मुंबई तरुण भारत 03-Feb-2017 महेश पुराणिक
१९८०च्या दशकात पंजाबमध्ये माजलेल्या स्वतंत्र खलिस्तानवादी दहशतवादाचे भूत पुन्हा एकदा जिवंत होण्याची चिन्हे आहेत आणि याला कारणीभूत आहेत, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल. पंजाब विधानसभा निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला असतानाच अरविंद केजरीवाल खलिस्तानवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या सक्रिय पाठिंब्याने चर्चेत आले, त्यांच्यावर ही फुटीरतावादी चळवळ पुनरुज्जीवित करण्याचा आरोप झाला. याला कारणही केजरीवाल यांचे आतापर्यंतचे वर्तन, त्यांच्या प्रचारसभांतील खलिस्तानी चळवळीला दिले जाणारे प्रोत्साहन हेच आहे.
पंजाबमध्ये केजरीवाल आणि आमआदमी पक्षाची ज्या ज्या वेळी सभा असते, त्या त्या वेळी तिथे ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जातात. इतकेच नव्हे तर ’आप’च्या कित्येक पोस्टर्स आणि बॅनर्सवर अरविंद केजरीवाल यांच्यासह खलिस्तानी दहशतवादी भिंद्रनवाले यांचे फोटोही झळकतात. अरविंद केजरीवाल आणि ’आप’च्या प्रचाराचा एकूणच रागरंग पाहता ते खलिस्तानी चळवळीला पुन्हा एकदा हवा देण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट होते आणि तेही अगदी दिवसाढवळ्या. ही बाब देशाच्या सुरक्षेच्या आणि सार्वभौमत्त्वाच्या दृष्टीने अतिशय गंभीर असल्याचे त्यांच्या व्यक्तिगत वक्तव्यांतूनही सिद्ध होते.
गेल्याच शनिवारी पंजाबमधील मोगा येथे झालेल्या सभेदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी ‘खलिस्तानी लिबरेशन फ्रंट’ या फुटीरतावादी संघटनेचा नेता गुरविंदर सिंग याच्या घरी मुक्कामकेला होता. गुरविंदर सिंग याच्यावर पंजाबमध्ये फुटीरतावादी खलिस्तानी चळवळीचा दहशतवाद अत्युच्च पातळीवर असताना शीख आणि हिंदूंमध्ये दंगली भडकविण्याचा आरोप आहे. परंतु, सबळ पुराव्याअभावी सुटका झालेला गुरविंदर सध्या ब्रिटनमध्ये राहून आपल्या फुटीरतावादी कारवाया करीत आहे. त्याच्यावर इतरही अनेक हत्या, हत्येचा प्रयत्न, असे आरोप आहेत. एवढा काळा इतिहास असलेल्या व्यक्तीच्या घरी मुक्कामकरण्यामागे केजरीवालांचा पुन्हा एकदा खलिस्तानी चळवळ धुमसविण्याशिवाय दुसरा काही उद्देश असण्याची शक्यता निश्चितच नाही.
याच आठवड्यात कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या संगरूरमधील मौर मंडी येथे मंगळवारी झालेल्या सभेनंतर बॉम्बस्फोट झाला, ज्यात सहा जणांचे प्राण गेले. राहुल गांधी यांनी यानंतर याचा संबंध थेट अरविंद केजरीवाल आणि खलिस्तानी फुटीरतावादी शक्तींशी जोडत, केजरीवाल हे पंजाबमध्ये देशविरोधी शक्तींना पुन्हा उभे करण्यासाठी मदत करीत असल्याचा आणि ही पंजाबसाठी धोकादायक बाब असल्याचा आरोप केला. आमआदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर असा आरोप केवळ राहुल गांधी यांनीच नव्हे, तर कॅप्टन अमरिंदर सिंग, अकाली दल आणि पंजाबमधील अनेक राजकीय विश्लेषक-तज्ज्ञांनीसुद्धा केला. पंजाब पोलिसातील एका ज्येष्ठ अधिकार्यामने तर खलिस्तानी घटकांचे तुष्टीकरण करून अरविंद केजरीवाल आगीशी खेळत असल्याची उघड प्रतिक्रियाही दिली.
