एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात सोडून इस्रोने मिळवलेले यश सगळीकडेच निराशेचे मळभ दाखवणाऱ्या आजच्या वातावरणात झळाळून उठणारे आहे..
संसदेच्या समितीने इस्रोला वार्षिक तरतूद ५० टक्के वाढवून द्यावी अशी शिफारस केली. परंतु अर्थसंकल्पात त्याच्या निम्मीही वाढ झाली नाही . सरकारकडे पुतळे आदींसाठी खर्च करावयास मुबलक पैसा आहे. विज्ञानासाठी तो नाही. आजची जागतिक अवकाश बाजारपेठ ज्या वेगाने वाढते आहे ते बघता अशी तरतूद मान्य केल्यास इस्रो त्याचे सोने करील यात शंका नाही.
एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात सोडण्याची कामगिरी साध्य केल्याबद्दल इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रो या संघटनेचे मन:पूर्वक अभिनंदन. हा विक्रमासाठी केलेला विक्रम नाही. तर एका आवश्यक गरजेतून साध्य केलेली ही क्षमता आहे. ही गरज आहे निधी संकलनाची. इतके उपग्रह एकाच यानातून अवकाशात सोडणे आपल्याला शक्य झाल्यामुळे हे काम आपणास आता व्यवसाय म्हणून करता येईल आणि त्यातून निधी मिळू शकेल. अशा पद्धतीने इतरांचे उपग्रह सोडताना आपण आपला उपग्रह सोडण्याचा खर्चही निम्म्याने कमी केला आहे. त्याचमुळे सामान्यांच्या दृष्टीने हा विक्रम आहे हे खरे असले तरी इस्रोसाठी हा विक्रम म्हणण्यापेक्षा उपग्रह सोडण्याच्या क्षमतेचे वर्धन आहे असे अध्यक्ष किरणकुमार यांचे प्रतिपादन हे वास्तववादी ठरते. यात जोखीम जरूर होती. काही मोठे तर काही छोटे असे १०४ उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडताना त्यांच्यात अंतर राखणे फार महत्त्वाचे होते. ते जमले नसते तर अवकाश उद्योगात भारताची विश्वासार्हता होत्याची नव्हती झाली असती व भारत अनेक वर्षे मागे गेला असता. तसे होणे आपल्याला परवडणारे नाही. कारण एकाच वेळी मंगळयान आदी मोहिमा काढणारे आपण दुसरीकडे अजूनही मंगळाची शांत, गोमूत्रयुक्त पंचगव्य आदी भाकड कल्पना तितक्याच कवटाळत असून अशा अर्धविज्ञानवादी वातावरणात विज्ञानाची हार होणे दुर्दैवी ठरले असते.
इस्रोने यापूर्वी जून २०१५ मध्ये एकाच वेळी २३ उपग्रह सोडले होते. त्यामुळे यात पुढचा टप्पा गाठला जाणार हे उघडच होते. तो गाठण्यात इस्रोने मिळवलेले हे यश आजच्या सगळीकडेच निराशेचे मळभ दाखवणाऱ्या वातावरणात झळाळून उठणारे आहे यात शंका नाही. यातून उठून दिसते ती आपल्याकडील संस्थात्मक उभारणीच्या कामाची महती. इस्रो, आयआयटी, आयआयएम्स अशा या स्वातंत्र्योत्तर कालावधीत जन्माला आलेल्या संस्थाच आजही आपणास इतर देशांपेक्षा आघाडीवर ठेवत असून त्यानंतर मात्र अशा संस्थांची निर्मिती आपल्याकडे थांबल्यात जमा आहे. या पापाचा सर्वात मोठा वाटा इंदिरा गांधी यांच्याकडे जातो. पण इतरांनीही काही वेगळे केले असे नाही. आणि अलीकडे तर व्यवस्थेपेक्षा व्यक्तीलाच महत्त्व देण्याची प्रथा पडल्याने संस्थात्मक उभारणी आपण जणू विसरूनच गेलो आहोत. सतीश धवन व विक्रम साराभाई यांनी भारताच्या अवकाश कार्यक्रमाची जी स्वप्ने पाहिली ती अशी वेगाने पूर्ण होत असताना अशा घटनांनी