पुण्यात गुरूवारी झालेला बॉम्बस्फोट कमी तीव्रतेचा जरी असला तरी त्याचे गांभीर्य मोठे आहे. चार वर्षांपूर्वी जर्मन बेकरीत झालेल्या स्फोटात १७ जण ठार आणि ६४ जण जखमी झाले होते, तेव्हाच पुणे हे दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचे स्पष्ट झाले होते. आता पुन्हा एकवार दहशतवादाने पुणेकरांचे दार ठोठावले आहे. गुरूवारी दुपारी झालेला स्फोट हा पुण्याच्या भरवस्तीत आणि फरासखाना आणि विश्रामबागवाडा या दोन पोलीस स्थानकांच्या वाहनतळाच्या आवारात झाला आहे आणि तेथून अगदी हाकेच्या अंतरावर पुण्याचे प्रसिद्ध दगडूशेट हलवाई मंदिर आहे. खुद्द दोन पोलीस स्थानकांच्या आवारातच दिवसाढवळ्या घडवलेला हा बॉम्बस्फोट हे जणू तपास यंत्रणेला दिलेले खुले आव्हान आहे. आम्ही तुमच्या डोळ्यांदेखत, तुमच्या नाकावर टिच्चून घातपात घडवू शकतो ही कुर्रेबाजी त्यात दिसते. जेथे स्फोट घडला तेथे दोन सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, पण त्याची तमा न बाळगता स्फोट घडवला गेला हे लक्षात घेण्याजोगे आहे. हा स्फोट ज्या मोटारसायकलीत घडवला गेला ती सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एका पोलिसाची आहे आणि ती गेल्या महिन्यात चोरीला गेली होती. सातार्यातून चोरलेली मोटारसायकल पुण्यात आणून हा स्फोट घडवला गेला याचा अर्थ यामागील सूत्रधारांचे जाळे सातार्यापासून पुण्यापर्यंत पसरलेले असले पाहिजे. या स्फोटामागे कोण असावे याबाबतचे धागेदोरे अद्याप गवसलेले नाहीत, त्यामुळे सर्व शक्यतांना वाव मिळतो. काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये तथाकथित हिंदुत्ववादी संघटनेच्या तरूणांनी हैदोस घातला होता.
हडपसरमध्ये मोहसिन शेख या निरपराध युवकाचा त्यांनी केलेल्या जबर मारहाणीत मृत्यू ओढवला. गटागटाने तरूणांची टोळकी पुण्यामध्ये फिरून दहशत माजवत होती. हा स्फोट त्या घटनेचा सूड उगवण्याचा प्रयत्न असू शकतो. मोहसिनच्या हत्येप्रकरणात सुरू असलेल्या पोलिसी कारवाईच्या विरोधात दुसर्या गटाकडून हा स्फोट घडवण्यात आला नसेल असेही सांगता येत नाही. त्यामुळे या प्रकरणी आणखी कोणकोणते दुवे हाती लागतात त्यावरूनच स्फोटामागे कोण आहे यासंबंधी निष्कर्ष काढणे योग्य ठरेल. स्फोटात अमोनियन नायट्रेटसारख्या स्फोटकाचा वापर झाला, घातपाताची तीव्रता वाढवण्यासाठी त्यात खिळे ठेवले गेले होते हे सारे पाहिले तर यामागे सराईत हात असल्याचा संशय बळावतो. पुण्यात लवकरच गणेशोत्सवाची धामधूम असणार आहे. परवाच्या स्फोटामुळे यंदाच्या गणेशोत्सवाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. शहरांत तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलेली असली, तरी केवळ कॅमेरे बसवल्याने घातपात रोखता येणार नाही. सुरक्षा यंत्रणांनी अधिक दक्ष आणि चौकस व्हावे लागेल. स्फोटाच्या परिसरात पुणेकरांचे लाडके दैवत दगडूशेट हलवाई गणपती आहे. चार वर्षांपूर्वी जर्मन बेकरीत स्फोट झाला त्याच संध्याकाळी महंमद कातिल सिद्दिकीने याच दगडूशेटच्या परिसरात बॉम्ब असलेली बॅग एका फूलवाल्याकडे ठेवायचा प्रयत्न केला होता, पण त्या फूलवाल्याने बॅग ठेवून घ्यायला नकार दिल्याने त्याचा तो बेत फसला होता. पण दैव नेहमीच साथ देईल असे नसते. दगडूशेट हलवाई गणेशमंदिराची सुरक्षा व्यवस्था ढिसाळ आहे हे पोलिसांनी गेल्या वर्षी घेतलेल्या चाचणीत स्पष्ट झाले होते. हा ढिसाळपणाच निरपराध्यांच्या जिवावर बेतत असतो. पुण्यातील स्फोटामागे जर इंडियन मुजाहिद्दीन असेल तर अब्दुल करीम टुंडा आणि यासिन भटकळ हे त्याचे दोन्ही म्होरके गजाआड असतानाही ही संघटना सक्रिय कशी असा प्रश्न उपस्थित होतो. इंडियन मुजाहिद्दीनचा कणा पूर्णपणे मोडण्यात आपल्या तपास यंत्रणांना पुरेपूर यश आलेले नाही असा त्याचा अर्थ होतो. इंडियन मुजाहिद्दीनच्या आझमगढपासून औरंगाबादपर्यंतच्या जवळजवळ दोन डझन हस्तकांना आजवर गजाआड पाठवण्यात आलेले आहे. खुद्द पुण्यात जर्मन बेकरीत स्फोट झाल्यानंतर त्यांच्या पुण्यातील हस्तकांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. परंतु एवढे सगळे होऊनही जर इंडियन मुजाहिद्दीन घातपात घडवत असेल तर ती येत्या काळात देशासाठी नवी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे भविष्यातील धोके लक्षात घेऊन या स्फोट प्रकरणाचा गांभीर्याने आणि कसोशीने तपास व्हायला हवा. निष्पापांच्या रक्ताला आसूसलेले हे सैतान मोकळे राहता कामा नयेत.
No comments:
Post a Comment