सदर घटनेनंतर पंजाबमधील हिंदू तख्त आणि जुना आखाड्याचे प्रमुख पंचानंद गिरी यांनीही केजरीवालांनी खलिस्तानी फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला. अरविंद केजरीवाल यांना मुक्कामच करायचा होता तर ते राज्य सरकारच्या अतिथीगृहात किंवा ’आप’च्या एखाद्या कार्यकर्त्याच्या घरीही राहू शकले असते, असे ते म्हणाले. मात्र असे न करता ते गुरविंदर सिंग या फुटीरतावाद्याच्या घरी राहिले, हे अयोग्य आणि फुटीरतावादी प्रवृत्तींना फूस लावल्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच आता आपण अरविंद केजरीवाल आणि ’आप’यांच्याविरोधात खुलेपणाने बोलणार असल्याचे आणि त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या पंजाबात अकाली दल सत्तेत आहे. पण अकालीविरुद्ध जनमत असल्याचे दिसत असल्याने जनतेतील असंतोषाचा थेट फायदा घेत केजरीवाल धोकादायक पद्धतीने शीख समाजातील कट्टरतावादी घटकांना चुचकारत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. आपल्या प्रचारसभेतही केजरीवाल वारंवार १९८४ मधील शीखविरोधी दंगलीतील दोषींना शिक्षा करण्याचा आणि पवित्र गुरू ग्रंथसाहिबच्या अवमानाच्या घटनांचाच सातत्याने उल्लेख करत असतात. पंजाबमधील तुरुंगात कैदेत असलेल्या अनेक गुंड आणि फुटीरतावादी चळवळीशी संबंधित लोकांना आपली सत्ता आल्यास मुक्त करण्याचेही केजरीवाल नेहमीच बोलतात. या सर्व पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल आणि खलिस्तानी फुटीरतावाद्यांचे पडद्याआड संबंध असल्याचेच स्पष्ट होते.
मात्र या सर्व प्रकरणावर आमआदमी पक्षाचे संजय सिंग यांनी सांगितले की, ’’अरविंद केजरीवाल यांना गुरविंदर सिंग कोण हेच माहिती नाही.’’ परंतु गुरविंदर सिंग या फुटीरतावाद्याच्या घरी अरविंद केजरीवाल यांना सतनामसिंग या गुरविंदरच्या अत्यंत जवळच्या मित्रानेच नेले होते. मग एका राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या केजरीवाल यांना आपण नेमके कुठे जात आहोत हेही माहिती नव्हते का? किंवा ते मुद्दामजाणून घ्यायचे नव्हते? किंवा खलिस्तानवादी शक्तींकडून मिळणारा पैसा प्रिय असल्याने त्यांना त्याची फिकीर वाटली नाही? की खलिस्तानवादी शक्तींना पाठिंबा देऊन ती चळवळ पुन्हा जागी करणे हाच त्यांचा अजेंडा आहे?
