गेल्या आठवड्यात राज्य तुरुंग विभागाचे पोलीस महानिरीक्षक जवाहर सिंग यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केली. त्याआधी (आठवडाभर) मुंबई रेल्वेचे पोलीस उपायुक्त अशोक देशभ्रतार यांचीही गृहमंत्र्यांनी अशीच चालू अधिवेशनात गच्छंती केली होती. एकाच अधिवेशनात दोन आयपीएस अधिकार्यांना निलंबित करण्याची राज्य शासनाची ही पहिलीच वेळ आहे. जवाहर सिंग हे थेट आयपीएस आहेत, तर अशोक देशभ्रतार हे (स्टेट पोलीस सर्व्हिस) नॉमिनेटेड आयपीएस अधिकारी आहेत. अशोक देशभ्रतार यांनी सरकारला व काही अधिकार्यांना बदनाम करण्यासाठी घोड्यांचा व्यापारी हसन अलीच्या कबुलीची खोटी ऑडियो सीडी तयार केली होती. तशीच सीडी तुरुंंग विभागाचे पोलीस महानिरीक्षक जवाहर सिंग यांनी नाशिक कारागृहाच्या अधीक्षिका स्वाती साठे यांना बदनाम करण्यासाठी जेलमधील मोक्का आरोपींना हाताशी धरून तयार केली. ती गृहमंत्र्यांकडे पाठविली. परंतु हीच सीडी जवाहर सिंग यांच्या मुळावर आली. जवाहर सिंग यांनी स्वाती साठे यांच्या विरुद्ध कुभांड रचून खोटी सीडी तयार केल्याचे तपासात उघड झाले. जवाहर सिंग हे 1986 च्या बॅचचे थेट आयपीएस अधिकारी आहेत. बी.ए., एल.एल.बी. शिकलेला हा अधिकारी आणखी दोन वर्षांनी इंडियन पोलीस सर्व्हिसमधून रिटायर्ड होणार होता, परंतु तत्पूर्वीच आबांनी त्यांचे विसर्जन केले. त्याबद्दल पोलीस दलात आबांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. जवाहर सिंग यांची महाराष्ट्र पोलीस दलात 25 वर्षे सेवा झाली. परंतु त्यांच्या हाताखाली काम करणार्या कोणत्याही अधिकार्याने अथवा कर्मचार्याने त्यांच्याबद्दल कधी चार शब्द चांगले बोलल्याचे ऐकीवात नाही. उलट या अधिकार्याने आपल्या हाताखालील अधिकार्यांना व कर्मचार्यांना त्रास देण्यात, त्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्यातच आपली हयात घालविली. महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी जवाहर सिंग यांच्या कॅबिनमध्ये जाण्यास कधीही धजत नसत. मुंबईच्या नारकोटिक्स शाखेत असताना तर जवाहर सिंग यांनी एका फौजदार महिलेची ओढणीच खेचली होती, तर मुंबईच्या हत्यारी विभागात असताना एका शिपाई महिलेला तुझ्या शर्टाचे बटन टाईट आहे ते जर तुटले तर..? असा निर्लज्ज सवाल करून त्या शिपाई महिलेला मान खाली घालायला लावली होती. जवाहर सिंग यांच्या अशा वात्रट लीलांमुळे त्यांना कधी एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग मिळाली नाही. कायम साईड पोस्टिंगला असणार्या जवाहर सिंग यांची जेव्हा म्हाडामध्ये व्हिजिलन्स ऑफिसर म्हणून नेमणूक झाली तेव्हा तर त्यांनी म्हाडा अधिकार्यांनाच धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. त्याच्या लेखी तक्रारी जेव्हा राज्य शासनाकडे गेल्या तेव्हा तेथूनही त्यांची उचलबांगडी करून त्यांना राज्याचे तुरुंग अधिकारी (पोलीस महानिरीक्षक) म्हणून नेमण्यात आले. परंतु तेथेही जवाहर यांनी आपले ‘गुुण’ उधळले. नाशिक तुरुंग अधीक्षक म्हणून काम करणार्या स्वाती साठे यांना त्यांनी गुंतविण्याचा प्रयत्न केला. ‘साठे आरोपींना मदत करतात, पैसे खातात’ अशी खोटी सीडी तयार केली. परंतु हे सारे प्रकरण जवाहर सिंग यांच्या अंगाशी आले. आबांनी जवाहर सिंग यांची लक्तरे वेशीवर टांगली. आबांनी त्यांना घरचा रस्ता दाखविला. वास्तविक, हे खूप अगोदर व्हायला पाहिजे होते. परंतु उशिरा का होईना, आबांनी हे धाडस दाखविले त्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. आबा हे सचोटीचे आहेत. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल विरोधी पक्षालाही शंका नाही. परंतु आज त्यांच्या भोळेपणाचा शरद पवारांच्या कानाला लागलेले अधिकारी फायदा घेत आहेत. ते आबांना महत्त्व देत नाहीत. आबांच्या मीटिंगला जाणे म्हणजे वेस्ट ऑफ टाइम समजतात आणि पोलीस अधिकार्यांच्या मिटिंगमध्येही जाहीरपणे बोलतात. त्यामुळे आपण म्हणतो तेच सत्य, तेच ब्रह्मवाक्य अशी मानसिक जडणघडण व हुकूमशाही वृत्ती आज मुंबई पोलिसांना रोज अनुभवायला येत आहे. हे सारे रोखणे आता आबांच्याही हाती नसल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवारांचा प्रत्येक शब्द ज्यांना ‘वेद’ वाटतो, प्रमाण ठरतो ते अधिकारी आबांना जुमानत नाहीत. हिटलर, स्टॅलिन, माओ, इदीअमीन, गडाफीसारखे हुकूमशहा ज्यांचे आदर्श असतील ते आबांना कशाला मानतील. आबांनी जवाहर सिंगसारख्यांना दणका दिला खरा, परंतु आबांचीच नक्कल करणार्या अधिकार्यांचे काय? गुन्हेगारांचा माग काढण्याऐवजी ज्येष्ठ पोलीस अधिकारी एकमेकांचीच पाठ काढीत आहेत, हे कुणाच्या हिताचे आहे?
No comments:
Post a Comment