प्रलोभनांच्या बळावर धर्मप्रचार
हिंदूंचे पवित्र क्षेत्र असलेल्या तिरुपतीत अन्य पंथाच्या लोकांना धर्मप्रचार करण्यास बंदी असतानाही ख्रिश्चन धर्मप्रचारक कपट आणि प्रलोभनांच्या आधारावर आपल्या धर्माचा प्रचार-प्रसार करण्याचा उद्योग करीत आहेत. विडंबना ही आहे की, स्वत:ला धर्मनिरपेक्षतेचे ठेकेदार समजणारे राजकीय पक्ष बहुसंख्यकांच्या श्रद्धेशी होणार्या या खेळाबाबत मौन बाळगून आहेत, तर दुसरीकडे सेक्युलॅरिझमच्या रक्षणाचा विडा उचलण्याचा दावा करणार्या माध्यमातील एका मोठ्या वर्गाला या घटनेची साधी माहिती घेण्याचीही आवश्यकता वाटली नाही. का? कल्पना करा, ख्रिश्चन किंवा इस्लामशी संबंधित निषिद्ध पवित्र ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी धर्मप्रचार करण्याचा प्रयत्न केला असता, तर केवढा गहजब उडाला असता? असे झाले असते, तर सेक्युलॅरिस्टांच्या या टोळीने हिंदुत्ववाद्यांवर जातीय उन्माद पसरवत असल्याचा आरोप करीत गदारोळ माजविला असता. भारतात प्रचलित सेक्युलॅरिझम बहुसंख्यकांच्या श्रद्धेवर वज्रप्रहार आणि धार्मिक कट्टरवादाच्या पोषणाचा पर्याय आहे, ही गोष्ट खरी नाही काय?
तिरुमला तिरुपती देवस्थानम् स्थित व्यंकटेश्वर मंदिर तिरुमला, शेषाद्री, गरुडाद्री, व्यंकटाद्री, नारायणाद्री, वृहाद्री आणि अंजानाद्री या सात पर्वतांनी वेढलेले हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथील २५० किलोमीटरच्या परिघात हिंदूंव्यतिरिक्त कुणा अन्य धर्म, पंथाचा प्रचार आणि प्रसार निषिद्ध आहे. या पूर्ण परिसरात लिखित, मौखिक स्वरूपात अन्य धर्मांच्या प्रचार-प्रसारास बंदी आहे. अर्थात अन्य मत, पंथीयांच्या प्रवेशाला बंदी नाही, परंतु त्यांना देवस्थानम्मध्ये प्रवेश करण्यापूर्वी व्यंकटेश्वराप्रति आपली श्रद्धा व्यक्त करणार्या पत्रकावर स्वाक्षरी करावी लागते. एवढ्यातच मंदिरासमोर ‘मोंदीठोका’ या पाद्र्याला ख्रिश्चन धर्माचा प्रचार-प्रसार करतानाचा व्हिडीओ सार्वजनिक झाल्यावर स्वाभाविकपणे हिंदू समाजात त्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली. देवस्थानात काम करणारे कर्मचारी हिंदू आहेत आणि स्वाभाविकपणे व्यंकटेश्वराविषयी त्यांच्या मनात श्रद्धा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चर्चचे प्रचारक प्रलोभनाच्या बळावर तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचार्यांमध्ये आपल्या धर्माच्या प्रसार-प्रचारात गुंतले आहेत.