खलिस्तानी फुटीरतावादी आणि त्यांचे अनिवासी भारतीय पाठीराखे यांच्याशी केजरीवाल यांचा संबंध असल्याचे नोटाबंदीनंतर प्रकर्षाने पुढे आले. आमआदमी पक्षाला नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात निधीची कमतरता भासू लागली. नोटाबंदीने ’आप’चे कंबरडेच मोडले. कारण वेगवेगळ्या मार्गाने आधी गोळा केलेला पैसा केवळ कागदाच्या तुकड्यात परावर्तित झाला. त्यामुळे गेल्या एका महिन्यात आमआदमी पक्षाने खलिस्तानी फुटीरतावाद्यांशी संधान साधूनच नव्हे, तर जणू काही त्यांच्यासमोर समर्पण करूनच अनेकानेक वैध-अवैध मार्गाने पैसा गोळा केला. फोर्ड फाऊंडेशनसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या आडून, हवालामार्गे लाखो रुपयांच्या रकमा जमवल्या. कित्येक खलिस्तानी कार्यकर्ते आमआदमी पक्षात सक्रियही झाले आणि त्यांनी ’आप’ला सर्व प्रकारची रसदही पुरवली. तसेच खलिस्तानवाद्यांच्या मेहेरबानीमुळे ’आप’ने या फुटीरतावाद्यांची पंजाबमधील प्रचारात खुलेआममदतही घेतली. ज्या गावात-शहरात ’आप’ची कोणतीही संघटना नाही, नेटवर्क नाही तिथेही ’आप’चा प्रचार जोरदारपणे सुरू झाला, यामागेही याच फुटीरतावादी शक्ती होत्या. एवढेच नव्हे तर कित्येक पोस्टर्सवर-बॅनर्सवर अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर दहशतवादी भिंद्रनवाले याचे फोटोही झळकले. ’आप’च्या सभेदरम्यान अनेकवेळा ’स्वतंत्र खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणाही दिल्या गेल्या. अरविंद केजरीवाल यांनी तर विद्यमान मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्याविरोधात खलिस्तान समर्थक जर्नेल सिंग यालाही तिकीट देण्याचा प्रताप केला. जर्नेल सिंग याने अनेकदा युरोप आणि कॅनडात जाऊन तेथील खलिस्तानसमर्थक अनिवासी पंजाबी शीख समाजाच्या कार्यक्रमात सहभागही घेतला आहे. तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरमयांनी शीख दंगलीसंदर्भात अपेक्षित उत्तर न दिल्याने त्यांच्यावर बूट फेकण्याचे कृत्यही त्यांनी केले आहे. मात्र खलिस्तानी फुटीरतावाद्यांशी अरविंद केजरीवालांसह ’आप’च्या नेत्यांच्या असलेल्या संबंधामुळे आमआदमी पक्षातील स्थानिक कार्यकर्ते नाराज असल्याचेही पक्षातील अंतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे.
खलिस्तानी फुटीरतावाद्यांशी ’आप’चे लागेबांधे असल्याचे हे काही पहिलेच किंवा एकमेव उदाहरण नाही. गेल्या वर्षी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि ’आप’चे नेते मनीष सिसोदिया यांच्यावरही असेच आरोप झाले होते. २०१६च्या सप्टेंबर महिन्यात फिनलँडमध्ये स्किल डेव्हलपमेंट कॉन्फरन्स भरली होती. या कॉन्फरन्ससाठी सिसोदिया गेले होते. मात्र एका दिवसासाठी असलेल्या या कॉन्फरन्सनंतरही सिसोदिया तिथेच चार ते पाच दिवस राहिले. नेहमीच उठसूट आपण काय करतो, हे ट्विटरवर टाकणारे सिसोदिया या काळात मात्र शांत होते. या काळात त्यांनी कसलीही माहिती किंवा आपण कुठे आहोत याबाबतचे ट्विट केले नाही. याला कारणही तसेच आहे, या काळात त्यांनी फिनलँडमधील अनिवासी भारतीय शीख समाजाचे नेते जे की, खलिस्तानी फुटीरतावादी आहेत त्यांच्याशी चर्चा केल्याचा आरोपही करण्यात आला.
