February 19, 2017019
इतिहासकाळात युद्धाचे क्षेत्र अतिशय मर्यादित असे. योद्धे एखाद्या लहानशा भूभागात प्रत्यक्ष समोरासमोर येऊन युद्ध करीत असत. आता मात्र यात बराच बदल झाला आहे. दूरदूरच्या शत्रूंशीदेखील वैर उत्पन्न होऊन प्रत्यक्ष युद्ध करावे लागत असल्याने युद्धभूमीचे क्षेत्र बरेच वाढले आहे. त्यामुळे दूर अंतरावरील शत्रूवर दुरून शस्त्र सोडून प्रहार करण्याच्या तंत्रांचा वापर करणे आता अपरिहार्य झाले आहे. त्यासाठी यंत्रशक्तीची मदत घेतली जाते. अशा यंत्र अथवा आयुधांच्या साह्याने फेकल्या जाणार्या, प्रामुख्याने विध्वंसक साधनाला ‘अस्त्र’ अथवा ‘क्षेपणास्त्र’ असे म्हटले जाते.
भारतात रामायण-महाभारत काळात काही प्रमाणात अस्त्र किंवा क्षेपणास्त्रे वापरण्यात आल्याचे दिसते. धनुष्य या आयुधाचा त्या कामी उपयोग केला जात असल्याने त्या अस्त्राचा पल्ला बराच लहान असे. पुढे टिपू सुलतानने तोफा वापरून विध्वंसक शक्ती आणि पल्ल्यात वाढ केली. परंतु, ती वाढदेखील आजच्या क्षेपणास्त्रांच्या तुलनेत नगण्यच ठरते. तेव्हा आजची ही क्षेपणास्त्रांमधील प्रगती कशी झाली आणि भारताने ही प्रगती किती आणि कशी साधली? याचा आता विचार करू या.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाचे संरक्षण करणे हे सर्वात महत्त्वाचे असल्याने, संरक्षणसिद्धतेसाठीची अनेक कामे हाती घेण्यात आलीत. त्यासाठी आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जास्तीत जास्त मदत घेण्यात येऊ लागली. या मदतकार्यातील एका अतिशय प्रभावी कार्याची सुरुवात १९८० साली झाली. देशातील संरक्षण खात्याच्या संशोधन आणि विकासाची कामे करणार्या प्रयोशाळांना अस्त्र निर्मितीसाठी लागणार्या पदार्थांच्या उत्पादनात योग्य पात्रता लाभली होती. त्यामुळे अस्त्र निर्माण करून त्यांना दूरपर्यंत पोहोचविण्याची क्षमता आपल्या वैज्ञानिकांमध्ये आली असल्याची खात्री वाटू लागली. तत्कालीन पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री महोदयांनी या संधीचा लाभ घेण्याचे ठरविले आणि लगेच ‘समाकलित मार्गदर्शित क्षेत्रणास्त्र विकास कार्यक्रम’ (म्हणजेच Integrated Guided Missile Development Progamme) नावाने ओळखला जाणारा उपक्रम सुरू करण्यात आला.
प्रत्येक उपक्रमाचे यश हे त्याला मार्गदर्शन करणार्या व्यक्तीवर अवलंबून असते. म्हणून अशा कर्तबगार व्यक्तीचा शोध सुरू झाला आणि १९८३ साली योग्य व्यक्तीची प्रयोगशाळेच्या संचालकपदी नियुक्ती केली गेली. ही कार्यतत्पर कर्तबगार व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम! त्यांच्या मार्गदर्शनात नियोजित काम लगेच सुरू झाले. समाकलित मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाच्या (IGMDP) अंतर्गत चार प्रमुख प्रकल्प सुरू झालेत. हे चार प्रकल्प म्हणजे-
१) भूपृष्ठावरील एका ठिकाणाहून भूपृष्ठावरील दुसर्या लक्ष्यावर मारा करू शकणार्या लहान पल्ल्याचे क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प. या क्षेपणास्त्रांना ‘पृथ्वी क्षेपणास्त्र’ या नावाने संबोधिले जाते.
२) भूपृष्ठावरून आकाशातील कमी उंचीवरील लक्ष्यावर मारा करू शकणार्या लहान पल्ल्याची क्षेपणास्त्रे निर्माण करणारा प्रकल्प. या क्षेपणास्त्रांना ‘त्रिशूळ क्षेपणास्त्र’ या नावाने संबोधिले जाते.
३) भूपृष्ठावरून आकाशातील मध्यम उंचीवरील लक्ष्यावर मारा करू शकणार्या मध्यम पल्ल्यांची क्षेपणास्त्रे निर्माण करणारा प्रकल्प. या क्षेपणास्त्रांना ‘आकाश क्षेपणास्त्र’ या नावाने ओळखले जाते.
