'हुडहुड'चा धडा!
अनेकदा भारताच्या किनारपट्टींवर ही वादळे आदळली आहेत. त्यात असंख्य लोक आपले प्राण गमावून बसले आहेत.आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांत सध्या चक्रीवादळ हुडहुडने दबंगशाही सुरू केली आहे. खूप मोठे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाने सारे काही भुईसपाट केले आहे. त्यामुळे तिथे भयंकर वाताहत झाली आहे; परंतु अगोदरच योग्य कारवाई केल्यामुळे जीवितहानी कमी झाली. दोन्ही राज्यांत मिळून ८ जणांना आपले प्राण गमवावे लागले. सुमारे १८५ किमी प्रतिघंटा वेगाने चक्रीवादळ धावत होते. त्यात ३५0 हून आंध्रातील गाव सापडले. आंध्रमधून ९0 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले, तर ओडिशामधून ६८ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. वीज गुल झाली. मोसम विभागाने स्पष्ट केले आहे की, कमीत कमी तीन दिवस तरी या हुडहुडचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाची खर्या अर्थाने कसोटी आहे. नुकताच जम्मू-काश्मीरमध्ये जलप्रलय आला होता. त्यापूर्वी केदारनाथचा भयानक जलप्रवाह लोक विसरलेले नाहीत. एकूणच आपत्ती व्यवस्थापनाला आता अधिक सक्षम व्हावे लागणार आहे. अर्थात आताच्या या चक्रीवादळामध्ये मोठी जीवितहानी झालेली नाही, त्यावरून सकारात्मक बदल होत आहेत, असे समजायला वाव आहे. आपला मोसम विभाग चांगला सक्षम झाला, तर येणार्या संकटाची चाहूल लवकर लागू शकते आणि त्यानुसार आवश्यक ते उपाय आपण योजू शकतो! हिंदी महासागर म्हणजे असंख्य वादळे पोटात घेऊन बसलेला सागर आहे. अनेकदा भारताच्या किनारपट्टींवर ही वादळे आदळली आहेत. त्यात असंख्य लोक आपले प्राण गमावून बसले आहेत. हिंदी महासागरात आजवर झालेल्या ३५ तुफानी वादळांपैकी २७ चक्रीवादळे बंगालच्या उपसागरावरून घोंगावत येऊन भारत आणि बांगलादेशाच्या किनारपट्टीवर आदळली. गेल्यावर्षी म्हणजेच २0१३ मध्ये ओडिशाच्या किनारपट्टीवर फयान नावाचे चक्रीवादळ आदळले होते. त्या वेळीही मोठे नुकसान झाले होते. आताही तसेच चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्रच्या किनारपट्टीवर आदळले आहे. मात्र या वेळी सावध पवित्रा घेतल्यामुळे जास्त नुकसान झाले नाही. फयानच्या वेळीही फारसे नुकसान झाले नाही. ही एक चांगली गोष्ट आहे. सकारात्मक गोष्ट आहे. केदारनाथ येथे झालेला जलप्रलय असो अथवा नुकताच काश्मीरमध्ये झालेला जलप्रलय असो.. त्या वेळी योग्य संकेत वेळेवर मिळाले नाही आणि त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. केदारनाथचा प्रलय तर जगबुडीची झलक दाखवणार होता. २00५ पासून आपत्ती व्यवस्थापन कायदा अस्तित्वात आला आहे, मात्र सुरुवातीला फारसे काही घडले, असे दिसले नाही. मात्र आता चांगल्यापैकी आपत्ती व्यवस्थापन काम करीत आहे. मात्र भारताच्या किनारपट्टीवर हुडहुड धडकल्यावर त्याच सुमाराच जपानच्या ओकिनावा व क्युशू या प्रांतांवर व्हॉगफॉग या चक्रीवादळाने प्रहार केला. मात्र त्यापूर्वीच लाखो लोकांना जपानने तथून हलवले होते आणि त्यामुळे मोठी जीवितहानी होऊ शकली नाही. नैसर्गिक आपत्ती घडू नये हे काही आपल्या हाती नाही; परंतु ते संकट कोसळलेच तर त्यावर उपाययोजना तात्काळ करायला हवी. आपत्ती व्यवस्थापन सक्षम असायला हवी. संकट कोणतेही असो, त्याच्याशी चार हात करण्याची तयारी आपली असायला हवी. संकट काही सांगून येणार नाही. आकस्मिक आलेल्या संकटावरही आपल्याला मात करता आली पाहिजे. तशी आपल्याला तत्परता दाखवायला हवी!
