Total Pageviews

Friday 25 August 2017

फुटीरवाद्यांची दुर्बुद्धी!‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यायाने पाकिस्तानशी चीनने वाढवलेली दोस्ती हा नेहमीच भारतासाठी चिंतेचा विषय राहिलेला आहे. चिन्यांच्या विश्‍वासार्हतेला 1962 मध्ये गेलेला तडा आजही कायमच आहे. चीनकडून पाकिस्तानचा वापर एक ‘आर्थिक गुलाम’ म्हणून होत आहे. विकासाचे गाजर दाखवून, मोठ्या आर्थिक मदतीच्या बुरख्याखाली चीनने पाकिस्तानला पूर्णपणे कह्यात घेतले आहे.


By shankar.pawar | Publish Date: Aug 25 2017 6:18AM   अग्रलेख विघ्नहर्त्या श्रीगणेशाचे आज आगमन होत आहे. गणरायाला बुद्धिदेवता म्हणूनही ओळखले जाते. सध्या देशाला अनेक विघ्नांनी ग्रासले आहे आणि त्याला कारणीभूत असलेल्या सर्वांना गणेशाने सद्बुद्धी देऊन विघ्नांचे निवारण करावे अशीच सर्व भारतवासीयांची इच्छा असणेही साहजिकच आहे. डोकलामप्रश्‍नी युद्धाच्या खुमखुमीने सीमेवर उभा असलेला चीन आणि काश्मीरमधील अशांतता ही त्यामधील दोन ठळक विघ्ने आहेत. या दोन्हींमध्ये कुठे तरी पाकिस्तानचा संबंध हा येतोच. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यायाने पाकिस्तानशी चीनने वाढवलेली दोस्ती हा नेहमीच भारतासाठी चिंतेचा विषय राहिलेला आहे. चिन्यांच्या विश्‍वासार्हतेला 1962 मध्ये गेलेला तडा आजही कायमच आहे. चीनकडून पाकिस्तानचा वापर एक ‘आर्थिक गुलाम’ म्हणून होत आहे. विकासाचे गाजर दाखवून, मोठ्या आर्थिक मदतीच्या बुरख्याखाली चीनने पाकिस्तानला पूर्णपणे कह्यात घेतले आहे. पाकव्याप्‍त काश्मीर तर चीनला आंदण दिल्यासारखेच आहे. पश्‍चिमेकडील आघाडीवर चीनने भारताला शह देण्यासाठी अशी उठाठेव केली असतानाच पूर्वेकडे भूतानकडूनही भारताला घेरण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्यामधूनच डोकलामचा प्रश्‍न उद्भवला. चीनच्या जीवावर पाकिस्तानच्या उड्या आहेत आणि पाकिस्तानच्या मदतीवर काश्मीरमधील फुटीरवादी रोज नवे उपद्व्याप करीत आहेत. बुरहान वानीचा खात्मा झाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून काश्मीर खोरे अशांत आहे. अर्थात, त्यामागे ‘हुर्रियत कॉन्फरन्स’ अशा नावाखाली एकत्र आलेल्या मूठभर फुटीरवाद्यांचे कडबोळेच आहे. उघडपणे पाकधार्जिण्या असलेल्या या लोकांनी वर्षभरापासून काश्मीर आणि काश्मिरी लोकांना वेठीस धरले आहे. तेथील तरुणांना बेरोजगार ठेवून त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यांना दगडफेकीसारख्या कृत्यांना भरीस पाडणार्‍या या फुटीरवाद्यांच्या अनेक कारवाया आता अधिक ठळकपणे चव्हाट्यावर आणल्या जात आहेत. पैसे, अंमली पदार्थ, कपडेलत्ते अशी वेगवेगळी आमिषे दाखवून तेथील तरुणांकडून देशद्रोही कामे करवून घेतली जात आहेत. त्यासाठी लागणारा पैसा या फुटीरवाद्यांकडे कसा