बंगालमधील ज्वालामुखी
तब्बल तीस वर्षांची डाव्यांची राजवट संपवून ममता बॅनर्जी यांच्या हाती पश्चिम बंगालची सूत्रे सोपवताना तेथील जनतेने जल्लोष केला होता. सुरवातीला मार्क्सवादी आणि इतर डाव्या पक्षांनी चांगला कारभार केला. ग्रामीण जनतेला त्याचा फायदा झाला. पण हळूहळू ग्रामीण भागात आपली पकड मजबूत करण्याच्या नादात डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी सुरू केली. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसला गावांमध्ये पाय रोवता येऊ नयेत म्हणून धमकावण्यापासून ते ठार मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यातून रक्तरंजित चकमकी सुरू झाल्या. या प्रकारांमुळे डावे पक्ष लोकांच्या मनातून उतरू लागले. ममता यांच्या तृणमूल काँग्रेसच्या हाती राज्याची सत्ता सोपवण्याचे प्रमुख कारण डाव्यांची वाढती अरेरावी हे होते. त्या मुख्यमंत्री झाल्यानंतर हिंसाचाराला आळा बसेल, परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा होती. पण ममता यांच्या राजवटीत कायदा आणि सुव्यवस्था पार ढासळली असून, संपूर्ण राज्यच ज्वालामुखीच्या तोंडावर असल्याची स्थिती आहे. अलीकडेच राज्यात झालेल्या बाँबस्फोटांच्या घटनेतून ते दिसून आले. मात्र त्याकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी ममता विरोधकांवरच टीका करण्यात धन्यता मानत आहेत. बालमृत्यूंचे प्रमाण वाढले, महिलांवर बलात्कार झाले, तरी आपल्याला बदनाम करण्यासाठी डाव्यांनी केलेले हे कारस्थान आहे, असा आरोप त्या सातत्याने करतात. शारदा चिट फंड गैरव्यवहारात अडकलेल्या ‘तृणमूल’च्या बड्या नेत्यांना वाचवण्यासाठी या प्रकरणाची चौकशी ‘सीबीआय’कडे देण्यासही त्या तयार झाल्या नाहीत. ममता यांच्या ‘हम करेसो...’ प्रवृत्तीचेच दर्शन यातून घडले आहे.
अलीकडेच वर्धमान शहरात दोन ऑक्टोबरला, गांधी जयंतीच्या दिवशी आणि दुर्गापूजेची धामधूम सुरू असताना झालेल्या बाँबस्फोटांचे धागेदोरे बांगलादेशातील अतिरेकी संघटनेपर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले आहे. वर्धमानमधील बाँबस्फोटांत तिघे जण मरण पावले. ते बाँब तयार करीत असताना स्फोट झाला आणि ‘तृणमूल’च्या एका नेत्यानेच त्यांना घर भाड्याने दिले होते, ही बाब चौकशीत समोर आली. हे बाँब कशासाठी तयार केले जात होते, ते कोठे वापरले जाणार होते, त्याचे सूत्रधार कोण आहेत, या साऱ्याचा तपास केंद्रीय यंत्रणेमार्फत होणे गरजेचे होते. तरीही ममता अशा चौकशीस तयार नव्हत्या. नंतर घटनास्थळाजवळच आणखी ४० बाँब सापडले. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) चौकशी सुरू केली, तेव्हा बांगलादेशातील संघटनेच्या अतिरेक्यांनी बंगाल आणि आसपासच्या राज्यांत आश्रय घेतला असून, ते येथे बाँब तयार करून बांगलादेशात पाठवतात, असे आढळून आले. म्हणजे बांगलादेशातील अतिरेकी कारवायांसाठी भारताच्या भूमीचा वापर सुरू होता आणि राज्याचे गृह खाते, पोलिस यांना त्याची अजिबात माहिती नव्हती. राज्यातील गुप्तचर यंत्रणांचे हे ढळढळीत अपयश होते. ‘एनआयए’च्या तपासात अनेक नव्या बाबी समोर येत असून, त्यातून या बाँबचा वापर कदाचित भारतातही केला गेला असता, असा संशय व्यक्त झाला आहे. बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांच्या हत्येचा कट वर्धमानमधील अतिरेक्यांनी आखला होता, असेही तपासात उघडकीस आल्याने या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, हे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर ‘एनआयए’च्या प्रमुखांनी आणि नंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. डोवल यांनी या प्रकरणी राज्य सरकारच्या अपयशाबद्दल थेट ममता बॅनर्जी यांच्याकडेच नाराजी व्यक्त केली. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात आम्ही केंद्राला संपूर्ण सहकार्य करू, असे सांगण्याची वेळ ममता यांच्यावर आली. मात्र आक्रमक भाषणे करून, डाव्यांच्या नावाने थयथयाट करणाऱ्या ममता यांचा पोलिस आणि प्रशासनावर वचक राहिला नसल्याचेच या घटनांतून उघड झाले आहे. याआधीही राज्यात गेल्या वर्षी सुमारे नऊ हजार बाँब सापडले. त्यातील सात हजार बाँब एकट्या वर्धमान जिल्ह्यात आढळले. नक्षलवादी वा अतिरेक्यांचे हे कृत्य असू शकते. पण वर्धमानच्या घटनेतून दहशतवाद्यांना राज्यात मोकळे रान मिळाल्याचे जाणवते.
एवढे होऊनही ममता बॅनर्जी यांची आणि त्याच्या कार्यकर्त्यांची अरेरावी संपलेली नाही. वीरभूममध्ये गेल्या आठवड्यात भाजप आणि ‘तृणमूल’च्या कार्यकर्त्यांमध्ये चकमक उडून तीन जण मारले गेले. याआधीही जूनमध्ये अशाच प्रकारांमुळे स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती. बांगलादेशातील मूलतत्त्ववादी गट सीमेलगतच्या भागात आश्रय घेत असून, मतपेढीच्या राजकारणातून ‘तृणमूल’कडून त्यांना पाठीशी घातले जात आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. बंगाल सध्या ज्वालामुखीच्या तोंडावर दिसत असले तरी त्याचे चटके बांगलादेशाबरोबर आपल्या देशाच्या अन्य भागांनाही बसू शकतात. या साऱ्या घटनांची गंभीर दखल घेऊन अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी ममता यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करण्याची भूमिका घ्यायला हवी. ते बंगालच्या, देशाच्या व त्यांच्याही हिताचे आहे
No comments:
Post a Comment