Total Pageviews

Sunday 5 February 2017

राष्ट्रभक्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन


January 29, 2017045 २६ जानेवारी रोजी भारताचा प्रजासत्ताक दिन थाटात साजरा झाला. एकीकडे प्रखर राष्ट्रभक्तीचे दर्शन घडत होते, तर दुसरीकडे ओंगळवाणे प्रदर्शन. देशातील अनेक शहरांमध्ये जसे तरुणाई बेधूंद होऊन ओंगळवाणे प्रदर्शन करीत होती, तसेच नागपुरातील तरुणाईलाही ऊत आला होता. रस्तोरस्ती हुल्लडबाजी होताना दिसत होती. डीजेच्या तालावर अन सिनेमाच्या गाण्यांवर तरुण आणि तरुणी नाचत होत्या. याला अपवादही होता. सगळेच तरुण अन तरुणी बेभान झाल्या होत्या, असे नव्हे. काहींनी भान ठेवून प्रजासत्ताक दिन साजरा केला. पण, जे काही नागपुरात पाहायला अन अनुभवायला मिळाले, ते निश्‍चितच आनंददायी नव्हते. दीडशे वर्षे देशावर इंग्रजांचे राज्य होते. दीडशे वर्षांच्या राजवटीत इंग्रजांनी भारतीयांवर घोर अन्याय केला. गुलामगिरीतील भारतीयांना मोजक्या इंग्रजांनी अक्षरश: छळले. ही इंग्रजी राजवट उलथून टाकण्यासाठी वासुदेव बळवंत फडके, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू, मंगल पांडे… यांच्यासारखे महान भारतीय, हसत हसत फासावर लटकले. मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी आणि आपल्या भारतीय बांधवांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शहीद झाले. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांच्यासारखे महापुरुष, देश स्वतंत्र करण्यासाठी अहोरात्र झटले. या महापुरुषांबद्दल तपशीलवार सांगण्याची गरज नाही. त्यांनी केलेले कार्य आजही आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. क्रांतिकारकांनी बलिदान दिले नसते आणि महापुरुषांनी आंदोलन छेडले नसते, तर आम्ही आजही गुलामगिरीत खितपत पडलो असतो… परंतु, क्रांतिकारकांचं बलिदान आणि महात्मा गांधींसारख्या थोर पुरुषांनी केेलेली आंदोलनं यामुळे ब्रिटिशांवर दबाव वाढला. ‘चले जाव’चा नारा बुलंद झाला. ब्रिटिशांनी काढता पाय घेण्याचे ठरविले अन् अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर भारताची घटना तयार करण्याचे काम प्रारंभ झाले. घटनेचा मसुदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सरकारच्या सुपूर्द केला अन् २६ जानेवारी १९५० रोजी घटना लागू करण्यात आली. भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आले. त्या दिवशीपासून दरवर्षी २६ जानेवारी रोजी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. राजधानी दिल्लीत राजपथावर आपल्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन जगाला घडविले जाते. जगातील एका देशाच्या प्रमुखाला प्रमुख अतिथी म्हणून बोलाविले जाते. गेल्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आले होते. यंदा अबुधाबीचे युवराज आले होते. राजपथावर सगळे कसे दिमाखात सुरू होते. राजपथावर देशाच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन सुरू असतानाच, इकडे आमच्या नागपुरात अतिउत्साही तरुणाईने रस्त्यारस्त्यांवर नुसता उच्छाद मांडला होता. देशभक्तीचे अत्यंत हिडिस प्रदर्शन सुरू होते. हुल्लडबाजी करताना जसे तरुण आघाडीवर होते तशा तरुणीही मागे नव्हत्या! डीजेवर कर्णकर्कश गाणी वाजविली जात होती. काही ठिकाणी देशभक्तिपर गाणी जरूर वाजविली जात होती. पण, बहुतांश ठिकाणी सिनेमाची गाणी वाजविली जात होती. ‘सैराट’ या मराठी सिनेमातील ‘झिंग झिंग झिंगाट…’ हे गाणे वाजवले जात असताना तरुण आणि तरुणी बेभान होऊन नाचत होते. पोरं आणि पोरी मस्तवाल झाल्यासारखे दिसत होते. त्यांचे अंगविक्षेप आणि एकूणच वर्तणूक आक्षेपार्ह होती. प्रसंग काय आहे, आपण करतो काय आहोत, याचे भान ही तरुणाई