Total Pageviews

Sunday, 2 November 2014

जामा मशिदीचे शाही इमाम -पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना आमंत्रित केलेले नाही

ही मस्ती उतरविलीच पाहिजे!-दिलीप धारुरकर देशात सार्वत्रिक निवडणुका आल्या की, जे राजकारणी गुडघे टेकून विनंती करतील त्या राजकीय पक्षाला ‘सेक्युलर’ ठरवून त्यांना मुस्लिमांनी मते द्यावीत असा फतवा काढणारे दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम आता निवडणूक नसतानाही बरेच चर्चेत आले आहेत. एरवी हे महाशय कधीच बातम्यांमध्ये नसतात. आता हे एकदम चर्चेत आले याचे कारण यांनी एक अगोचरपणा केला आहे. आपल्या जागी आपला मुलगा १९ वर्षाचा मुलगा शाबान बुखारी याला आपल्या गादीवर नायब इमाम म्हणून घोषित करण्याचा दस्तारबंदी नावाचा कार्यक्रम यांनी २२ नोव्हेंबर रोजी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला या इमामाने मुद्दाम ठरवून भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना आमंत्रित केलेले नाही. एखाद्या मशिदीतील कोणत्याही कार्यक्रमात कोणाला आमंत्रित करावे हा त्या मशिदीच्या इमामाचा अधिकार आहे हे मान्य. दिल्लीतील या मशिदीत एरवी वर्षभरात अनेक कार्यक्रम होतही असतील आणि त्याला हे इमाम बुखारी महाशय कोणाला बोलावतात आणि कोणाला नाही याची चर्चाही होत नाही. मात्र या दस्तारबंदीच्या कार्यक्रमाला यांनी नरेन्द्र मोदी यांना बोलावले नाही याची इतकी चर्चा यासाठी होते आहे की यांनी या कार्यक्रमाला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलावले आहे. एवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाही तर या इमामाने नरेन्द्र मोदी यांना का बोलावले नाही याची जी कारणमीमांसा जाहीरपणे टीव्ही चॅनेलवर जाणीवपूर्वक बोलून केली आहे ती जास्तच आक्षेपार्ह आहे. हे सय्यद अहमद बुखारी महाशय टीव्ही वाहिनीवर बोलताना म्हणाले की, ‘या कार्यक्रमात नरेन्द्र मोदी यांनी यावे असे देशातील मुस्लिमांना वाटत नाही. मोदी यांनी एकाच समुहाबाबत न बोलता संपूर्ण देशातील जनतेबाबत बोलले पाहिजे. मोदी जर आपला दृष्टिकोन बदलतील तर देशातील मुसलमानही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतील.’ पुढे एका प्रश्‍नाला उत्तर देताना हे इमाम उद्दामपणा अधिक वाढवत म्हणाले की, देशातील मुस्लिमांनी मोदी यांना निवडून दिलेले नाही.’ या देशात कोणताही राजकीय अभिनिवेश नसलेल्या नागरिकालाही संताप यावा असे तारे या महाशयांनी तोडले आहेत. मुळात या बुखारी महाशयांच्या या सर्व बडबडीमध्ये एक मस्ती आहे. आपण देशातील सर्व मुस्लिमांचे एकमुखी प्रवक्ते आहोत अशी एक स्वयंघोषित मस्ती या विधानातील शब्दाशब्दातून व्यक्त होते आहे. या देशातील सरकारे बदलली की प्रत्येक सरकारमधील पंतप्रधान किंवा प्रमुख हे दिल्लीच्या या जामा मशिदीच्या इमामापुढे गुडघे टेकतात हा इतिहास आहे. राजकीय स्वार्थासाठी हे लांगूलचालन असते हे अगदी उघड आहे. नरेन्द्र मोदी यांनी सद्भावना उपवास केला त्यावेळी मुस्लिम मौलवी वापरतात तशी गोल टोपी स्वीकारली नव्हती. त्याची खूप चर्चा त्यावेळी झाली होती. त्यावर मोदी यांनी अगदी स्पष्ट शब्दात स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणतात