जम्मू-काश्मीर जनतेला मोदींनी दाखविले विकासाचे स्वप्न
उधमपूर ते कटरा रेल्वेमार्गाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी काश्मिरी जनतेचे हृदय जिंकण्याची भाषा करून सकारात्मकतेचा संदेश दिला. पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतरच्या पहिल्याच दौर्यात मोदी काश्मीरबाबत काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. विशेषतः काश्मीरविषयक 370 व्या कलमासंदर्भात ते काही वक्तव्य करतात काय याविषयी उत्कंठा होती. परंतु पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरच्या जनतेने आजवर अत्यंत खडतर परिस्थितीशी सामना केला आहे; आता शांतता आणि सौहार्द आणायची गरज आहे. तद्वतच विकासाद्वारे येथील जनतेचे हृदय जिंकायचे आहे, असे भावनिक उद्गार काढले. कार्यक्रमात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी कपाळावर टिळा लावून घेण्यास साफ नकार दिला. कुणाला कळली तरी का या घटनेची बातमी?
०४ जुलैला जम्मू-काश्मीर दौर्यावर असताना नरेंद्र मोदी यांनी, जम्मू-काश्मीरमध्ये देशाच्या सीमेचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणार्या भारतीय लष्करातील अधिकारी, जवानांना श्रीनगर येथील बदामीबाग कॅन्टोनमेन्ट युद्धस्मारकावर भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.आज पर्यंत ६४०० हुन जास्त लष्करातील अधिकारी, जवानांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे.जम्मू-काश्मीरचे राज्यपाल, लेफ्ट. जनरल दलबीर सुहाग, राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक यावेळी उपस्थित होते. त्यानंतर आयोजित सैनिक संमेलनात पंतप्रधानांनी लष्करी अधिकारी आणि जवानांना संबोधित केले.त्या नंतर काश्मीरमधिल सुरक्षा व्यवस्थेची समिक्षा करतांना मुख्यमंत्री ओमरना बोलवले नव्हते.
जम्मू-काश्मीरला भारताशी जोडण्यासाठी रेल लिंक प्रोजेक्ट
थेट वैष्णोदेवीच्या पायथ्यापर्यंत नेणाऱ्या उधमपूर ते कटरा या रेल्वेमार्गाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, 'जम्मू काश्मीरच्या विकासासाठी उधमपूर ते कटरा रेल्वे सेवा ही एक मोठी भेट आहे.जम्मू-काश्मीरला उर्वरित भारताशी जोडण्यासाठी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी काश्मीर रेल लिंक प्रोजेक्टचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. 'प्रत्येक भारतीयाला या राज्याची प्रगती व्हावी, इथल्या तरुणाईला नोकऱ्या मिळव्यात आणि राज्याला समृद्धी यावी असे वाटते. त्यामुळे जरी काश्मीरमध्ये आमची सत्ता नसली तरी आम्ही त्यासाठी प्रयत्नशील राहू. ते आमचे कर्तव्य आहे. ते आम्ही करूच.
'उधमपूर ते कटरा मार्गामुळे काश्मिरींची नव्हे, तर देशातील लाखो भाविकांची मोठी सोय झाली आहे. यामुळे येत्या दहा वर्षांत कटराचा चेहरामोहरा बदललेला असेल; पण त्याचवेळी आम्ही जम्मूच्याही विकासाकडे दुर्लक्ष करणार नाही.काश्मीर खोरे आणि जम्मू यात सरकार कोणताही भेदभाव करणार नाही,' असेही ते म्हणाले.
उधमपूर ते कटरा हा मार्ग २५ किमीचा असून, त्यासाठी एक हजार १३२ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या मार्गावर सात बोगदे असून, ३० मोठे पूल आहेत. उधमपूर ते कटरादरम्यानच्या ट्रेनला 'श्री शक्ती एक्स्प्रेस' असे नाव देण्याचीही त्यांनी सूचना केली.महत्त्वाकांक्षी काश्मीर रेल लिंकमधील आता पुढील टप्पा कटरा ते बनिहाल असा असून, हा टप्पा २०१८पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
ऊर्जा क्षेत्रात खासगी भागीदारी
ऊर्जा क्षेत्रामध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) असायला हवी, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नॅशनल हायडेल पावर कॉर्पोरेशन'कडून उभारलेल्या २४० मेगावॉटच्या उडी जलविद्युत प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटना वेळी मांडले. देशातील ऊर्जा क्षेत्राच्या भरभराटीसाठी 'पीपीपी' आवश्यक असल्याचे ते म्हणाले. मोदी यांच्या हस्ते बारामुल्ला येथील ताबारेषेजवळ असलेल्या उडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे राष्ट्रार्पण करण्यात आले. झेलम नदीवर बांधण्यात आलेला हा प्रकल्प 'पीपीपी'तून उभारला आहे. दुसऱ्या फेजमध्ये असलेल्या ४.२३ किमीच्या बोगद्यातून पाणी वीजनिर्मितीसाठी नेण्यात येते आहे. या प्रकल्पाची क्षमता २४० मेगावॅट आहे.
