मुंबई हल्ल्यातून काय शिकलो?
26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली. साहजिक या हल्ल्यातून सरकारने किंवा सुरक्षा यंत्रणांनी काय धडा घेतला असा प्रश्न मनात येतो. त्या दृष्टीने विचार करायचा तर त्या हल्ल्यानंतर एकूण सुरक्षा व्यवस्थेत काही बदल झाले. मुंबई पोलिसांच्या निदान कमांडोजना तरी आधुनिक शस्त्रे पुरवण्यात आली. परंतु हे प्रयत्न दहशतवादी हल्ले थांबवण्यात पुरेसे आहेत का असा प्रश्न निर्माण होतो.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु या कटू घटनेच्या स्मृती अजुनही कायम आहेत. त्याच बरोबर दहशवादी कारवायांचे सावटही कायम आहे. साहजिक मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यातून सरकारने किंवा सुरक्षा यंत्रणांनी काय धडा घेतला असा प्रश्न अनेकांच्या मनात येणे साहजिक आहे. त्यादृष्टीने विचार करायचा तर त्या हल्ल्यानंतर एकूण सुरक्षा व्यवस्थेत काही बदल झाले आहेत ही समाधानाची बाब म्हणायला हवी. त्याच बरोबर मुंबई पोलिसांच्या निदान कमांडोजना तरी आधुनिक शस्त्रे पुरवण्यात आली आहेत. शिवाय बुलेटप्रूफ जॅकेट आणि बुलेटप्रूफ चिलखती गाडय़ाही पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्याच बरोबर समुद्रावरच्या सुरक्षेतसुध्दा वाढ करण्यात आली आहे. परंतु हे सारे प्रयत्न दहशतवादी हल्ले थांबवण्यात पुरेसे आहेत का असा प्रश्न निर्माण होतो. आपण समुद्र मार्ग बंद केला तर दहशतवाद्यांकडून हवाई मार्ग किंवा दुसरे काही हातखंडे वापरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहशतवादाचे आव्हान कायम असून त्याचा सामना करण्यासाठी सतत दक्ष रहावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे बॉम्बस्फोट प्रकरणी राजधानी दिल्लीत अटक करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोघांचा मराठवाडय़ाशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडे दहशतवाद्यांच्या मराठवाडा कनेक्शनविषयी चर्चा होताना दिसते. त्याला पुष्टी देणारी नवी माहिती आता समोर आली आहे. त्याच बरोबर दहशतवादी आपले जाळे कसे वाढवत आहेत हेही स्पष्ट होत आहे. त्यामुळेच यापुढे सुरक्षा यंत्रणांनी अधिक सतर्कता बाळगण्याबरोबर दहशतवादी शक्तींना कोणत्याही प्रकारे मदत न करण्याबाबत जनतेत पुरेशी जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
मुंबईवरील हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी सरसकट अनेकांची कत्तल केली. त्यात हिंदू- मुस्लिम हा काही प्रकार नव्हता. अनेक भारतीय मुस्लिम नागरिक रेल्वे स्टेशनवरील हल्ल्यात मारले गेले. हा हल्ला संपता संपताच मुंबईतील काही प्रमुख धर्मगुरूंनी अशी मागणी केली होती की, या हल्ल्याचा प्रतिकार करताना ठार मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना आपल्या देशात दफन करू नये. परंतु मुंबई स्फोटांची `छोटी मोठी घटना’ अशी संभावना करणार्या आपल्या तत्कालीन गृहमंत्र्यांनी या मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे गुप्तपणे परंतु रितसर आणि धार्मिकरित्या तळोजा कारागृहाबाहेर दफन केले. जे परकीय नागरिक आपल्या देशात येऊन येथील नागरिकांची सर्रास कत्तल करतात. त्यांना या देशात धार्मिक रितीरिवाजानुसार दफन करण्याचा अधिकार कोणी दिला? खरे तर या हल्ल्याचा प्रतिकार करताना भारतीय जवानांकडून मारले गेलेले दहशतवादी आणि या प्रकरणात फाशी गेलेला दहशतवादी हे सर्व पाकिस्तानचे नागरिक होते. आंतरराष्ट्रीय प्रथेनुसार त्यांचे मृतदेह वा त्यांचे अवशेष पाकिस्तानातील त्यांच्या नातेवाईकांच्या सुपूर्त करणे हा उत्तम मार्ग होता. त्याद्वारे आपसूकच पाकिस्तानी नागरिकांचा या हल्ल्यातील सहभाग चव्हाटय़ावर आला असता. परंतु मतपेढीचे राजकारण करणार्या मंडळींना हे कसे सूचणार? इतिहासाचाच दाखा घ्यायचा झाला तर 1764 मध्ये पानिपतनंतर मराठय़ांचे साम्राज्य परत दिल्लीपर्यंत पसरले तेव्हा महादजी शिंदे यांनी कुतूबशहाची कबर खोदून त्याचा सांगडा बाहेर टाकला होता. हा तोच कुतूबशहा ज्याने पानिपतच्या लढाईत जनकोजी शिंदे यांचा अपमान केला होता आणि त्याच्या मृत शरीरावर अत्याचार केले होते. राक्षसी वृत्तीच्या शत्रूशी कसे वागावे याचा हा धडाच होता. परंतु आधुनिक राजकारण्यांना हा इतिहास ठाऊक नाही आणि तसे वागण्याची धमकही त्यांच्या अंगी नाही.