की केवळ ढोंग म्हणून मुसलमानी पद्धतीची टोपी का घालायची? जी टोपी धार्मिक कृत्ये करताना घालायची असते, तसा कोणताही धार्मिक प्रसंग नसताना केवळ कोणाला तरी बरे वाटावे म्हणून खोटे खोटे परिधान करणे मला मंजूर नाही. मोदी यांनी आपकी अदालत या कार्यक्रमात त्यांच्यावरील आरोपांना उत्तरे देताना ही भूमिका स्पष्टपणे मांडली होती. महात्मा गांधी, सरदार पटेल, पं. नेहरू यांनीही कधीच असली टोपी घातली नव्हती, हेही त्यांनी त्यावेळी बोलताना निदर्शनास आणून दिले होते. मात्र ही भूमिका समजून न घेता मोदी यांनी टोपी घालायला नकार दिला, याची इतकी आक्रमक प्रसिद्धी केली गेली आणि विनाकारण इतकी टीकेची झोड उठविली गेली की जणू मोदी यांनी काहीतरी घोर अपराधच केला! या देशातील मल्टीकम्युनल लोकांना जातीय, पंथीय अहंगंडांना कुरवाळायची आणि राष्ट्रीय एकात्मता, देश, राष्ट्र अशी भाषा करणार्‍यांना जातीय म्हणून हिणविण्याची इतकी सवय लागली आहे की, त्यांना तर मोदी यांनी टोपी नाकारण्याच्या घटनेने जणू आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. कसे कचाट्यात सापडले मोदी अशा आविर्भावात हे सगळे आपली शस्त्रे धार लावून तुटून पडले! धर्मनिरपेक्षतेची ढोंगी भाषा करणार्‍या असल्या मल्टीकम्युनल लोकांमुळे शाही इमाम बुखारी यांच्यासारख्या पंथवेड्या लोकांची मस्ती पोसली जात असते. शाही इमाम इतकेच या देशातील निरपेक्षतेचे नाव घेत लांगूलचालन करणारे हे नतद्रष्ट मल्टीकम्युनलही तेवढेच दोषी आहेत. या इमाम बुखारीसमोर व्ही. पी. सिंग गुडघे टेकताना छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. पंतप्रधान नाही पण कॉंग्रेसच्या पंतप्रधानांना कळसुत्रीप्रमाणे खेळविणार्‍या सोनिया गांधी या लोकसभा निवडणुकीच्या आधी इमाम बुखारी यांना भेटून मतांची भीक मागतानाची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली आहेत. इमाम बुखारी यांनी सोनिया गांधींना पाठिंबा दिला असताना सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसची इतकी वाईट अवस्था झाली की सत्ता तर नाहीच, पण लोकसभेत विरोधी पक्षनेता होण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळही मिळाले नाही. देशातील ज्या अनेक लोकसभा मतदारसंघात मुस्लिमांची निर्णायक मते आहेत, त्या सर्व मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले. याचा अर्थ जामा मशिदीच्या सय्यद अहमद बुखारी या शाही इमामाची सद्दी संपली. देशातील मुस्लिम समाजाने यांच्या फतव्यानुसार मतदान करण्याचे सपशेल नाकारले. अनेक जागरूक मुस्लिम नरेन्द्र मोदी यांच्याविरोधात होणार्‍या अपप्रचाराला परस्पर सडेतोड उत्तरे देऊ लागले आहेत. इंडिया टीव्हीच्या आप की अदालत या मालिकेत एका कार्यक्रमात रजत शर्मा यांनी प्रेक्षक म्हणून विविध स्तरातील मुस्लिम बांधवांनाच बोलावले होते. नरेन्द्र मोदी यांच्या बाबत त्यांच्या मनात जे प्रश्‍न आहेत ते त्यांनी मोकळेपणाने विचारावेत असे आवाहन शर्मा यांनी केले. त्या सर्व प्रश्‍नांना मोदींनी नव्हे, मोदी यांच्यावर प्रेम करणार्‍या अहमदाबादमधील बीएमडब्ल्यू गाडीच्या शोरूमचे मालक आणि गुजरातमधील एका सुशिक्षित मुस्लिम महिलेनेच उत्तरे दिली होती. या