1-Aug-2017
शेफाली वैद्य
WhatsApp
426
समाज माध्यमांचा एक खूप मोठा फायदा म्हणजे वाचक तुमच्याशी थेट संवाद साधू शकतात. मला बऱ्याच वेळेला इनबॉक्स मधून अगदी खासगी स्वरूपाचे मेसेजेस येतात. काल तसाच एक मेसेज आला. पाठवणारी मुलगी युपीची आहे, कॉलेज मध्ये शिकते. तिचा प्रश्न 'लव्ह जिहाद' बद्दल होता. तिचं म्हणणं होतं की घटनेने कुठल्याही सज्ञान भारतीय नागरिकाला स्वतःला हव्या त्या व्यक्तीशी विवाह करायचे अधिकार दिलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक हिंदू-मुसलमान विवाह हा 'लव्ह जिहाद' समजायचा का? मी तिला सांगितलं की प्रत्येक आंतरधर्मीय विवाह हा अर्थातच 'लव्ह जिहाद' असू शकत नाही, पण बिगरमुस्लिम मुलींना पद्धतशीरपणे प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करणे म्हणजे 'लव्ह जिहाद'. खुद्द सर्वोच्च न्यायालयाने देखील केरळमध्ये 'लव्ह जिहाद' अस्तित्वात आहे हा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) युक्तिवाद ग्राह्य धरूनच एनआयएला चौकशीचा आदेश दिला आहे.
हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ज्या प्रकरणात दिला ते प्रकरण म्हणजे शफीन जहाँ ह्या मुसलमान तरुणाने अथिया ह्या हिंदू मुलीशी केलेला तथाकथित विवाह आणि त्या विवाहानंतर त्या मुलीने केलेलं धर्मांतर. मुलीचे वडिल अशोकन यांनी हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा आरोप केला होता आणि त्या विवाहाविरुद्ध ते कोर्टात गेले होते. सर्व साक्षी पुरावे पडताळून बघितल्यानंतर केरळ हायकोर्टाने त्यांचे म्हणणे मान्य करून शफिन जहा व अथिया यांचं लग्न रद्द करून अथियाचा ताबा तिच्या आई-वडिलांकडे दिला आहे. शफिन जहा यांनी आपलं लग्न रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. ह्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेची बाजू मांडताना ही केवळ आंतरधर्मीय विवाहाची केस नसून हिंदू तरूणींना फूस लावून त्यांचं धर्मांतर घडवून आणण्याचा पद्धतशीर प्रयत्न केरळमध्ये होतोय आणि ह्या धर्मांतराची पाळेमुळे थेट इस्लामी दहशतवादापर्यंत पोचतात असे प्रतिपादन एनआयएतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिंदर सिंग ह्यांनी सर्वोच्च न्यायालयात केले होते. ह्या आरोपाची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने हा चौकशीचा आदेश दिला आहे.
खरेतर हे 'लव्ह जिहाद' प्रकरण नवे नाहीच. २०१० मध्ये केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि कम्युनिस्ट नेते अच्युतानंदन ह्यांनीही कडव्या इस्लामी संघटना 'मॅरेज एन्ड मनी' म्हणजे 'लग्न आणि पैसा' ही दोन शस्त्रे वापरून केरळचे इस्लामीकरण करत आहेत असा गंभीर आरोप केला होता. केरळची चर्च आणि हिंदू संघटना ह्यांनीही ह्या आरोपाला पुष्टी दिली होती. काही दिवसांपूर्वी एका राष्ट्रीय न्यूज चॅनेलवरती देखील 'लव्ह जिहाद' होतो आहे आणि त्यासाठी काही कडव्या मुस्लिम संघटनांनी रेट कार्डही काढले आहेत असा खळबळजनक आरोप करण्यात आला होता. तथाकथित 'प्रागतिक' विचारसरणीच्या लोकांचा ह्यावरच युक्तिवाद म्हणजे, प्रेम हे धर्मातीत असतं त्यामुळे कुठल्याही हिंदू मुलीला मुसलमान मुलावर प्रेम करायचा आणि त्याचा धर्म स्वीकारायचा हक्क आहे. कायदेशीरदृष्ट्या हे बरोबरच आहे, पण असे विवाह करणाऱ्या मुली कुठल्या कुटूंबातून येतात, विवाह करताना त्यांची मानसिक स्थिती काय असते, त्या मुसलमान होणार म्हणजे नक्की काय करणार, त्या एका निर्णयामुळे त्यांच्या कायदेशीर हक्कांमध्ये काय फरक पडू शकतो ह्याची पूर्ण जाणीव त्यांना असते का हे सगळं विचारात घेणं महत्वाचं आहे. मुद्दा दोन भिन्नधर्मीय लोकांनी प्रेमात पडण्याचा नाही किंवा लग्न करण्याचाही नाही. मुद्दा आहे तो लग्नाआधी धर्मांतर करण्याचा.
