Total Pageviews

Monday 20 February 2017

उलटलेला भस्मासुर-पाकिस्तानने गेली किमान दोन-अडीच दशके जो दहशतवादाचा भस्मासुर पोसला तो आता सर्व ताकदीनिशी उलटतो आहे.

भारत व अफगाणिस्तान यांना खिळखिळे करण्यासाठी तसेच जमले तर बांगलादेश व पश्चिम आशियात काही देशांना अस्थिर करण्यासाठी पाकिस्तानने गेली किमान दोन-अडीच दशके जो दहशतवादाचा भस्मासुर पोसला तो आता सर्व ताकदीनिशी उलटतो आहे. तसे नसते तर गेल्या १५ दिवसांत देश हादवरून टाकणारे किमान आठ दहशती हल्ले पाकला सोसावे लागले नसते. यातला सर्वांत भयंकर हल्ला सिंध प्रांतातील सेहवानच्या सूफी दर्ग्यावर झाला. त्यात किमान ८८ भाविकांचे प्राण गेले. दोनशेवर जखमी उपचार घेत आहेत. दुर्दैव म्हणजे, या बळींमध्ये अनेक लहान मुलांचा समावेश आहे. हा हल्ला झाल्यानंतर पाक लष्कराने आक्रमक पवित्रा घेऊन शंभरावर दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचे सांगितले जाते. या दाव्यावर विश्वास ठेवणे, कठीणच आहे. लष्करप्रमुखांनी तर टोकाची आक्रमक भाषा वापरली आहे. मात्र, पाकमध्ये दहशतवाद्यांनी आयएसआयच्या आश्रयाने कुठे कुठे तळ केले आहेत व ते कुणाला कशी मदत करीत आहेत, हे पाक लष्कराला माहीतच नसेल, यावर कोणताही शहाणा माणूस विश्वास ठेवणार नाही. पाकिस्तानात हे जे रक्तरंजित अराजक माजले आहे, याला अनेक कारणे आहेत. पहिले म्हणजे, इस्लाम हा एकाश्म नाही. इस्लाममध्येही अनेक पंथोपपंथ आहेत. त्यांचे स्वतःचे रीतीरिवाज आहेत, हेच या दैत्यांना मान्य नाही. त्यातून सूफी, अहमदी, शिया अशा संपद्रायांच्या विरोधात ‘धर्मयुद्ध’ पुकारले जाते. ही लढाई व्यापक, बहुस्तरीय आहे. पण पाक राज्यकर्त्यांनी ‘इष्ट दहशतवाद व अनिष्ट दहशतवाद’ असा भ्रामक भेद करून दहशतवाद्यांना दुसरे सशक्त निमित्त दिले. भारतीय व अफगाण भूमीवर रक्ताचे सडे घालतील ते मित्र आणि कराचीत नंगानाच करतील ते मात्र शत्रू, हे भेद चूक होता. रणभूमीत भारताकडून वारंवार पराभव झाल्याने पाकने छुप्या युद्धासाठी दहशती मार्ग निवडला. ही पाकच्या स्वहितातील धोरणात्मक व व्यूहात्मक घोडचूक ठरते आहे. काश्मीर, बलुचिस्तान, अफगाणिस्तानात दहशतवादी व पाक सैन्याने सतत एकत्र कारवाया केल्याने पाक लष्कराची जी काही सेक्युलर वीण होती, तीही उसवत गेली. आता ते पाक भूमीवरील दहशतवाद कसा काय निपटणार आहे? सेहवानच्या आठशे वर्षांची परंपरा असणाऱ्या या लाल शहाबाज कलंदर सूफी दर्ग्याजवळ जो कार्यक्रम होता, त्याचे नाव ‘कलंदरी धमाल’ असे होते. यात संगीत, भजन, कव्वाली, नृत्य असे सारे असते. दक्षिण आशियातील सर्व संपन्न संगीत आणि धर्मपरंपरांचा प्रसन्न संगम सूफी संप्रदायात आढळतो. जशी पाक लष्कराची सेक्युलर वीण नष्ट झाली, तद्वत पाकिस्तानी समाजाची वीण दहशतवाद्यांना खुपते आहे. कारण त्यात भारतीय परंपरेचे असंख्य ताणे-बाणे आहेत. अशा स्थितीत जी बहुमुखी तटबंदी करायची ती भारत, पाक, अफगाणिस्तान यांनी अफगाण पश्चिम सीमेवर एकत्र येऊन मागेच करायला हवी होती. ती संधी गेली. आता पाक लष्कर दहशतवाद्यांशी खरी लढाई करते की लुटूपुटूची, याची वाट न पाहता भारताला दक्षिण आशियातील दहशतवाद निपटून काढण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा लागेल. अमेरिकेचे नवे नेतृत्वही त्याला अनुकूल असेल. पाकिस्तानी असोत की भारतीय- निरपराध नागरिकांच्या रक्ताचे पाट आता थांबवावेच लागतील

No comments:

Post a Comment