गाझातील युद्ध सोशल मिडियावर
अनय जोगळेकर
1
इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेत ८ जुलै पासून युद्धं झडले आहे. गेल्या दोन आठवड्यात या युद्धात ६००हून अधिक पॅलेस्टिनी आणि ३०हून अधिक इस्रायली कामी आले आहेत. पॅलेस्टिनी बळींमध्ये या युद्धाशी संबंध नसलेल्या सामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर आहे. लांबीला बोरिवली त कुलाबा म्हणजेच सुमारे ४० किमी आणि रूंदीला १० किमी असलेल्या गाझा पट्टीत तब्बल १८ लाख लोकं रहातात. सन २००० सालपासून हमास इस्रायलवर रॉकेट हल्ले करत असून गेल्या काही वर्षात या रॉकेटच्या मारक क्षमतेत मोठी वाढ झाल्यामुळे आज इस्रायलचा ७०% भूभाग आणि ५०% लोकसंख्या या रॉकेटच्या सावटाखाली आहे.
युद्ध कालावधीत हमासने इस्रायलमध्ये २०००हून अधिक रॉकेट डागली असून नागरी वस्तीवर आदळणारे जवळपास प्रत्येक रॉकेट इस्रायलच्या क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेने हवेतच टिपल्याने इस्रायलचे बोटावर मोजण्याइतके नागरिक या हल्ल्यांना बळी पडले आहेत. याशिवाय गाझामधून जमिनीखालून ५ किमीपेक्षा लांब बोगदे खणून इस्रायलच्या सीमेच्या आत शिरून तेथील गावांना किंवा सैन्यतळांना लक्ष्य बनवायचे तसेच इस्रायली नागरिक आणि सैनिकांचे अपहरण करून त्यांना या बोगद्यांतून गाझामध्ये न्यायचे आणि त्यांच्या बदल्यात आपल्या शेकडो अतिरेक्यांची सुटका करून घ्यायची असे हमासचे धोरण राहिले आहे.
युद्धक्षेत्र (गाझा पट्टी) अतिशय दाटीवाटीचे असल्याने इस्रायलसाठी हे युद्ध अतिशय कठीण आहे. याआधीची युद्धं उदा. सिरिया, इराक, अफगाणिस्तान इ. लोकसंख्येची तुरळक घनता असलेल्या भागात लढली गेल्याने लष्करासाठी लक्ष्य निश्चित करणे सोपे होते. त्यातून हमासने गाझामधील शाळा, मशिदी, हॉस्पिटल आणि घरांमध्ये आपली रॉकेट दडवून ठेवली असून तेथूनच ती इस्रायलच्या नागरी वस्त्यांवर जसं की शाळा, घरं, वीजनिर्मिती केंद्र आणि विमानतळावर डागण्यात येत आहेत. इस्रायलचे हवाईदल आज जगातील सर्वात अत्याधुनिक हवाईदलांमध्ये गणले जाते.
हमास जिथून रॉकेट डागत आहे अशा इमारतींना लक्ष्य करण्यापूर्वी इस्रायली लष्कर फोन करून, हवेतून चेतावणी देणारी पत्रकं फेकून तसेच विध्वंस न करणारी “डमी” क्षेपणास्त्र डागून लोकांना त्या इमारती पुढील अर्ध्या तासात खाली करण्याच्या सूचना देते. असे असले तरी, अनेकदा लहान मुलं आणि वृद्धं एवढ्या कमी वेळेत दुसरीकडे जाऊ न शकल्यामुळे किंवा हल्ला केलेल्या इमारतीची आग इतरत्र पसरून किंवा अपेक्षेपेक्षा अधिक पडझड झाल्याने अनेकदा गाझामधील निष्पाप नागरिक या हल्ल्यांत बळी पडत आहे. इस्रायल आपल्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी गाझामध्ये क्षेपणास्त्र हल्ले करत आहे तर हमास आपल्या क्षेपणास्त्रांचे संरक्षण करण्यासाठी गाझामध्ये अडकून पडलेल्या नागरिकांचा ढाल म्हणून वापर करत आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार हा दुहेरी गुन्हा आहे.
