चीनची घुसखोरी.. प्रचार साहित्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे 'मेक इन इंडिया'चा नारा देत आहेत, दुसरीकडे सरसंघचालक मोहन भागवत यांनी चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. मात्र, असे असतानाही स्वदेशी व मेक इन इंडियाच्या पुरस्कर्त्यांनीच चिनी बनावटीच्या प्रचारसाहित्याला सर्वाधिक पसंती दिल्याचे निदर्शनास येत आहे. निवडणूककाळात वाढणाऱ्या प्रचार साहित्याच्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी चीनने याही क्षेत्रात घुसखोरी करत भारतीय बनावटीच्या प्रचार साहित्याला केव्हाच मागे टाकले आहे. दोन्ही काँग्रेस व अन्य राजकीय पक्षांकडूनही चिनी टोप्यांना सर्वाधिक मागणी आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तूंनी आक्रमण केले आहे. अगरबत्ती, दिवाळीतील कंदील, पणत्या, मोबाइलबरोबरच याचा विळखा आता निवडणूक प्रचार साहित्यालाही पडला आहे. मुंबईत लालबाग येथे निवडणूक प्रचार साहित्याची मोठी बाजारपेठ असून हे प्रचार साहित्य खरेदी करण्यासाठी येथे सध्या एकच झुंबड उडाली आहे. जवळपास प्रत्येक लहान-मोठय़ा दुकानात प्रचार साहित्य घेण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची लगबग सुरू आहे. निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून पदयात्रा, प्रचार फेऱ्या, चौक आणि जाहीर सभा, घरोघरी प्रचार यावर भर असल्याने या सगळ्यात वातावरण निर्मिती करण्यासाठी प्रचार साहित्याला मोठय़ा प्रमाणात मागणी असल्याचे लालबाग येथील व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
'पारेख ब्रदर्स'चे दिलीप पारेख यांनी सांगितले, निवडणूक प्रचार साहित्यात चायना टोप्यांना सर्वच राजकीय पक्षांकडून अधिक प्रमाणात मागणी आहे. एका चायना टोपीची किंमत साधारण चार ते सहा रुपयांपर्यंत आहे. तर भारतीय बनावटीच्या एका टोपीची किंमत किमान दहा ते ३० रुपयांपर्यंत आहे. भारतीय टोप्यांच्या तुलनेत चायना टोप्या स्वस्त असल्याने साहजिकच त्यांना जास्त मागणी आहे. टोप्यांसबरोबरच मनगटावर बांधायचे बॅण्ड, टी शर्ट, मफलर/उपरणे, बिल्ले यांनाही अधिक उठाव आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना-भाजप यांची युती तरकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी होती. यावेळी हे चौघेही वेगवेगळे लढत आहेत. त्याशिवाय 'मनसे' आणि अन्य राजकीय पक्षांचे उमेदवारही निवडणूक िरगणात आहेत. त्यामुळे तुलनेत यावेळी सर्वच उमेदवारांकडून आपापल्या पक्षांच्या प्रचार साहित्याला मागणी असल्याचे निरीक्षणही पारेख यांनी नोंदविले. तर 'श्रीराम ड्रेसवाला'चे हेमंत म्हणाले, प्रचार साहित्यात टोप्या व मफलर/उपरणे यांची विक्री जास्त प्रमाणात होते. दिवसाला सुमारे एक ते दीडहजार नग असे याचे प्रमाण असते.
या निवडणूक प्रचार साहित्याबरोबरच विविध राजकीय पक्षांची निवडणूक चिन्ह किंवा राजकीय नेत्यांची चित्रे असलेल्या अंगठय़ा तसेच बांगडय़ा, मंगळसुत्र आदी प्रकारही बाजारात आले असले तरी त्याला फारशी मागणी नाही. राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे चित्र असलेले टी शर्टही विक्रीस आले असून त्यांना चांगली मागणी आहे. टी शर्टवर प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार यांचे चित्र असलेल्या टी शर्टना त्या त्या राजकीय पक्षाच्या तरुण/युवा कार्यकर्त्यांकडून विशेष मागणी असल्याचे लालबाग येथील अन्य एका व्यापाऱ्याने सांगितले.
झेंडे, मफलर गुजरातमधून
निवडणुकीच्या काळात जाहीर सभा, प्रचार फेऱ्या, पदयात्रा यासाठी झेंडे आणि मफलर/उपरणे हे जास्त प्रमाणात लागतात. मुंबईत हे साहित्य प्रामुख्याने नवी दिल्ली, मथुरा आणि गुजरात मधून येत असल्याची माहितीही काही व्यापाऱ्यांनी दिली.
शिवसेना आणि भाजप यांच्या साहित्याची अधिक खरेदी
शिवसेना आणि भाजप यांची युती या निवडणुकीत नाही. दोन्ही पक्ष वेगवेगळे लढत असल्याने दोन्ही पक्षातून स्वतंत्र उमेदवार निवडणूक िरगणात आहेत. दोन्ही कॉंग्रेस, मनसे, अन्य राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवार निवडणूक िरगणात असले तरीही शिवसेना आणि भाजपकडून निवडणूक प्रचार साहित्याला सर्वात जास्त मागणी असल्याचे निरीक्षण व्यापाऱ्यांनी नोंदविले.
निवडणूक प्रचार साहित्याचा दर पुढीलप्रमाणे
(वस्तू, आकार आणि किंमत या नुसार)
* रस्त्यावर लावण्यासाठी निवडणूक चिन्ह
असलेले कापड, १३ रुपये मीटर
* झेंडे, १६ बाय २४, ५ रुपये ५० पैसे,
* झेंडे- २० बाय ३०, ८ रुपये
* झेंडे- ३० बाय ४०, ४० रुपये
* झेंडे- ४० बाय ६०, ७० रुपये
* भगवा झेंडा- अर्धा मीटर १० रुपये, पाऊण मीटर-२५ रुपये, १ मीटर-३० रुपये, दीड मीटर-५० ते ६० रुपये, ३ मीटर-१०० रुपये
* मफलर/उपरणे, साधे- ५ रुपयांपासून पुढे, सॅटीनचे- १० रुपयांपासून पुढे
* बिल्ले- २ रुपयांपासून पुढे
* बॅच- ४ रुपये
* टी शर्ट- ८० ते ९० रुपये
पंचरंगी लढतीमुळे प्रचार साहित्याचा तुटवडा
राज्यात होणाऱ्या पंचरंगी लढतीमुळे गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी निवडणुकीतील उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे निवडणूक प्रचार साहित्याचा तुटवडा जाणवत आहे. मालाचा तुटवडा असल्याने मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यासाठी येणाऱ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना एक-दोन दिवस जरा थांबा, माल लवकरच येईल, असे सांगावे लागत आहे. प्रचार साहित्यात 'टोपी' हा प्रकार चीनी बनावटीचा असून अन्य साहित्य हे स्वदेशी आहे.
No comments:
Post a Comment