४) तिसर्या पिढीतील रणगाडाभेदक क्षेपणास्त्र निर्माण करणारा प्रकल्प. या क्षेपणास्त्रांना ‘नाग क्षेपणास्त्र’ हे नाव देण्यात आले.
५) या चार प्रकल्पांच्या जोडीने काही वेगळ्या खास प्रणालीच्या ‘अग्नी’ क्षेपणास्त्राचे कार्यदेखील घेण्यात आले. निर्माण करण्यात येणार्या क्षेपणास्त्राच्या कामाची चाचणी घेण्यासाठी ओरिसा राज्यात बालासोर येथे प्रक्षेपण केंद्रदेखील उभारण्यात आले. नियोजित कामे व्यवस्थित सुरू होऊन १९८८ साली ‘पृथ्वी’चे आणि १९८९ मध्ये ‘अग्नी’चे प्रक्षेपण झाले. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला, परंतु लगेच एक अडथळा निर्माण झाला. ‘मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रीजिम’ नावाच्या १९८७ साली स्थापन झालेल्या परराष्ट्रीय गटाने क्षेपणास्त्र तंत्रज्ञान भारताला देण्यात मदत न करण्याचे ठरविले. तो अडथळा पार करण्यासाठी IGMDP ने भारतातील प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था आणि उद्योगक्षेत्रातील काही संस्था यांचा गट स्थापन करून क्षेपणास्त्राला उपयुक्त असा धातू अथवा पदार्थ निर्माण करणे शक्य झाले. क्रमाक्रमाने उपयुक्त तंत्रज्ञान विकसित झाले आणि काही विलंबाने, परंतु खात्रीलायकपणे अडथळा दूर झाला.
योजनेची सुरुवात १९८३ साली झाली तेव्हाच त्याची कालमर्यादा २५ वर्षांची ठरविण्यात आली. या नियोजित काळातच आपण कार्य पूर्ण केल्याचे पाहून आनंद होतो. निर्माण केलेल्या विविध क्षेपणास्त्रांची आता माहिती घेऊ या.
लहान पल्ल्याची क्षेपणास्त्रं
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एका ठिकाणाहून पृष्ठभागावरीलच दुसर्या ठिकाणी मारा करणार्या क्षेपणास्त्र प्रणालीत प्रामुख्याने ‘पृथ्वी’, ‘धनुष’ आणि ‘‘अग्नी- I,II, III इत्यादी नावांनीदेखील त्यांची गणाना केली जाते. पृथ्वीचे १९८८ साली यशस्वी प्रक्षेपण पहिल्यांदा झाले. साधारणपणे ८.५ मीटर उंचीचे आणि १ मीटर व्यासाच्या नळकांड्याच्या आकाराच्या या अस्त्राने १५० किलोमीटर दूरच्या जमिनीवरील लक्ष्यावर मारा केला होता. पुढे १९९६ साली पृथ्वी-खख आणि २००४ मध्ये पृथ्वी-खखख ने अनक्रमे ३५० किमी आणि ६०० किमीचे पल्ले (Ranges) गाठले. १९९४ साली पृथ्वी-ख क्षेपणास्त्र भारतीय लष्कराला देण्यात आले. या प्रणालीत सतत सुधारणा होत गेल्याने लवकरच पृथ्वी-ख ची जागा डीआरडीओने नव्याने विकसित केलेल्या ‘प्रहार’ क्षेपणास्त्राने घेतली.
‘प्रहार’ हे कमी खर्चीक, अत्यंत जलद गतीचे, सर्व प्रदेशात आणि सर्व प्रकारच्या हवामानात अचूकपणे लक्ष्याचा भेद करण्यास समर्थ असे अस्त्र आहे. युद्धातील डावपेच साधण्यासाठी याचा उपयोग होतो. भारतीय लष्कर आणि वायुदलाला शत्रूकडील मोक्याच्या जागांवर मारा करण्याचे कामी प्रहार क्षेपणास्त्र फारच उपयुक्त ठरते. शिवाय युद्धक्षेत्रात हे अस्त्र पोहोचविणे बरेच सुलभ असते. ट्रकसारख्या मोटार वाहनातून या अस्त्रांना सहजपणे नेता येते. शिवाय एका वाहनातून एका वेळी जवळजवळ सहा प्रहार क्षेपणास्त्र नेणे जमू शकते. या वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांवर वेगवेगळ्या प्रकारची स्फोटकाग्र ठेवता येत असल्याने निरनिराळ्या लक्ष्यांंवर एकाच वेळी मारा करता येतो. या क्षेपणास्त्रात घन रूपातील इंधन वापरले जात असल्याने, हे अस्त्र अगदी २-३ मिनिटांतच उभारता येते. या क्षेपणास्त्राची गती ध्वनीच्या गतीच्या २.०३ पट असल्याने त्याचा युद्धक्षेत्रातील प्रभाव ताबडतोब दिसू शकतो. डीआरडीओने निर्यात करण्यास उपयुक्त असा एक प्रहारचा वेगळा प्रकार विकसित केला आहे. त्या प्रकाराला ‘प्रगती’ हे नाव देण्यात आले आहे. नोव्हेंबर २०१४ पासून ‘प्रगती’ निर्यातीसाठी सज्ज आहे.