भारतीय घटनेनुसार दोन भिन्नधर्मीय व्यक्तींना आपापले धर्म न बदलता स्पेशल मॅरेज एक्टखाली विवाह करता येतो. असा विवाह करणाऱ्या स्त्रीचा कुठलाही कायदेशीर हक्क हिरावून घेतला जात नाही. प्रसंगी पतीबरोबर न पटल्यास तिला कोर्टात जाऊन घटस्फोट घेण्याचा, पोटगी मागण्याचा आणि नवऱ्याच्या मालमत्तेवर पत्नी म्हणून अधिकार सांगण्याचा हक्क आहे. पण ज्या स्त्रिया लग्नापूर्वी धर्मांतर करून शरिया कायद्याखाली निकाह करतात त्यांना मात्र ह्या सगळ्या अधिकारांवर पाणी सोडावं लागतं. मुसलमान पुरुषाला शरिया कायद्यानुसार चार वेळेला विवाह करायचा अधिकार आहे. त्याला पत्नीला आवाजी घटस्फोट घ्यायचाही अधिकार आहे, जो अधिकार स्त्रीला नाही. मुसलमान पुरुष स्त्रीला तीन वेळा तलाक म्हणून घटस्फोट देऊ शकतो पण स्त्रीला तो हक्क नाही.
बहुतेक मुली खूप कोवळ्या वयात भावनेच्या भरात त्यांच्या प्रियकरांच्या मानसिक दबावाला बळी पडून धर्मांतराचा निर्णय घेतात. तेव्हा त्यांना सांगितले जाते की 'निकाह पुरता' धर्म बदलायचा आहे. एकदा लग्न झालं की मग ती मुलगी आपापल्या मूळ धर्माच्या चालीरीती पाळू शकते. त्या वेळेला मुलगी खूप दबावाखाली असते. तिच्या घरून तर अश्या लग्नाला बहुधा कट्टर विरोध असतोच, त्यामुळे पळून जाऊन लग्न करणे वगैरे आततायी निर्णय तिने घेतला की माहेरचा उरलासुरला आधारही तिच्यासाठी नष्ट होतो. मग निकाह करून नवऱ्याची मर्जी सांभाळत बसण्याखेरीज तिच्याजवळ दुसरा उपायच नसतो. माझ्या ओळखीच्या एका हिंदू मुलीने असाच वयाच्या अठराव्या वर्षी पळून जाऊन धर्मांतर करून एका मुसलमान मुलाशी निकाह केला. पण काही महिन्यातच त्या माणसाचे खरे स्वरूप तिला कळून चुकले. तो माणूस तिला मारहाण करायला लागला. तिला आपल्या कुटुंबियांच्या करड्या नजरेच्या पहाऱ्यात कोंडून ठेवायला लागला. तिच्या सुदैवाने तिथल्याच एका सहृदय मुसलमान शेजारणीने तिला तिच्या माहेरच्या लोकांशी संपर्क साधायला मदत केली आणि त्यांनी येऊन पोलिसांच्या मदतीने तिची सुटका केली. तिने मग रीतसर विधीपूर्वक परत हिंदू शरण स्वीकारला, वकिलीचा अभ्यास पूर्ण केला आणि आज ती हैद्राबादमध्ये प्रॅक्टिस करते. तिच्या सर्वाधिक पक्षकार आहेत ट्रिपल तलाकने पिडलेल्या मुसलमान महिला. ती मुलगी नशीबवान म्हणून त्या सापळ्यातून तिला बाहेर पडता आलं पण बरेच वेळेला अश्या मुलींना माहेरचा आधार तुटल्यामुळे आहे त्या परिस्थितीत दिवस काढावे लागतात. प्राप्त परिस्थतीशी जुळवून घेत घेत मग ती मुलगी हळूहळू स्वतःच कडवी इस्लाम धर्माभिमानी बनत जाते. प्रख्यात कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा ह्यांच्या 'आवरण' ह्या कादंबरीत हा लव्ह जिहाद कसा होतो ह्याचे फार प्रत्ययकारी वर्णन आहे.
