श्रीगणेशाच्या मूर्तीही आजकाल चिनी बनावटीच्या मिळू लागल्या, तिथे दिवाळीच्या फटाक्यांमध्ये ड्रॅगनने धमाका उडविला नसता, तरच नवल. वर्षानुवर्षे भारतात फटाके म्हटले की, तामिळनाडूच्या शिवाकाशीचे नाव घेतले जायचे. परंतु ड्रॅगनच्या फटाक्यांच्या आवाजाने सहा हजार कोटींची उलाढाल असलेली आणि पाच लाख रोजगार देणारी शिवाकाशीही हादरली. केंद्र सरकारने या चिनी फटाक्यांच्या आयातीवर गेल्यावर्षीच बंदी घातली, तरीही यंदा सर्रास चिनी फटाक्यांची आतषबाजी होत राहिली. चीनच्या कोणत्याही वस्तूंप्रमाणेच फटाकेही आपल्या फटाक्यांच्या तुलनेत ५० टक्के स्वस्त आहेत. चिनी कारागिरांची कल्पकता त्यात होती आणि त्यामुळे भारतीय कलाकारांच्या नावापासून ते वेगवेगळ्या रंग-रुप घेतलेले हे फटाके भारतीयांना खुणावू लागले. चिनी फटाक्यांमध्ये पोटॅशिअम क्लोरेट हा घटक असतो. पोटॅशिअम नायट्रेट आणि अॅल्युमिनिअम पावडर या भारतीय फटाक्यांमधील घटकांपेक्षा ते कित्येकपट स्वस्त असते. परंतु आरोग्यास आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ते अधिक घातक असते. त्यांचा आवाजही मोठा असतो. याच कारणाने भारताने चिनी फटाक्यांवर बंदी घातली. परंतु कधी नेपाळमार्गे तर कधी समुद्रमार्गे कंटेनरच्या कंटेनर आणून ही तस्करी सुरू राहिली. गेल्या महिन्यात नवी मुंबईत कळंबोली येथे महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने साडेतीन कोटींच्या फटाक्यांचे कंटेनर पकडले. कंटेनर फ्रेट स्टेशनवर बोगस बिल ऑफ एन्ट्री सादर करून हे कंटेनर ताब्यात घेण्याची या टोळीची कार्यपद्धती उघड झाली. मुंबईप्रमाणे कांडला, कोलकाता, तुतीकोरीन या बंदरांमध्येही तस्करीच्या मार्गाने चिनी फटाके येतात. दोन हजार कंटेनर्समधून सुमारे ६०० कोटी रुपयांच्या फटाक्यांची तस्करी झाली असावी, असा अंदाज होता. चोरवाटांनी किंवा काही ठिकाणी तर राजरोस मिळणारे चिनी फटाके तस्करीचा प्रभाव दाखवतात. एकूणच चिनी मालाच्या तस्करीविषयी आपल्या यंत्रणा निद्रिस्त आहेत. त्यामुळे खेळणी, कपडे, मोबाइल, बॅटऱ्या, पंखे याऐवजी फटाके एवढाच काय तो मामला. फटाक्यांच्या किरकोळ विक्रीतही सुरक्षेच्या नियमांबाबत आपल्या यंत्रणा उदासीन आहेत. त्यामुळे एकूणच तस्करी रोखणारी यंत्रणा प्रभावी केली, तरच फटाक्यांच्याही तस्करीला आळा बसू शकेल. अन्यथा चिनी आक्रमण इथेही चालूच राहील.
No comments:
Post a Comment