नाकर्ते राज्यकर्ते आणि भारतद्वेषाने पछाडलेले फुटीरतावादी
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या ६६ वर्षांपासून एक पर्यटनाचा व्यवसाय सोडला तर काश्मीरचे खोरे विकासाकडे विन्मुख होऊन बसले आहे. विकास ,रोजगार नाही. खोर्यातील जनता आयुष्य नुसते रेटते आहे. विकासाची दृष्टी नसलेले, नाकर्ते राज्यकर्ते आणि भारतद्वेषाने पछाडलेले फुटीरतावादी, आपल्या स्वार्थासाठी काश्मीरला युद्धभूमीचे स्वरुप आणून सामान्यांच्या अडचणी अधिकच वाढवित असतात. शेख अब्दुल्लांच्या तीन पिढय़ा,मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या दोन पिढय़ा कुणालाही राज्याच्या विकासाची ओढ नाही. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी या त्यांच्या पक्षांचे स्थान नावापुरतेच. काश्मिरात खरी सत्ता असते ती फुटीरवाद्यांच्या हातात.या भारतविरोधी शक्तीविरुद्ध फारुख अब्दुल्ला किंवा मुफ्ती मोहम्मद यांनी आवाज उठविला नाही. सर्वकाळ सुरक्षा रक्षकांच्या गराडय़ात वावरणारे हे नेते काश्मिरातून लष्कर मागे घ्यावे असा धोशा लावत असतात.
गेल्या ६६ वर्षे सत्तेत असणार्या राजकीय नेत्यांनी काश्मीरच्या विकासाची एकही महत्त्वाची योजना पूर्णत्वास नेली नाही किंवा आखली नाही. जनतेचा उदरनिर्वाह चालतो तो पर्यटनावर आणि सरकारचा केद्राच्या मदतीवर. काश्मीरमधील राजकीय आणि बिगर राजकीय नेतृत्वाने एकच गोष्ट नेटाने केली, ती म्हणजे नकारात्मक मानसिकता(आमच्या वर अन्याय होतो) जोपासण्याची. या मानसिकतेतूनच नरेन्द्र मोदी यांच्या दौर्याच्या दिवशी राज्यात बंद पुकारण्यात आला. २०१३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग अशाच दौर्यावर आले असताना फुटीरवाद्यांनी दोन दिवसांचा बंद पाळला होता. या काळात कधी हिंसाचार उफाळेल हे सांगणे कठीण असल्यामुळे राज्यात कडक बंदोबस्त ठेवला जातो. तेथील पोलिस यंत्रणा कुचकामी असल्यामुळे कायदा आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारी लष्करावर येऊन पडते.
मानसिकता बदलल्याशिवाय काश्मीर खोर्यात विकास नाही
फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या बंदकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून मोदी यांनी आपल्या भाषणाचा संपूर्ण रोख विकासाच्या मुद्यावरच ठेवला. राजकारणाऐवजी काश्मीरचा विकास आपल्याला महत्त्वाचा वाटतो हे त्यांनी बोलून दाखवले. यातून त्यांना फुटीरवादी शक्तींना आपण फार किंमत देत नाही हेही दाखवून दिले. ओमर अब्दुल्ला सरकारने फुटीरवाद्यांविरोधात कठोर कारवाई केल्याशिवाय आणि राजकीय, सामाजिक नेते यांच्यासोबत जनतेनेही नकारात्मक मानसिकता बदलल्याशिवाय काश्मीरच्या खोर्यात विकासाचे वारे खेळणार नाही.आज ना उद्या तेथे सकारात्मक मानसिकता तयार होईल या आशेपोटीच केद्र सरकार काश्मीरला दरवर्षी आर्थिक मदत वाढवून देत असते.
ओमर अब्दुल्ला यांनी मोदींच्या दौर्यात काही रस दाखवला नाही. तर फुटीरवाद्यांनी आपलेच तुणतुणे वाजवले. काश्मीर प्रश्न सोडवण्याबाबत पंतप्रधानांनी भाष्य करण्याची गरज होती ही त्यांची अपेक्षा. एकीकडे पंतप्रधानांच्या आगमनप्रसंगी बंद पुकारायचा आणि दुसरीकडे मोठमोठय़ा अपेक्षा बाळगायच्या.काश्मीरचे नेते जर असे राजकारण करीत असतील तर काश्मिरातील तरुणांनीच इतिहासाचे ओझे फेकून देऊन मुख्य प्रवाहात येण्याचे धैर्य दाखवावे. तेच काश्मीर प्रश्नाचे उत्तर आहे.
पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलेला उधमपूर ते कटरा हा रेल्वेमार्ग जम्मू-काश्मीरला उर्वरित भारताशी जोडणारा महत्त्वाचा टप्पा आहे. या मार्गामुळे काश्मीर खोरे देशाशी आणखी घट्ट जोडले जाईल आणि काश्मीरमधील शेतीमाल आता थेट बाजारपेठेत नेता येईल. तरुणांना रोजगार मिळून खर्याअर्थाने काश्मीरच्या विकासाला दिशा मिळेल असा आशावाद आहे.तो सार्थ करण्याची तयारी काश्मीरच्या राज्यकर्त्यांनी दाखवायला हवी.
No comments:
Post a Comment