Total Pageviews

Saturday, 4 February 2017

वादळाचे अंतरंग उलगडणारी पुस्तके ट्रम्प यांच्या कारकीर्दीला नुकतीच सुरुवात झाली आहे सचिन दिवाण

वादळाचे अंतरंग उलगडणारी पुस्तके ट्रम्प यांच्या कारकीर्दीला नुकतीच सुरुवात झाली आहे आणि त्याच्या परिणामांची जगाला आता केवळ चुणूक दिसत आहे. अशावेळी या ट्रम्प नामक वादळाची जडणघडण कशी झाली आहे हे जाणून घेतल्यास त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याचे मार्गही कदाचित त्यातून दिसू शकतील. त्यासाठी ही पुस्तके महत्त्वाची आहेत.. कोणी निंदा किंवा वंदा, डोनाल्ड ट्रम्प नावाची व्यक्ती आजमितीला अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेली आहे. तुम्हाला आवडो किंवा न आवडो, जर महाभियोग चालवून त्यांना पदच्युत केले गेले नाही, तर पुढील किमान चार वर्षे जगाला त्यांना झेलावे लागणार आहे. बरं, प्रश्न दुसऱ्या कोणत्याही साध्यासुध्या देशाच्या अध्यक्षाचा किंवा प्रमुखाचा असता तर वेगळा, पण इथे गाठ आहे जगातील एकमेव महासत्तेच्या सर्वोच्च पदी स्थानापन्न झालेल्या एका विक्षिप्त माणसाची. असं म्हणतात की ‘व्हेन अमेरिका कॅचेस कोल्ड, होल वर्ल्ड स्निझेस.’ आधीच जगाचा ‘अनसर्टन्टी इंडेक्स’ यंदा आजवरच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. मग अमेरिकेची सूत्रे अशा तुफानी व्यक्तिमत्त्वाकडे गेल्यावर जगाला कापरे भरले नाही तरच नवल! आता या पाश्र्वभूमीवर या वादळाच्या केंद्रस्थानी जाऊन त्याला समजून घेता आले तर जरा फायद्याचे ठरू शकते. वादळाच्या अंतरंगात डोकावण्याची ही संधी ट्रम्प यांच्यासंबंधीची काही पुस्तके उपलब्ध करून देतात. त्यात त्यांचे चरित्रकार मायकेल डी’अँतोनिओ यांचे ‘द ट्रथ अबाऊट ट्रम्प’, पत्रकार एझरा लीवंट यांचे ‘ट्रम्पिंग त्रुदाँ – हाऊ डोनाल्ड ट्रम्प विल चेंज कॅनडा इव्हन इफ जस्टीन त्रुदाँ डझंट नो इट यट’ आणि खुद्द ट्रम्प यांनी पत्रकार टोनी श्वाट्र्झ यांच्या साथीने १९८७ साली लिहिलेले ‘ट्रम्प : द आर्ट ऑफ द डील’ या पुस्तकांचा समावेश होतो. ट्रम्प नावाचे रसायन नेमके काय आहे, त्याची जडणघडण कशी झाली आणि जगात सध्या जे काही घडू घातलेले आहे त्यावर या प्रक्रियेचा कसा ठसा उमटणार आहे हे ट्रम्प चरित्रकार मायकेल डी’अँतोनिओ यांनी सीन इलिंग यांना दिलेल्या मुलाखतीत अत्यंत मार्मिकपणे वर्णिले आहे. त्यांचे पुस्तकही याची मोठी दृष्टी प्रदान करते. डी’अँतोनिओ यांनी ट्रम्प यांच्यासोबत खूप काळ व्यतीत केला असून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बारकाईने अभ्यास केला आहे. त्यांच्या मते ट्रम्प हे एखाद्या नटासारखे आहेत. जॉन वेन जसा आयुष्यभर वेगवेगळ्या भूमिका जगत आला तसे ट्रम्प आयुष्यभर विविध भूमिका जगत आले आहेत. आपली ही ओळख त्यांना अत्यंत प्रिय आहे. एका यशस्वी उद्योजकाच्या भूमिकेतून बिनधास्त वक्तव्ये करणाऱ्या आणि जोखीम पत्करू इच्छिणाऱ्या अध्यक्षीय उमेदवाराच्या भूमिकेत त्यांनी केलेल्या स्थित्यंतराने अमेरिकी मतदारांवर गारुड केले आणि ते अध्यक्षपदी निवडूनही आले. त्यांच्या या धोका स्वीकारण्याच्या वृत्तीचा माग एक व्यावसायिक आणि व्यक्ती म्हणून असलेल्या पूर्वायुष्यातही दिसून येतो. जगाच्या दृष्टीने ज्या गोष्टी प्रमाण आहेत त्या धुडकावून लावण्यात त्यांना आनंद मिळतो. मला सामान्यांसारखे जगण्याची-वागण्याची गरज नाही हे दाखवण्याची ऊर्मी त्यामागे असते. मग या सगळ्यातून ट्रम्प यांना आपली काय प्रतिमा निर्माण करायची आहे, आपण काय आहोत हे सिद्ध करायचे आहे? डी’अँतोनिओ यांच्या मते, दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकी जनरल