गाझामधील युद्धं जमिनीवर जितक्या तीव्रतेने लढले जात आहे त्यापेक्षा अधिक तीव्रतेने ते सोशल मिडियावर लढले जात आहे. इंटरनेट आणि सोशल मिडियाच्या जन्मानंतरचे हे काही पहिले युद्धं नाही. अमेरिकेचे अफगाणिस्तान आणि इराकवरील आक्रमण, सुदानमधील यादवी युद्ध, सिरियामध्ये बशर अल-असाद यांच्या राजवटीचे अल-कायदा आणि अन्य बंडखोरांविरूद्धंचे युद्धं आणि इराकमध्ये आयसिसने घातलेला धुमाकूळ यातील प्रत्येक युद्धात गाझा युद्धाच्या अनेक पट अधिक सामान्य नागरिक मारले गेले आहेत. पण त्यांच्यापेक्षा गाझा युद्धं अधिक चर्चिलं जाण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जगभरातील लोकांना अरब-इस्रायल संघर्षात रस असून तेलाचं राजकारण त्याभोवती फिरतं.
आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे, इस्रायल आणि पॅलेस्टाइन हा आकाराने ठाणे जिल्ह्याच्या दुप्पट असणारा प्रदेश जगातील मोबाइल आणि इंटरनेटने सर्वाधिक जोडल्या गेलेल्या भागांपैकी एक आहे. इस्रायलमधील सुमारे ९०%हून अधिक लोकं आणि पॅलेस्टिनी भागातील सुमारे ६०% लोकं अतिजलद इंटरनेट वापरतात.
गाझा पट्टी इस्रायल आणि इजिप्तने ती संपूर्णतः वेढली असून या देशांच्या परवानगीशिवाय तेथून आतबाहेर करणं सहजशक्य नसल्याने आतापर्यंत काही निवडक पत्रकारांच्या वार्तांकनावर तेथील बातम्या अवलंबून असायच्या. पण आज उच्च दर्जाचे कॅमेरे असलेल्या स्मार्टफोनमुळे गाझातील लाखो नागरिक पत्रकार बनले आहेत. अरब मिडियाही या युद्धात हायपर-अॅक्टिवपणे उतरला असून आपल्याकडील सोशल मिडिया साधनांचा प्रभावीपणे वापर करत आहे. या मिडियाची सहानुभूती हमास आणि गाझापट्टीतील लोकांकडे आहे. इस्रायलच्या हल्यात झालेला विध्वंस, त्यात चुकीमुळे बळी पडलेले निष्पाप लोकं; खासकरून मारली गेलेली किंवा जखमी झालेली मुलं, त्यांच्या अंत्ययात्रा, हॉस्पिटलमधील आणीबाणीची परिस्थिती यांचे चित्रण तात्काळ फेसबुक, ट्विटर आणि युट्यूबच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे.
इस्रायलच्या हल्ल्यात मरण पावलेली कुटुंब, इमारतींच्या ढिगाऱ्याखाली मिळालेली मुलं, उध्वस्तं झालेली घरं आणि मशिदी यांविषयी मन हेलावून टाकणारी वर्णनं फक्त अरब आणि मुस्लिम जगातच नव्हे तर जगभर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहेत. “युद्धस्य कथाः रम्याः” अशी एक म्हण आहे. युद्धाचं वर्णन अनेकदा प्रेरणादायी ठरते. पण युद्धातून होणाऱ्या विध्वंसाची चित्रं आणि त्यात बळी पडलेल्या माणसांच्या करूण कहाण्या वाचून युद्धाच्या अपरिहार्यतेचे कुठल्या ना कुठल्या कारणाने समर्थन करणाऱ्यांच्या मनातही आपल्या हेतुबद्दल संशय निर्माण होतो.
प्रत्येक युद्धात शक्तिशाली बाजूपेक्षा दुबळ्या बाजूला किंवा अधिक नुकसान झालेल्या बाजूला सहानुभूती मिळते. इस्रायलच्या आयर्न डोम रॉकेट प्रतिरोधक यंत्रणेने जिविताचे तसेच मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणावर कमी केल्यामुळे पॅलेस्टिनींच्या तुलनेत इस्रायलची बाजू सोशल मिडियावरील प्रचारात लंगडी ठरते. गेल्या दोन आठवड्यात #gazaunderattack हा हॅश टॅग ट्विटरवर ४५ लाखहून अधिक वेळा वापरला गेला आहे तर # israelunderattack हा हॅश टॅग कसाबसा २ लाख वेळा वापरला गेला आहे. सोशल मिडियावरील ट्रेंड आज अनेक ठिकाणी जनमत घडवत किंवा बिघडवत असून विविध देशांच्या परराष्ट्र धोरणावरही प्रभाव टाकतात याची जाणीव इस्रायलला असल्याने त्याने या प्रचार युद्धात अत्यंत हायटेक आणि स्मार्ट कॅंपेन उघडली आहे.