येतो, हेही आता स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानातून हा पैसा सौदी अरेबिया, बांगलादेश, श्रीलंका, नवी दिल्ली अशा मार्गाने काश्मीरमध्ये येतो. ‘एनआयए’ने विविध ठिकाणी टाकलेल्या धाडींमधून फुटीरवाद्यांच्या या सर्व कारवाया उघड झाल्या आहेत. अनेक बडे फुटीरवादी जाळ्यात अडकलेही आहेत. मात्र, तरीही मीरवाईज उमर फारूखसारखा फुटीरवादी मानभावीपणाने हा पैसा आम्हाला काश्मिरी लोकांकडून व काश्मिरी समर्थकांकडून मिळतो असे सांगतो. अर्थातच, मीरवाईजसारख्यांच्या बरळण्यावर कुणी विश्‍वास ठेवण्यासारखी स्थितीही नाही. हे सर्व फुटीरवादी पाकने पुरवलेल्या पैशावर कोट्यधीश बनले आहेत. भारतात आणि भारताबाहेर त्यांची मोठीच मालमत्ता आहे. ही मालमत्ता उघडही झाली आहे. मात्र, आता काश्मिरी जनतेनेही त्यांचा खरा चेहरा ओळखून राहण्याची वेळ आली आहे. आपल्या कुटुंबाचे भले करून तमाम काश्मिरी लोकांच्या जीवनाचे नरक करणार्‍या या फुटीरवाद्यांना काश्मिरी लोकांनीच भीक घालण्याचे थांबवले तर काश्मीरच्या स्थितीत मोठा बदल घडू शकतो. सध्या त्याद‍ृष्टीनेच अनुकूल प्रयत्न सुरू आहेत, ही समाधानाची बाब आहे. पाकिस्तानात सध्या अराजकासारखीच स्थिती आहे. पनामा पेपर्स प्रकरणात बेहिशेबी मालमत्ता व भ्रष्टाचारप्रकरणी नवाज शरीफ यांना पंतप्रधानपद सोडावे लागले. त्यांच्या विश्‍वासातील, पण भ्रष्टाचाराचे आरोप असलेलाच दुसरा माणूस पदावर आला तरी स्थिती ‘जैसे थे’च आहे. बलुचिस्तान, गिलगिट-बाल्टिस्तान, पाकव्याप्‍त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधातील आवाज आणखी वाढत आहे. अशा स्थितीत निव्वळ चीनच्या साथीने पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्याचे उद्योग सोडलेले नाहीत. आधीच जर्जर असलेल्या एका देशाचा आपल्या देशातील नसता हस्तक्षेप खरे तर भारतासारख्या बलाढ्य देशाने अजिबात खपवून घेणे योग्य नव्हेच आणि सध्याही तसेच होत आहे, हे एक सुचिन्ह आहे. एकीकडे फुटीरवाद्यांच्या ‘एनआयए’च्या माध्यमातून आर्थिक नाड्या आवळल्या जात आहेत तर दुसरीकडे लष्कराने वेचून वेचून काश्मीरमध्ये दडलेल्या दहशतवाद्यांना ठार करण्याचा सपाटा लावला आहे. या ‘एनआयए’ आणि ‘क्‍लीनआऊट’ मोहिमेमुळे पाकधार्जिणे लोक दुहेरी संकटात सापडले आहेत. पीडीपी-भाजप आघाडीचे राज्यसरकारही संयमाने प्रशासनाचा गाडा हाकत आहे. इस्रायलच्या मैत्रीतून भारताने आपल्या भूमीतील परकीय हस्तक्षेप कठोरपणे मोडून काढण्याचा धडा जरी शिकून घेतला तरी ते देशासाठी हितावह आहे. काश्मीरमधील धर्मांध, स्वार्थी फुटीरवाद्यांना काही सद्बुद्धी मिळावी असे आपल्याला जरी वाटत असले तरी तशी शक्यता कमीच आहे, हेही उघडच आहे. अर्थात, त्यांचे दिवस भरले असल्याने त्या विघ्नाची चिंता करण्याचीही फारशी गरज नाही

No comments:

Post a Comment