Total Pageviews

Tuesday, 8 August 2017

सुरक्षा यंत्रणांचे लक्षवेधी कार्य

“लष्कर-ए-तोयबा’ चा काश्‍मीरमधील म्होरक्‍या अबू दुजाना याला त्याच्या साथीदारासह ठार करून भारतीय लष्कराने अतिरेक्‍यांविरुद्धच्या मोहिमेत मोठे यश मिळविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थिती अस्थिर करण्यासाठी दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या मदतीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्याला भारतीय लष्कराकडून वेळोवेळी ‘करारा’ जबाब देऊन अतिरेक्‍यांचे म्होरके खतम करण्याचे सूत्र अवलंबिण्यात आले आहे. अगदी सुरुवातीला “लष्कर-ए-तोयबा’ चा कमांडर बुऱ्हाण वाणी त्यानंतर अबू कासीम आणि आता अबू दुजाना याला ठार करून भारतीय लष्कराने “लष्कर-ए-तोयबा’चे कंबरडे मोडले आहे. दुर्देवाची बाब म्हणजे या दहशतवाद्यांना जम्मू-काश्‍मीरमधील नागरिकांच्या एका विशिष्ट गटाचा पाठिंबा असल्यामुळे अबू दुजाना याला ठार केल्यानंतर पोलीस आणि जवानांवर नागरिकांकडून दगडफेकीचे प्रकार घडले त्यामुळे काश्‍मीर खोऱ्यातील परिस्थिती पुन्हा तणावग्रस्त बनली आहे. असाच प्रकार बुऱ्हाण वाणी आणि अबू कासीम याच्या हत्येनंतरही झाला होता. अबू कासीम याच्या हत्येनंतर “लष्कर-ए-तोयबा’ची सूत्रे आपल्या हाती घेणारा अबू दुजाना हा गेल्या सात-आठ वर्षांपासून काश्‍मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करण्यात सक्रिय होता. त्याला जिवंत पकडण्यासाठी दहा लाखाचे इनामही जाहीर करण्यात आले होते. त्याच्या मागावर लष्कराचे जवान होतेच मात्र यापूर्वी सुमारे पाच-सहा वेळेस तो त्यांना गुंगारा देऊन पसार झाला होता. गेल्या मे महिन्यात त्याला पकडण्यासाठी तो लपून बसलेल्या गावाला जवानांनी वेढाही घातला होता मात्र तेथील नागरिकांनी जवानांवर सारखी दगडफेक केल्यामुळे व गोळीबार केल्यास नागरिक मरतील या भीतीने जवानांनी माघार घेतल्यामुळे त्याला पळून जाण्यात यश आले होते. मात्र यावेळी पुलवामा जिल्ह्यातील हाकरीपोरा येथे मंगळवारी झालेल्या चकमकीत अबू दुजाना याला कंठस्नान घालण्यात लष्कराला यश मिळाले. उधमपूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर झालेला हल्ला, पंपोर येथे लष्करी जवानांवर झालेला हल्ला तसेच अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर केलेला गोळीबार आदी घटनांमागचा अबू दुजानाहा ‘मास्टरमाईंड’ होता. विशेष म्हणजे अबू दुजाना सतत पाकिस्तानच्या संपर्कात असायचा. त्याला पकडण्यासाठी गेल्या कित्येक दिवसापासून भारतीय लष्कराने खास मोहीम सुरु केली होती. सुमारे पंधरा दिवसापूर्वी अबू दुजाना बंदेपुरा येथे असल्याची खबर लष्कराला मिळाली होती त्यावेळी तो चकमा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मात्र जाताना त्याचा मोबाईल मोटारीमध्ये राहिल्याने या मोबाईलच्या साहायाने जवानांना त्यांचा ठावठिकाणा माहित झाला आणि हाकरीपोरा येथे मंगळवारी झालेल्या चकमकीत अबू दुजानाचा खात्मा करण्यात आला. अबू दुजाना हा पाकिस्तानी नागरिक असल्याने त्याच्या मृत्यूची पाकिस्तानला लगेच कळविण्यात आली मात्र पाकिस्तानाने नेहमीप्रमाणे कानावर हात ठेवले असून दुजानाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. अबू दुजानाचा पाकिस्तानला परत जाण्याच्या बेतात असतानाच त्याला ठार करण्यात यश आल्याने दहशतवादी गटांना चांगलाच धक्का बसला आहे. अबू दुजाना जहाल अतिरेकी तर होताच पण ‘अय्याशी’ करण्यातही माहीर होता. त्याची हीच सवय त्याला नडली आणि रात्रीच्या वेळी पत्नी बरोबरच प्रेयसीला भेटण्याच्या प्रयत्नांत तो भारतीय लष्कराच्या जाळ्यात सापडला अशी अधिकृत माहिती आहे. अबू दुजाना यांच्यानंतर आता काश्‍मीर खोऱ्यात आता झकीर मुसा नावाचा एकमेव जहाल दहशतवादी कार्यरत असल्याचे समजते. भारतीय लष्कराचे जवान त्याच्याही मागावर असून लवकरच त्याला पकडण्यात यश येईल व तसे झाल्यास दहशतवादविरोधी मोहिमेला आणखी बळकटी येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवादविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून दहशतवाद्यांची सर्व मार्गाने कोंडी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मध्यंतरी केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाने दहशतवाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास मदत झाली होती. तरीही दहशतवादी संघटनांना ‘बाहेरून’ आर्थिक रसद पुरविली जात होतीच ते लक्षात घेऊन ‘हुरियत कॉन्फरन्स’ सारख्या संघटनांच्या दोन्ही गटांच्या नेत्यांच्या घरांवर ‘एनआयने’ धाडी घालून बेहिशोबी रक्कम मोठ्या प्रमाणावर जप्त केली. ‘हुरियत’चे प्रमुख सईद अली शहा गिलानी यांच्या दृष्टीने तो मोठा धक्का होता. याशिवाय गिलानी यांचे प्रमुख सहकारी मोहम्मद अश्रफ खान यांच्यासह अनेकांना यासंदर्भात स्थानबद्ध करण्यात आले आहे त्यामुळे ‘हुरियत’शी संबधित असणाऱ्यांचे धाबे दणाणलेले आहे. तरी देखील फारूक अब्दुल्ला सारखे राजकीय नेते आपल्या वक्तव्याने काश्‍मीरमधील दहशतवादांना खतपाणी घालीत आहेत. काश्‍मीरमधील दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे हेच त्यामधून प्रकट होते

No comments:

Post a Comment