पत्रकार सुनीला सोवनी ह्यांनी 'लव्ह जिहाद' च्या प्रत्यक्ष केसेस मध्ये अडकलेल्या तरुणी, त्यांचे आई-वडील, सामाजिक कार्यकर्ते, वकील आणि मानसोपचारतज्ज्ञ वगैरे लोकांशी बोलून, त्यांच्या मुलाखती घेऊन, विभिन्न घटकांमधल्या, विविध राज्यांमधल्या तरुणींना भेटून 'लव्ह जिहाद - दबलेले भयानक वास्तव' नावाचे एक छोटे पुस्तक लिहिले आहे. ते वाचले म्हणजे ह्या प्रकरणांमधली सुसूत्रता लक्षात येते. एक म्हणजे ह्या लव्ह जिहाद प्रकरणात ज्या मुली प्रामुख्याने फसतात त्यांच्या घरी कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा अभाव असतो. कधी आई-वडिलांबरोबर संवादाचा अभाव, कधी घरात सतत होणारी भांडणे, कधी भीषण गरिबी, तर कधी मुळातच मुलीचा चंचल, बाह्य झगमगाटाला भुलणारा स्वभाव. सुनीला सोवनींच्या मते लव्ह जिहादला बळी पडणाऱ्या बहुसंख्य मुली कुणीतरी आपल्याकडे लक्ष द्यावे ह्यासाठी इतक्या आसुसलेल्या असतात की कुणीतरी रोज आपल्याकडे बघतो, त्याचं हसणं अगदी आमिर खान सारखं आहे इथपासून ते त्याच्याकडे मस्त मोटर बाईक आहे इथपर्यंतचे कुठलेही कारण त्यांच्यासाठी प्रेमात पडायला पुरेसे होते. एकदा मुलगी मुलाकडे आकर्षित झाल्यावर मुलाकडून तिच्यावर भेटवस्तूंचा वर्षाव करण्यात येतो. अगदी नेलपेंट, लिपस्टिक पासून ते महागड्या परफ्युम पर्यंत भेटवस्तू दिल्या जातात. पुढचा टप्पा म्हणजे मुलगा मुलीला फोन घेऊन देतो व घरच्यांना ह्या फोनबद्दल सांगू नको असे बजावतो. अश्या रीतीने मुलीच्या घरच्या लोकांना कळू न देता त्यांचा संपर्क बिनबोभाट सुरु होतो. त्यात मुलगी शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात रहात असली तर प्रकरण अजूनच सोपे होते. केरळमध्ये आपापली गावे सोडून शिक्षणासाठी म्हणून राहिलेल्या मुली मोठ्या प्रमाणात अश्या प्रेम प्रकरणांच्या शिकार होताना दिसतात.
