Total Pageviews

Tuesday, 28 February 2017

भारत-म्यांमासंबंधात काही आशेची किरणे…


February 28, 2017035 सर्वसाक्षी २०१२ सालच्या विजयादशमीचा दिवस होता. मंडाले शहरातील ईरावती नदीच्या घाटावरील दृश्य बघून असे वाटत होते की, आपण बंगाल किंवा आसाममधील एखाद्या नदीच्या काठावर तर नाही! नवरात्रीनंतर मूर्तिविसर्जनासाठी, मंडालेच्या सर्व भागातून सुशोभित तराफे तसेच ग्रामीण भागातील लोक घाटावर गोळा झाले होते. त्या संध्याकाळी कमीतकमी ५० हजार लोक तिथे जमले असतील. सर्वत्र उत्साही वातावरण होते. लोकही सणासुदीसारखे नटून-थटून आलेले. ढोल आणि नगार्‍याच्या ठोक्यांनी सारे शहर दुमदुमत होते. फुलांची सजावट आणि गुलाल यामुळे उत्साही झालेले वातावरण, ईरावती नदीवरून वाहणार्‍या थंड बोचर्‍या वार्‍यांमध्ये मिसळून गेले होते. म्यांमात बाहेरून आलेल्या कुणालाही हा दिवस आणि ते सर्व दृश्य अविस्मरणीय होते. माझ्यासाठी तर हा अनुभव खर्‍या अर्थाने स्फुरणदायी होता. हा संपूर्ण सोहळा कॅमेर्‍यात कैद करण्याचा तसेच मनाच्या कोपर्‍यात साठवून ठेवण्याचा मी प्रयत्न करीत होतो. मंडाले शहरात बंगाली आणि मणिपुरी लोकांची लक्षणीय संख्या आहे आणि नवरात्रीच्या समापन दिनी त्यातील बहुतेक जण नदीच्या घाटावर उपस्थित झाले होते. मंडालेचे मणिपूरशी घनिष्ठ सांस्कृतिक बंध आहेत. अनेक शतके मंडाले ही बर्माची राजधानी होती आणि येथील राजघराण्याची सोयरीक मणिपुरी राजघराण्याशी होत असे. कालांतराने राजघराण्यांची सद्दी संपली आणि या दोन प्रांतांमधील सांस्कृतिक व सामाजिक संबंध विरत गेले. नेपाळी वंशाचे हिंदू मंडाले शहरात तसेच म्यांमाच्या उत्तर भागात गेल्या शतकापासून वसले आहेत. नेपाळी गोरखा समाजाला ब्रिटिशांनी लष्कराच्या सेवेत घेतले आणि इथे वसविले. भारतातील हिंदूंपेक्षा या नेपाळी गोरख्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती बरीच चांगली आहे. नेपाळी हिंदू लष्करात सहभागी असल्यामुळे त्यांना भारतीय हिंदूंपेक्षा चांगली वागणूक मिळाली. नेपाळी हिंदूंना नागरिकत्व देण्यात लष्करी राजवटीला काही हरकत नव्हती. असे असले तरी हिंदू समाजाचे हे दोन घटक- भारतीय आणि नेपाळी-आता आतापर्यंत मिळून-मिसळून राहू शकले नाही. यांच्यात समेट व्हावी म्हणून वेळोवेळी अनेक व्यक्तींनी, संस्थांनी प्रयत्न केलेत. पण व्यर्थ! मध्य बर्मात भारतीय लोकसंख्या असलेली ७० हून अधिक खेडी आहेत. ब्रिटिशांच्या राजवटीत, उसाच्या शेतीसाठी भारतातून स्थलांतरित झालेली ही मंडळी तेव्हापासून शेतीच्याच उद्योगात आहेत. काहींनी लहानमोठे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यातील काहींनी मंडाले आणि यंगूनला व्यवसाय सुरू करून चांगलाच जम बसविला आहे. हा भाग चौतगा व जियावाडी या दोन गावांच्या नावांनी ओळखला जातो. दक्षिण म्यांमामधील तमिळांप्रमाणेच, येथील हिंदीभाषी लोकांना लष्करी राजवटीत भयंकर त्रास झाला. चौतगा येथील मोफत वसतिगृह आणि शाळा तसेच मंदिर, हे सर्व हिंदू संस्कृतीचे एक प्रकारे आधारस्तंभ म्हणून पुढे आले आहे. लष्करी राजवटीच्या कठीण दिवसांत, या प्रकल्पाला आजूबाजूच्या खेड्यांतून सतत मदत होत होती. हिंदी आणि संस्कृत शिकण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओघही कायम राहिला. या शाळेतील परीक्षा खूप लोकप्रिय आहेत. मातृभाषेपासून वंचित असलेली मुले इथे मातृभाषा शिकू शकतात. आतापर्यंत येथून शेकडो विद्यार्थी हिंदी शिकले आहेत आणि त्यामुळेच आजही जियावाडी व चौतगा गावातील रस्त्यांवर हिंदी ऐकायला मिळते. ही काही कमी उपलब्धी नाही. सनातन धर्म स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांद्वारा संचालित हा प्रकल्प आता हिंदी आणि हिंदूंसाठी एक प्रकारे प्राणदायिनीच ठरत आहे. बहुतेक कार्यकर्ते, मग ते कुठल्याही संघटनेत कार्य करणारे असोत, एकतर ते या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत किंवा कुठल्या ना कुठल्या रूपाने या संस्थेशी जुळलेले आहेत. सरकारकडून या संस्थेला कुठल्याही प्रकारची मान्यता नाही आणि तरीही, दरवर्षी या शाळेला चांगल्या