कार्यक्रमातील प्रत्येक प्रश्‍नाला आपल्याला आलेल्या प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे या दोघांनी मोदींच्या भूमिकेला योग्य ठरविले होते. राजकारणी आपल्या दारात येऊन आपल्यासमोर गुडघे टेकतात, या एकाच गोष्टीची धुंदी चढलेल्या शाही इमामांना या देशातील मुस्लिम समाजाच्या मनात काय खळबळ चालली आहे याची जाणीवच झालेली दिसत नाही. बकाल वस्त्या, गाड्या दुरूस्त्या, पंक्चरचे दुकान, वाहनावर ड्रायव्हर नाही तर क्लिनर अशी कामे करत जगणारा मुस्लिम तरुण हे चित्र या फतवे काढणार्‍या इमामांना दिसतच नाही. या पार्श्‍वभूमीवर ‘सबका साथ सबका विकास’ हा नारा देणारे नरेन्द्र मोदी आता मुस्लिम समाजातील अनेकांना आकर्षण वाटू लागले आहेत. नरेन्द्र मोदी यांच्याबाबत कांगावखोर विरोधकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर जी बदनामी केली होती, त्यामुळे मोदी यांना व्हिसा नाकारणार्‍या अमेरिकेला सव्वाशे कोटी भारतीय जनतेने मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपला स्पष्ट बहुमत देऊन या बलाढ्य देशाला अक्षरश: नमविले. अमेरिकेला नाक घासत मोदी यांना आपल्या देशात सन्मानाने बोलवावे लागले. या पार्श्‍वभूमीवर मोदी यांनी अमेरिकेत जे विचार व्यक्त केले त्यामध्ये भारतातील दहशतवादाबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘भारतातील दहशतवाद बाहेरून आलेला आहे. भारतीय मुसलमान देशभक्त आहेत. बाहेरून येणार्‍या दहशतवादाला ते हाणून पाडतील.’ या तीन वाक्यात देशाबाहेरून येथे दहशतवाद केवळ प्रार्थनापद्धतीच्या वेगळेपणाच्या आधारे पेरणार्‍या राक्षसी वृत्तीला इशारा होता, भारतीय मुस्लिमांबाबत प्रगाढ विश्‍वास होता, भारतीय मुस्लिमांना दहशतवादाच्या विरोधात उभे राहण्याचे एक आवाहनही होते. मात्र शाही इमामांना यातले काहीच कळलेले दिसत नाही. त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना या कार्यक्रमाला बोलावले आहे. मोदींचा अपमान करण्याच्याच उद्देशाने त्यांना मुद्दाम डावलले. इमाम बुखारीचे निमंत्रण हे काही व्हाईट हाऊसचे निमंत्रण नाही. ते दिले काय आणि नाही दिले काय यात मोदी यांना काही फरक पडणार नाही. फरक पडणार आहे तो इमाम बुखारी यांना. फरक पडणार आहे तो इमाम बुखारी यांच्याकडे पाहण्याच्या देशातील एकशे वीस कोटी नागरिकांच्या दृष्टिकोनात. इमाम बुखारी यांना नवाज शरीफ यांना बोलवावेसे वाटते ते कशामुळे? ज्या कारणाने ते मोदी यांना नाकारतात ती कारणे शरीफ यांना लागू पडतात की काय? भारतातील मुसलमान मोदी यांना पसंत करत नाहीत, मात्र नवाज शरीफ यांना पसंत करतात का? आपल्या सडक्या मेंदूतील घाण आणि दुर्गंधी देशातील तमाम मुस्लिम समाजाच्या डोक्यावर लादण्याचा इमाम बुखारी यांचा हा धंदा भारतातील देशभक्त मुस्लिमांनी झुगारून दिला पाहिजे. नरेन्द्र मोदी यांच्याबाबतच्या अपप्रचारामुळे त्यांच्याबद्दल पूर्वग्रह बाळगून सीएनएन या आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाहिनीचे पत्रकार फरीद झकेरिया (औरंगाबादचे एकेकाळचे मुस्लिम विचारवंत व नेते रफिक झकेरिया यांचे चिरंजीव) यांनी नरेन्द्र मोदी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत तर मोदी यांनी त्यांना