भारतीय किनाऱ्याच्या दिशेने चक्रीवादळ घोंघावत येत आहे, असे समजले की, आता किती जणांचा बळी जाणार, हाच पहिला प्रश्न निर्माण व्हायचा. याचे कारणही तसेच होते. देशात सर्वाधिक मृत्यूंना कारणीभूत ठरणाऱ्या ज्या काही आपत्ती आहेत, त्यात चक्रीवादळांचा क्रमांक वरचा होता; पण आता हा इतिहास झाला आहे. आताच आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर नुकसान करणाऱ्या हुडहुड चक्रीवादळाच्या निमित्ताने पुन्हा एकदा याच्यावर शिक्कामोर्तब झाले. या वादळातील तीव्रता मोठी असली तरी त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सहा असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. अनधिकृत सूत्रांनुसार ही संख्या थोडी जास्त असेलही, पण ती फार मोठी नाही हे निश्चित. फार मागे जाण्याचे कारण नाही. अगदी गेल्या १५ वर्षांचा विचार केला, तरी तीव्र चक्रीवादळांमध्ये बळी जाणाऱ्यांची संख्या हजारांमध्ये, नाही तर निदान शेकडय़ामध्ये तरी असायचीच; पण हा आकडा लक्षणीयरीत्या खाली आला आहे. तुलनेसाठी १९९९ साली ओरिसामध्ये धडकलेल्या 'सुपर सायक्लोन'चे (महाचक्रीवादळ) उदाहरण घेता येईल. या वादळाची तीव्रता प्रचंड होती. ताशी २५० किलोमीटर इतक्या वेगाने वारे वाहत होते. या वादळामुळे तब्बल ९८०० जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे. अनधिकृत नोंदीनुसार हा आकडा दहा हजारांपेक्षा किती तरी जास्त आहे. त्या तुलनेत या वेळच्या वादळाची तीव्रता कमी होती. मात्र त्यात मृतांचा आकडा सहापर्यंत खाली येणे ही आशादायी बाब आहे. याचे श्रेय हवामान विभागाने पुरेसा आधी दिलेला अचूक अंदाज, प्रशासनाची तयारी आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने तातडीने दिलेला प्रतिसाद या सर्वाकडे जाते. अर्थात या बदलाचे बीजही १९९९ मधील वादळाच्या प्रचंड हानीमध्येच आहे. त्यानंतर तयार करण्यात आलेल्या योजना आता पूर्णत्वाला गेल्या आहेत. 'झिरो लॉस ऑफ लाइफ' - 'शून्य जीवितहानी' अशी व्यूहरचना आखून त्या दृष्टीने तयारी करण्यात आली. त्याअंतर्गत विशेषत: ओरिसामध्ये खास निवारे तयार करण्यात आले आहेत. याशिवाय धोका असलेल्या किनारी भागातून बाहेर काढण्यात आलेल्या लोकांना तात्पुरते राहण्यासाठी दहा हजार शाळांची विशिष्ट पद्धतीने बांधणी करण्यात आली आहे. याशिवाय अन्न व पाण्याचा पुरवठा, इंधनाची उपलब्धता, विशेष शीघ्र कृती दलाची स्थापना या सर्व गोष्टींचा हा परिणाम आहे. त्याचेच परिणाम आता दिसू लागले आहेत. तो गेल्या वर्षी लक्षणीयरीत्या जाणवला. गेल्या वर्षी आंध्र प्रदेश आणि ओरिसाच्या किनाऱ्यावर 'फायलिन' नावाचे चक्रीवादळ धडकले. त्याहीमुळे आर्थिक हानी झाली, पण मृतांचा आकडा बराच खाली आला होता. त्या चक्रीवादळात २५ ते ३० जणांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ या वर्षी आता हुडहुडच्या निमित्ताने हेच पाहायला मिळाले. या वेळी आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यावरील सुमारे चार लाख रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. त्याआधी भारतीय हवामान विभागाने चक्रीवादळाबाबत पाच दिवस आधी दिलेला अंदाज आणि त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलासारख्या यंत्रणांनी दाखविलेली तत्परता यामुळे मृतांचा आकडा कमीत कमी राखणे शक्य झाले. आतापर्यंत नैसर्गिक आपत्तींमुळे आपल्या देशात मोठी प्राणहानी झाली आहे; पण तंत्रज्ञान, तयारी, समन्वय आणि इच्छाशक्ती यांचा योग्य वापर केल्यास या गोष्टींवर ही हानी खूप कमी करता येते, हे या उदाहरणांवरून दिसून आले आहे. हा वादळवाऱ्यावर आपण एक प्रकारे मिळवलेला विजयच आहे. त्याची व्याप्ती अधिक वाढविणे आणि नैसर्गिक आपत्तींच्या बाबतीत खऱ्या अर्थाने 'झिरो लॉस ऑफ लाइफ' प्रत्यक्षात आणणे हे आपल्यासमोरील आव्हान आहे. आतापर्यंतची प्रगती पाहता याबाबत आशावादी राहण्यास हरकत नाही.
No comments:
Post a Comment