फोडा आणि झोडा’ या बेरकी नीतीने राज्य करणा-या ब्रिटिशांच्या करणीने १९४७ मध्ये भारताची फाळणी होऊन त्यातून पाकिस्तान हे नवे राष्ट्र निर्माण झाले. त्यानंतरच्या ६७ वर्षांत स्वतंत्र भारतासाठी पाकिस्तान कायमची डोकेदुखी बनला आहे. १९४७ मध्ये काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी बंडखोरांच्या बुरख्याखाली केलेली घुसखोरी, १९६५ मध्ये झालेले युद्ध, १९७१ मध्ये झालेला बांगलादेश मुक्तीचा संग्राम, १९९९ मध्ये कारगिल क्षेत्रामध्ये पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी करण्याची आगळीक अशा चार युद्धांमध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची माती खायला लावली तरी अजून पाकिस्तानला अक्कल आलेली नाही. नेमके हेच गेल्या पंधरवड्यात घटनांनी पुन्हा सिद्ध केले आहे.
दोन्ही देशांच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तसेच आंतरराष्ट्रीय सरहद्दीवर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधी कराराचा भंग करीत भारतीय लष्करी चौक्या तसेच सीमेलगतच्या नागरी वस्त्यांवर जोरदार गोळीबार व तोफगोळ्यांचा भडिमार सुरू ठेवला आहे. त्या हल्ल्यामध्ये काही भारतीय नागरिक ठार झाले आहेत. इम्रान खान व मौलाना मुहंमद ताहिर-उल-काद्री या दोन कडव्या विरोधकांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना विलक्षण राजकीय कोंडीत पकडले आहे. त्यात माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारीदेखील भर घालत आहेत. पाकिस्तानी लष्कराचा पाठिंबा असल्याशिवाय शरीफ विरोधकांच्या अंगात इतके बळ संचारणे शक्यच नाही. पाकिस्तानमधील या राजकीय अस्थैर्यावरून तेथील जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने भारतीय सरहद्दीवर हल्ले चढविण्याचा नेहमीचा सिलसिला सुरू केला आहे. पाकिस्तानच्या या आगळिकीला भारताने चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे, अशी युद्धज्वर चढलेली भाषा लगेच भारतातही बोलली जाऊ लागली.
पाकिस्तानने भारतीय सीमेवर चढविलेल्या हल्ल्याचे पडसाद उमटू लागले ते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचारमोहिमेत! पाकिस्तान भारताच्या सीमेवर हल्ले चढवत असून तरीही या देशाला संरक्षणमंत्री नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात निवडणूक प्रचारात गुंतलेले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. आंतरराष्ट्रीय राजकारणात शेजारी राष्ट्रांशी वर्तन करण्याचे काही संकेत असतात. ते पाळूनच भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यावे, असे अपेक्षित होते. हे वास्तव संरक्षणमंत्रिपद उपभोगलेल्या शरद पवारांना माहीत नाही, असे नाही; पण अशा गोष्टींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यातच त्यांची राजकीय कारकीर्द गेली आहे! देशासमोर उभ्या उग्र आव्हानांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्णपणे पाठ फिरविली आहे, असे सिद्ध झाले तर त्यांच्यावर कडक टीकेचे कोरडे जरूर ओढायलाच हवेत; परंतु मोदी यांनी पाकिस्तानकडून होत असलेल्या हल्ल्यांचे गांभीर्य ओळखून पावले टाकायला सुरुवात केली होती याचे प्रत्यंतर गुरुवारी आले.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला मैत्रीचा प्रस्ताव धुडकावून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे पाकिस्तानला महाग पडेल. भारतावर सातत्याने हल्ले चढविले जात असतील तर त्याची मोठी किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल’, हा केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी दिलेला इशारा पाकिस्तानने गांभीर्याने घ्यायला हवा. पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. यामुळेच सीमेवरचा तणाव निवळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. मोदी अमेरिकेच्या दौ-यावर गेले होते त्याच काळात नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत काश्मीर प्रश्नाला आंतरराष्ट्रीय धग द्यायचा विफल प्रयत्न केला. त्याच व्यासपीठावर मोदींनी शरीफ यांच्या अकांडतांडवाला अनुल्लेखाने मारले. पाकिस्तानच्या भारतातील राजदूताने काश्मीरमधील फुटीरतावादी हुरियत नेत्यांशी चर्चा करण्याचा उद्दामपणा दाखविला होता. त्यामुळे भारताने पाकिस्तानशी परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चाच रद्द केली. पाकिस्तानला आपली घोडचूक कळाली; पण त्यांच्या लष्कराला अक्कल आलेली नाही.
मोदी यांच्या शपथविधीला नवाझ शरीफ पाहुणे म्हणून हजर राहिल्याने आता पाकिस्तान-भारत संबंध सुधारण्यास मदत होईल, असे वाटणारे भाबडे आपल्या देशात कमी नाहीत. दोन्ही देशांच्या मैत्रीचे पद्धतशीर भांडवल करणारेही बोकाळलेले आहेत. पाकिस्तानचे भारताबरोबर नेहमी वाकड्यात शिरणे याला सध्याच्या काळात मुँहतोड जवाब मिळणे आवश्यक होते. तो भारतीय लष्कराने गेल्या दोन दिवसांत चोख प्रत्युत्तराने दिला आहे. काश्मीर प्रश्नाचे कायम भांडवल करून पाकिस्तानने भारतामध्ये दहशतवाद पसरविण्याचे प्रयत्न केले. मुंबईतही भीषण हल्ला घडवला, भारताचे तुकडे करण्याचे मनसुबे बाळगणा-या पाकिस्तानचे नाक ठेचणे व आंतरराष्ट्रीय संकेतांनुसारच आम्ही पाकिस्तानशी बोलणी करणे ही चाणक्यनीती भारताने यापुढेही अवलंबावी. कारण जगात दुबळ्यांचे कोणी ऐकत नाही. ऐकले जाते ते समर्थ राष्ट्राचेच!
No comments:
Post a Comment