साफल्याचे समाधान निश्चितच वैज्ञानिक व देशवासीयांना मिळत असते. या प्रक्षेपणातील एक योगायोग महत्त्वाचा आहे. ज्या अमेरिकेने आपल्याला १९९८ मधील दुसऱ्या अणुस्फोटानंतर तंत्रज्ञान नाकारले होते त्याच अमेरिकेचे ९७ उपग्रह आपण या उड्डाणात अवकाशात सोडले. एरवी मध्यपूर्वेत एकमेकांच्या जिवावर उठलेल्या इस्रायल व संयुक्त अरब अमिरातीचे उपग्रहही यातून बरोबरच अवकाशस्थ झाले. इस्रोने सातत्याने क्षमता सुधारण्याचे ध्येय जोपासलेले आहे. उड्डाण अपयशी ठरले अथवा यशस्वी झाले तरीही त्याचे विश्लेषण तेथे केले जाते. त्यामुळे कुठल्याही यशाने भारावून असे काही तेथे घडत नसते. अन्यथा इस्रोची एवढी प्रगती कधीच झाली नसती. इस्रोसमोर आता आव्हान आहे ते विक्रमांच्या पलीकडचे. रशियाने २०१४ मध्ये एकाच वेळी ३७ उपग्रह अवकाशात सोडले होते. त्याआधी अमेरिकेच्या नासाने २०१३ मध्ये एकाच वेळी २९ उपग्रह सोडले होते. हे दोन्ही देश अवकाश क्षेत्रात महाशक्ती आहेत. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशाने ही कामगिरी करणे याला वेगळे महत्त्व आहे. याआधी अमेरिकावगळता अनेक देशांच्या मंगळ मोहिमा अपयशी ठरत असताना आपण ती यशस्वी केली होती. तो चीनला मोठा धक्का होता. तरी अन्य अनेक बाबतीत चीन आपल्या पुढे आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. चीनची मजल स्वत:चे अवकाशस्थानक बांधण्यापर्यंत गेली आहे. मंगळानंतर इस्रोचे लक्ष्य आता शुक्रावर आहे व त्यासाठी मोहीम आखली जात आहे.
अलीकडे हे उपग्रह मोठय़ा प्रमाणात सोडण्याचे प्रमाण वाढण्यामागे दळणवळणाचा वाढता वेग हे महत्त्वाचे आर्थिक कारण. मोबाइल, इंटरनेट यांचा प्रसार एवढा झाला आहे की, कंपन्यांना चांगली सेवा देण्यासाठी छोटे पण जास्त उपग्रह सोडण्याची गरज भासते. आताच्या उड्डाणात एकटय़ा अमेरिकेतील सानफ्रान्स्किोच्या प्लॅनेट इन्कार्पोरेशनचे किमान ९० उपग्रह आहेत. हे असे इतरांचे उपग्रह सोडण्याचे काम करून इस्रोने सुमारे १० कोटी डॉलरची कमाई केली आहे. उपग्रह सोडण्याची बाजारपेठ पुढील तीन वर्षांत तीनशे कोटी डॉलरची उलाढाल नोंदवेल. सॅटेलाइट इंडस्ट्री असोसिएशन या संस्थेच्या २०१५ मधील अहवालानुसार उपग्रहबांधणी व तत्संबंधी सेवा क्षेत्राची वाढ २०१४-१५ मध्ये १६६० कोटी डॉलर होती ती आता १२,७०० कोटी डॉलर झाली आहे. म्हणजे अवकाश क्षेत्रातील या उपक्रमातून आपल्याला आर्थिक प्रगतीचीही संधी आहे. तीच लक्षात घेऊन संसदेच्या विज्ञान तंत्रज्ञानविषयक स्थायी समितीने इस्रोला वार्षिक तरतूद ५० टक्के वाढवून द्यावी अशी शिफारस केली. परंतु अर्थसंकल्पात इस्रोसाठी त्याच्या निम्मीही वाढ नाही हे वास्तव आहे. सरकारकडे पुतळे आदींसाठी खर्च करावयास मुबलक पैसा आहे. विज्ञानासाठी तो नाही. आजची जागतिक अवकाश बाजारपेठ ज्या वेगाने वाढते आहे ते बघता अशी तरतूद मान्य केल्यास इस्रो त्याचे सोने करील यात शंका नाही. व्हर्जिन गॅलक्टिक, स्पेस एक्स यासारख्या खासगी अवकाश कंपन्यांशी स्पर्धा करण्याची ताकद इस्रोत आहे. फक्त त्यासाठी आणखी पाठबळ हवे. इस्रो त्यांच्या