अत्यंत सकारात्मक उत्तरे दिलीच, पण मुलाखतीनंतर फरीद झकेरिया यांनी म्हटले आहे की, मी मोदी यांच्याबाबत केलेले मूल्यमापन चुकीचे होते. ते एक कणखर व्यक्ती असून अत्यंत चातुर्याने आंतरराष्ट्रीय संबंध तयार करत आहेत. शाही इमाम बुखारी यांनी मोदी यांना मुद्दाम अवमान करण्याच्या हेतूने आमंत्रित न करता पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आमंत्रित केले आणि केलेल्या कृत्याचे जे उद्दाम समर्थन केले त्याबाबत राजस्थानमधील अमीन पठाण म्हणतात की, ‘कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाची कठपुतळी बनून वागणार्‍या बुखारी यांनी सर्व भारतीय जनतेचा घोर अपमान केला आहे. देशातील मुस्लिम समाजाची मान खाली गेली आहे.’ देशातील मुस्लिमांचे आपण एकटेच ठेकेदार असल्यासारखे या इमाम बुखारींनी नरेन्द्र मोदी यांच्याबाबत व्यक्त केलेले विचार देशातील मुस्लिम समाजाला नामंजूर आहेत याची कितीतरी उदाहरणे देता येतील. इमाम बुखारी याने जरा या लोकाकडून काही शिकता आले तर ते त्यांच्या भविष्यासाठी चांगलेच होईल. हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठात कायद्याची परीक्षा देणारा महंमद इस्माईलखान म्हणतो की ‘आता मोदी हे सर्व देशाचे पंतप्रधान आहेत आणि ते आमचेही पंतप्रधान आहेत.’ ‘मोदी यांनी आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मला वाटते की आम्ही त्यांना घाबरण्याची गरज नाही.’ असे बुरखा घालणार्‍या प्राध्यापिका कनीज फातिमा म्हणतात. मानवी हक्कासाठी काम करणारे कार्यकर्ते महंंमद लतीफखान म्हणतात की, लोकशाही पद्धतीने संपूर्ण बहुमताने मोदी निवडून आले आहेत. मुसलमानांनी त्यांना एक संधी दिली पाहिजे. ते काही चुका करतील तर त्यांचा विरोध आम्हीही करू. मात्र त्यांना जनतेने बहुमताने निवडून दिले आहे, आम्ही त्यांचा सन्मान केलाच पाहिजे.’ देशातील सर्वसामान्य मुस्लिम समुदाय या पद्धतीने विचार करत असताना या समाजाचा स्वयंघोषित ठेकेदार इमाम बुखारी मात्र अत्यंत विषारी वक्तव्ये करत मोदी यांचा विरोध करतात ही विसंगती समजून घेतली पाहिजे. बुखारी यांना जी भाषा समजेल, त्या भाषेत मुस्लिम तरुणांनीच त्यांना उत्तरे दिली पाहिजे. प्रश्‍न मुस्लिम समाज आणि त्यांचा ठेकेदार म्हणविणारा बुखारी यांच्यात किती विसंगती आहे इतकाच नाही. मुद्दाम पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रण द्यायचे, मुद्दाम भारतीय जनतेने बहुमताने निवडून दिलेल्या पंतप्रधानांचा अवमान करायचा ही मस्ती आहे. देशापेक्षा, देशहितापेक्षा आम्ही जास्त मोठे असल्याचे दाखविण्याचा एक धोकादायक दर्प यामागे दिसतो आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने भारतीय जनतेने बहुमताने दिलेल्या निर्णयापुढे मान तुकविली. मात्र हा उद्दाम शाही इमाम मात्र मुद्दाम हेतूपुरस्सर उद्धटपणा करण्याच्या मस्तीत आहे. महंत आदित्यनाथ यांनी या शाही इमामाला पाकिस्तानातच हाकलून द्या असे म्हटले आहे. पाकिस्तानात हाकलून देऊन प्रश्‍न सुटणार नाही. भारतात राहूनच यांची मस्ती जिरविण्याचे काम, यांचे डोके ठिकाणावर आणण्याचे काम या देशातील देशभक्तांनी आणि देशभक्त मुस्लिम समाजाने केले पाहिजे.

No comments:

Post a Comment