खरे तर दहशतवादाविरूध्द लढाई जिंकण्यासाठी त्याचा पाकिस्तानात असलेला स्त्रोत कमजोर करण्यात आजपर्यंत आपल्याला यश मिळालेले नाही. आजवर भारतात झालेल्या बहुतांश दहशतवादी हल्ल्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याचे दिसून आले आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तान लष्कर-ए-तोयबाला दहशतवादी संघटनाच मानायला तयार नाही. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आजसुध्दा लष्कर-ए-तोयबाला भरभक्कम पाठिंबा आहे. बकरी ईदसारख्या सणासुदीला तिथले लोक लष्कर-ए-तोयबाला उघडपणे भरघोस मदत करतात. या सार्या परिस्थितीचा विचार करता पाकिस्तानात दहशतवादी तयार करण्याची फॅक्टरी सुरू राहील तोपर्यंत दहशतवादही सुरूच राहणार हे उघड आहे. याला मुख्य कारण आजपर्यंत दहशतवादाविरूध्द आपण आक्रमक भूमिका घेणार अशी केवळ पोकळ धमकीच दिली गेली आहे. 2001 मध्ये दिल्लीत संसदेवर हल्ला झाल्यानंतर भारतीय लष्कराने अशा प्रकारच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानवर सिमित हल्ले करण्याची योजना आखली होती. परंतु प्रत्यक्षात 2006 मध्ये मुंबईच्या लोकलमधील बॉम्बस्फोट आणि 2008 मध्ये मुंबईवरील हल्ला झाल्यानंतरसुध्दा त्या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली नाही. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील लोकांना दहशतवादाला पाठिंबा देण्याची किंमत चुकवावी लागत नाही तोपर्यंत हे असेच सुरू राहणार आहे. अशा परिस्थितीत सीमेवर कुरापत काढून गोळीबार करण्याच्या पाकिस्तानी मनोवृत्तीला आपण त्यांच्यावर दसपट जास्त गोळीबार करून योग्य वेळी उत्तर दिले. त्यामुळे भविष्यकाळात पाकिस्तान शस्त्रसंधी तोडायला धजावेल असे वाटत नाही.
नेमके हेच दहशतवादी हल्ल्याबाबतही लागू पडते. आज पाकिस्तानला कळून चुकले आहे की, भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर नवे सरकार त्याचे प्रत्युत्तर हवाई हल्ल्याने देईल. कारण ज्या प्रकारे नरेंद्र मोदींनी या आधीच्या सरकारवर दहशतवादाविरोधात कचखाऊ धोरण अंमलात आणण्यावरून टीका केली होती. त्यावरून आज दहशतवादी हल्ल्याला जशास तसे उत्तर देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्या सरकारपुढे असणार नाही. तसे न केल्यास सरकारची जनमानसातील लोकप्रियता आणि विश्वासार्हता नष्ट होईल आणि असे होणे नरेंद्र मोदींना मुळीच मान्य असणार नाही. अशा प्रकारच्या प्रत्त्युत्तराच्या भितीमुळे यापुढील काळात दहशतवादी हल्ल्यांवर चाप बसला जाण्याची शक्यता आहे. परंतु पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर तिथल्या सरकारचे किंवा लष्कराचे कितपत नियंत्रण आहे हा मोठा प्रश्न आहे. तिथल्या सरकारला नको असतानासुध्दा भारतावर हल्ला करण्याचे मनुसबे हे दहशतवादी नक्कीच अंमलात आणू शकतात.
No comments:
Post a Comment