सपशेल विसरली होती! देशभक्तीच्या नावाने नुसता गोंधळ चालू होता. काही तरुणांनी तर प्रजासत्ताक दिनाच्या मिरवणुकीत, चक्क कुख्यात गुंड अरुण गवळीचा फोटो बॅनरवर लावला होता! अरुण गवळी हा मुंबईतला कुख्यात गुंड आहे. विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली तो सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. अशा गुंडाचे छायाचित्र मिरवणुकीतल्या बॅनरवर लावले जावे, हे प्रजासत्ताक भारताचे दुर्दैवच म्हणावे! एकीकडे हातात तिरंगा राष्ट्रध्वज आणि दुसरीकडे अरुण गवळीचे छायाचित्र लावून देशभक्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन समाजाला घडविले जात होते. यांचे हे देशप्रेम बघून रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍यांना किळस येत होती. डीजेवर कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवून पर्यावरणविषयक नियमांच्या जशा चिंधड्या उडविल्या जात होत्या, तसेच वाहतुकीचे सगळे नियमही पायदळी तुडविले जात होते. विशेष म्हणजे प्रत्येक मिरवणुकीसोबत पोलिस होते. पण, पोलिसांना बघ्याचीच भूमिका घ्यावी लागली. एकेका वाहनात क्षमतेच्या दुप्पट-तिप्पट तरुणी-तरुण बसले होते. बसले होते म्हणण्यापेक्षा उभे राहून, गाडीच्या खिडकीबाहेर शरीर काढून, हाती असलेला झेंडा बाहेर फडकवीत नागरिकांना त्रासच देत होते. आपण जो तिरंगा झेंडा फिरवितो आहोत, तो रस्त्याने जाणार्‍या एखाद्या वाहनचालकाला लागेल आणि आणि त्याला दुखापत होईल, याचाही विचार कुणी करताना दिसत नव्हते. कुणी गाडीच्या टपावर बसले होते, तर कुणी बोनेटवर! देशभक्तीचे किळसवाणे प्रदर्शन सुरू असताना, येणारे-जाणारे नागरिकही असहायपणे फक्त बघत होते. गोंधळ करणार्‍यांना विरोध करण्याची हिंमत कुणीच दाखविली नाही. ‘नंगे से खुदा डरे’ या हिंदी वाक्प्रचाराचा प्रत्यय रस्तोरस्ती येत होता! देशभक्तीने प्रेरित होऊन ज्या मिरवणुका रस्तोरस्ती निघाल्या होत्या, त्यामुळे सगळीकडेच वाहतुकीला अडथळे निर्माण झाले होते. भरधाव वेगाने तरुण बाईक चालवीत होते. आपल्या बेभान वागण्याचा कुणाला त्रास होईल, याचे कुणालाही भान नव्हते! या मिरवणुकांमध्ये अनेक खुल्या जीप सामील झाल्या होत्या. खुल्या जीपमध्ये बसलेली टारगट तरुणाई कुणाचेच काही ऐकायला तयार नव्हती. मिरवणूक रस्त्याच्या एका बाजूने जायला हवी होती. परंतु, सगळीकडे या मिरवणुकांनी वाहतुकीत अडथळे आणल्याचेच जाणवले. पोलिसही हतबल होऊन पाहण्यापलीकडे काही करू शकत नव्हते. मिरवणुकीच्या अग्रभागी डीजे लावले होते. या डीजेवरील गाण्यांच्या तालावर नाचताना, आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत, याचे भानही तरुणाई हरवून बसली होती. मोटारसायकलस्वार अनेक तरुणांच्या मागे मुली बसल्या होत्या. या मुली दुचाकीवर उभ्या राहून हातवारे करून नाचत होत्या, तेव्हा आज देशाचा प्रजासत्ताक दिन आहे की एखाद्याच्या लग्नाची वरात आहे, असे सहजच वाटले. या मुला-मुलींना कुणाचा धाक असावा असे क्षणभरही वाटले नाही. आपण रस्त्यावर गोंधळ घालतो आहोत, धिंगाणा करतो आहोत, देशभक्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन करतो आहोत, याची ना कुणाला लाज वाटत होती, ना खंत! मुजोरी मात्र क्षणोक्षणी जाणवत होती. जो कुणी यांना रस्ता मोकळा करून मागत होता, त्याच्याकडे रागाने पाहात होती ही मंडळी. आमचे प्रजासत्ताक टिकून आहे ते आमच्या शूर सैनिकांमुळे. देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी रात्रंदिवस डोळ्यांत तेल घालून पहारा देणारे आमचे शूर जवान शत्रूच्या गोळ्यांना बळी पडत आहेत. ऊन, वारा, पाऊस, थंडी, बर्फ याची कशाचीही पर्वा न करता जवान सीमेवर कडक पहारा देत असतात. एका क्षणी जिवंत आहोत, दुसर्‍या क्षणी