ब्रह्मपुत्रेची हाक ऐकणार कोण? (संजीव शहा)
- संजीव शहा
रविवार, 23 नोव्हेंबर 2014
काश्मीरमधील पुराकडं संपूर्ण देशाचं लक्ष गेलं. त्या ठिकाणी मदतकार्यही वेगानं सुरू झालं. मात्र, आसाममधील पुराकडं देशाचं लक्ष ज्या प्रमाणात जायला हवं, त्या प्रमाणात गेलं नाही. त्यामुळंच देशाच्या मुख्य प्रवाहात आपण नसल्याची भावना ईशान्य भागातील लोकांची झाली आहे. या राज्यांच्या समस्यांकडंही प्राधान्यानं बघायला हवं...
मेघालयातील स्थानिक लोकांनी उभारलेला बांबूचा पूल.
‘सरहद’ संस्थेतर्फे काश्मीर पूरग्रस्त भागाचा दौरा आणि तेथील पूरग्रस्त नागरिकांसाठीचं मदतकार्य नुकतचं करून आलो होतो. त्यामुळं काश्मिरी नागरिकांच्या परिस्थितीबाबत सगळी कल्पना होती, तेथील घटना मनात ताज्या होत्या. त्याच वेळी सायंकाळी दूरचित्रवाणीवरील विविध वाहिन्यांवरील बातम्यातून आसाममधील पुराची आणि त्यामुळं झालेल्या वित्तहानीची छोटीशी बातमी व काही दृश्यं दाखवली जात होती. त्या बातमीतील ब्रह्मपुत्रेचं रौद्र स्वरूप व पुरानं ईशान्येकडील राज्यांची झालेली वाताहत पाहून मन हेलावून गेलं. हा पूर काश्मीरपेक्षा जास्त रौद्र असूनही ब्रह्मपुत्रेच्या पुराबद्दल काश्मीरच्या तुलनेनं माध्यमांकडून कमी जागरूकता होत असल्याची माझी भावना झाली. असं का? हा प्रश्न पडला आणि ब्रह्मपुत्रेच्या पुरामुळं उद्ध्वस्त झालेल्या, बेघर झालेल्या आणि निराधार झालेल्या बांधवांसाठी काम करण्याचा ‘सरहद’नं निर्णय घेतला आणि मग अभ्यास सुरू केला तेव्हा या प्रश्नाचे अनेक पैलू लक्षात येऊ लागले. पहिली गोष्ट म्हणजे ‘नेमेची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणं दर दोन वर्षांनी येणारा पूर हा आसामवासीयांनाच नाही तर जगालाही नवीन नसतो. ‘नित्य मरे त्यास कोण रडे’ या उक्तीप्रमाणं हा पूर दरवर्षीच थैमान घालणार, त्यात नवीन काय? आणि तिसरं महत्त्वाचे म्हणजे इथलं मागासलेपण आणि वेगळेपणाची तसेच देश आपली काळजी करत नाही ही असलेली तीव्र भावना.
आर्थिक, शैक्षणिक दृष्टीनंही ईशान्य भारतातील ही सात राज्य देशाच्या मुख्य प्रवाहापासून जरा फटकूनच असतात. इथं आदिवासींच्या अनेक जाती-जमाती, त्यांचे प्रश्न आणि श्रद्धाही वेगवेगळ्या, त्याही विखुरलेल्या. त्यांच्या गरजाही अत्यल्प. भारतीयांनी ईशान्येकडं तसं दुर्लक्षच केलं आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न असा ईशान्य भारत परकीयांच्या हस्तक्षेपामुळं सतत अशांतच राहिला.
काश्मीरमध्ये ‘सरहद’ संस्थेच्या माध्यमातून गावा-गावांत संपर्क आहे. त्याचप्रमाणं ईशान्य भारतातही संपर्क प्रस्थापित करण्याचा आणि या भागातील जनतेला मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा यथाशक्ती प्रयत्न करण्याचा संकल्प करून सरहद संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर व मी गुवाहाटीला गेलो. गुवाहाटी विमानतळावर आसाम गण परिषदेच्या उपाध्यक्षा आणि आसाममधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अलका सरमा आम्हाला घ्यायला आल्या होत्या. ईशान्य भारतात सरहद संस्थेच्या सहकार्यानं अनाथ मुलं आणि विधवा महिलांसाठी दीर्घकालीन काम करण्याचा योजना त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. मूळ मुंबईच्या असलेल्या अलका सरमा हिंदी, आसामी, मराठी, गुजराती आणि इंग्रजी चांगल्या पद्धतीनं बोलतात. आसाम गण परिषदेचे प्रमुख नेते नागेन सरमा यांच्याशी लग्न करून त्या आसाममध्ये स्थायिक झाल्यानंतर दोनदा विधानसभेत निवडूनही आल्या. (नागेन सरमा आसाममध्ये आसाम गण परिषदेचे सरकार असताना मंत्री झाले आणि मंत्री असतानाच उल्फा अतिरेक्यांनी त्यांच्या मोटारीच्या ताफ्यावर बाँबहल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली.)
