Total Pageviews

Thursday 31 July 2014

KARGIL WAR & LT VIJAYANT THAPERS LAST LETTER

कारगिल युद्ध आणि लेफ्टनंट विजयंत थापरचे शेवटचे पत्र-ब्रिगेडियर हेमंत महाजन कारगिल युद्धाला १५ वर्षे पूर्ण झाली. त्या पाश्र्वभूमीवर या युद्धामध्ये पराक्रमाची बाजी लावून विजय पताका फडकवणार्या सैनिकांचे स्मरण करणे औचित्याचे ठरते. अत्यंत खडतर परिस्थितीत जीवाची पर्वा न करता ज्या सैनिकांनी देशाच्या सुरक्षिततेला अबाधित ठेवले त्यांच्या शौर्यापुढे नतमस्तक होऊन भारतीय नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडताना आपण देखील तेवढेच तत्पर राहिले पाहिजे ही जाणीव या निमित्ताने सर्वांच्या मनात रुजवली गेली पाहिजे. २६ जुलै या दिवसाला भारताच्या इतिहासात विषेश महत्त्व आहे आणि हा दिवस समस्त भारतीयांनी कधीही विसरू नये असा आहे. पंधरा वर्षांपूर्वी या दिवशी भारतीय सैन्याने कारगिल युद्धामध्ये पाकिस्तान विरुद्ध मोठा विजय मिळवला होता. १९९९ मध्ये तात्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्ताशी मैत्रीसाठी हात पुढे केला होता. ते लाहोरला गेले . त्याच दरम्यान फेब्रुवारी ते एप्रिलच्या महिन्यात पाकिस्तानने त्यांच्या सैन्याची घुसखोरी भारताच्या कारगिल, द्रास, मश्को या भागात केली. या घुसखोरी दरम्यान हे घुसखोर दहशतवादी/ मुजाहिद्दीन होते असे पाकिस्तानने भासवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते मुजाहिदीन नसून पाकिस्तानी सैन्याचे सैनिक होते आणि ते सिव्हिल ड्रेसमध्ये घुसखोरी करत होते.या भागाची उंची १० ते १६ हजार फूट इतकी असून वर्षातील नऊ महिने हा डोंगराळ भाग बर्फाने पूर्ण आच्छादलेला असतो. येथील तापमान उणे १० अंश सेल्सियसपासून उणे ४० अंश सेल्सियस इतके कमी असते. अत्यंत कडाक्याची तेथे थंडी असते. अशा डोंगराळ आणि प्रचंड बर्फ असलेल्या भागात आपले सैन्य खूप कमी असते. त्यामुळे ज्या ठिकाणी आपले सैनिक नव्हते त्या भागात पाकिस्तानने घुसखोरी केली आणि डोंगरांच्या शिखरावर आपले सैन्य आत शिरवायला सुरुवात केली होती. ते रात्रीच्या वेळेस घुसखोरी करायचे आणि दिवसाच्या वेळेस लपुन बसायचे.एप्रिलमध्ये या भागात कोणी तरी आले आहे याची कुणकुण भारतीय सैन्याला लागली आणि कितो संख्येने आत सैन्य घुसले हे समजण्यासाठी पुढचा एक महिना लागला. त्यानंतर जून पासून भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन विजय" मोहिम सुरु केली. तरुण सैनिक आणि अधिकार्यांचे युध्द या युद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तरुण अधिकारी सहभागी झाले होते. कारण हा डोंगराळ भाग असल्यामुळे या भागात नौदल किंवा एअरफोर्सचा वापर करता एण्यासारखा नव्हता. तसेच इतर तंत्रज्ञानाचा, क्षेपणास्त्रांचा देखील फारसा उपयग नव्हाता. हे युद्ध पायदळाचे होते. या युद्धादरम्यान पाकिस्तानी सैन्यावर प्रत्यक्ष हल्ला करून त्यांना मारावे लागले. या युद्धात जे जवान शहीद झाले ते अतिशय तरुण वीस ते सव्वीस या वयोगटाचे होते. या युद्धात आपले जवळपास ३६ अधिकारी मारले गेले