Total Pageviews

Thursday, 9 October 2014

pakistan firing on loc-घुसखोरांविरुद्ध काश्मीरच्या डोंगराळ प्रदेशात भारतीय लष्कराची मोहीम सुरू

घुसखोरांविरुद्ध काश्मीरच्या डोंगराळ प्रदेशात भारतीय लष्कराची मोहीम सुरू असताना, तेथून आपले लक्ष आणि फौजा हटविण्यासाठी पाकिस्तान पठारी, मैदानी प्रदेशातील सीमेवर कुरापती काढतो आहे. त्याला जशास तसे उत्तर आपले सैनिक देतच आहेत, पण तोवर इथल्या राष्ट्रवाद्यांनी 'एकदाच धडा शिकवण्या'ची भाषा आवरणे बरे.. भारताच्या सीमेवर पाकिस्तानकडून काढल्या जाणाऱ्या कुरापतींत अचानक वाढ हा काही योगायोग नाही. हे का होत आहे हे आधी समजून घ्यावयास हवे. तसे न करता, त्यामागील कारणे माहीत करून न घेता पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा करणे हा बालिशपणा झाला. महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांत होऊ घातलेल्या निवडणुकांमुळे अशा भाषेस पूर आला असून एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकायला हवा, अशी मागणी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसते. तशी ती करणाऱ्यांनी हे समजून घ्यावयास हवे की आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी वा राजकारण हे आपापल्या नेत्यांचे पौरुष सिद्ध करण्याचे स्थळ नव्हे. कोणत्याही दोन देशांतील संबंध हा केवळ त्या दोन देशांचाच प्रश्न नसतो. त्यात अनेक आंतरराष्ट्रीय मुद्दे दडलेले असतात आणि अनेक पातळीवरील जागतिक संबंधांची वीण असते. त्यामुळे निवडणुकीआधी युद्धखोरीची भाषा करणारे वा पाकिस्तानला सरळ करण्याचे आश्वासन देणारे नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आरूढ झाले तरी त्यांनाही जागतिक हितसंबंधांची वीण उसवणार नाही, याची काळजी घेतच पावले टाकावी लागतात. मोदी सत्तेवर आहेत म्हणून पाकिस्तानचा प्रश्न चुटकीसरशी मिटेल, असे मानणे हा शुद्ध बावळटपणा ठरेल. तेव्हा या भाबडेपणातून बाहेर पडून सध्या जे काही सीमेवर सुरू आहे, ते समजून घ्यावे लागेल. पाकिस्तानने प्रचलित शस्त्रसंधी सोडून देत भारतीय क्षेत्रात आकस्मिक गोळीबार सुरू केला, त्यामागच्या प्रमुख दोन कारणांतील कमी महत्त्वाचे कारण म्हणजे जम्मू काश्मीर या राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका. या निवडणुका ठरल्याप्रमाणे झाल्या तर पुढील दोन महिन्यांत, म्हणजे डिसेंबरच्या आत, व्हायला हव्यात. कारण या वर्षअखेरीस त्या राज्याच्या विधानसभेची मुदत संपते. सध्या त्या राज्यात निवडणुकांसाठी मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू असून या महिन्याच्या अखेपर्यंत ते चालेल. या काळात जास्तीतजास्त मतदारांची नोंदणी व्हावी यासाठी राज्य आणि केंद्रातर्फे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना पहिली मोठी खीळ बसली ती त्या राज्यात नुकत्याच येऊन गेलेल्या पुरामुळे. जवळपास ३०० जणांचे प्राण ओसंडून वाहणाऱ्या नद्यांनी घेतले आणि ते घेताना या राज्याची घडी पार विसकटून टाकली. या पुराने ते राज्य किमान दहा वर्षे मागे गेले. तरीही प्रशासकीय यंत्रणेचा प्रयत्न आहे तो परिस्थिती जास्तीतजास्त सुरळीत करण्याचा आणि निवडणुका घेण्याचा. तेव्हा ठरल्याप्रमाणे या निवडणुका झाल्या तर मोदी सरकारच्या शिरपेचात तो एक मानाचा तुरा ठरेल. त्याच वेळी या निवडणुका पाकिस्तानपुरस्कृत फुटीरतावाद्यांच्या मनसुब्यावर पाणी ओतणाऱ्या ठरतील. काश्मीरमध्ये शांतता कधीच नांदू नये असाच फुटीरतावाद्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे मिळेल त्या मार्गाने त्या कशा उधळता येतील या दिशेनेच प्रयत्न सुरू असतात. सीमेवर तणाव निर्माण करून युद्धजन्य परिस्थिती तयार करणे हा त्याच प्रयत्नांचा एक भाग. पाकिस्तानतर्फे आता जे काही सुरू आहे, ते या निवडणुकांत कशी आडकाठी आणता येईल यासाठी. अशा वेळी भारताने संयतपणे ही परिस्थिती हाताळली नाही, पाकिस्तानला आपल्याकडील युद्धखोरांना हवे आहे तसे मर्दानी वगैरे उत्तर दिले तर वातावरण आणखीनच चिघळेल आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. पाकिस्तानला नेमके तेच हवे आहे. कारण एकदा का युद्धसदृश परिस्थिती तयार झाली तर निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील आणि तशा त्या ढकलल्या गेल्या की तो देश पुन्हा भारताची भूमिका लोकशाहीविरोधी असल्याची बोंब ठोकू शकेल. त्या देशाकडून सध्या सुरू असलेल्या गोळीबारामागील हे एक कारण. दुसरे कारण हे अधिक महत्त्वाचे आहे. भारतीय लष्कराने या काळात पाकिस्तानातून येणाऱ्या घुसखोरांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. हा काळ हिवाळा सुरू होण्याचा. तो पूर्ण जोमात आला की हिमालय गोठतो आणि त्या परिसरातील दैनंदिन दळणवळणदेखील थंडावतेच. इतिहास असे दाखवतो की पाकिस्तानातून, म्हणजे अर्थातच पाकव्याप्त काश्मिरातून, याच काळात घुसखोर पाठवले जातात. हे घुसखोर पुढे भारतभर घुसून उत्पात घडवतात. त्यामुळे इतिहासापासून धडा घेऊन भारतीय लष्कर अलीकडे हिवाळय़ात अधिक कडक पहारा ठेवते आणि त्याआधी हा परिसर पिंजून काढते. आताही तेच सुरू असून गेल्या काही दिवसांत जवळपास तीन डझनभर असे घुसखोर पकडले वा टिपले गेले. लष्कराची ही कारवाई अशीच सुरू राहिली तर पाकिस्तानला भारतात घुसखोरांना पाठवणे अधिकाधिक अवघड होत जाईल. नेमक्या याच काळात भारत-पाक सीमेवर अन्यत्र तणाव निर्माण झाला आहे, तो याचमुळे. हे सर्व ताजे तणावक्षेत्र ज्या भागात भारत आणि पाकिस्तान यांच्यातर्फे रीतसर कुंपण घालून भूभागाची वाटणी करण्यात आली आहे, त्या परिसरात आहे. पाकिस्तानातून घुसखोर येतात ते पहाडी प्रदेशातून आणि ही तणावग्रस्त सीमा आहे काहीशा पठारी प्रदेशात. यामागील अर्थ आपण आधी समजून घ्यावयास हवा. जेथे कुंपणांनी सीमा अधिकृतपणे विभागण्यात आली आहे, तेथेच बरोबर पाकिस्तानने भारताविरोधात कागाळय़ा काढावयास सुरुवात केली आहे. यामागील उद्देश हा की या घटनांमुळे भारतीय फौजा मोठय़ा प्रमाणावर या पठारी प्रदेशात वळवणे भारतास भाग पडावे. तशी वेळ भारतावर आल्यास पहाडी प्रदेशातील भारताची दक्षता विरळ होईल आणि तेथे तो प्रदेश पिंजून काढण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या सैनिकांची संख्या कमी होईल. म्हणजेच अधिक मोठय़ा संख्येने वा निर्वेधपणे पाकिस्तानी घुसखोर भारतात पाठवता येतील. पाकिस्तानचा प्रयत्न आहे तो हा. समोरून गोळीबार होत असतानाही भारतीय लष्कर मोठय़ा प्रमाणावर तेथे वळवून जोरदार प्रत्युत्तर देणे आपण टाळत आहोत, ते यामुळे. आपल्याकडे फुकाची राष्ट्रवादी भाषा करणाऱ्यांना याचे भान नाही. या मंडळींच्या अपेक्षेनुसार भारतीय लष्कर आणि सरकार वागत गेले तर आपल्याकडून बरोबर पाकिस्तानला हवी असलेलीच कृती घडेल. तेव्हा मोदी यांना सबुरीची भाषा करावी लागत आहे, ती या वास्तवामुळे. खेरीज, या दोन कारणांपलीकडील वास्तवदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. ते आहे काश्मीरबाबत. हे राज्य आपल्यासाठी जरी भूलोकीचे नंदनवन असले तरी ते पाकिस्तानच्या कपाळावरील वाहती जखम आहे, हे आपण विसरून चालणार नाही. या प्रश्नावर पाकला भारताकडून वारंवार पराभव चाखावा लागलेला आहे, हे वास्तव कोणत्याही पाकिस्तानी राज्यकर्त्यांस सुखाने जगू देणारे नाही. तेव्हा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नवाझ शरीफ असोत वा जनरलमियाँ मुशर्रफ असोत किंवा पाकिस्तानी पंतप्रधान भारतीय पंतप्रधानांच्या शपथविधीस प्यार का पैगाम वगैरे घेऊन आले असोत किंवा दोन्ही देशांतील बोलघेवडे शांतिदूत एकमेकांना शीरकुर्मा आणि पुरणपोळय़ांचे घास भरवोत. काश्मीर आहे त्या स्थितीत राहणे हे त्या देशास चालणारे नाही. तेव्हा काही ना काही कारणाने पाकिस्तान तेथे कुरापती काढत राहणारच राहणार. अशा वेळी त्यास जशास तसे वगैरे उत्तर देण्याचा प्रयत्न आपल्याकडून झाला तर युद्ध अटळ आहे, याचे भान आपणास असावयास हवे. तसे ते खरोखरच झाले तर त्याचे अनिष्ट परिणाम हे पाकिस्तानपेक्षा आपल्यावर अधिक होतील. कारण त्या देशाकडे आता गमावण्यासारखे अधिक काही नाही. ज्याचे बरे चाललेले असते त्यालाच संसार उघडय़ावर येऊ नये याची काळजी असते. ज्याचा संसार रस्त्यावरच असतो तो कोणत्याही संघर्षांला तयारच असतो. कारण त्यास आपले अधिक काही वाईट होईल याची चिंता करण्याचे कारण नसते. नंग्यास साक्षात खुदादेखील भीत असतो, हे या संदर्भात लक्षात ठेवलेले बरे.

No comments:

Post a Comment