Total Pageviews

Saturday, 18 February 2017

छत्रपती शिवाजी महाराज! जयंती


छत्रपती शिवाजी महाराजांनी द्रष्टा म्हणून जे कार्य केले, त्यात त्यांची आरमार निर्मिती फारच महत्त्वाची आहे. आरमार याचा अर्थ व्यापारी जहाजे नसून, सागरी मार्गाचे रक्षण करणारे व जकात वसुलीसाठी उपयोगी असे नौदल होय. इसवी सन ९८५ ते १०१४ या काळात चोल वंशीय राजराजे यांनी आरमाराच्या साह्याने श्रीलंकेचा उत्तर भाग आणि लखदीव-मालदीव बेटे जिंकली होती. त्यानंतर त्याचा मुलगा राजेंद्र पहिला याने इ. स. १०१४ ते १०४४ या काळात श्रीलंकेवर विजय मिळविला होता तो आरमाराच्या साह्याने. तसेच आग्नेय आशिया म्हणजे जावा, सुमात्रा, मलेशिया इत्यादी ठिकाणी आरमाराच्या साह्याने विजय प्राप्त केला. यानंतर सुमारे ६०० वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची निर्मिती केली. नेमक्या याच ६०० वर्षांच्या काळात आपल्या देशावर सर्व बाजूने आणि विशेषत: सागरी मार्गाने अनेक आक्रमणे झालीत. व्यापाराच्या उद्देशाने परकीय आलेत व येथे सत्ता स्थापन केली. चोल राजांपूर्वी आपल्या देशाचा सागरी मार्गाने फार मोठा व्यापार होता, पण आरमार नव्हते. सांगण्याचा उद्देश हा की, चोल राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय कोणीही आरमारी सैन्य उभे केले नव्हते. तसे पुरावे उपलब्ध नाहीत. भारतात कायम होणारी, स्थापन होणारी पहिली युरोपीय सत्ता पोर्तुगिजांची आहे. त्यानंतर इंग्रज, फ्रेंच, डच वगैरे आलेत. हे सर्व सागरी मार्गाने आलेत. हे सर्व सागरी व्यापार्‍यांच्या मार्फत जगभर व्यापार करीत होते. व्यापार करताना संरक्षणासाठी सैन्य म्हणून आरमारही सोबत होते. त्यामुळे आरमारासह परकीय व्यापार भारतापर्यंत आला व स्थिर झाला. व्यापार हे निमित्त आणि धर्मप्रसार हे दुसरे कारण. यासाठी रोमन कॅथॉलिक्स जगभर पसरले. साम, दाम, दंड, भेद पद्धतीने अर्थ (पैसा) मिळविला आणि धर्म लादला. हे आजही सुरू आहे. शिवाजी महाराजांच्या आधी ५० वर्षे पोर्तुगिजांनी भारतात धर्म व सत्ता स्थापण्यास चाचपणी- इन्क्विझिशन- सुरू केले होते. इ. स. १६६७ मध्ये छत्रपतींनी आणि नंतर संभाजी महाराजांनीही पोर्तुगिजांना अद्दल घडविली. पोर्तुगिजांइतकेच इंग्रजही शिवाजी महाराजांना ओळखून होते. छत्रपती शिवाजी महाराज एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे होते. त्यांची राजनीती, कूटनीती, समाजकारण, धार्मिक उदारता, लोककल्याण याबाबतचे कार्य चिरकाल टिकणारे आहे. तत्कालीन सर्व परिस्थितीची जाण असणारे जे अनेक शासक होते, त्यात छत्रपती शिवाजी महाराज अग्रणी होते. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, सिद्दी यांचे बळ आरमारात आहे. त्याच्या जोरावर ते आपल्या देशात सत्ता स्थापन करीत आहेत, हे ओळखून छत्रपतींनी आपले सागरी सामर्थ्य- आरमार-उभे केले. सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, रत्नागिरी खांदेरी, कोकणात बाणकोट, नंतर रेवदंडा, चौल (किती नावे घ्यावीत!) इत्यादी ठिकाणी सागरी किल्ले उभारले. सागरी मार्गाने होणार्‍या वाहतुकीतून जकात मिळविणे आणि परकीय सत्तेवर करडी नजर ठेवणे, असा दुहेरी उद्देश छत्रपतींचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू सरदार, जहागीरदार आणि वतनदार यांच्याशी मैत्री करण्याचा सदैव प्रयत्न केला आहे. विविध मुसलमानी साम्राज्यात अनेक हिंदू सरदार बादशहांप्रती निष्ठावान होते. काही अपवाद होते, पण त्यांची संख्या कमी होती. बहुतेक