Total Pageviews

Wednesday, 5 November 2014

IRON MAN SARDAR VALLABHBHAI PATEL

भारताला भावनात्मक स्वरूपात एकतेच्या सूत्रात बांधणार्‍या सरदार पटेल यांची जयंती नुकतीच साजरी झाली. हा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. कॉंग्रेस या कार्यक्रमाला राजकीय चष्म्यातून पाहात असेल, तर यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. कारण तिच्या (कॉंग्रेसच्या) परंपरेत भारताचे स्वातंत्र्य आणि त्यानंतर आधुनिक भारताच्या जडणघडणीत केवळ एका विशिष्ट वंशाचेच योगदान आहे. भारताला एक समृद्ध आणि सशक्त राष्ट्र घडविण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणार्‍या सुपुत्रांची एक प्रदीर्घ शृंखला आहे. मात्र, कॉंग्रेस एका विशिष्ट परिवाराचेच गुणगान करण्यात आघाडीवर आहे. भगवान राम, श्रीकृष्ण, गुरुनानक देव यांच्यापासून शीख गुरूंची मोठी परंपरा आहे. छत्रपती शिवाजी, महाराणा प्रताप, अमर शहीद भगतसिंग, महात्मा गांधी, बाळ गंगाधर टिळक, लाला लाजपतराय, बिपिनचंद्र पाल, डॉ. हेडगेवार, वीर सावरकर इत्यादींची तपश्‍चर्या आणि बलिदान हे राष्ट्र कधीतरी विसरू शकेल काय? केवळ भिन्न विचारसरणी आहे म्हणून कुणा देशभक्त, थोरपुरुष किंवा अवतारी पुरुषांचे योगदान दुय्यम ठरवायचे काय? कॉंग्रेस स्वातंत्र्यापूर्वी राजकीय पक्ष म्हणून कमी आणि स्वातंत्र्यासाठी लढणारी संघटना म्हणूनच अधिक परिचित होती, ही वस्तुस्थिती आहे. यात हिंदू महासभा समाजवाद्यांपासून सर्व प्रकारच्या विचारसरणीचे लोक सहभागी झाले होते. आणि, हे देखील ऐतिहासिक सत्य आहे की, सरदार पटेल आणि पंडित नेहरू, दोघांचेही विचार आणि भारतीय इतिहासाप्रति त्यांचा दृष्टिकोन अनेक विषयांत वेगवेगळा होता. परंतु, देशाचे स्वातंत्र्य या एकमात्र ध्येयाने या दोघांना एकत्र बांधून ठेवले होते. जेथे एकीकडे पंडित नेहरू समाजवादी आणि डाव्या विचारसरणीच्या चष्म्यातून भारत आणि उर्वरित जगाला बघत होते, तर दुसरीकडे पटेल यांची मानसिकता विशुद्ध स्वरूपात भारताची सनातन संस्कृती आणि राष्ट्रवादाने प्रेरित होती. भारताच्या बहुलतावादी सनातन संस्कृतीवर आस्था असल्याने सरदार पटेल खर्‍या अर्थाने सेक्युलर होते. मात्र, त्यांची धर्मनिरपेक्षता व्होट बँकेेने प्रभावित नव्हती. त्यांचा सेक्युलॅरिझम सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या आड आला नाही, ज्यास पंडित नेहरूंनी विरोध केला होता. जर सरदार पटेल यांनी दृढनिश्‍चय दाखविला नसता, तर आज सोमनाथचे प्रकरणही अयोध्येप्रमाणे वादग्रस्त राहिले असते. पटेल श्रद्धावान होते. दुसर्‍यांच्या श्रद्धांचा सन्मान करीत होते. मात्र, राष्ट्रहित आणि भारताच्या सनातन परंपपरेची किंमत देऊन नाही. पंडित नेहरूंच्या नेतृत्वात कॉंग्रेसने पटेल यांच्या वैचारिक अधिष्ठानाला त्यांच्या मृत्यूबरोबरच तिलांजली दिली आणि त्यांचे कर्तृत्व, राष्ट्रकार्य हे लोकांच्या विस्मृतीत जाईल, यादृष्टीने सुनियोजित षडयंत्र रचले. त्यामुळे यात मुळीच आश्‍चर्य नाही की केंद्र सरकार अनुदानित डझनभर योजनांपैकी पटेल यांच्या नावावर केवळ एकमात्र योजना आहे आणि बाकी सर्व गांधी-नेहरू वंशाला समर्पित आहेत. शाहबानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवणे, मुसलमानांना समान नागरी कायदा लागू न करणे, हज अनुदान, मदरशांसाठी अनुदान, मुल्ला-मौलवींना मुसलमानांच्या नेत्याच्या रूपात स्वीकारणे, धर्माच्या आधारावर दहशतवाद्यांची मुक्तता करणे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून सर्वसंमतीने प्रस्ताव पारित करणे, या सगळ्यांना पटेल यांच्या सेक्युलॅरिझममध्ये काहीही स्थान नाही. सरदार पटेल धर्माच्या आधारावर नागरिकांमध्ये भेदभाव करण्याच्या विरोधात होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ज्या लोकांना (डाव्या विचारसरणीशी संबंधित) पंडित नेहरूंचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाठिंबा होता, तेच लोक सरदार पटेल यांचे प्रखर टीकाकार होते. एवढेच नव्हे, तर त्यांना त्यावेळी ज्या शिव्या देण्यात येत होत्या (फॅसिस्ट, जातीयवादी, मुस्लिमविरोधी वगैरे) त्याच आज नरेंद्र मोदी आणि भाजपाला देण्यात येतात. याचे काय कारण आहे? याचे कारण स्पष्ट आहे की, संघ परिवाराच्या वैचारिक अधिष्ठानाची मूळ प्रेरणा भारताची सनातन संस्कृती आहे, ज्यामुळे सरदार पटेलही प्रेरित होते. तिबेट गिळंकृत केल्यानंतर आता चीनची वक्रदृष्टी भारताकडे वळली आहे, याकडे अन्य राष्ट्रनिष्ठ लोकांव्यतिरिक्त सरदार पटेल आणि तत्कालीन सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांनीही देशाचे लक्ष वेधले होते. परंतु, डाव्या कम्युनिस्टांच्या प्रभावामुळे दीपून गेलेल्या पंडित नेहरूंनी याकडे दुर्लक्ष केले आणि परिणामी १९६२ मध्ये भारताला चीनकडून मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. काश्मीरची समस्या पंडित नेहरूंच्या अदूरदृष्टीचा जिवंत पुरावा आहे. काश्मीरचे तत्कालीन महाराजा हरिसिंह प्रखर देशभक्त होते. दुसरीकडे आपल्या विकृत सेक्युलॅरिझमने प्रभावित होऊन कट्टर धर्मांध-जातीयवादी आणि महाराजांचे शत्रू शेख अब्दुल्ला यांना पाठिंबा देत होते. या पार्श्‍वभूमीमुळेच महाराजा हरिसिंह आपले राज्य भारतात विलीन करण्यासंदर्भात संभ्रमावस्थेत होते. पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने जेव्हा टोळीवाल्यांनी काश्मीरवर हल्ला केला तेव्हा त्यांनी भारतात काश्मीर विलीन करण्याची लिखित सहमती अगदी वेळेवर पाठविली होती, परंतु पंडित नेहरूंनी काश्मीर विषय स्वत:कडेच ठेवला होता, ज्यात सरदार पटेल यांचा हस्तक्षेप किरकोळ होता. शेख अब्दुल्लांच्या राष्ट्रविघातक कारवाया सरदार पटेल यांच्यापासून लपल्या नव्हत्या. त्यांनी या संदर्भात पंडित नेहरूंना सावध करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शेख अब्दुल्लांप्रति प्रेम उफाळून आल्यामुळे पंडित नेहरूंनी त्यांचे काहीएक ऐकले नाही. जर पटेल नसते, तर कदाचित काश्मीरप्रमाणेच देशात अशा प्रकारची अनेक रक्तरंजित प्रकरणे राक्षस बनून आम्हाला त्रास देत राहिली असती. पंडित नेहरू आणि सरदार पटेल, दोघांनाही जवळजवळ ७५ वर्षांचे आयुष्य लाभले. सरदार पटेल यांच्या मृत्यूनंतर (१५ डिसेंबर १९५०) ‘मॅन्चेस्टर गार्जियन’ ने लिहिले होते, ‘एकाच व्यक्तीला विद्रोही आणि मुत्सद्दी या दोन्ही रूपात क्वचितच यश प्राप्त होते. परंतु, या संदर्भात पटेल अपवाद होते.’ भारताच्या रक्तरंजित फाळणीच्या वेळी देशी संस्थानांच्या विलीनीकरणाच्या प्रश्‍नावर त्यांनी जो राजकीय दृढनिर्धार आणि दूरदर्शीपणा दाखविला तो त्यांच्या समकालीन नेत्यांपैकी खूप कमी जणांमध्ये आढळून येतो. त्यांच्या करिष्मापूर्ण नेतृत्वाविषयी ‘लंडन टाईम्स’ ने लिहिले होते, ‘भारतीय संस्थानांच्या एकीकरणाचे त्यांचे कार्य त्यांना बिस्मार्क आणि कदाचित त्यांच्यापेक्षाही उच्च स्थान प्राप्त करून देते.’ त्यांच्या संदर्भात विन्स्टन चर्चिल यांचे मत होते, ‘अशा व्यक्तीने भारताच्या सीमांच्या आत स्वत:ला मर्यादित ठेवू नये, संपूर्ण विश्‍वाला त्यांच्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे’. याच उद्देशाने गुजरात सरकारने सरदार पटेल यांची प्रतिमा, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ निर्माण करण्याचे कार्य सुरू केले आहे. ही जगातील सर्वात उंच (१८२ मीटर) प्रतिमा असेल. आपल्या उंचीसाठी काही प्रतिमा विश्‍वात प्रसिद्ध आहे. यात ब्राझिलच्या रियो दी जानेरोस्थित ‘ख्राईस्ट द रीडिमर’ (३९.६ मीटर), रशियाच्या व्होल्गोग्रेडस्थित ‘द मदरलॅण्ड कोल्स’ (८५ मी.), अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ (९३ मी.), जपानची ‘उशीकु दाइबुत्सु’ (१२० मी.), चीनची ‘स्प्रिंग टेंपल बुद्धा’ (१५३ मी.) यांचा समावेश आहे. खरे तर आज एकात्म, एकीकृत भारत सरदार पटेल यांचे सर्वात मोठे स्मारक आहे. एक कुशल प्रशासक असल्यामुळे कृतज्ञ राष्ट्र त्यांना ‘लोहपुरुष’ म्हणूनही त्यांची स्मृती जागवितो. या देशी संस्थानांचे विलीनीकरण करून भारताची कालजयी संस्कृती आणि सभ्यता याला त्यांनी एक मूर्त रूप दिले. बलवीर पुंज

No comments:

Post a Comment