प्रक्षेपणासाठी उपयुक्त सुटे भाग इतर कंपन्यांकडून तयार करून घेत असते. त्यामुळे रोजगार उपलब्धता व बुद्धिमत्तेला संधी अशा दोन्ही गोष्टी त्यात साध्य होत आहेत. अशा वेळी उपग्रह कशासाठी सोडायचे, त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध असा अजागळ प्रश्न नेहमी केला जातो. हे आपल्याला जमले नसते तर उच्च तंत्रज्ञानासाठी आपल्याला आजही इतर देशांच्या मेहेरबानीवर अवलंबून राहावे लागले असते. उपग्रहातून हवामानाची तर माहिती मिळतेच. पण आजच्या मोहिमेत जो काटरेसॅट २ ए उपग्रह सोडला आहे, त्याच्या मदतीने शहरे, खेडी, सागरी किनारे, शेतजमीन यांच्या वापरावर लक्ष ठेवता येणार आहे, भूखंडाच्या भ्रष्टाचारावर लक्ष ठेवतानाच शहर नियोजनासाठी मदत करणारा हा आधुनिक नेत्र आहे. एवढेच काय देशातील रस्ते व जलस्रोत यांचे नियोजन त्यामुळे करता येणार आहे. आजच्या काळात उपग्रहाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पाणी कुठे लागेल हेदेखील निश्चित सांगता येते. शत्रूच्या हालचालीही टिपता येतात. त्याच्या जोडीला परकीय चलन मिळून आर्थिक स्वयंपूर्णताही येते.
परंतु खंत ही की अवकाश क्षेत्रातील असे यश साजरे करण्यापुरते आपण इस्रो आदी संस्थांचे स्मरण करतो. एरवी विज्ञानप्रसार आणि विज्ञानवाद आपल्या खिजगणतीतही नाही. त्यातल्या त्यात इस्रो तरी भाग्यवान. तिचे कधी तरी का असेना, कौतुक होते. पण तेवढे कौतुक इतर क्षेत्रातील संशोधनाच्या वाटय़ास येत नाही. खेळांमध्ये क्रिकेटला जे वलय लाभले ते विज्ञान क्षेत्रात इस्रोला लाभले आहे. ते एक वेळ ठीक. पण विज्ञानातील इतर संशोधन क्षेत्रांनाही असेच उत्तेजन दिले तर त्यातून गुरुत्वीय लहरी क्षेत्रात काम करणाऱ्या पुण्याच्या ‘आयुका’प्रमाणे इतर भारतीय संस्थाही तसे चांगले काम मूलभूत संशोधन क्षेत्रात करू शकतील. इस्रोच्या उपग्रह यशाचे उपाख्यान म्हणून महत्त्वाचे आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं, म्हणजेच इस्रोनं, बुधवारी इतिहास निर्माण केला. ज्या क्षणी इस्रोचं पीएसएलव्ही-सी३७ हे रॉकेट एकाचवेळी १०४ उपग्रह घेऊन अवकाशात झेपावलं, त्या क्षणीच या संस्थेनं आपण अवकाशविज्ञानात किती प्रगती केली आहे, ते जगाला दाखवून दिलं. आणि ज्यावेळी अवकाशात गेलेले सारे उपग्रह त्यांच्या अपेक्षित कक्षांमध्ये अलगद स्थापित केले, त्यावेळी भारत अवकाशविज्ञानात काय करू शकतो, ते स्पष्ट दाखवलं. अवकाशस्थित उपग्रहाचा वेध घेऊन ते नष्ट करण्याचा ‘पराक्रम’ करण्यापेक्षा आम्ही अवकाशविज्ञानाचा उपयोग सकारात्मक, चांगल्या कामासाठी, इतर देशांना कमी पैशात उपग्रह सोडण्यासाठी करत आहोत, याचा लखलखीत दाखला इस्रोनं दिला. अर्थात, ही मदत मेहेरबानी म्हणून नसते. त्याच्या मोबदल्यात आपल्याला चांगल्यापैकी पैसा परकीय चलनात मिळतो. त्याचमुळे इस्रोच्या यशस्वी झेपेनंतर उमटणारी एक स्वाभाविक प्रतिक्रिया ही ‘भारत आता अवकाशविज्ञान आणि त्याच्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक महत्त्वाचा घटक बनला आहे,’ अशी होती आणि ती रास्त अशीच होती.