चर्चच्या अशा प्रकारच्या धर्मांतरण अभियानाला जेव्हा विरोध करण्यात येतो, तेव्हा चर्चच्या हातात हात घालून सेक्युलर मंडळी हिंदुत्ववादी संघटनांना उपासनेच्या अधिकाराचे डोज पाजतात आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेतल्याचा आरोप करतात. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की आमच्या देशात चर्चची नेहमीच या ना त्या कारणाने कुरकुर सुरूच असते. ‘आमचा छळ होतो’ या एकाच मुद्याला धरून त्यांचे राजकारण सुरू असते. भारतात ख्रिश्नचांची स्थिती पाकिस्तान आणि बांग्लादेशाच्या तुलनेत खूप चांगली आहे. ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम हे दोन धर्म भारतात येण्यापूर्वीपासूनच सनातन धर्म सर्व धर्म सत्याकडेच जातात, असा उद्घोष करीत आला आहे. एकं सत्य विप्रा: बहुधा वदन्ति. सनातन धर्मात ३३ कोटी देवी-देवतांना मान्यता आहे, हा त्याच्या उदारमतवादी आणि सहिष्णू असल्याचा पुरावा आहे. हिंदू धर्म तर येशू ख्रिस्ताला राम आणि कृष्णाच्या अवतारात फार पूर्वीपासूनच पाहात आला आहे.
भारतातील ख्रिश्चन धर्माचा इतिहास खूप जुना आहे. येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या काही काळानंतर सेंट थॉमस यांचे केरळच्या समुद्रकिनार्यावर आगमन झाले आणि त्यांच्यासमवेत काही स्थानिक नागरिकांनी या धर्माचा स्वीकार केला. स्थानिक नागरिकांनी एक नवीन देवता येशूला मानणार्यांचे स्वागत करून त्यांना संपूर्ण सहकार्य केले. शतकांपासून हे लोक अन्य धर्मपंथाच्या अनुयायांबरोबर शांती आणि बंधुभावाच्या वातावरणात राहिले. कित्येक शतकांपर्यंत येशू ख्रिस्ताचा धर्म भारतातील अन्य धर्म पंथांबरोबरच वाढत, बहरत होता. हे ख्रिश्चन नागरिक सीरियन चर्चला मानणारे होते. समस्या तेव्हा निर्माण झाली, जेव्हा क्रुसेड (धर्मयुद्ध) च्या नावाखाली पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश भारताच्या समुद्रकिनार्यावर उतरले आणि शक्ती, छळ व फसवणुकीच्या बळावर त्यांनी येथील नागरिकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास बाध्य केले. जेथे लोक आर्थिक दृष्टीने गांजलेले असतात त्यांच्यात पाश्चिमात्यांकडून आलेल्या प्रचंड पैशाच्या बळावर व फसवणूक करून चर्चकडून धर्मप्रचाराचे कुटिल उद्योग केले जातात.
जेव्हा १३ व्या १४ व्या शतकात पोर्तुगीज भारतात आले तेव्हापासून भारतीय संस्कृतीशी ख्रिश्चॅनिटीचा संघर्ष अधिक वाढला. त्यांना ख्रिश्चन धर्माचे येथील स्वरूप, जे कुठल्याही पद्धतीने युरोपातून नियंत्रित नव्हते आणि तेथील रीतिरिवाजांना मानत नव्हते, पसंत पडले नाही. पोर्तुगीजांबरोबर रोमन कॅथॉलिक चर्चचे आगमन झाले. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : राईटिंग ऍण्ड स्पीचेस’ च्या पाचव्या खंडातील पान क्रमांक ४३४ ते ४४१ पर्यंत दोन्ही चर्चेसमधील संघर्ष आणि रोमन कॅथॉलिक चर्चने सीरियन चर्चचे अस्तित्व नष्ट करण्याचे कशा प्रकारे प्रयत्न केले यावर विस्तारपूर्वक चर्चा केली आहे. डॉन ऍलॅक्सिज डि मेंडिसला गोव्याचा आर्चबिशप बनविण्यात आले. त्याचे प्रारंभिक धोरण नवीन अनुयायी घडविण्यापेक्षा जुन्या लोकांना आपल्या अधीन करण्याचे होते. लष्करासमवेत दक्षिणेकडे आगेकूच करताना त्याने सीरियन चर्चला आपले वर्चस्व मान्य करण्यास सांगितले. प्रारंभिक विरोध व संघर्षानंतर मेडिसने घडविलेला हिंसाचार पाहून सीरियन चर्चने शरणागती पत्करली. साम, दाम, दंड, भेद यांच्या साह्याने मेंडिसच्या माध्यमातून पोपचा साम्राज्यवाद पसरला.
