WhatsApp
7
काश्मीरमध्ये 2001 साली आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैनिकांनी 3 हल्लेखोर आतंकवाद्यांचा खात्मा केला. त्यापैकी एकाच्या खिशात जळगावचा फोन नंबर असलेली चिठ्ठी सापडल्यानंतर भारताविरुध्दच्या लढाईसाठी भारतातीलच मुस्लीम तरुणाईचा वापर पाकिस्तान करू लागल्याचे सत्य पुन्हा एकदा सिध्द झाले. या सगळया कटकारस्थानात सिमी ही विद्यार्थी संघटना सामील असून जळगाव हे तिचे केंद्र असल्याचे उजेडात आले. त्यानंतर जळगाव पोलिसांनी सिमीची पाळेमुळे खणून काढून दहशतवादी कारवायात सहभागींना कुठून कुठून शोधून काढले? भक्कम पुरावे कसे मांडले? येथपासून ते या दहशतवाद्यांना तुरुंगाच्या अंधारकोठडीची कशी वाट दाखवली, याची संदर्भासहित माहिती आपल्याला 'सिमी दी फर्स्ट कन्व्हिक्शन इन इंडिया' या पुस्तकात मिळते. सिमीसंदर्भातील बारीकसारीक तपशील, पोलीस तपास, न्यायालयीन कामकाज, सिमीशी संबंधितांच्या मुलाखती आदी किचकट विषय वाचनीय करून ते पुस्तकाच्या स्वरूपात वाचकांच्या हाती देण्याची किमया विजय वाघमारे यांनी केली आहे.
एकूण बारा प्रकरणांत पुस्तक विभागले गेले आहे. सिमीच्या स्थापनेचा इतिहास पहिल्या प्रकरणात आला आहे. जळगावात सिमीचा उदय होण्याची कारणे दुसऱ्या प्रकरणात आहेत. पोलीस तपास, प्रमुख आरोपींचे जबाब, अटकसंत्रानंतरची खळबळ, खटल्यातील साक्षीदार, जळगाव व नागपूर खटल्याचा निकाल, जळगावात शिरलेल्या दहशतवादी संघटना, सरकारी वकील, आरोपीचे वकील, पत्रकार व सरकारी साक्षीदार यांच्या मुलाखती, सिमीवर बंदी आणण्यास उपयुक्त ठरलेला, महत्त्वपूर्ण ठरलेला पोलीसांचा अहवाल आदी प्रकरणांतून विषयाचे गांभीर्य मांडण्यात विजय वाघमारे यशस्वी झाले आहेत.
पहिल्या प्रकरणात सिमीच्या स्थापनेचा वृत्तान्त मांडला आहे. त्यानुसार 'जमाते इस्लामी'ची विद्यार्थी संघटना एस.आय.ओ.चे पुनरुज्जीवन स्डुटंड इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाच्या (सिमीच्या) रूपात झाले. इस्लामचा प्रचार या हेतूने 1977 साली स्थापन झालेली ही संघटना जमात-ए-इस्लामी-ए-हिंदची विद्यार्थी संघटना म्हणून ओळखली जाऊ लागली. इस्लामचा प्रचार करता करता या सर्व संघटना हिंदू व पाश्चात्त्य संस्कृतीबद्दल द्वेष पसरविण्याचे कामही करू लागल्या. त्यातूनच सिमीच्या माध्यमातून मुस्लीम तरुणांना दहशतवादाकडे ओढले जाऊ लागले. पुढे पुढे लष्कर-ए-तोयबा, हरकत-उल-जिहादी-इस्लामी (हुजी), माफिया डॉन यांच्याशी व पाकिस्तानी गुप्तचर संघटनेशी सिमीचे संबंधही उघड झाले होते. भारत हे मुस्लीम राष्ट्र व्हावे व जागतीक इस्लामीकरण करणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे सिमीने उघडपणे सांगितले होते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रक्तरंजित संघर्ष करावा लागला तरी चालेल, असे सिमीचे सदस्य सांगतात.
अशी पार्श्वभूमी असलेल्या संघटनेला जळगावात स्थान कसे मिळाले? देशभरातील विविध ठिकाणच्या दहशतवादी कारवायांसाठी जळगावातल्या आपल्या समाजबांधवांचा वापर केला जातोय हे माहीत होऊनही काही जण मूक कसे राहिले? किंबहुना सिमीच्या कार्यक्रमांना प्रोत्साहित कसे केले? याची कबुली त्याच मंडळींनी कशी दिली, हे वाघमारेंनी या पुस्तकात सविस्तर दिले आहे.