अलका सरमा यांच्यासोबत आम्ही ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावरील पूरग्रस्त भागांना भेट दिली. तिबेट-चीनमधून उगम पावून अथांग अशी ब्रह्मपुत्रा नदी आसामच्या आडव्या पट्ट्यात आत शिरते व पूर्ण आसाम व्यापत दुसऱ्या बाजूनं बांगलादेशात प्रवेश करते तिथून बंगालच्या उपसागरात विलीन होते. या प्रवासात तिला ४८ नद्या येऊन मिळतात व तिचं पात्र रुंदावत जातं. तिची लांबी उगमस्थानापासून २ हजार ९०० किलोमीटर आहे. इतकी लांब व रुंद की जणू समुद्रच. या हंगामात आतापर्यंत आसाममधील विविध भागांत ११ वेळा पुराचे तडाखे बसले आहेत. यामुळे पूर्ण आसाम राज्यामधील जवळपास ८० टक्के जनजीवन कोलमडून पडलं आहे. असंख्य घरं, पिकं, रेल्वेलाइन्स, महामार्गाचं प्रचंड नुकसान झालं आहे. संपूर्ण ईशान्य भारतात पुरामुळं प्रवास करणं अवघड झालं आहे. याशिवाय आसाममधील गॅरोहिल्स या भागात ढगफुटी झाल्यामुळं तीन हजारांहून अधिक घरे वाहून गेली आहेत व पाचशेहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. मात्र, दुर्दैवानं येथील पुनर्वसन कार्यापासून जग अनभिज्ञ आहे.
१९५४ पासून आजपर्यंत आसाममधील पुरामुळं झालेल्या नुकसानीची जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यानुसार अडीच हजारांपेक्षा जास्त गावं पूर्णपणे नष्ट झाली आहेत व ९० हजारेंपेक्षा जास्त कुटुंबांना याचा फटका बसला आहे. केंद्र सरकार बदलल्यानंतरही ईशान्य भारतासाठी परिस्थिती बदलल्याची चाहूलही नाही. या वर्षीच्या इतक्या भीषण पुरानंतर आणि मनुष्य तसेच वित्तहानीनंतरही केवळ एका केंद्रीय मंत्र्यानेच आसामला भेट दिली आणि त्यावरही आसामला पूर काही नवीन नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा गोष्टींचा नकारात्मक परिणाम ईशान्य भारतातील जनतेवर नेहमीच होतो.
ब्रह्मपुत्रेच्या पुरामुळं बाधीत लोकांच्या पाहणीसाठी आणि पुनर्वसनासाठीच्या दौऱ्यात येथील विविध क्षेत्रांतील लोकांशी चर्चा केल्यानंतर प्रामुख्यानं एक गोष्ट लक्षात आली, की ही समस्या एक राष्ट्रीय समस्या म्हणून घोषित करावी, अशी मागणी ईशान्य भारतातील अनेक नेते, विचारवंत आणि पत्रकार अनेक वर्षांपासून करीत आहेत आणि केंद्रातील प्रत्येक सरकार त्याकडं सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत आहे, असा या भागातील जनतेचा समज झाला आहे. सध्या इंडियन एक्स्प्रेसचे सहसंपादक असलेले व डॉ. भूपेन हजारिका पुरस्काराचे मानकरी समुद्रदास कश्यप यांच्या घरी या भागातील समस्या, पूर, योजना, मदत यांबद्दलच चर्चा केली. कश्यप हे ईशान्य भारतातीाल घडामोडींविषयक महत्त्वाचे पत्रकार मानले जातात. त्यांची हीच खंत आहे.
मोठमोठ्या पर्वतरांगांनी, वादळाच्या वेगानं वाहणाऱ्या नद्यांनी आणि मध्येच असलेल्या बांगलादेशानं त्यांना आपल्यापासून तोडलं आहे. शिक्षणाअभावी आणि वेगळेपणाच्या मनात बिंबलेल्या भावनांमुळं इथला तरुण अतिरेक्यांच्या जाळ्यात सहजच सापडतो. या पर्वतरांगा हा भूप्रदेश मुख्य भारतीय प्रवाहापासून वेगळा करतात, त्याबरोबर इथं हिंसाचार, दहशतवाद आणि सशस्त्र अतिरेकी कारवाया ही आता नित्याचीच बाब झाली आहे.