भारतात पोपचा साम्राज्यवाद आताही त्याच धोरणाच्या आधारे वाढत आहे. विदेशी पैशाच्या बळावर, तसेच फसवणूक, छळ, कपटाचा आश्रय घेऊन धर्मांतर करीत असल्याचा आरोप चर्च नाकारू शकत नाही. वस्तुत: धर्मांतरावर राष्ट्रीय चर्चा घडून आली पाहिजे आणि जबरदस्तीने किंवा कुणाला प्रलोभन दाखवून होत असलेल्या धर्मपरिवर्तनाला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशात कठोर व्यवस्था लागू करण्यात आली पाहिजे. मात्र, सेक्युलॅरिस्टांमुळे निर्माण झालेल्या कित्येक समस्यांपैकी एक असलेला धर्मांतराचा मुद्दा आता उग्र स्वरूप धारण करीत आहे. भारतात धर्मांतराची दोन प्रमुख कारणे आहेत. सामाजिक-आर्थिक विषमता आणि शोषणामुळे उद्भवणारा असंतोष हे पहिले प्रमुख कारण आहे. परंतु, जोपर्यंत चर्चच्या व्यवस्थेत दलित ख्रिश्चनांची भागीदारी निश्चित होत नाही, तोपर्यंत धर्मांतरित ख्रिश्चनांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीत परिवर्तन होण्याची शक्यता कमी आहे. भारतीय ख्रिश्चन स्वभावत: देशभक्त आणि धर्मभीरू आहेत. चर्चच्या व्यवस्थेत एकाधिकार ठेवणारा वर्ग त्यांच्या धार्मिक भावना दडपून टाकून आपले वर्चस्व राखण्यास समर्थ आहे. दलित ख्रिश्चनांची स्थिती त्या दलित जातींपेक्षा अधिक दयनीय आहे, जे संघर्षाचा मार्ग स्वीकारून पुढे जाण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
दुसरे कारण व्यक्तिगत लाभासाठी धर्मांतराचा स्वीकार हे आहे. मात्र, हे तितकेसे उपद्रवी नाहीत आणि अशा मूठभर धर्मांतरित ख्रिश्चनांना चर्च व्यवस्थेत चांगला लाभ होतो. प्रश्न त्या दलित आणि वंचित वर्गाचा आहे, ज्यांना सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक संपन्नेचे मृगजळ दाखवून त्यांची फसवणूक करण्यात आली. जर चर्च भारतात येनकेनप्रकारेण आपली संख्या वाढविण्याचा उद्योग सातत्याने करीत आहे, तर मग जनगणनेच्या वेळी त्यांची संख्या वाढलेली का दिसत नाही? हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. धर्मांतरितांपैकी बहुतांश आपले धर्मांतर गुप्त राखतात. ते सार्वजनिक स्वरूपात याला स्वीकारत नाहीत. त्यांची नावे केवळ चर्चच्या रजिस्टरमध्येच नोंदली जातात. स्वातंत्र्यानंतर मेघालय, नागालॅण्डसारखे काही भारतीय प्रांत ख्रिश्चनबहुल झाले आहेत. काश्मिरी पंडितांचा छळ आणि त्यांच्या पलायनाच्या वार्ता वर्तमानपत्रात बर्याचदा प्रकाशित झाल्या आहेत. परंतु, हे खूप कमी लोकांना माहीत असेल की मिझोरममधून गैरख्रिश्चन रियांग जातीच्या लोकांना हाकलून देण्यात आले आहे. चर्चच्या धर्मांतराच्या कारवायांना वेसण घालण्याची आवश्यकता आहे.
-
No comments:
Post a Comment