गेल्या काही वर्षांमध्ये इंटरनेट, फोन यांचा वापर जगभर वाढत आहे. शिवाय, प्रत्येक देश आता आपल्याकडं दूरसंदेशवहनाच्या अत्याधुनिक सोयी असाव्यात यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी उपग्रह ही गोष्ट कळीची आहे. असे उपग्रह भारत इतरांपेक्षा कमी खर्चात सोडू शकतो. गेल्या काही वर्षांत इस्रोने परदेशांचे १८० उपग्रह यशस्वीपणे सोडले आणि देशाला भरपूर परकीय चलन मिळवून देतानाच भारतीयांच्या मनातला आत्मविश्वासही दृढ केला. प्रज्ञा, प्रतिभा, कल्पकता, मेहनत, चिकाटी, दीर्घोद्योग, सातत्य यात भारतीय माणूस कमी नाही, ही गोष्टसुद्धा इस्त्रोनं अधोरखित केली.
सन २००८मध्ये इस्रोनं एकाचवेळी १० उपग्रह अवकाशात पाठवून जगाला चकित केलं. त्यावेळी तो विक्रम होता. परंतु नंतर अमेरिकेनं २९ आणि रशियानं ३७ उपग्रह पाठवून आपल्याला मागे टाकलं. परंतु पुढच्या काळात आपण पुन्हा मुसंडी मारली. आपण चांद्रयान१ मोहीम यशस्वी केली. पाठोपाठ मंगळाच्या कक्षेत उपग्रह यशस्वीपणं पाठवला. आता एकाचवेळी एक हजार ३७८ किलो वजनाचे १०४ उपग्रह अवकाशात पाठवले. यावेळी पाठवलेल्या उपग्रहांमध्ये कार्टोसॅट-२ हा आपला उपग्रह ७१४ किलो वजनाचा आहे, तर इतर १०३ छोटेखानी उपग्रहांचे एकंदर वजन ६६४ किलो आहे. या इतर उपग्रहांमध्ये अमेरिकेचे ९६ उपग्रह आहेत. त्याशिवाय इस्राएल, कझाकस्तान, युनायटेड अरब अमिरात, स्वित्झर्लंड, नेदरलँड यांच्या उपग्रहांचा समावेश आहे. या उपग्रहांपैकी बहुसंख्य उपग्रहांकडं पृथ्वीची छायाचित्रं टिपण्याची क्षमता आहे आणि ते सर्व अमेरिकेन ‘प्लॅनेट’ या खाजगी कंपनीचे आहेत. आपल्या कार्टोसॅट उपग्रहाकडे उच्च दर्जाची छायाचित्रं टिपण्याची क्षमता आहे. आणि त्याचा वापर पाकिस्तान आणि चीन यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी होऊ शकतो.