आणि ५२७ सैनिक शहीद झाले. अधिकार्यांची रॅन्क होती लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल. पाकिस्तानच्या या घुसखोरीला उत्तर देण्यासाठी आपल्याला देशातील या बुद्धिमान, साहसी तरुणांची किंमत द्यावी लागली. २६ जुलैला टायगर हिलवर ज्यावेळी भारताचा तिरंगा फडकवला गेला त्यावेळी आपण ही लढाई पूर्णपणे जिंकली. या लढाईमध्ये अनेकांना शौर्य पुरस्कार मिळाले. परमवीर चक्र चार , महावीर चक्र चार अधिकार्यांना, वीर चक्र हे २९ सैनिक व अधिकार्यांना मिळाले आणि सेना मेडल ५२ सैनिकांना आणि अधिकार्यांना मिळाले. या शिवाय ज्या बटालियन्सनी तेथे महापराक्रम केला त्यामध्ये १८ ग्रेनेडियर्स, राजपूताना रायफल्स, १३ जम्मु-काश्मीर रायफल्स, १८ गढवाल रायफल्स, ८ शिख रेजीमेंट यांना युनिट सायटेशन देण्यात आले. मोठा पराक्रम गाजवल्यामुळे त्यांना या प्रकारे गौरवीले गेले. या युद्धामध्ये ज्या जवानांनी आपल्या जीवाची बाजी लावून पराक्रम गाजवीला त्या सर्वांची नावे इथे नमूद करणे शक्य नाही पण आपल्या देशासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती युद्ध करून देशाचे रक्षण करणाèया या सैनिकांपैकी काहींची आठवण आपण नक्कीच काढू शकतो. यामध्ये ज्यांना परमवीर चक्र मिळाले होते त्यात कॅप्टन विक्रम बात्रा होते. त्यांचे ये दिल मांगे मोअर हे वाक्य अतिशय प्रसिद्ध झाले होते. कॅप्टन मनोज पांडे, रायफल मॅन योगिंदर्सिंग यादव आणि रायफल मॅन संजय कुमार यांना परमवीर चक्र मिळाले. या पैकी योगिंदर्सिंग यादव आणि संजयकुमार हे नशीबाने आपल्यामध्ये आहेत. बाकीनी आपल्या प्राणाचे बलिदान केले. महावीर चक्र मेजर आचार्य, लेफ्टनंट कर्नल विश्वानाथन, मेजर राजेश सिंग, मेजर विवेक गुप्ता यांना मिळाले असून त्यांची आठवण आपण नेहमीच ठेवली पाहिजे. या प्रत्येकाने तेथे शौर्याची परिसिमा गाठली. प्रत्येकाचे शौर्य प्रेरणादायी होते, पण येथे वर्णन करणे शक्य नाही. मात्र आपण किमान एका शुर विराची शौर्यगाथा थोडक्यात जाणून घेऊ शकतो. विर चक्र विजेते लेफ्टनंट विजयंत थापर लेफ्टनंट विजयंत थापर यांचा पराक्रम येथे नक्कीच नमूद करावासा वाटतो. विजयंत थापर यांच्या शौर्याबद्दल त्यांना वीरचक्र मिळाले आहे. लेफ्टनंट विजयंत थापर हे २२-२३ वर्षांचे जवान होते. सैन्यात अधिकारी बनून अवघी दोन वर्षे झाली होती. कारगिलमध्ये येण्या आधी त्यांची पलटण काश्मीरच्या कुपवाडा भागात दहशतवाद विरोधी ऑपरेशनमध्ये गुंतलेली होती. या ठिकाणी असताना दहशतवाद्यांनी एका संपूर्ण कुटुंबाला मारले. या कुटुंबातील केवळ एकच आठ वर्षांची मुलगी वाचली. त्या मुलीचे नाव रुखसाना असे असून आपल्या आई-वडिलांना प्रत्यक्ष डोळ्यासमोर मरताना बघितल्यामुळे तिची वाचा कायमची गेली होती. विजयंत थापरने या मुलीला दत्तक घेतले होते. ते तिच्या खर्चाकरता प्रत्येक महिन्याला त्यावेळी १०० रुपये ते पाठवत होते. ही १९९७ सालची गोष्ट आहे. एका शाळेत त्यांनी तिला घातले होते. अजूनही लेफ्टनंट विजयंत थापर गेल्यानंतर त्याचे वडील त्या मुलीकडे बघत आहेत. लेफ्टनंट विजयंत