सगळे आरोपी उच्चशिक्षित
शिक्षणाचा अभाव व बेरोजगारी यामुळे मुस्लीम तरुण दहशतवादाकडे वळतो, असे तथाकथित पुरोगामी सतत सांगत आले आहेत. परंतु या पुस्तकानुसार सिमीच्या माध्यमातून दहशतवादी कृत्यात सामील जळगावातील हे सगळे तरुण उच्चशिक्षित व चांगल्या पदावर नोकरी करीत होते.
प्रमुख आरोपींमधील आसिफखान बशीरखान हा 1991-92मध्ये जळगावच्या बांभोरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजीनियरिंगचा डिप्लोमा घेतलेला तरुण. शिक्षण संपल्याबरोबर त्याला शहरातच एका कंपनीत नोकरी लागली. सहा-सात महिन्यानंतर त्याला जळगावातीलच जैन उद्योग समूहात चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. त्याचे वडीलही याच कंपनीत ट्रॅक्टर मेकॅनिक होते, तर आसिफचा भाऊ अजिजखान बी.ई. मेकॅनिकलपर्यंत शिकलेला. आसिफचा मार्गदर्शक शकील हन्नान डी.एड. होऊन जामनेर तालुक्यात जि.प.च्या उर्दू शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करणारा. सिमीच्या एक मास्टरमाइंड गुलजार वानी इलेक्ट्रॉनिक इंजीनियर व अलिगढ मुस्लीम विद्यापीठात पीएच.डी. करणारा. शेख रसूल शेख चाँद हा चोपडा येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेचा केंद्र प्रमुख होता. वकारुल हसन हा ऑरगॅनिक केमिस्ट्रीत पदव्युत्तर शिकून बी.एड. झाल्यानंतर एका माध्यमिक शाळेत शिक्षक असलेला सिमीचा अखिल भारतीय सेक्रेटरी होता. त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यदेखील उच्चशिक्षित व नोकरी-व्यवसायात. याचाच अर्थ शिक्षणाचा अभाव नव्हता, इतरही आरोपी पदवीधर व नोकरी, व्यवसाय करणारे होते. भरपूर पगाराची नोकरी, डॉक्टर, शिक्षक, इंजीनियर अशा सन्माननीय पदांवर असूनही सिमीने या सगळयांना दहशतवादी कृत्यांसाठी तयार केले.
लोकल बाँबस्फोटात सिमीचा सहभाग
जळगावच्या अक्सानगर भागातील अक्सा मशीद सिमीच्या दहशतवादी कारवाईचे केंद्र होते, हा जळगावकरांसाठी धक्का होता. अक्सा मशिदीत नमाज पठणानंतर सिमीचा शहराध्यक्ष असलेला शकील हन्नान देशातील संवेदनशील मुद्दयांवर जिहाद करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करू लागला. दिल्लीत सिमीच्या प्रशिक्षण केंद्रातील इज्तेमात त्याने शरीफखान, सरफराजखान,खालीद असद, शेख सिद्दीक, शेख असिफ, शेख हनिफ, शेख इलियास, मुश्ताक शेख यांना पाठविले होते.अक्सा मशिदीत होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमासाठी शकील हन्नान संचालक मंडळाकडे पत्र पाठवायचा. या सगळया मीटिंगमधून, कार्यक्रमांतून दहशतवादी घडविले जात असल्याचा मशिदीच्या संचालकांना थोडासाही संशय आला नाही, हे आश्चर्यच आहे. येथूनच मुंबईत 11 जुलै 2006 रोजी झालेल्या बाँबस्फोटासाठी आसिफ बशीरखान हा दहशतवादी तयार झाला, ही अक्साशी संबंधितांसाठी लाजिरवाणी बाब ठरली. या घटनेत 300हून अधिक निरपराधांचा बळी गेला होता.
मुंबईच्या स्फोटाप्रमाणेच नागपूरचे विश्व हिंदू परिषद कार्यालय उडवून लावायचा कट जळगावात शिजला होता. या सगळया कृत्यांमध्ये सहभागी सगळयांना सापळा लावून पोलिसांनी कसे पकडले, याचे अतिशय अचूक वर्णन या पुस्तकात करण्यात आले असून घटनाक्रम आपल्यासमोरच घडतो आहे असे वाटते.
पोलीस कारवाईचे जणू जिवंत प्रसारण
जळगावातला 'तो' फोन नंबर मिळाल्यानंतर आरोपींचा शोध लावण्यापासून ते त्यांना कोर्टासमोर उभे करून त्यांना शिक्षा होईपर्यंत पोलीस खात्यातील रामकृष्ण पाटील ह्या पोलीस कॉन्स्टेबलपासून ते डीवायएसपी सारंग आव्हाड, तपास अधिकारी सुभाष पटेल, राज्य गुप्तवार्ता विभागाचे तपास अधिकारी अनिल बोरसे व जिल्हा पोलीस अधीक्षक कुलवंतकुमार सिंग यांच्यापर्यंत सगळयांनी कशा हालचाली केल्या, हे अशा पध्दतीने शब्दबध्द केलेय की ते आपल्यासमोरच सगळे घडतेय असे वाटते.
