Total Pageviews

Tuesday 28 February 2017

मग, युद्ध हवे कुणाला इथे? March 1,


2017012 एक कन्हैया दिल्लीत उभा राहिला. देशाविरुद्ध काहीबाही बरळून गेला आणि हिरो झाला! मग ज्याच्या जातीचा आधारच पूर्णपणे खोटा होता, तो रोहित वेमुला तिकडे हैदराबादेत उभा राहिला. त्यानेही तोच तमाशा केला अन् देशभर भाव खाऊन गेला! आता ती संधी काश्मीरच्या गुरमेहर कौरने बळकावली आहे. डाव्या विचारसरणीच्या तमाम जनांना गोबेल्सचे प्रसिद्धितंत्र चांगलेच, अगदी खोलवर उमजले आहे. त्यामुळे, तमाम चांगल्या बाबी बाजूला सारून एखाद्या तद्दन फालतू गोष्टीला अवास्तव महत्त्व कसे द्यायचे अन् त्याच्याकडे जगाचे लक्ष कसे वेधायचे, यात ते अगदीच पारंगत झाले आहेत. १९९९ मध्ये शहीद झालेल्या या देशातील एका शूर सैनिकाची मुलगी असलेली गुरमेहर कौर नवी दिल्लीतील रामजसमध्ये शिकतेय्. पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी असलेल्या गुरमेहरच्या भाग्यात सध्या प्रसिद्धीचे योग आहेत. बेताल बडबड केली की, आपल्या देशात प्रसिद्धी मिळवणे तितकेसे जिकिरीचे ठरत नाही, ही बाब सभोवतालच्या हुशार मंडळींनी व्यवस्थितपणे समजावून सांगितल्यानंतर तिने एक विधान केले. म्हणाली, ‘‘माझ्या बाबांचे प्राण पाकिस्तानने नव्हे, एका युद्धाने घेतले आहेत…’’ झालं. संधीच्या शोधातच असलेले लोक त्या विधानाने पेटून उठले. ज्यांना रान उठवायचे होते त्यांनी, त्यावरून रान उठविण्यात कुठलाच कसूर बाकी ठेवला नाही. मग म्हणे, या विद्यार्थिनीला अभाविपच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिली. त्याची पोलिसांकडे रीतसर तक्रार करण्यापेक्षा गुरमेहरला ती बाब ट्विट करून जगाला सांगणे अधिक महत्त्वाचे वाटले. मग काय, आगीत तेल ओतायला तेवढे पुरेसे होते. आता तर सर्वांनाच मैदान मोकळे झाले एकमेकांवर तुटून पडायला. कॉंग्रेसच्या मनीष तिवारींपासून तर माकपच्या सीताराम येचुरींपर्यंत आणि राहुल गांधींपासून तर अरविंद केजरीवालांपर्यंत सारेच दंड थोपटून रणांगणात उतरले. डावे-उजवे म्हणत एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले. असे आयते निमित्त गवसल्यावर उजव्यांविरुद्ध गरळ ओकण्याची संधी सोडतील ते डावे कसले? कॉंग्रेस आणि केजरीवालांची पिलावळही प्रसिद्धीचा लाभ एकट्या डाव्यांना कसा उठवू देतील मग? मग तेही सरसावले या हाणामारीत. गुरमेहरच्या शहीद पिताश्रींबद्दल या देशाला नितान्त आदर आहे. त्यांच्या प्राणांचे मोल अन् देशासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची किंमत इथे कुणाच्याही लेखी कमी होऊ शकत नाही. पितृछत्र हरविलेल्या गुरमेहरबद्दलही तमाम भारतीयांच्या मनात आपुलकीचीच भावना असणार आहे. पण, म्हणून तिच्या आडून चाललेल्या घाणेरड्या राजकारणाचं समर्थन कसं करायचं? आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे, तरुणांनी राजकारणात पडू नये तर उड्या घ्याव्यात… हे सारं मान्यच. पण, म्हणून विद्यापीठे आणि महाविद्यालये ही काय देशविरोधी कारवायांची केंद्रे व्हावीत? राजकारणाचे अड्‌डेे व्हावेत? काय सांगतो कन्हय्या अन् रोहित वेमुला प्रकरणांचा अन्वयार्थ? वडिलांच्या बलिदानाने व्यथित झालेली गुरमेहर काश्मीरसह सार्‍या देशात शांती नांदावी म्हणून युद्धविहीन जगाची कल्पना मांडत असेल, तर त्याचे स्वागतच आहे. पण, मग युद्ध हवे आहे कुणाला इथे? ज्या पाकिस्तानविरुद्धच्या सैनिकी कारवाईत गुरमेहरचे वडील शहीद झालेत, ती सैनिकी कारवाई काय भारताने स्वत:हून केली होती? की भारतीय सैनिकांनी स्वत:हून युद्ध