पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन होत असून, पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात पाच नागरिक ठार झाले आहेत. त्याआधी एक जवान हुतात्मा झाला. जम्मू-काश्मीरमधील पूँच जिल्ह्यातील मेंढर व सावजीन क्षेत्रात पाकिस्तानकडून ही जी आगळीक सुरू आहे, तिला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची पाकिस्तानची खोड नवीन नाही. दोन्ही देशांदरम्यान २००३ मध्ये झालेल्या शस्त्रसंधीचे या ऑक्टोबर महिन्यातच पाकिस्तानने अकरा वेळा उल्लंघन केले आहे. त्यातही गेल्या दोन दिवसांत झालेला उखळी तोफांचा मारा व गोळीबार जास्त गंभीर आहे, असे सरहद्दीलगतच्या गावातील लोकांनी जो अनुभव सांगितला त्यावरून स्पष्ट होते.
भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेला बसलेली खीळ, पाकिस्तानातील कमालीची अस्थिरता, ‘आयएसआय’च्या नव्या प्रमुखाची नियुक्ती, अशी काही कारणे पाकिस्तानच्या या खुमखुमीमागे असू शकतात. हिवाळ्याचा मोसम आता जवळ आला आहे. एकदा तो सुरू झाला, की घुसखोरी करणे अवघड बनते. त्यापूर्वीच घुसखोरी घडवून आणण्याचा डाव यामागे असू शकतो. गेल्या काही वर्षांत याच पद्धतीने, पाकिस्तानी सैन्याच्या मदतीनेच जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी झाली आहे. ‘आयएसआय’च्या प्रमुखपदी रिझवान अख्तर यांची अलीकडेच नियुक्ती झाली. यापूर्वी त्यांनी काही मुलाखतींमधून भारताशी संबंध सुधारल्याशिवाय पाकिस्तानात स्थैर्य निर्माण होणार नाही, असे सांगितले होते. परंतु पाकिस्तानच्या बाबतीत उक्ती आणि कृती यांच्यात नेहमीच अंतर राहिले आहे. स्वतःचे स्थान मजबूत करण्यासाठी भारतविरोधी भूमिका घेणे हे तेथील नेत्यांच्या अंगवळणी पडले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने तेथे आलेल्या राष्ट्रप्रमुखांपैकी बांगलादेशाच्या पंतप्रधानांना मोदी भेटले; परंतु पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भेटण्याचे त्यांनी टाळले. दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याच्या राजनैतिक प्रयत्नांमध्ये निर्माण झालेला अडसरच यावरून स्पष्ट होतो. ईदच्या निमित्ताने वाघा सरहद्दीवर दोन्ही बाजूंकडून मिठाईची देवाणघेवाण करण्याची प्रथा आहे. यंदा मात्र त्या प्रथेला फाटा देण्यात आला. एकीकडे ‘तालिबान’चा धोका आणि दुसरीकडे इम्रान खानसारख्या आंदोलकांना आलेला चेव यामुळे नवाझ शरीफ यांचे सरकार अडचणीत आहे. या सगळ्यावरून लक्ष वळवणे हेही भारताच्या विरोधात कुरापती काढण्याचे कारण असू शकते. इराक व सीरियातील घडामोडींमुळे पश्चिम आशियात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली असून, भारतीय उपखंडातही त्याचे दुष्परिणाम जाणवण्याचा धोका आहे. या परिस्थितीत भारताला खूपच सावध राहावे लागणार आहे.
No comments:
Post a Comment