ही सगळी चर्चा करीत असतानाच मेघालयाची राजधानी शिलाँगला जायचं ठरलं. आम्ही तिथं गेलो तेव्हा स्थानिक लोक एकत्र येऊन तेथील नदीवर बांबूच्या पुलाची उभारणी करत होते. आधीचा मोठा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं पलीकडील गावाचा संपर्क तुटला होता. शाळा आणि बाजारपेठ पलीकडील गावात असल्यानं संपर्कासाठी काहीच साधन नव्हतं. सरकारकडून लोकांची काही अपेक्षाही नव्हती. सगळे गावकरी एकत्र आले. प्रत्येकानं स्वतःच्या घरून दोन-दोन बांबू आणले व श्रमदानासाठी घरटी एक माणूस बाहेर पडला. सरकारची वाट न पाहता पुलाचं काम सुरू केलं. कसलीही अगतिकता नाही की लाचारी नाही की आता खंतही नाही.
असे प्रश्न सोडविण्याची आता या नागरिकांना जणू सवयच झाली आहे.
या सात राज्यांतील आसामचा विचार करताना जाणवतं ते येथील बहुतांशी प्रदेश सपाट आहे. तेथील भौगोलिक परिस्थिती कारखान्यांसाठी तसेच औद्योगिक विकासासाठीही पूरक आहे. तिथे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते; परंतु प्रभावी नेतृत्वाचा अभाव हीसुद्धा एक मोठी समस्या आहे. एकंदरीत ही सात राज्ये अडगळीत असल्यासारखी बाजूला पडली आहेत. त्यांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत किंवा उर्वरित भारतापर्यंत पोचत नाही. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आसाममधूनच राज्यसभेवर गेले असले, तरी त्यांच्याविषयी या भागात आदर नाही. इथं रोजगाराच्या संधी नसल्याने कामाच्या शोधात येथील नागरिक दुसरीकडे स्थलांतरित होतात, तर सीमावर्ती पट्ट्यामध्ये स्वस्तातील बांगलादेशी मजूर आसाममध्ये येतात. ईशान्य भारताची ९८ टक्के सीमा आंतरराष्ट्रीय म्हणजे बांगलादेश, नेपाळ, भूतान, चीन व म्यानमार या देशांच्या सीमेला जोडली गेली आहेत. त्या दृष्टीनं या भागाचं संरक्षणात्मकदृष्ट्याही महत्त्व खूपच अधिक आहे. सीमेवरचा मोठा भाग बंद नसल्यामुळे लोकांचं सीमा पार करून येणे-जाणे चालू असते. त्याला क्रॉस बॉर्डर ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणतात. त्याने देशाच्या सुरक्षिततेलाही धोका वाढला आहे. आम्ही तिथल्या लोकांशी बोलणी सुरू केली, पण लक्षात आले यांच्याशी संवाद साधणे अशक्य आहे. यातला मोठा अडसर म्हणजे भाषेचा. तेव्हा अलका सरमा व ज्योती दास यांनी दुभाषकाचे काम केले.
यांच्याशी चर्चा करता-करता जवळच असलेल्या त्यांच्या झोपड्यात आम्ही पाहुणचार घेतला. फक्त बांबूच्या पट्ट्या त्यावर मातीचे लिंपण यांनी तयार केलेल्या भिंती. स्वच्छ, नीटनेटक्या झोपड्या, जवळच्या झाडांवरच्या रानटी फळांचा मधूर रस व तांदूळ आंबवून घरीच बनवलेली दारू हा पाहुणचार येथे प्रत्येकासाठी असतो. प्रत्येक झोपडीत धाग्यातून तयार करण्यासाठी हातमागाची यंत्रे होती. सुती वस्त्र तयार होत होती. सगळेच स्वतःच्या कापडाची गरज स्वतः भागवतात. झोपडीबाहेर झाडे, त्यावर रेशमी किडे, अळ्या, कोष यांची शेती. रेशमी धागा तयार होत होता. कुठलेही शिक्षण नाही की प्रशिक्षण नाही.