थापर यांचे वडिलसुद्धा सैन्यामध्ये मराठा रेजिमेंट मध्ये कर्नल होते. गनिमी काव्याने हल्ला ते अतिशय चांगले खेळाडू होते. इंडियन मिलेटरी अकादमी मध्ये असताना त्यांना पोहण्या करता आणि बॉक्सिंग करता अनेक पदके मिळाली होती. कारगिलच्या युद्धाच्या वेळी विजय यांच्या पलटणीला आदेश मिळाला होता की, थ्री पिंपल या शिखरावर असणार्या पाकिस्तानी सैनिकांवर हल्ला करुन हे शिखर पुन्हा जिंकावे. हे शिखर १६-१७ हजार फूट उंचीवरचे होते. त्या ठिकाणी पाकिस्तानचे १००-१५० सैनिक होते. या भागात हल्ला करणे अतिशय कठीण असते, त्यामुळे तुम्ही मागच्या बाजूने जाऊन गनिमी काव्याने त्यांच्यावर हल्ला करा, असे लेफ्टनंट विजयंत थापर यांना सांगितले गेले होते. ज्याप्रमाणे तानाजी मालुसरे सिंहगडावर सर्वात अवघड कड्यावरून चढले, तसेच लेफ्टनंट विजयंत देखील आपल्या १२ कमांडोना घेउन रात्रीच्या वेळेस अत्यंत अवघड भागावरून चढले. आणि तिथून पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला. हे ठिकाण असे होते की जिथून परत येणे शक्य नव्हते. दुसर्या बाजूने ७०-८० जणांची कंपनी हल्ला करणार होती. म्हणजे एकाच वेळी पाकिस्तानी सैन्यावर दोन बाजूनी हल्ला होणार होता. लेफ्टनंट विजयंत थापरचे शेवटचे पत्र ज्यावेळी लेफ्टनंट विजयंत थापर लढाईवर गेले, त्यावेळी त्यांना कल्पना होती की येथून जिवंत परत येणे अशक्य आहे. म्हणून त्यांनी आपल्या आई-वडिलांना एक शेवटचे पत्र लिहिले. हे पत्र त्यांनी बटालियनच्या ऑफिसमध्ये सोडले. त्यांनी ऑफिसमध्ये सांगून ठेवले होते की, मी परत आलो नाही तरच हे पत्र माझ्या कुटुंबियांना द्यायचे. लेफ्टनंट थापर शहीद झाल्यानंतर अनेक दिवसांनी हे पत्र त्यांच्या आई-वडिलांना मिळाले. त्यामध्ये त्यांनी जे लिहिले होते ते वाचून कुठल्याही भारतीय नागरिकाच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि मातृभूमीवरचे प्रेम जागृत झाल्या शिवाय राहणार नाही. हे पत्र विजय थापर यांनी आपल्या आई-वडिल, भाऊ आणि आज्जीला लिहिले होते. त्या पत्रात त्यांनी लिहिले होते, ‘ज्यावेळी तुम्हाला हे पत्र मिळेल तेव्हा मी या जगात नसेन आणि मी तुम्हाला आकाशातून बघत असेन. मी मोहिमेवरून परत येणे अशक्य आहे. पण त्याबद्दल मला काहीही दुःख नाही. मी पुन्हा पुढच्या जन्मी माणूस म्हणून जन्मलो तर मी पुन्हा फक्त भारतीय सैन्यातच जाईन आणि देशाकरता लढाईचे काम करेन. आपल्या वडिलांना त्यांनी म्हटले होते, ‘डॅडी तुम्ही युद्ध संपल्यानंतर नक्की "थ्रि पिंपल एरियामध्ये या आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी बघा की, आम्ही आणि भारतीय सैन्य किती कठीण भागामध्ये लढलो. माझ्या युनिटला म्हणजे राजपूताना रायफल्सला जरूर सांगा की, त्यांच्या मंदिरात म्हणजे करणीमाता देवीच्या मंदिरात आमचा आणि इतर शहिद जवानांचा फोटो लागला तर फार चांगले होईल. प्रत्येक महिन्याला रुखसानाला पैसे पाठवत जा. सगळ्यांना शुभेच्छा. खरोखरच विजय थापर आणि त्यांच्या कर्तृत्वाला सर्व भारतीयांनी सलाम केला पाहिजे.

No comments:

Post a Comment