Total Pageviews

Thursday, 23 October 2014

FOR GODS SAKE BUY INDIAN -BOYCOTT CHINESE GOODS

दिवाळीची खरेदी करण्यापूर्वी नुकतीच नवरात्रीची धामधूम व गडबड संपली. नवरात्राचे दिवस कसे भारावल्यासारखे निघून जातात कळतच नाही. आता सगळ्यांना वेध लागलेत ते दिवाळीचे! नुकतीच मी दिवाळीसाठी काही सामान खरेदी करण्यासाठी बाजारात गेली होती तेथील सुसंवाद- ‘‘ए, या पणत्या कशा दिल्यात रे! काकू, मोठ्या ६० रु. डझन व लहान ५० रु. डझन.’’ ‘‘बापरे, काही भाव सांगतोस का रे. ४० व ३० रु. डझन दे.’’ हो, नाही करता करता त्याने बिचार्याने ३० रु. डझन या भावाने त्या पणत्या दिल्या. या प्रसंगाने माझ्या मनात विचारांचे काहूर माजले. खरेच हे योग्य आहे का? आपण सोफिस्टिकेटेड म्हणविणारे लोक, बाजारात लहान दुकानदारांशी घासाघीस करतो. हेच बिचार्यांचे कमाईचे दिवस आहेत. आपल्याला महागाई जाणवते; ते तर गरीब व कष्टाळू लोक आहेत. त्यांनी या दिवसात थोडे पैसे जर कमविले तरच ते दिवाळी साजरी करू शकतील. दुसरा एक प्रसंग. मी भाजीबाजारात गेली होती. दोन बायका एका महागड्या गाडीतून उतरल्या व भाजीवाल्याशी भाव करू लागल्या. ६० रु. किलोचे टोमॅटो त्या ४० रुपयात मागत होत्या. शेवटी दुकानदाराने ५० रु. किलो या भावाने टोमॅटो त्यांना विकले. अशा कोत्या वृत्तीला काय म्हणावे आपण? स्टेटस् जपणार्या बायका मोठ्या मॉल्समध्ये जाताात तेव्हा फिक्स रेट व महागडे कपडे खरेदी करतातच ना? तेथे भाव करतात काय? मोठ्या हॉटेलमध्ये गेल्यावर वेटरला ५० ते १०० रु. टीप पटकन देऊन टाकतो आपण. मग या गरिबांशी घासाघीस का? ऑटोवाल्यांना मीटरप्रमाणे किंवा तसेच भरमसाट पैसे मोजतो, पण रिक्षावाल्यांशी कटकट करीत असतो. याला सोफेस्टिकेटेड म्हणायचे का? आता दिवाळीपूर्वी खरेदी करण्यासाठी बरीच गर्दी वाढत आहे. माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की, त्यांनी दिवाळीसाठी खरेदी करताना खालील बाबी लक्षात ठेवाव्यात : १) कृपया, ‘चायना मेड’ वस्तूंची खरेदी करू नका. त्याऐवजी आपल्या कारागिरांनी बनविलेल्या वस्तूंचीच खरेदी करा. २) लवकरात लवकर खरेदी करा, जेणेकरून नंतर बाजारात अफाट गर्दी झाल्यावरचा त्रास वाचेल. ३) कृपया, अधिक घासाघीस करू नका. कारण मोठ्या मॉल्समध्ये आपण फिक्स रेटच्या वस्तू खरेदी करतोच. ४) इको फ्रेंडली दिवाळी साजरी करा. ५) फटाके कमीत कमी फोडा किंवा काहीच न फोडलेत तर अतिउत्तम. कारण त्यामुळे प्रदूषणाचा त्रास वाचेल. ६) आपल्या घरी काम करणार्या माणसांना त्या महिन्याचा पगार तेवढाच अधिक द्या. वर्षांतून एकदा त्यांना अपेक्षा असणारच. ७) जवळच्या एखाद्या झोपडपट्टीत गरीब मुलांना फराळाचे, कपडे व फटाके द्या. बघा, आपल्याला किती आत्मिक समाधान मिळते ते! आपल्या मुलांना पण चांगले वळण लागते व योग्य संस्कार होतात. ८) मिठाईऐवजी ड्रायफ्रुट दिल्यास ते पौष्टिकही असतात व टिकतात. कारण या दिवसात खव्यात जास्त प्रमाणात भेसळ असते. ९) मिठाई चांगल्या दुकानातूनच घ्यावी व लगेचच संपवून टाकावी. १०) दिवाळीत आपल्या भागातील सफाई कामगारांनासुद्धा काहीतरी भेटवस्तू