आमआदमी पक्ष, अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांच्यावरील खलिस्तानी चळवळीशी संबंध असल्याचे आरोप खरे ठरण्याची शक्यता सध्याच्या पंजाबमधील एकूणच प्रचारातून दिसते. पंजाबमधील विधानसभा निवडणूक, त्यातील आमआदमी पक्षाचा सहभाग, त्यांचे फुटीरतावाद्यांशी असलेले अर्थपूर्ण संबंध, फुटीरतावाद्यांचा ’आप’ला असलेला सक्रिय पाठिंबा या घटनांवरून हे सत्य धडधडीतपणे देशासमोर येते. अशा कुटील कारवाया सक्रियपणे करणारे फुटीरतावादी खलिस्तानी गट आणि अरविंद केजरीवाल यांचा देशविघातक संबंध पाहता केजरीवाल हे नक्कीच स्वतःच्या स्वार्थासाठी देशाच्या सुरक्षेशीसुद्धा खेळू शकतात, हे स्वच्छपणे समजते
काय आहे खलिस्तानी चळवळ?
१९७० व ८०च्या दशकात पंजाबात शीखांचा स्वतंत्र देश अस्तित्वात यावा यासाठी चळवळ चालू झाली होती. या काल्पनिक स्वतंत्र देशाचे नाव ‘खलिस्तान, असे पंजाबी भाषेतील ‘खालसा’ (पवित्र) या शब्दावरून ठेवण्यात आले होते. शीखांच्या या मागणीला या काळात दहशतवाद व हिंसाचाराचे स्वरूप प्राप्त झाले. या चळवळीने भारत सरकारशी एक प्रकारचे युद्ध उभे ठाकले होते. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री बेअंत सिंग, जनरल अरुण वैद्य अशा अनेक महत्त्वाच्या व्यक्ती या दहशतवादाला बळी पडल्या. १९८६-८७च्या सुमारास पंजाब पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर या खलिस्तानी दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली. ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’च्या माध्यमातून या चळवळीचा भारतातून सफाया करण्यात आला व त्यामुळे ही चळवळ व त्याच्याशी संबंधित दहशतवादाला आळा बसला. सध्या ही चळवळ ब्रिटन, कॅनडा इत्यादी देशात राहाणार्याा शीख समुदायाकडून चालवली जाते.
ऑपरेशन ब्ल्यू स्टार
३ ते ६ जून १९८४ दरम्यान शीख दहशतवादी व भारतीय लष्करादरम्यान अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात घडलेल्या चकमकीला ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ असे नाव देण्यात आले. जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखाली खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी सुवर्ण मंदिरातून कारवाया चालवल्या होत्या. जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांना या चकमकीत ठार करून त्यांच्या कारवायांचा बिमोड करण्यात आला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतला व भारतीय सैन्यास कारवाईचे आदेश दिले होते. भिंद्रनवालेसह बरेच दहशतवादी यात मारले गेले, इतरांनी शरणागती पत्करली, पण सुवर्णमंदिरात त्यावेळी बरेच नागरिकही उपस्थित होते. त्यांचाही यात मृत्यू झाला. याचमुळे शिखांचे सर्वोच्च धार्मिक स्थळ सुवर्णमंदिरातील ही कारवाई वादग्रस्त ठरली. हिंसाचाराची मालिका येथेच न संपता याचीच परिणती पुढे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्याच शीख सुरक्षारक्षकांकडून झालेली हत्या व त्यानंतर उसळलेल्या शीखविरोधी दंग्यांत झाली. खलिस्तानवाद्यांचा म्होरक्या भिंद्रनवाले आणि त्याच्या साथीदारांनी सुवर्णमंदिरात आश्रय घेतल्यामुळे त्यांना हुसकावून लावण्यासाठी जी लष्करी कारवाई झाली, तिचे एक नेते आणि माजी लेफ्ट. जन. के. एस. ब्रार यांच्यावरही काही वर्षांपूर्वी या खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. असा क्रूर आणि घातक, राष्ट्रविरोधी इतिहास असलेल्या खलिस्तानी चळवळीशी संधान बांधून केजरीवालही दहशतवाद आणि अराजकाला आमंत्रण देत ८०च्या दशकात गाडले गेलेले, मधल्या काळात सुप्तावस्थेत गेलेले खलिस्तानवादी चळवळीचे भूत पुन्हा एकदा जिवंत करत आहेत.
No comments:
Post a Comment