Total Pageviews

Sunday, 20 August 2017

चिनी अगरबत्ती व धूप-कापरापासून सावधान!-गणेश पुराणिक


पब्लिशर - August 16, 2017 Facebook Twitter >>मनोहर विश्वासराव<< सीमा भागातील डोकलाम येथे घुसखोरी करणाऱ्या चीनच्या भ्याड कृत्याबद्दल देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू असतानाच दुसरीकडे मात्र हिंदुस्थानी बाजारपेठेत चिनी वस्तूंचे साम्राज्य हे दिवसेंदिवस अधिकच फोफावत चालले आहे. त्यात गणेशोत्सवाला काही दिवसच उरले असताना ठाण्याच्या बाजारपेठेत चिनी कोळसा, धूप व कापूर दाखल झाला आहे. आज घरगुती गणपती तसेच सार्वजनिक गणपती मंडपात पूजा व आरतीच्या वेळी अगरबत्ती, धूप व कपूर यांचा वापर केला जातो. पण घरगुती गणपतीच्या तुलनेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या वस्तूंची अधिक गरज असते. पेटत्या निखाऱ्यावर धूप, ऊद व लोबान यांचे खडे टाकले की त्याचा मंडपात सुंगध दरवळतो. पण सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच गॅसवर कोळसे पेटवणे व नंतर फुंकणीने ते निखारे पेटवत ठेवणे सगळ्यांनाच शक्य होतेच असे नाही. पण चीनच्या मॅजिक कोळशाची वडी मिनिटातच पेटत असल्यामुळे वेळ वाचवण्यासाठी सध्या चिनी बनावटीच्या धूप-कापूर व मॅजिक कोळशाला बाजारात चांगलीच मागणी असून व्यापाऱ्यांचाही चिनी कोळसा व धूप-कापूरच्या विक्रीकडे अधिक कल आहे. तसेच देवाची पूजा व आरती करण्यासाठी धूप, अगरबत्ती, कापूर या वस्तू अनिवार्य असल्यामुळे या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात भाविकांची लगबगही सुरू झाली आहे. पण स्वस्त असणाऱ्या या चिनी वस्तू आरोग्यास किती महाग पडू शकतात,याची कल्पना ग्राहकांना नसते. कारण याआधीही चिनी मोबाईलच्या स्फोटात तरुण जखमी झाल्याचे प्रकार घडले आहेत व काही महिन्यांपूर्वीच हिंदुस्थानी बाजारपेठेत दाखल झालेल्या चिनी तांदूळ, चिनी अगरबत्त्या व चिनी फटाके यांच्यात घातक रसायन असल्याचे एका सर्वेक्षणातून सिद्ध झाले होते. तसेच सरकारलाही देशातील तज्ञ मंडळी व डॉक्टरांकडून चिनी मालावर बंदी घालण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या होत्या. पण सरकारच्या मवाळ भूमिकेमुळे आज हिंदुस्थानी बाजारपेठेत चिनी वस्तू मोठ्या प्रमाणावर विकल्या जात आहे. त्यामुळे चिनी मालावर बंदी घालण्यात सरकारचीच इच्छाशक्ती कमजोर असल्याचे दिसत आहे. तसेच चीनच्या वस्तूंचा खराब दर्जा व लोकांच्या आरोग्याचा प्रश्न पाहता जगातील अनेक देशांनीही चीनच्या मालावर बंदी घातली आहे. पण केंद्र सरकार अद्यापही चिनी मालावर बंदी का घालत नाही? चीन स्वस्त आणि मस्त वस्तूंचे आमिष दाखवून कोटय़वधी हिंदुस्थानींच्या जिवाशी खेळ करत आहे. ही साधी बाबही सरकारला कळेनाशी झाली आहे का? मुख्य म्हणजे आज देशात दर्जेदार उत्पादन बनवणाऱ्या कंपन्याचे जाळे असतानाही चीनच्या वस्तूंची गरजच काय? सत्यस्थिती पाहूनही जर सरकार गपगुमान तमाशा पाहत असेल तर हे देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. कारण आज देशातील अन्न भेसळीची वाढती प्रकरणे व त्यात हिंदुस्थानी बाजारपेठेतील चीनच्या विषारी वस्तूंचे वाढते साम्राज्य पाहता देशवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. जर सरकारने वेळीच चिनी मालावर बंदी घातली असती तर आज हिंदुस्थानी बाजारपेठेत चिनी वस्तूंचे साम्राज्य फोफावले नसते. तेव्हा लोकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता सरकारने चिनी मालावर कायदेशीर बंदी घालणे गरजेचे आहे. तसेच चिनी वस्तू आरोग्यास घातक असल्याचे वारंवार डॉक्टरांकडून सांगण्यात येते पण लोकही स्वस्त आणि मस्तच्या नादात चिनी वस्तू विकत घेतात ,तेव्हा लोकांनीही सावधगिरी बाळगली पाहिजे. ग्राहकांनी देवाच्या पूजेसाठी अगरबत्ती व धूप-कापूर घेताना चीनच्या स्वस्त वस्तूंचा मोह टाळून चांगल्या दर्जाच्या ब्रँडेड कंपनीचा धूप-कापूर व अगरबत्ती घेणे योग्य आहे. तसेच व्यापाऱ्यांनीही शक्यतो चिनी मालाच्या विक्रीवर बहिष्कार टाकून स्वदेशीचा आग्रह धरला पाहिजे. चिनी वस्तूंमुळे केंद्र सरकारला महसूल मिळत असला तरीही सरकारची तिजोरी भरण्यासाठी कोटय़वधी लोकांचे जीवन टांगणीला लावणे योग्य आहे का? याचे सरकारने भान ठेवले पाहिजे

No comments:

Post a Comment