जॉर्ज पॅटन यांच्यासारखी प्रतिमा ट्रम्प यांना निर्माण करायची आहे. डी’अँतोनिओ म्हणतात की, जेव्हा ट्रम्प पॅटन यांच्याबद्दल बोलतात तेव्हा त्यांना आपल्याला काय आवडते, किंवा आपण कसे बनू इच्छितो हेच ते सुचवत असतात. पॅटन यांच्या आक्रमकतेशी, अधिकारवाणीशी ते साधम्र्य साधू पाहात असतात. लोकांनी आपल्याकडेही तसेच उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून पाहावे अशी त्यांची इच्छा असते. ट्रम्प यांच्या आदर्श व्यक्तींमध्ये त्यांचे वडील, ते एका लष्करी प्रशिक्षण संस्थेत असतानाचे अधिकारी आणि प्रसिद्ध वकील रॉय कॉन यांचा समावेश आहे. या सर्वाच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये काही समान धागे आहेत. ते सर्व आक्रमक आणि दांडगाईखोर होते, आपल्या व्यक्तिमत्त्वाची उंची ते ताकदीमध्ये मोजत आणि आपल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी साधनशूचितेच्या पालनावर त्यांचा फारसा कटाक्ष नसायचा. डी’अँतोनिओ उल्लेख करतात, की ट्रम्प यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले होते, ‘यू आर अ किलर, यू आर अ किंग’ आणि त्यावर ट्रम्प यांनी ठाम विश्वास ठेवला. डोनाल्ड यांचा थोरला भाऊ फ्रेडी वडिलांच्या अपेक्षांना उतरू शकला नाही. मग डोनाल्ड यांनी वडिलांच्या अपेक्षेबरहुकूम बनण्याचा पूर्ण प्रयत्न केला. तर ट्रम्प यांची आई कमालीची दिखाऊ वृत्तीची होती. प्रत्येक कार्यक्रमात सर्वाचे लक्ष आपल्यावरच खिळून राहावे असा तिचा कटाक्ष असे. त्यामुळे ट्रम्प यांनी वडिलांकडून बेदरकार व निष्ठूर वृत्ती आणि आईकडून दिखाऊपणा उचलला, असे त्यांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण करताना डी’अँतोनिओ यांनी म्हटले आहे. आपल्या विरोधकांवर आणि प्रसारमाध्यमांवर ट्रम्प करीत असलेल्या शरसंधानाबद्दल डी’अँतोनिओ म्हणतात की, स्वत:शिवाय अन्य कोणत्याही स्रोताकडून येणारी माहिती खोटी आहे हे ट्रम्प यांना दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी अन्य सर्व माहितीच्या स्रोतांना अवैध ठरवणे हे त्यांच्या विरोधाचे सूत्र आहे. तसे केल्याने आपलेच खरे असून आपल्यावर विरोधक व प्रसारमाध्यमे अन्याय करत असल्याचे दाखवून सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा हेतू असतो. मग ट्रम्प नेमके कसे अध्यक्ष असतील याचे उत्तर देताना डी’अँतोनिओ म्हणतात, ट्रम्प कधीच एक यशस्वी नेता नव्हते. ते त्यांच्या कॅसिनो आणि एअरलाइन्सच्या व्यवसायातील कामगिरीवरून दिसून आले. त्यामुळे ट्रम्प आपला कारभार प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून चालवतील. त्यांचा प्राधान्यक्रम ‘डीलमेकिंग’ला असेल. त्यांच्यासाठी अध्यक्षपद हे एक डामडौल करण्याचे पद आहे. लोकांनी आपल्याला छान-छान म्हणावे, आपले कौतुक करावे यातच त्यांना रस असेल. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्रवादाला चुचकारले आहे. अमेरिकेच्या हितालाच प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी त्यांनी व्यापारी र्निबध लादण्याचे धोरण स्वीकारले आहे. दहशतवादावर नियंत्रण मिळवण्याच्या नावाखाली मुस्लिमांच्या अमेरिका प्रवेशावर र्निबध लावले जात आहेत. शेजारच्या मेक्सिकोतून होणारे स्थलांतर आणि तस्करी रोखण्यासाठी सीमेवर २००० मैलांची भिंत बांधण्याचा जंगी प्रस्ताव मांडला आहे. त्यांच्या या धोरणांची पाळेमुळे त्यांच्या ‘द आर्ट ऑफ द डील’ पुस्तकात दिसून येतात असे लेखकांचे व विश्लेषकांचे म्हणणे आहे. ट्रम्प आपल्याला एक उत्तम ‘डीलमेकर’ समजतात. त्यांचा मोठमोठय़ा संकल्पना, विचार, प्रतिमांवर विश्वास आहे. त्याच नजरेतून