व मिठाई अवश्य द्या, जेणेकरून वर्षभर ते व्यवस्थित स्वच्छता ठेवतील. ११) शक्य असल्यास घरीच फराळाचे बनविल्यास दर्जा व वस्तुमानात तडजोड करावी लागणार नाही. १२) फराळाचे पदार्थ खाताना गोड पदार्थाचे कमीत कमी सेवन करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्या प्रकृतीवर ताण पडणार नाही. १३) फटाके उडवीत असताना मुलांजवळ स्वत: उभे राहून लक्ष ठेवा, जेणेकरून अपघात टाळले जातील. १४) रस्त्यांवर फटाके उडवीत असताना येणार्या-जाणार्या वाहनांवर लक्ष ठेवा. १५) पणत्या व दिव्यांच्या माळा लावल्यावर घरचे मोठे ट्युबलाईट कमीत कमी वापरा, जेणेकरून विजेची बचत होऊ शकेल. १६) दिवाळीत फक्त ‘स्वदेशी’ वस्तूंचाच वापर करा. माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की, सगळ्यांनी गरिबांशी खूप मोलभाव न करता, दिवाळीत चायना मेड वस्तूंचा वापर टाळावा. सगळ्यांना दिवाळी आनंदाची व सुखाची जावो व नवीन वर्षात भरभराट होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! चैत्र पाडव्याची गुढी असो अथवा दिवाळीतील आकाशकंदील, पणत्या अन्‌ शुभेच्छा पत्रके बहुतेकांना या सर्व वस्तू "मेड इन चायना'च हव्या असतात. स्वस्त, मस्त आणि आकर्षक या वैशिष्ट्यांमुळे "चायनीज वस्तू' ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून, भारतीय बाजारपेठांवर त्यांनी आक्रमण केले आहे. "चायनीज फास्टफूड' आणि "चायना मोबाईल' भारतीयांच्या अंगवळणी कधीच पडले आहेत. अगदी खेड्यापासून महानगरापर्यंत प्रत्येकाच्या ओठावर "चायना' नाव पोचले आहे. भारतीय सण, उत्सवांचे महत्त्व ओळखून त्यानुसार चायना कंपन्यांनी आपली उत्पादने तयार केली आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड सारख्या शहरात "चायना बाजार' नावाने स्वतंत्र दालनेच आहेत. चिनी बनावटीच्या गुढ्यांचे चैत्र पाडव्याला, तर गणेश मूर्तींचे गणेशोत्सवात जोरदार स्वागत झाले. आता दिवाळीच्या पार्श्वठभूमीवर प्रत्येक दुकानामध्ये चायना मेड वस्तू बघायला मिळत आहेत. आकर्षक व भडकपणामुळे चायनीज आकाशदिव्यांनी ग्राहकांना वेड लावले आहे. त्यांची विक्री जोरात सुरू आहे. "देशी बनावटीच्या कापडी व प्लॅस्टिकच्या आकाशदिव्यांची जागा आता चायनीज दिव्यांनी घेतली आहे. आकर्षक, टिकाऊ व घडी करून ठेवण्याची सोय यामुळे त्यांना ग्राहकांची पसंती मिळत असल्याचे सांगितले. चायनीज फटाके, पणत्या व शुभेच्छा पत्रकेही बाजारात उपलब्ध आहेत. कमी आवाज करणारे, स्वस्त आणि फुटल्यानंतर आकर्षक दिसणारे म्हणून ते ग्राहकांच्या पसंतीला उतरले आहेत. विद्युत रोषणाईची नवनवीन तोरणेही विक्रीसाठी आली आहेत. फळे, फुले व पानांच्या आकाराच्या पणत्या स्वस्त आणि चकचकीत असल्यामुळे त्यांनाही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. याखेरीज रांगोळी काढण्याचे वेगवेगळ्या आकारांचे साचे, रंगसंगतीचे छापे, प्लॅस्टिक फुलांच्या माळा व तोरणेही बाजारात विक्रीसाठी आले आहेत. चायनीज "म्युझिकल' शुभेच्छा पत्रेही ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहेत. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील "दिलखेचक' मजकूर आणि दीर्घकाळ टिकण्याची हमी यामुळे या शुभेच्छा पत्रांनाही चांगली मागणी आहे. • येथील वस्त्रनगरी दिवाळीसाठी सज्ज झाली आहे. बाजारपेठेत रंगीबेरंगी आकाशकंदील, शोभेच्या वस्तू, रांगोळी, कपडे यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. बाजारपेठेत सरासरी वीस टक्क्यांनी महागाईमध्ये वाढ दिसत असून, ७५ टक्के चायना मालाने बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण केले आहे. निवडणूक निकालानंतर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. तर दिवाळीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. इचलकरंजी शहरातील मेन रोडसह जनता चौक, गांधी पुतळा चौक, डेक्कन चौक या परिसरात स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामध्ये आकर्षक आकाशकंदील, रांगोळी, शोभेच्या वस्तू, पणत्या, मेणबत्या, रंगीबेरंगी हार, लहान मुलांसाठी खेळणी, किल्ल्यावरचे साहित्य, तयार किल्ले, सैनिक यांसह कपड्यांचे स्टॉल यांचा समावेश आहे. कापड मार्केट, बीजेपी मार्केट या परिसरातही कपड्यांची दुकाने सजली आहेत. बाजारपेठेमधील वस्तूंमध्ये सुमारे ७५ टक्के वस्तू चायना मेड आहे. स्थानिक तयार झालेल्या वस्तूंपेक्षा या वस्तूंची किंमत तुलनात्मकरीत्या खूपच कमी असल्याने ग्राहकही त्याकडे आकर्षित होत आहेत. बाजारपेठेमध्ये वीस ते पंचवीस टक्क्यांनी सर्व वस्तूंमध्ये वाढ झाली आहे. वस्त्रनगरीमध्ये मालक व कामगार असे दोन मुख्य वर्ग असल्याने बोनस वाटपानंतरच खऱ्या अर्थाने खरेदीला सुरुवात होते. गत चार दिवसांपासून बोनस वाटप झाल्यामुळे बाजारपेठेत गर्दी फुलू लागली आहे. दरवर्षी दिवाळीला वस्त्रनगरीत करोडो रुपयांची उलाढाल होते. त्या पार्श्वभूमीवर दुकानदारांनी व स्टॉलधारकांनी मोठ्या प्रमाणात माल भरला आहे. (प्रतिनिधी) आजरा बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी आजरा : पावसाने लावलेली समाधानकारक हजेरी, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुका याचा परिणाम आजरा तालुक्यात दिवाळीच्या खरेदीवर दिसत असून, बाजारात मोठी गर्दी दिसत आहे. प्राधान्याने कपडे, आकाशकंदील, सोन्याचे जिन्नस, खरेदीकरिता मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. बहुतांशी सहकारी संस्थांनी सानुग्रह अनुदान व बोनस स्वरूपात कर्मचारी वर्गास दिवाळी भेट दिल्याचा परिणाम बाजारात जाणवत आहे. व्हॉटस अॅप, फेसबुकवरून खरेदीचा संदेश देशामधील चायनाची गुंतवणूक कमी व्हावी. त्याचबरोबर देशाला आर्थिक बळकटी मिळावी, यासाठी चायना वस्तू वापरापासून दूर राहा व स्वदेशी वस्तू वापरा आणि पणत्या व दिवाळी शोभेसाठी लागणारे काही साहित्य, फळे या वस्तू रस्त्याकडेला बसलेल्या गरीब व गरजूंकडून खरेदी करा. मोठ्या व्यापारी व दुकानांतून खरेदी करणे टाळून गरजूंना आर्थिक लाभ होईल यासाठी प्रयत्न करा, असे सामाजिक संदेश आजकाल व्हॉटस अॅप व फेसबुक या सोशल मीडियावरून फिरत आहेत. त्याला काही प्रमाणात प्रतिसादही मिळत असल्याचे दिसत आहे.

No comments:

Post a Comment