सरदार, वतनदारांनी छत्रपतींची साथ दिली नाही, हे खरे आहे. त्यामुळे छत्रपतींना नवे सरदार घडवावे लागले. बहुतेक हिंंदू सरदार, वतनदार नेकीने बादशहांशी एकनिष्ठ राहिले, पण त्यांच्या डोळ्यांसमोर हिंदू साम्राज्य निर्माण होत आहे, याची त्यांना आस्था वाटत नव्हती, उलट वैषम्य आणि असूयाच वाटत होती. छत्रपतींचा ध्येयवाद तत्कालीन वतनदार, सरदारांना पटला नाही किंवा त्यांनी त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले. मात्र, तरुण पिढी छत्रपतींच्या ध्येयवादाने भारून गेली व तीच त्यांच्या कामी आली. राजकारणात छत्रपतींनी जाणीवपूर्वक मोगल व इतर बादशहांशी अनेक तह केलेत. उद्देश होता, या देशातून परकीय सत्ता कायमची हद्दपार व्हावी. पण, दुर्दैवाने अनेक हिंदू सरदारांना याचे आकलन झाले नाही. तसे झाले असते तर खूप मोठी बलाढ्य हिंदू सत्ता या देशात निर्माण झाली असती. छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक वृत्तीचे होते, पण धर्मभोळे नव्हते. म्हणून तर बजाबा निंबाळकर आणि नेताजी पालकर यांना त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात आणले. म्हणजे धर्मपरिवर्तनाचा पाया घातला. धर्मबहिष्कृत करणारे तत्कालीन धर्मपंडित तसेच धर्मपरिवर्तन घडवून आणणार्‍यांसाठी तो एक जबरदस्त धक्का होता. यात छत्रपतींची धर्माच्या विचाराची सकारात्मकता दिसून येते. छत्रपती कठोर होते, पण क्रूर नव्हते. म्हणून तर चंद्रराव मोरे यांच्या वधानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या पालनपोषणाची निश्‍चित व्यवस्था त्यांनी करून दिली. छत्रपती साहसी होते, पण आततायी नव्हते. व्यवहारी होते, पण ध्येयशून्य नव्हते. उच्च ध्येयाची स्वप्ने पाहून ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करणारे वास्तववादी होते. म्हणून त्यांच्या राहणीत उधळेपणा कधीच नव्हता. अन्य राजांप्रमाणे चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, काव्य अशा प्रकारच्या कलाकारांना आश्रय देणे तसेच मोठमोठे राजवाडे बांधणे, इमारती, घाट, धर्मशाळा निर्माण करणे इत्यादींसाठी त्यांनी राज्याच्या संपत्तीचा उपयोग केला नाही. अपवादात्मक काही कलावंत आहेत; पण छत्रपतींच्या मनाचा कल होता तो, प्रजेचे पालनपोषण, संरक्षण आणि स्थैर्य याकडे. दुष्काळात लक्षावधी लोक खितपत पडले असताना किंवा समृद्धीच्या काळातसुद्धा वेठबिगारी आणि सत्तेच्या माजात, कोट्यवधी रुपये खर्च करून ‘ताजमहाल’सारखी वास्तू बांधण्याची ‘रसिकता’ त्यांच्याकडे नव्हती. उलट ओबडधोबड पठारे, टेकड्या, खोल दर्‍या, उंच माची यांच्या आधारे बळकट किल्ले उभारून सभोवतालच्या प्रदेशातील जनतेचे परकीय सत्तेपासून रक्षण व पालनपोषण करण्यासाठी उपयुक्त वातावरण तयार करणे आणि जनतेत हे राज्य आपले आहे, अशी विश्‍वासाची भावना निर्माण करणे, त्याचबरोबर परकीय सत्तांचे राजकीय आणि धार्मिक आक्रमण थोपविणे व परतवून लावणे, हा कायम निश्‍चय छत्रपतींच्या मनात होता. आपला देश क्रमाक्रमाने मुसलमानी व रोमन सत्तेच्या आधिपत्याखाली जात आहे, याची जाणीव छत्रपतींच्या मनाला आणि विचारांना, परकीय सत्तेशी लढण्याची सतत प्रेरणा देत होती. बालवयात झालेले संस्कारही तेवढेच मोलाचे होते. आपल्या देशात एक कायम विचारसरणी फार पूर्वीपासून रुजू झाली आहे. ती म्हणजे लढण्याचे काम सैन्याचे असते, सामान्य प्रजेचे नाही. युद्धकाळात सेना लढत असताना, आजूबाजूच्या प्रदेशातील जनता शंात राहिली. परिणामी असे अनेक राजे, साम्राज्ये