त्यांच्या मेक्सिको सीमेवरील २००० मैल लांब भिंतीकडे पाहता येते. प्रत्यक्षात ती बांधून होईल का नाही माहीत नाही. पण मोठय़ा संकल्पना लोकांना भुलवतात. मेक्सिकोबरोबर नुकत्याच झालेल्या चर्चेत त्यांनी काही ठिकाणी भिंतीऐवजी कुंपण घालण्याचे संकेत दिले. त्याचेही सूत्र पुस्तकात मिळते, सर्व पर्याय खुले ठेवा हे त्यांचे धोरण आहे. त्याबरोबरच व्यावसायिक म्हणून एखाद्या प्रकल्पाची किंमत कमी करण्याकडे त्यांचा कल असतो. म्हणूनच या भिंतीचा खर्च मेक्सिकोकडून वसूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण लोकांना नुसतेच झुलवत ठेवता येत नाही. त्यांना प्रत्यक्ष काम करून दाखवावे लागते. म्हणूनच थोडय़ा लहान प्रमाणात का होईना हा प्रकल्प पूर्ण करून दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली वचने पटापट पूर्ण करण्याकडे त्यांचा असलेला कल हेच स्पष्ट करतो. याशिवाय या लेखकांना ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जाणवलेला एक पैलू म्हणजे ते परिस्थितीवर कायम प्रतिहल्ला करत आले आहेत. त्यामुळे देशांतर्गत आणि जागतिक प्रस्थापित व्यवस्था असो की प्रसारमाध्यमे, ‘अरे’ला ‘का रे’ करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. ट्रम्प यांच्या कारकीर्दीचा संपूर्ण जगावरच भलाबुरा परिणाम होणार आहे. तूर्तास त्याची झळ मेक्सिको आणि कॅनडा या शेजारी देशांना बसत आहे. यापैकी कॅनडावर कळत-नकळत होणाऱ्या परिणामांचा परामर्श पत्रकार एझरा लीवंट यांनी त्यांच्या ‘ट्रम्पिंग त्रुदाँ’ या पुस्तकात घेतला आहे. ट्रम्प अद्याप अमेरिकेचे अध्यक्ष झालेही नव्हते. पण त्यांच्या प्रचाराचा आणि त्यातील मुद्दय़ांचा शेजारच्या कॅनडाचे लिबरल पक्षाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदाँ यांच्या धोरणांवर कसा परिमाम झाला हे या पुस्तकाने दाखवून दिले आहे. त्रुदाँ यांनी ट्रम्प यांच्या धोरणांवर सरसकट टीका सुरू केली. ट्रम्प जे काही बोलतील त्याचा विरोधी सूर त्रुदाँ लावू लागले आणि त्यातून आपल्या देशांतर्गत विरोधकांवर नेम धरण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असे लीवंट यांनी या पुस्तकात म्हटले आहे. या बाबतीत जस्टीन त्रुदाँ त्यांचे वडील पिअरी त्रुदाँ यांनी १९७० च्या दशकात जो अमेरिकाविरोधी सूर लावला त्याचीच री ओढत आहेत. ट्रम्प निवडून आल्यानंतरच्या काही आठवडय़ांतच त्रुदाँ यांनी अमेरिकेचा पारंपरिक प्रतिस्पर्धी क्युबाची राजधानी हवानाला भेट दिली, गाझा पट्टीतील ‘हमास’शी संबंधित संस्थांना २५ दशलक्ष डॉलरच्या देणग्या दिल्या आणि कॅनडातील एका मोठय़ा तंत्रज्ञानविषयक कंपनीची मालकी चिनी कंपनीला घेण्याची परवानगी दिली. इतकेच नव्हे, तर इराण आणि जागतिक हवामानबदल आदी विषयांवरही त्रुदाँ यांनी अमेरिकाविरोधी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. देशांतर्गत विरोधकांवर मात करण्यासाठी त्रुदाँ हे उद्योग करत असले तरी त्यातून अमेरिका व कॅनडा हे शेजारी अधिकाधिक दूर जात आहेत. वास्तविक अमेरिका व कॅनडा यांचे आर्थिक, लष्करी आणि सांस्कृतिक बाबतीत पूर्वापार सौहार्दपूर्ण संबंध आहेत. पण केवळ ट्रम्प यांच्या आगमनाने त्यात फरक पडू लागला आहे. ट्रम्प यांच्या कारकीर्दीला नुकतीच सुरुवात झाली आहे आणि त्याच्या परिणामांची जगाला आता केवळ चुणूक दिसत आहे. अशावेळी ही पुस्तके या परिणामांना सामोरे जाण्याचे मार्ग दाखवू शकणारी आहेत. ती जशी ट्रम्पच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतात, तसाच त्याला पर्यायी राजकारण उभारण्याची आशाही व्यक्त करतात. सचिन दिवाण

No comments:

Post a Comment