संख्येत विद्यार्थी मिळत आहेत. असे असले, तरी भारतीय मुळाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची अजून इथे सोय झालेली नाही. जगातील इतर देशांप्रमाणेच, येथील हिंदीभाषी जनता ब्रिटिश राजवटीत, उसाच्या शेतीसाठी येथे स्थलांतरित झाली आहे. अर्थातच, बर्मिज शेतकरी आळशी आहेत आणि त्यांना उसाच्या शेतीसाठी तसेच साखर उत्पादनासाठी आवश्यक असलेले कौशल्यही नाही. सर्वार्थाने, बर्मिज अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम भारतीय करीत आहेत. या भागात स्थलांतरित होणार्‍या पहिल्या भारतीय तुकडीने येथे आल्यावर जे काही भोगले, याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. मलेरियाच्या डासांनी भरलेली घनदाट जंगले, उसाच्या शेतीसाठी कापावी लागली. यासाठी त्यांनी चिकाटीने प्रचंड परिश्रम केलेत. ब्रिटिश राजवटीत, भारतीय वंशाच्या लोकांनी सरकारी नोकर, व्यापारी, बँकर्स, कारकून, सावकार इत्यादी रूपात कार्य करून ते सरकार तसेच अर्थव्यवस्थेचे आधार बनले. १९३० मध्ये सुरू झालेल्या भारतीयविरोधी दंगली आणि जपान्यांनी बर्माचा ताबा घेतल्यानंतर झालेले सामूहिक पलायन तसेच १९६२ साली जबरदस्तीने झालेली हकालपट्‌टी, यामुळे मूळ भारतीयांचा बर्मा देशातील दबदबा बराच कमी झाला. म्यांमामधील बौद्धांसाठी भारत पुण्यभूमी आहे आणि भारतीयांसाठी हा त्यांच्या पूर्वजांचा देश आहे. पर्यटनाला प्रोत्साहित केले, तर सांस्कृतिक आणि धार्मिक बंध अधिक मजबूत होऊ शकतात. २०१४ सालचा नरेंद्र मोदींचा विजय इथल्या भारतीय समाजाने जाहीरपणे साजरा केला. कारण त्यांना आशा वाटली की, उदीयमान भारतामुळे त्यांच्या प्रयोजनाला बळ तसेच बदलत्या परिस्थितीचा फायदा मिळेल. आर्थिक आणि व्यापारासाठी मदतीची गरज असली, तरी चीनच्या विस्तारवादी भूमिकेमुळे आग्नेय आशियातील देशांमध्ये चिंता आहे. म्यांमामध्ये थोडाफार चिनी समाज आधीपासून अस्तित्वात असला, तरी लष्करी राजवटीच्या काळात चीनने म्यांमामध्ये चांगलाच शिरकाव केला. चिनी सरकारच्या प्रचंड गुंतवणुकीमुळे येथील चिनी लोकसंख्या आता चांगलीच वाढली आहे. चिनी सरकार खूष राहावे म्हणून म्यांमा सरकार स्थानिक चिन्यांशी चांगले संबंध ठेवून आहे. येणार्‍या काळात, बर्मिज समाज भारताकडे कसा बघतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. एक अनुभव सांगण्याचा मोह मला आवरत नाही. पूर्वीचे मेमियो आणि आताचे प्यिनोलविन, हे उत्तर म्यांमामधील रमणीय थंड हवेचे गाव आहे. इथे भारतीय बर्‍यापैकी संख्येत आहेत. या गावाच्या उत्तरेला नव्याने बांधलेल्या बौद्ध मंदिराला मी भेट दिली. गेल्या दशकातच याचे निर्माण झाले आहे. मंदिराचा परिसर प्रचंड विस्तृत आहे. याची एक कथा आहे. म्यांमामधे कुठेतरी एक प्रचंड व अत्यंत रेखीव बुद्ध मूर्ती तयार होत होती. ती मूर्ती विकत घेण्याची चीनची इच्छा होती. बर्मिज लोकांनी याला विरोध केला. परंतु, चीनच्या दबावामुळे म्यांमा सरकारने ती मूर्ती विकण्याचा निर्णय घेतला, तेव्हा लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. मग लोकांनी काय केले? ही बुद्ध मूर्ती वाहून नेणार्‍या प्रचंड मोठ्या ट्रकला, या भागातील डोंगराळ घाटात उलटवून दिले. मूर्ती कुठलेही नुकसान न होता बाहेर फेकली गेली. चिनी ठेकेदाराने मूर्ती उचलण्यासाठी प्रचंड मोठ्या क्रेन्स आणल्या. पण, बुद्ध चीनच्या दिशेने एक इंचही सरकला नाही. नंतर मात्र या भागातील बौद्ध भिक्खूंनी या मूर्तीला डोंगराच्या शिखरावर वाहून नेले आणि तिथे एक सुंदर बौद्ध मंदिर बांधले. वाचकांना आठवत असेल, तर प्रसिद्ध चित्रपट नर्तकी हेलन ही म्यांमामधील आहे. तसेच म्यांमामध्ये जन्मलेल्या आणखी एका भारतीयाचे भारतात सर्वात लक्षणीय योगदान आहे. ते म्हणजे श्री सत्य नारायण गोएनका गुरुजींनी प्रस्थापित केलेली विपश्यना साधना. या महापुरुषाने ही ध्यानसाधना पुन्हा भारतात आणली आणि हिंदू व बौद्धांना एकत्र आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या घटना, भारत-म्यांमामधील संबंध चांगले होण्यासाठी आशेचे किरण आहेत

No comments:

Post a Comment