नष्ट झाली आहेत. जेथे सैन्यासह सामान्य प्रजाही लढते, तेथे आक्रमण करणार्‍या शत्रूच्या फौजाही निकामी होतात. छत्रपतींच्या काळात सामान्य जनतेत आत्मीयता आणि विश्‍वास निर्माण झाला होता. सामान्य प्रजा कशी लढली, याचे उत्तर धर्माभिमान नसून, आपण लढू शकतो आणि शत्रूला पराजित करू शकतो, हा विश्‍वास छत्रपतींनी प्रजेत निर्माण केला. लढून वीरगती प्राप्त करण्यापेक्षा लढणे, टिकणे, प्रसंगी पळणे आणि शत्रूला पळविणे, त्यांना थकविणे व पराजित करणे हे नवे पहिले मूल्य छत्रपतींनी निर्माण केले. दुसरे मूल्य म्हणजे प्रजेच्या सोयी सांभाळणे (सवलती नव्हे!) आणि धर्माभिमानाबरोबर स्वदेशाभिमान जागविणे, हे तिसरे मूल्य. ही तीन नवी मूल्ये छत्रपतींनी प्रस्थापित केली. लढावे, राज्य वाढवावे, प्रसंगी नमते घ्यावे आणि राज्य वाचवावे; पण प्रजेचे पोषण, रक्षण व संवर्धन करावे, हाच राजधर्म आहे, याची जाण छत्रपतींना होती. अकबर महान होता. हिंदूंच्या बाबतीत त्याचे उदार धोरण होते, अशी स्तुतिसुमने त्याच्यावर उधळली जातात. परंतु, अकबराच्या राज्यात बहुसंख्य प्रजा हिंदू होती. या बहुसंख्य हिंदू प्रजेला संतुष्ट ठेवल्याशिवाय स्थिर राजवट निर्माण करता येणार नाही, आपल्या धर्माचा प्रसारही करता येणार नाही, हे साधे व्यवहारज्ञान अकबराकडे निश्‍चित होते. जी बहुसंख्य हिंदू प्रजा अकबराच्या शासनाला कर देत होती, त्या हिंदू प्रजेबाबत अकबराचे औदार्याचे धोरण असणे यात काय मोठेपणा! छत्रपती शिवाजींच्या राज्यात मुस्लिम बहुसंख्य नव्हते. ते राज्याच्या कराचा आधारही नव्हते. ज्या मुसलमानांचा इतिहास आक्रमणाचा आणि अत्याचाराचा होता, या देशात ज्यांनी वारंवार आक्रमणे करून येथे लूट केली, जबरीने धर्मांतर घडवून आणले, अशा मुसलमान वंशाच्या प्रजेच्या बाबतीत छत्रपती असहिष्णुतेने वागले नाहीत. शेजारच्या मुसलमानी सत्ता हिंदू प्रजेवर जबरी कर लादत होत्या, तरीही छत्रपतींनी आपल्या राज्यातील मुसलमानी प्रजेवर अत्याचार केले नाहीत, उलट औदार्याने वागविले. त्यांना हिंदू प्रजेसमान वागणूक दिली, ती स्वयंभू औदार्यातून आणि सहिष्णू वृत्तीतून. कौटिल्याने म्हटले आहे- ‘प्रज्ञासुखे सुखं राज्ञ: प्रजानाम् च हिते हितम्‌|’ प्रजेच्या सुखात राजाचे सुख असते. प्रजेच्या हितात राजाचे हित असते. जुलमी राजा कधीही यशस्वी होत नसतो. कौटिल्याच्या मतानुसार प्रजेचे इहलौकिक कल्याण हे राजाचे काम आहे. शांतता ठेवणे, परकीय आक्रमणापासून प्रजेचे रक्षण करणे ही कामे केली की राजाचे कर्तव्य संपत नसते. अतिवृष्टी, दुष्काळ, नापिकी आणि परकीय आक्रमण यासारख्या आपत्ती सांगून येत नाहीत. म्हणून राजाने आपले सैन्य सतत तयार ठेवावे. त्याचबरोबर धान्याची कोठारेही सतत भरून ठेवावीत. नवी पिके आली की नवे धान्य विकत घ्यावे. शेतकर्‍यांजवळील धान्य संपले की, व्यापारी स्वत: जवळील धान्य चढ्या भावाने विकून प्रजेची पिळवणूक करतात. अशा वेळी राजाने जुने धान्य काढून प्रजेला द्यावे. त्यामुळे राज्याची धान्याची कोठारे सदैव नव्या धान्याने भरलेली राहतात. त्यामुळे भावसुद्धा नियंत्रणात राहतात व प्रजेला सतत धान्यपुरवठा सुरू राहतो. आजच्या कल्याणकारी राज्याची कल्पना जेवढी कौटिल्याच्या विचारात होती, तेवढी छत्रपतींच्या प्रत्यक्ष राज्यकारभारात दिसून येते. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज अग्रणी द्रष्टा होते, असे म्हणणे चूक ठरणार नाही! वसंत बापुराव वर्‍हाडपांडे,९६६५३५६६८१

No comments:

Post a Comment