यंदाच्या अर्थसंकल्पात अवकाश कार्यक्रमांसाठी मोठी तरतूद आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे पर्यावरणापेक्षा अवकाशविज्ञानाला अधिक पैसा देणार असल्याच्या बातम्या आणि चीनची यातील प्रगतीची आस लक्षात घेता भारतानं त्यासाठी अधिक पैसा देणं अनेक अर्थांनी अर्थपूर्ण आहे. याचं कारण, अमेरिकेनं अवकाशातलं कसब वारंवार सिद्ध केलं आहे. चीननं आपणही कमी नाही, हे गेल्या दशकभरात दाखवून दिलं आहे. २००३ सालामध्ये चीननं मानवासह अवकाशयानाची मोहीम यशस्वी करून दाखविली आणि आपल्या अगोदर म्हणजे २००७ सालात चंद्रावरही यशस्वी स्वारी केली. मात्र, सगळ्यात चिंताजनक गोष्ट आहे ती वेगळीच. २००७ सालामध्ये चीननं अवकाशात ७५० किलो वजनाचा आणि ८६५ किमी उंचावर असलेला आपलाच उपग्रह आपल्या भूमीवरून सोडण्यात आलेल्या उपग्रहविरोधी अस्त्रानं नष्ट करून दाखविला. हे तंत्रज्ञान अमेरिकेकडंही आहे आणि अशी कामगिरी अमेरिकेने १९८५मध्येच केली होती. या पार्श्वभूमीवर आपणही यात प्रगती करणं अत्यावश्यक आहे आणि तशी ती आपण करत आहोत, असं आताच्या मोहिमेनं सिद्ध केलं. आपल्या अवकाशस्थित उपग्रहांचा आपल्याला चांगलाच उपयोग झाला आहे. विशेषत: दूरसंदेशवहन, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, ठोस निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती विविधांगी माहिती मिळवणं अशा अनेक वाटांनी हे उपग्रह आपल्याला साथ देत आले आहेत. हे आपल्या अवकाशविज्ञानाचं फळ आहे.
उपग्रह अवकाशात पाठवणं ही मोठी खर्चिक बाब असते. परंतु अन्य देशांच्या अवकाशसंस्थांपेक्षा आपण हे काम कमी खर्चात करतो. आणि तीच गोष्ट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपयोगी पडत आहे. याचं मुख्य कारण आज अनेक देशांतील खासगी कंपन्या उपग्रह तयार करणं आणि ते अवकाशात पाठवणं, यात उतरण्यास उत्सुक आहेत. त्यांचा उद्देश अर्थात कमीत कमी खर्चात हे काम करून सरकारी संस्थांना शह देणं हाच आहे. त्या दृष्टीनं ते सातत्यानं प्रयत्नशीलही आहेत. अशा काळात इस्त्रो आजच अन्य देशांच्या सरकारी संस्थांपेक्षा कमी खर्चात उपग्रह अवकाशात नेऊन ते अपेक्षित कक्षेत यशस्वीपणं स्थापित करत आहे. यासंदर्भात आपल्या मंगळमोहिमेचं उदाहरण लक्षात घेण्यासारखं आहे. आपल्या मंगळाच्या मोहिमेचा खर्च सात कोटी ३० लाख अमेरिकी डॉलर खर्च आला. तर नासाच्या मेव्हन मंगळमोहिमेसाठी ६७ कोटी १० लाख अमेरिकी डॉलर खर्च आला, ही एकच गोष्ट याबाबत बोलकी आहे. या सगळ्या यशात पीएसएलव्ही सी-३४नं कमावलेली विश्वासार्हता अमोल आहे. १९९३सालापासून या रॉकेटनं चांद्रयान-१ आणि मंगळयानासह ३५ यशस्वी प्रक्षेपणं केली. आणि आता पीएसएलव्ही-सी३७नं अवकाशविज्ञानात भारताच्या यशाची कमान चढतीच राहील, अशी ग्वाही बुधवारच्या यशानं आपल्याला दिली आहे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि विज्ञानलेखक आहे
एकाचवेळी २० उपग्रह प्रक्षेपित करण्याचा स्वत:चाच विक्रम मोडीत काढत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करत केवळ एक नवा इतिहास घडविला नाही तर अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत जगाच्या चार पावले पुढे असल्याचे सिद्ध केले आहे. त्याबद्दल संस्थेचे संचालक जयकुमार, वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि सर्व सहाय्यक चमूचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे. यापूर्वी एकाच उड्डाणातून अमेरिकेच्या नासाने तसेच रशियाने चाळीसपेक्षा अधिक उपग्रह अंतराळात पाठवलेले नाहीत. त्यामुळे, १०४ उपग्रह अवकाशात सोडण्यात यश मिळाल्याने ‘इस्रो’ने जगातील प्रमुख आणि विकसित देशांना मागे टाकले आहे. यापैकी, १०१ उपग्रह हे परदेशी असून पृथ्वीचे सखोल आणि सर्वांगीण आकलन होण्यासाठी मदत करणारे आहेत. याचबरोबर परदेशी उपग्रह अंतराळात सोडण्यातही ‘इस्रो’ने १८० इतका मोठा आकडा गाठून अंतराळ मोहिमांच्या इतिहासातील आणखी एक उज्ज्वल अध्याय लिहिला आहे.