ह्या खटल्याशी ज्याचा ज्याचा संबंध आला, त्याला आपली बाजू जशी न्यायालयात मांडायला मिळाली, तशीच संधी विजय वाघमारे यांनी या पुस्तकातदेखील दिली आहे. पोलिसांनी घेतलेल्या मेहनतीला पुस्तकात पूर्ण न्याय दिला आहे. सगळया घटना-घडामोठी मांडताना कुठेही त्यांनी आपले मत पुढे केलेले नाही किंवा समाजात स्वत:ला प्रतिष्ठित समजणारे सिमीने उभ्या केलेल्या षड्यंत्रानुसार घडणाऱ्या घटनांकडे कसे डोळेझाक करीत होते, हेदेखील स्पष्टपणे मांडले आहे.
सिमीच्या राष्ट्रद्रोही कृत्यांचा पर्दाफाश करणाऱ्या खटल्याचे तंतोतंत वर्णन या पुस्तकाच्या माध्यमातून वाघमारे यांनी केले आहे.
हे पुस्तक म्हणजे दिशादर्शक दस्ताऐवज
जळगावातील सायंदैनिक साईमतचे कार्यकारी संपादक असलेल्या वाघमारे यांनी पुस्तकासाठी घेतलेली मेहनत त्यातील बारीकसारीक तपशिलांवरून आपल्या लक्षात येते. गेली दोन-अडीच वर्षे त्यांनी या खटल्याचा बारकाईने अभ्यास केला. मार्च महिन्याच्या अखेरीस अंतिम सुनावणी होऊन आरोपींना शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांनी पुस्तकरूपाने ते प्रकाशित करायचे ठरविले. वृत्तपत्रातले वार्तांकन आणि पुस्तक लिखाण यात फरक असतोच. काही बातम्यांमध्ये 'कळते'-'समजते'ने वेळ मारून नेली जाते. मात्र न्यायालयीन खटल्याचे वर्णन कसे निर्भेळ असावे यासाठी हे पुस्तक पत्रकारितेत काम करणाऱ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे.
वाघमारे यांनी हे पुस्तक लिहिण्याचे केलेले धाडस त्यांच्या धाडसी वृत्तीचे दर्शन घडविणारे आहे. कारण खटला उभा राहिला, न्यायनिवाडा झाला, व्हायची त्याला शिक्षा झाली की सगळे संपते. उरतात फक्त वृत्तपत्रातील बातम्यांतून शिळोप्याच्या गप्पा. मात्र हा खटला नि त्याच्याशी संबंधित लोकांच्या भूमिका पुस्तकरूपाने तयार करून एक कायमस्वरूपी दस्तऐवज वाघमारेंनी तयार केला आहे. त्यांचा हा दस्तऐवज सर्वच पातळयांवर बिनचूक असल्यामुळेच, दहशतवाद्यांमध्येच ज्यांची दहशत आहे असे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे.
जाता जाता एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, जी हे पुस्तक वाचताना लक्षात आली. सिमीच्या दहशतवादी कारवायांतील सहभागापूर्वी कोणत्याही घटनेला पाकिस्तानचा हात म्हणून सरकार हात झटकून मोकळे व्हायचे. परंतु पाकिस्तान पुरस्कृत या दहशतवादी कारवायांमध्ये जळगावसारख्या धार्मिक सलोखा जोपासणाऱ्या शहरातील मुस्लीम तरुणांचा सहभाग दिसून आला. ह्याला कोणती मानसिकता म्हणावी? तुम्हाला कोणी तरी भडकवतोय आणि तुम्ही वापरले जाताय हे मुस्लीम तरुणांच्या आणि त्यांच्या पालकांच्या, समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरणाऱ्यांच्या कसे लक्षात येत नाही? किंवा लक्षात आले तरी कसे डोळेझाक करतात?
तपास यंत्रणांनी मेहनतीने खटला लढवून दोषींना कडक शासन कसे होईल याची तजवीज केली. तो सगळा वृत्तान्त या पुस्तकात चितारण्यात वाघमारे यशस्वी झाले आहेत. म्हणूनच 'सिमी दी फर्स्ट कन्व्हिक्शन इन इंडिया' हे पुस्तक नसून समाजासाठीचा 'आइना' आहे असे वाटते.
No comments:
Post a Comment