छेडले होते पाकिस्तानविरुद्ध? गुरमेहर ज्याचा उल्लेख करतेय् ती शांती, अमनची गरज भारताने नाकारली कधी? खरं तर, ती भाषा ज्यांना कळायला हवी, त्यांना कळत नाही म्हणून तर अडचण आहे. तिच्या वडिलांना पाकिस्तानने नव्हे, तर एका युद्धाने मारले, अशी काव्यात्मक भाषा वापरल्याने काही वस्तुस्थिती बदलत नाही. सीमेवर कुरघोड्या झाल्या हे वास्तव आहे. आमच्या सैनिकांनी पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिले हे सत्य आहे. त्यात तिचे पितृछत्र हरवले, हे धगधगते वास्तव आहे. त्यानंतरही भारताविरुद्धच्या पाकिस्तानी कारवाया जराही थांबलेल्या नाहीत, हे विदारक सत्य आहे. याही परिस्थितीत शांतीच्याच कल्पना मांडायच्या असतील, तर मग सीमेवर तैनात असलेल्या आमच्या सैनिकांच्या हातात कुटायला टाळ देऊन मोकळे होऊ या आपण सारे! करू देत शत्रूला वार. चालवू द्या त्यांना बंदुकी, करू द्या त्यांना घुसखोरी… गुरमेहर म्हणते तसे शांतीचे गीत गाऊ मग आपण सारे. कॉलेजात पहिल्या वर्षाला शिकणारी गुरमेहर इतके प्रगल्भ विधान करते, ही खरोखरीच कौतुकास्पद बाब आहे. पण, त्या भावनात्मक वक्तव्याचा मेळ वास्तवाशी जराही खात नसताना, केवळ राजकारण करण्याची संधी मिळाली म्हणून या देशातले झाडून सारे राजकारणी लोक तळी उचलायला सरसावतात, आपल्याच सैनिकांवर शंका घ्यायलाही मागेपुढे बघत नाहीत, हा स्तर झाला राजकारणाचा? स्वातंत्र्याचे झाले, गरिबीचे झाले, अगदी इंदिरा-राजीव हत्येचेही झाले… अजून कशाकशाचे राजकारण कराल लेकहो? जराशी लाज वाटत नाही इथे कुणालाच आपल्या राजकारणाच्या घसरलेल्या दर्जाची? स्वत:ला सुसंस्कृत म्हणवणारे नेते काय काय बरळत सुटलेत या मुद्यावर. ही विधाने मागे घेतली नाहीत तर तुझ्यावर बलात्कार करू, अशा धमक्या काहींनी या विद्यार्थिनीला दिल्याची तिची बतावणी आहे. खरंच असं काही घडलं असेल, तर त्याचा शोध पोलिसांनी घ्यावा अन् भर चौकात उभे करून फटके हाणावेत त्यांना. पण, या कृत्याची पोलिसांकडे तक्रार करायचे सोडून, ट्विट करून त्यावर जाहीर चर्चा घडवून आणण्याची गुरमेहरची क्लृप्तीही समर्थनीय ठरत नाही. प्रसिद्धी तशीही स्वस्त झाली आहे आताशा या देशात. जीवनभर समर्पित भावनेने काही चांगले काम केले, तरी नाव कमावता येत नाही अनेकांना अन् असली वादग्रस्त विधाने केली की मात्र प्रसिद्धी लगोलग मागे धावत येते काहींच्या. कन्हय्या, रोहितसारख्या पिलावळीचे याच तंत्राने एका रात्रीतून जगभरात नाव होते अन् सीमेवर शहीद होणारे जवान मात्र अकारणच उपेक्षित राहून जातात. भगिनी गुरमेहरच्या साक्षीने संपूर्ण जगालाच आता हे ठणकावून सांगितले पाहिजे की बाबांनो, युद्ध करणे हा आमचा स्वभाव नाही. एकतृतीयांश जनता दारिद्र्यरेषेखालील जीवन जगते, त्या देशाला लक्षावधी सैनिकांची कुमक तयार करून त्यांच्यासाठी कोट्यवधींची रसद तयार करणे कसे परवडणार आहे? पण, करणार काय? हरामखोरी आमच्या सभोवताल ठाण मांडून बसली आहे. शांती अन् अमन त्यांनाच नको आहे. आज धुमसत असलेले काश्मीर हा त्यांच्याच दुष्कृत्याचा परिपाक आहे. कुठल्या देशाला आवडेल आपल्या सैनिकांचे प्राण गमावलेले? आम्हालाही ते नाहीच आवडत. गुरमेहरच्या कल्पनेतले युद्धविहीन जग हीच या देशाची कल्पना आहे. फरक फक्त एवढाच की, ही कल्पना कधीच वास्तवात उतरत नाही. आणि हो! या देशाचे आणखी एक दुर्दैव असे की, इथे सीमेवर प्राणपणाने लढणार्‍या सैनिकांपेक्षाही आपल्याच देशाविरुद्ध राजकारण करायला अन् गरळ ओकायला सरसावलेले लोक मोठ्या संख्येत निपजले आहेत

No comments:

Post a Comment