश जनतेने मतपेटीच्या माध्यमातून प्रकट केले आहे.
आपल्यालाही आपल्या अस्मितेचा विचार केला पाहिजे. आपली अस्मिता सनातन भारताची आहे. या अस्मितेवर सीमेपलीकडून इसवी सनाच्या सातव्या शतकापासून आक्रमणे झालेली आहेत. शेवटचे आक्रमण अहमद शहा अब्दालीचे होते. पानिपतची तिसरी लढाई हे त्याचे स्मारक आहे. आता त्या इतिहासाची पुन्हा उजळणी नको. आपल्याला आपल्या अस्मितेसहित अतिशय शक्तिशाली बनून उभे राहिले पाहिजे. भारताला जे आपली माता मानतात, इथल्या संस्कृतीचा आदर करतात आणि वेळप्रसंगी तिच्यासाठी बलिदानासही तयार राहतात, ते सर्व आपले. दुबईत किंवा कराचीत बसून मुंबई किंवा अन्य ठिकाणी बॉम्बस्फोट करणारे आपले शत्रू आहेत. त्यांच्या साथीदारांना या देशात स्थान नाही. इंग्लंडने ब्रेक्झिटच्या माध्यमातून नको असलेल्या लोकांचा येण्याचा मार्ग बंद करण्याचे ठरविले आहे. आपण सीएएच्या माध्यमातून हेच काम करण्याचे ठरविले आहे.

No comments:

Post a Comment