Total Pageviews

Saturday, 11 February 2017

निवेदिता भिडे; मागील ४० वर्षांपासून कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्रात कार्यरत असलेल्या निवेदिता भिडे यांची कामातील बारकाई आणि काळजी हा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय


Maharashtra Times | Updated: Jan 27, 2017, 07:46PM IST 0 ‘मी नाही आम्ही’ या संकल्पनेतून संघटनेच्याच हिताचा सर्वतोपरी विचार करणारे आणि नायकापेक्षाही सेवकाच्या साह्यासाठी सदा तत्पर राहण्याचा आग्रह धरणारे निगर्वी व्यक्तिमत्व म्हणजे निवेदिता भिडे. तमिळनाडूच्या कोट्यातून समाजकार्याचा पद्मश्री सन्मान मिळाल्यानंतर त्यांच्या मुळाचा शोध सुरू झाला. तेव्हा कुठे अनेकांना त्या विदर्भातील आणि मूळ वर्धेच्या असल्याचे समजले. वर्धेच्या रामनगरातील सर्कस मैदानापुढे त्यांचे घर. त्यांचे शिक्षणही वर्धेतच. रा. स्व. संघ परिवाराशी संबंधित असलेल्या त्यांच्या परिवाराने सेवेचा पंथ जपला. त्यांचे वडील रघुनाथराव भिडे जुन्या काळातील संघाचे स्वयंसेवक. संघकार्यात समरस झालेले दिवंगत लक्ष्मणराव भिडे हे त्यांचे काका. संघशाखांच्या देशाबाहेरील विस्ताराचे काम त्यांनी जोमाने केले. निवेदिता यांचे बंधू श्रीकृष्णदेखील संघाचे प्रचारक. वनवासी कल्याण आश्रमाचे काम ते बघतात. मागील ४० वर्षांपासून कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्रात कार्यरत असलेल्या निवेदिता भिडे यांची कामातील बारकाई आणि काळजी हा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. प्रतिष्ठितांपेक्षाही वंचितांना वाचा आणि वाटा देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या म्हणून त्या ओळखल्या जातात. केंद्राच्या ईशान्य भागातील शाळांची जबाबदारी त्यांच्याकडे होती, अशी आठवण काहीजण सांगायचे. मात्र, केवळ पठडीतल्या शिक्षणावर त्यांचा कधी भर नव्हता. आदिवासींच्या चालीरीती आणि वातावरणाच्या खोलात जाऊन शोध घेणे ही त्यांची खासियत. अशा परंपरांचा अभ्यास करून एकंदर दूर सारल्या गेलेल्या समाजघटकांना जवळ घेण्याचा पद्धतशीर प्रयत्न त्यांनी सतत केला. केंद्राच्या शाळेत प्राचार्या असतानाही नवनवे प्रयोग राबविले. विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम करीत असतानाही कार्यकर्त्यांना प्रशिक्षणाची जबाबदारी त्यांनी आनंदाने घेतली. कार्यकर्ता हा संघटनेचा प्राण असतो. त्याच्या सुखदुःखाच्या काळजीतून संघटनेला बळकटी येते अशी शिकवण त्यांनी स्वआचरणातून दिली. मराठी त्यांची मातृभाषा. संस्कृतवर श्रद्धा. असे असताना हिंदी आणि इंग्रजीखेरीज तमीळविषयीची त्यांची आत्मसिद्धता संघटनकौशल्यातून आल्याचे प्रकर्षाने जाणवते. विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांच्या निष्काम कर्तव्यनिष्ठेने भारलेल्या निवेदिता भिडे यांनी प्रचंड मेहनतीने संघटनकौशल्य आत्मसात केले आणि ‘व्यक्ती नव्हे तर समाज’ या शिकवणुकीचा वस्तुपाठ समाजापुढे ठेवला. मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी ध्येयनिष्ठेने सेवाप्रकल्पाची निवड करते आणि आपल्या मनमिळावू, सात्त्विक स्वभावाने साऱ्यांना आपलेसे करते, याचे उदाहरण निवेदिताताईंच्या जीवनप्रवासातून पुढे येते. मध्यंतरी ऑस्ट्रेलियात अनौपचारिक शिक्षणपद्धतीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. आताही शिक्षणातील सहजभाव हा त्यांच्या कळकळीचा विषय आहे. मुळापासून भिडणे, लढणे सुरू असतानाही फुलासारखे जपणे सोडू नये, अशी पवित्र भावना त्यांच्या सेवेला लगडली आहे. पद्मश्री पुरस्काराने या सहजभावाची दखल घेतली गेली

1 comment:

  1. To Purchase Marathi Books Online, refer following link: Book Katta.com

    ReplyDelete