काय होणार याची कसलीही शाश्‍वती नसताना, केवळ देशरक्षणासाठी हे जवान सीमेवर तैनात आहेत. काल-परवाचीच घटना आहे. हिमस्खलनामुळे आमचे १५ जवान बर्फाखाली दबून शहीद झाले आहेत. कुटुंबापासून दूर, हजारो किलोमीटर अंतरावर अतिशय विपरीत स्थितीत राहायचे, प्रत्येक क्षणी फक्त आणि फक्त राष्ट्राचाच विचार करायचा, असा सैनिकांचा दिनक्रम असताना, उद्याच्या भारताचे भविष्य असणार्‍या आमच्या तरुणाईने देशाच्या प्रजासत्ताक दिनी नागपूरच्या रस्त्यांवर राष्ट्रभक्तीचे हिडिस प्रदर्शन घडवावे, हा प्रत्येकाच्या चिंतेचा अन् चिंतनाचाच विषय असला पाहिजे. अन्यथा पुढ्यात काय वाढून ठेवले आहे, याची कल्पनाच न केलेली बरी! नागपुरातला फुटाळा तलाव प्रसिद्ध आहे. या तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात आल्यापासून, गेल्या काही वर्षांत त्याला चौपाटीचे स्वरूप आले आहे. सुरुवातीला नागपूरकर मंडळी कुटुंबासह या तलावाच्या काठी फिरायला जात असे. पण, हळूहळू या तलावाच्या काठाचा कब्जा तरुणाईने घेतला अन् कुटुंबासह फिरायला येणार्‍यांची संख्या कमी व्हायला लागली. तलावाचा काठ फक्त प्रेमीयुगलांसाठीच आहे की काय असे वाटावे, एवढी जोडपी इथे पाहायला मिळतात. प्रेमीयुगलांनी या ठिकाणी बसूच नये असे नाही, पण अनेक जोडपी जी अश्‍लील कृती करतात, ती आक्षेपार्ह असतात. सोबत असलेल्या लहान मुलांची नजर जर या जोडप्यांच्या हालचालींवर पडली, तर बालमनावर त्याचा वाईट परिणाम होईल, या भीतीने अनेक लोक फुटाळा तलावाची वाटच विसरले आहेत! या तलावाच्या काठावर २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनीही नुसता गोंधळ अन् गदारोळ होता. देश प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना खरे तर प्रत्येकाच्याच आनंदाला पारावार उरला नव्हता. आपणही सायंकाळी फुटाळा तलावाच्या काठावर जावे आणि प्रजासत्ताक दिनाचा आनंद लुटावा, असे प्रत्येकालाच वाटत होते. पण, अनेक जण त्या ठिकाणी गेले नाहीत हे बरेच झाले. कारण, तिथे नुसता उन्माद होता. तरुणाई बेधुंद झाली होती. कुठून संचारतो यांच्या अंगात हा उन्माद? कशासाठी केला जातो हा उन्माद? देशभक्तीच्या नावाखाली का केला जातो हा धिंगाणा? कुणाचकडे काही उत्तर नाही! धिंगाणा घालण्यासाठी आणि कायदा मोडण्यासाठी यांना निमित्त हवे असते. गणेशोत्सवाची मिरवणूक, स्वातंत्र्य दिन आणि गणराज्य दिनाचे निमित्त यांना मिळते. आता पुढल्या काळात होळी येईल. धुळवडीच्या दिवशी तर बघायलाच नको! ‘बुरा न मानो, होली हैं’ म्हणायचे अन् वाट्‌टेल तसे वागायचे, ही जणू परंपराच होऊ पाहते आहे आता. एवढीच तुमच्या अंगात मस्ती आहे, तर जा ना सीमेवर शत्रूशी लढायला अन् दाखवा तिथे तुमचे शौर्य! तुम्हाला प्रजासत्ताकाचा अपमान करता यावा म्हणून नाही करत आमचे शूर जवान देशाच्या सीमांचे रक्षण, हे लक्षात घ्या. स्वातंत्र्य दिनी आणि गणराज्य दिनी जी हुल्लडबाजी पाहायला मिळत आहे, ती लक्षात घेता, आमच्या शहीद जवानांचे आत्मे नुसते तडफडत असतील. हसत हसत फासावर लटकलेले आमच्या क्रांतिकारकांचे आत्मे विलाप करीत असतील. ‘‘हेच पाहण्यासाठी का आम्ही स्वातंत्र्य मिळवून दिले तुम्हाला?’’ असा प्रश्‍न ते विचारत असतील. काय उत्तरं आहेत आमच्याकडे त्यांच्या प्रश्‍नांची? स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आमचे राष्ट्रीय सण आहेत. राष्ट्रीय सणांना आम्ही तमाशाचे रूप देणार असू, तर आमच्यासारखे करंटे आम्हीच! आम्ही ज्यांच्याकडे उद्याच्या भारताचे भविष्य म्हणून बघतो, ती तरुणाई जर देशप्रेमाने बेभान होऊन नाचली असती, तर चिंता करण्याचे कारण नव्हते. पण, ही तरुणाई स्वत:च्या मौजमजेसाठीच धिंगामस्ती करीत असल्याने विषय चिंतेचा झाला आहे

No comments:

Post a Comment