एकदा 'प्रेम' प्रकरण सुरु झाले की दुसरा टप्पा म्हणजे शारीरिक संबंध. सुनीला सोवनींच्या मते हा सगळ्यात धोकादायक टप्पा आहे. प्रेम सिद्ध करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रियकराबरोबर हॉटेलमध्ये किंवा एखाद्या मित्राच्या घरी राहणे. असे करण्यास नकार देणाऱ्या मुलींवर भावनिक दबाव आणला जातो. शारीरिक भूक तर असतेच, त्यामुळे मुलगी प्रियकराबरोबर जायला तयार होते. लग्नाचे वचन तर त्याने दिलेलेच असते. एकदा शारीरिक संबंध आल्यानंतर मग मुलगी पुरतीच फशी पडते. काही वेळेला तिचे चित्रीकरण वगैरेही केले जाते त्यामुळे ती बाहेर पडायचे मनात आले तरी ह्या प्रकरणातून बाहेर पडू शकत नाही. ह्याच दरम्यान निकाहची पूर्वतयारी म्हणून मुलीला इस्लामी रीतिरिवाज पाळायचा आग्रह केला जातो. मुलगी घरी आपल्या आई-वडिलांबरोबर जरी राहत असली तरी तिला आई-वडिलांपासून लपवून नमाजपठण वगैरे करायला सांगितले वाचायला जाते. वाचायला पुस्तके दिली जातात.
शेवटचा टप्पा म्हणजे पद्धतशीर धर्मांतर करवून निकाहनामा करणे. बहुसंख्य मुली आपल्या कायदेशीर हक्कांविषयी अगदीच अनभिज्ञ असतात त्यामुळे त्यांना धर्मांतर केल्यामुळे आपण कुठल्या हक्कांवर पाणी सोडतोय ते मुळात कळतच नाही. त्यातही एखाद्या शिकलेल्या, जागरूक मुलीने स्पेशल मॅरेज एक्टखाली विवाह करायची गोष्ट काढलीच तर 'मला धर्माचे काही नाही, पण माझ्या आई-वडिलांच्या खुशीसाठी तू एवढेही करू शकत नाहीस का? हेच का तुझे माझ्यावरचे प्रेम?' वगैरे भावनिक ब्लॅकमेल करून मुलीला निकाहनामा करण्यासाठी राजी केले जाते. एव्हाना मुलगी मुलामध्ये मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या इतकी गुंतलेली असते की ती सारासार विचार करण्याच्या पलीकडे गेलेली असते. मुलीच्या आईवडिलांना कळलेच तर बरेचदा ते ही 'आता ती आम्हाला मेली' असे म्हणून तिच्याकडे पाठ फिरवतात, त्यामुळे तिच्यापुढे दुसरा काही पर्यायही राहिलेला नसतो. आपल्या मुलीच्या भल्यासाठी हायकोर्टापर्यंत धाव घेणारे अथियाच्या वडिलांसारखे पिता विरळाच.
जरी एखाद्या केसमध्ये मुलीने धर्मांतर केले नाही तरी ह्या विवाहातून होणारी मुले मात्र इस्लाम धर्मियच असतील असा अलिखित करार असतो. एव्हाना ब्रेनवॉश झालेल्या मुली हे सगळं मान्यही करतात. ह्या सगळ्यासाठी आखाती देशांमधून प्रचंड प्रमाणात पैसे येतो असे एनआयएचे म्हणणे आहे. अश्या धर्मांतर झालेल्या कित्येक युवती केरळमधून आयसीसच्या 'धर्मयुद्धात' सामील होण्यासाठी सीरियाला गेल्याच्या केसेस केरळ पोलिसकडे आहेत.
भिन्नधर्मीय विवाह होऊच नयेत असे कोणीच म्हणणार नाही. एकविसाव्या शतकात आपला जोडीदार स्वतः निवडायचा हक्क सगळ्यांनाच आहे, पण आपण धर्मांतर करतोय म्हणजे काय करतोय ह्याची पूर्ण कल्पना धर्मांतर करणाऱ्या मुलींना आहे का? अश्या विवाहांमध्ये पैशाची मोठ्या प्रमाणात देवाण घेवाण होते आहे का? असे विवाह करणाऱ्या मुलींचं पुढे काय होतं? नवऱ्याने तलाक देऊन हाकलून दिले तर तिच्यापुढे नक्की कुठला मार्ग असतो? असे विवाह करणाऱ्या लोकांशी कडव्या इस्लामी संघटनांचा नक्की काय संबंध असतो ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी करणं देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचं आहे. म्हणूनच 'लव्ह जिहाद' हे प्रकरण केवळ दोन भिन्नधर्मीय व्यक्तींपुरतेच मर्यादित राहात नाही.
- शेफाली वैद्य
No comments:
Post a Comment