व्हिडिओ– हमासचा रॉकेट हल्ला तुमच्या शहरात झाला तर?
या युद्धात इस्रायल संरक्षण दल (IDF) एका वेब न्यूज पोर्टलप्रमाणे काम करत आहे. इस्रायलच्या विमानांत तसेच ड्रोनमध्ये बसवलेल्या कॅमेरांद्वारे प्रत्येक हवाई हल्ल्याचे रेकॉर्डिंग करण्यात येत असून कशा प्रकारे हमासचे अतिरेकी घरांतून रॉकेट डागत आहेत, कशाप्रकारे अॅंब्युलन्सचा वापर अतिरेक्यांच्या वाहतूकीसाठी केला जात आहे, कशा प्रकारे हमासचे लोक लांब भुयारातून इस्रायलच्या प्रदेशात घुसखोरी करतात, कशा प्रकारे इस्रायलचे हवाईदल गाझा मधील लोकांना चेतावणी देते आणि कशाप्रकारे घरांमध्ये दडवलेले स्फोटकांचे साठे उध्वस्त करते इ. विषयांवरील व्हिडिओ रोजच्या रोज आपल्या स्वतःच्या यु-ट्यूब पेजवर (https://www.youtube.com/user/idfnadesk) उपलब्ध करून दिले जात आहेत.
इस्रायलचे परराष्ट्र मंत्रालयही या सोशल मिडिया युद्धात उतरलं असून या युद्धामागच्या इस्रायलच्या भूमिकेचे स्पष्टीकरण करणारे व्हिडिओ, चित्रं आणि सादरीकरणं ती आपल्या जगभरातील दूतावासांद्वारे तेथील मिडियाकडे पाठवत आहे. या दूतावासांतील प्रवक्ते स्थानिक मिडियात व सोशल मिडियात या युद्धाचे पडसाद कसे उमटले आहेत याचं विश्लेषण करून त्याला उत्तर देण्याची रणनीती ठरवत आहे.
आपला देश संकटात आहे हे ओळखून इस्रायलच्या विद्यापीठातील पत्रकारितेचे विद्यार्थी आपल्या उन्हाळी सुट्ट्यांमधला वेळ देशासाठी देऊन सोशल मिडिया कॅंपेनसाठी कंटेंट (मजकूर/संदेश) तयार करत असून जगभरातील महत्त्वाच्या भाषांमध्ये आणि संदर्भांमध्ये तो उपलब्ध करून देत आहेत.
सोशल मिडियाच्या प्रभावामुळे या युद्धात बळी पडलेल्या इस्रायली सैनिकांच्या अंत्यविधीला २०-३० हजार नागरिक गोळा होत आहेत. इस्रायल समर्थक कट्टर ख्रिश्चन आणि अन्य संघटनाही या सोशल मिडिया युद्धात उतरल्या आहेत. पश्चिम अशियातील सोशल मिडिया युद्धात इस्रायलची बाजू लंगडी ठरत असली तरी भारतातल्या ट्विटर जगतात #indiawithisrael हा हॅशटॅग अतिशय लोकप्रिय आहे.
गाझातील सोशल मिडिया युद्धातून आपण घ्यायचा सगळ्यात महत्त्वाचा धडा म्हणजे यापुढील सगळी युद्ध तसेच दहशतवाद विरोधी कारवाया सोशल मिडियावर अधिक तीव्रतेने लढल्या जातील. या कारवायांत तेथील नागरिक, फुटीरतावादी किंवा दहशतवादी संघटना आणि स्थानिक मिडिया सार्वभौम राष्ट्राच्या तोंडचं पाणी पळवू शकतील तसेच देशात दोन समाजांत तेढ निर्माण करू शकतील. ते टाळायचं असेल तर आपले पोलिस, सुरक्षा यंत्रणा आणि सैन्यदलं यांनीही अत्यंत प्रभावीपणे सोशल मिडिया वापरायची गरज आहे. या साठी नुसता पैसा आणि तंत्रज्ञान पुरेसं नाही तर ते वापरणारे लोकं आपल्या यंत्रणेत तयार करणे, या युद्धासाठी परिणामकारक संदेश निर्माण करणं तसेच कमांड आणि कंट्रोलद्वारे त्याचा पद्धतशीरपणे मारा करणंही तितकचं महत्त्वाचं आहे. आग लागल्यावर विहिर खणायला घेणे मूर्खपणाचं ठरेल.
No comments:
Post a Comment