आमच्यासाठी स्वतः एवढ्या दुःखात असतानाही काही आदिवासींनी आमच्या मनोरंजनासाठी रंगीबेरंगी पारंपरिक वस्त्रे नेसून पारंपरिक नृत्य केलं. कुठं रडगाणं, खंत अथवा अपेक्षा काही नाही. सारे काही सरळ, साधे, सोपे. या आदिवासींनी आम्हालाही त्यांचे कपडे, दागिने घालून त्यांच्यासोबत गायला, नाचायला लावले. आम्हीही त्यांचे मित्र झालो. या सात राज्यांच्या काही समस्या सारख्या, तर काही वेगवेगळ्या आहेत. आसाम वगळता बाकी राज्यांमध्ये डोंगर, दऱ्या, नागालॅंड, मणिपूर, आसाम व त्रिपुरा या राज्यांमध्ये कित्येक दशकांपासून अशांतता व अतिरेकी कारवाया सुरू आहेत. हा भाग सतत अशांत असल्यामुळे तिथे मोठे उद्योगधंदे काढण्यासाठी मोठी गुंतवणूक करण्यासाठी कुणाची तयारी नाही. त्यामुळे नवीन उद्योगांची उभारणी होत नाही व आधीच मागासलेला प्रदेश अधिक मागासलेला होत आहे आणि मुख्य प्रवाहापासून दुरावत चालला आहे.
कला, हस्तकौशल्य कलाकुसर व शेती हाच इथला पारंपरिक उद्योग व उपजीविकेचे साधन. इथल्या तरुण हातांना रोजगाराचे नवनवीन कौशल्य, उद्योग, शिक्षण हवे आहे. पर्यटन हे नवीन विकसित होत असलेले क्षेत्र आहे. त्याचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने खास प्रयत्न व पुढाकार घेतला पाहिजे. पर्यटनासाठी तिथे प्रचंड वाव आहे. ही सगळी परिस्थिती पाहता या ईशान्य भारतातील आपल्या दुर्लक्षित बांधवांना मदत करायला हवी. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ या भेटीमुळे बदलला. यांच्यासाठी ‘सरहद’तर्फे व्यावसायिक कौशल्याचं प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला गेला आहे. एकतर आदिवासींना इकडे आणणं आणि तिथं प्रशिक्षण केंद्र उभारणं. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे सहकारी तत्त्वावर अनेक मोठी केंद्रे, कारखाने व कामे चालतात, त्या धर्तीवर इथेही को-ऑपरेटिव्ह सोसायटीची उभारणी करायला हवी. यासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत.
ईशान्य भारतातील युवकांशी संपर्क साधून त्यांना मुख्य प्रवाहाशी विशेषतः महाराष्ट्राशी जोडण्यासाठी पूर्वोत्तर सात राज्यांना जोडणारी एक सायकल रॅली फेब्रुवारी २०१५ मध्ये काढण्याचे ठरले आहे. त्यासाठी मुष्टियुद्धाची जागतिक सुवर्णपदक विजेची मेरी कोमनेही पुढाकार घेण्याचं आश्वासन दिलं आहे.
सरहद संस्थेच्या ‘आश’ या प्रकल्पाद्वारे प्रामुख्याने जम्मू-काश्मीर व ईशान्य भारतातील निराधार, बेरोजगार, विधवा आणि अर्धविधवा महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांच्या हस्तकलांसाठी विक्री केंद्रे सुरू करण्यात येत असून, पहिले केंद्र डिसेंबर महिन्यात पुण्यात सुरू होत असून, नंतर मुंबई, गोवा आदी भागांत सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
आसाममधील आमच्या या दौऱ्यानंतर एक गोष्ट आम्हाला जाणवली ती म्हणजे पूर्वोत्तर भागातील लोकांमध्ये पारंपरिक कलाकुसरीचं प्रचंड असं ज्ञान आहे. या ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर संपूर्ण भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ मिळू शकते. काश्मीर आणि आसाममधील पुराची तुलना करणे हा या लेखाचा हेतू नाही. मात्र, काश्मीरच्या पूरग्रस्तांसाठी काम करत असतानाच आजवर सतत दुर्लक्षित राहिलेल्या ब्रह्मपुत्रेच्या सुपुत्रांसाठीही पुढाकार घ्यायला हवा. हजारो लोक बळी पडले, लाखो लोक बेघर झाले आणि किती तरी स्थलांतरित झाले. वर्षानुवर्षे अत्यंत भीषण अवस्थेत जगणाऱ्या ईशान्य भारतातील या दुर्लक्षित बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि निरागसता जपण्यासाठी आणि त्यांना मुख्य भारतीय प्रवाहाशी जोडण्यासाठी ब्रह्मपुत्रेच्या हाकेला साद द्यायला हवी
No comments:
Post a Comment