एकाच उड्डाणातून अधिकाधिक उपग्रह वाहून नेल्यास प्रत्येक उपग्रहामागील उड्डाणाचा खर्च खूप कमी होतो. त्यामुळे जगभरातील अंतराळसंस्था आणि कंपन्यांचे या प्रक्षेपणाकडे विशेष लक्ष होते. इस्रोच्या आंध्रमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून स्वदेशी बनावटीचा "पीएसएलव्ही-सी ३७" हा प्रक्षेपक सकाळी नऊ वाजून २८ मिनिटांनी आकाशात झेपावला आणि उड्डाणापासून ते उपग्रह वेगळे होण्यापर्यंत, तसेच अंतराळात सूर्यसापेक्ष कक्षेत भूस्थिर करण्यापर्यंच्या सर्व घडामोडी घड्याळाच्या काट्यागणिक नेमक्या पार पडल्या. एकीकडे संपूर्ण भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून येत असतानाच अवघ्या जगाने तोंडात बोटे घालत या घटनेची नोंद घेतली. यापूर्वी, इस्त्रोने एकाचवेळी २० उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले होते.
जानेवारीत एकाचवेळी ८३ उपग्रह सोडण्याचा इरादा होता. मात्र, काही कारणास्तव ती मोहीम पुढे गेली. त्यानंतर त्यात आणखी २१ उपग्रहांची भर पडली. अंतराळ संशोधन क्षेत्रात भारत विकसित देशांपेक्षा मागे तर सोडाच, उलट चार पावले पुढे असल्याचे इस्रोने दाखवून दिले. भारताचे हे यश जगाच्या हिताचे आहे. इस्रोने एकीकडे गेल्या काही दशकांत झालेल्या तंत्रवैज्ञानिक प्रगतीचा वस्तुपाठ जगाला सादर केला, त्याचबरोबर आर्थिक अडचणींवर सोपे मार्ग काढत कमी खर्चात मोहीम यशस्वी करून दाखवली. इस्रोने दोनच वर्षांपूर्वी मंगळयानाची मोहीम जगापेक्षा निम्म्याहून कमी खर्चात फत्ते केली होती. हा सारा पाया या संस्थेला लाभलेल्या दिग्गज पूर्वसूरींनी घालून दिला आहे. १९७४च्या पहिल्या अणुचाचणीनंतर देशावर घातलेल्या निर्बंधांत तंत्रज्ञानविषयक निर्बंधही होते. मर्यादित साधनसंपत्तीचे आव्हान तर सुरुवातीपासूनच होते. त्यामुळे १९८०मध्ये पहिला उपग्रह बैलगाडीतून आणण्यापासून विविध मार्गांनी खर्चात कपात करत करत वैज्ञानिक प्रगतीसाठी नवीन मार्ग शोधण्याची परंपरा आजही अप्रतिहत सुरू आहे. म्हणूनच अमेरिकेच्या नासापेक्षा वीसपट कमी निधी असूनही इस्रोने खूप पुढचे पाऊल टाकले आहे. यापुढे जगातील तीनशे अब्ज डॉलर्सच्या या अंतराळ विज्ञान बाजारपेठेतील भारताचा हिस्सा वाढत राहील आणि इस्रोची चढती कमान जगाच्या भुवया उंचावत ठेवेल, यात काहीच शंका नाही!
मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
No comments:
Post a Comment