जलसेनेला उपयुक्त क्षेपणास्त्र
भारताला जवळजवळ ७५०० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा असल्याने, देशाच्या संरक्षणात भारतीय आरमाराचे महत्त्व बरेच मोठे आहे. संरक्षणसिद्धतेत आरमाराकडे विशेष लक्ष दिले जाते. म्हणूनच आरमाराला उपयुक्त क्षेपणास्त्र निर्मिती करण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पृथ्वी प्रणालीत ‘धनुष’ नावाचे एक खास क्षेपणास्त्र भारताने निर्माण केले आहे. हे क्षेपणास्त्र आरमाराच्या बोटीतून डागता येते. ३५० किमीपर्यंत या अस्त्राचा पल्ला असल्याने, समुद्रातील दूरच्या शत्रुपक्षाच्या बोटीवर आपल्या बोटीतून मारा करणे धनुषने साधते. या क्षेपणास्त्रावर पारंपरिक आणि अणुगर्भीय असे दोनही प्रकारचे स्फोटकाग्र ((Warhead) आरूढ करता येतात. बोटीवरूनच किनार्यावरील (जमिनीवरील) एखाद्या लक्ष्यावरदेखील धनुषचा मारा करता येतो. ५ ऑक्टोबर २०१२ रोजी बंगालच्या उपसागरात उभ्या असलेल्या बोटीतून सर्वप्रथम धनुष डागण्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राने अत्यंत अचूक मारा करता येतो, हे आता अत्यंत खात्रीपूर्वकपणे दिसून आले आहे.
जमिनीवरून जमिनवरील दूरच्या लक्ष्यावर मारा करू शकणार्या क्षेपणास्त्र प्रणालीतील अतिशय मोठे पल्ले गाठू शकणारे बरेच आधुनिक अस्त्र म्हणजे ‘अग्नी क्षेपणास्त्र!’ या क्षेपणास्त्र मालिकेत मध्यम पल्ल्यापासून (७०० ते १२५० किमी) अतिलांबचे १०,००० किमी आंतरखंडीय (Intercontinental) पल्ले गाठू शकणारे प्रक्षेपी (Ballistic) क्षेपणास्त्रांचा अंतर्भाव केला गेला आहे. या प्रकारच्या क्षेपणास्त्रांची निर्मिती पूर्णपणे भारतीय असल्याने त्यांना ‘अग्नी’ या एका पंचमहाभूताचे नाव दिले गेले आहे. १९९१ साली या मालिकेतील पहिल्या क्षेपणास्त्राची (अग्नी-ख) चाचणी यशस्वी झाल्यावर या क्षेपणास्त्राचे खास महत्त्व असल्याने त्यात जास्त विकास साधण्यासाठी त्याच्या निर्मिती आणि चाचण्यांसाठी एक स्वतंत्र विभाग स्थापण्यात आला आहे. भारतीय संरक्षण विभागाच्या अंदाजपत्रकात याच्या मोठ्या खर्चाला ‘खास उपक्रम’ असे संबोधले जाते. अग्नी- II, III, IV, त कार्यान्वित झाले असून अग्नी- तख प्रगतिपथावर आहे.
त्रिशूळ क्षेपणास्त्र
जमिनीवरून आकाशातील कमी उंचीवरील लक्ष्यावर मारा करणारे हे क्षेपणास्त्र भारताच्या IGMD उपक्रमात निर्माण केले गेले. या क्षेपणास्त्राचा पल्ला फक्त नऊ किलोमीटरचा होता. त्यातून ५.५ किलोग्रम वस्तुमानाचे स्फोटकाग्र नेले जात असे. प्रामुख्याने आरमारातील जहाजांच्या उपयोगी येणारे हे अस्त्र गणले जात असे. या क्षेपणास्त्रात सुधारणा होऊन त्याचा पल्ला १२ किमीपर्यंत केला गेला जाऊन, १५ किलोग्रॅम स्टोटकाग्र वाहून नेण्यापर्यंत त्यात सुधारणा झाली होती. परंतु, त्याचा उत्पादनखर्च बराच जास्त होत असल्याने २००८ सालापासून या क्षेपणास्त्राला निवृत्ती देण्यात आली.
जमिनीवरून आकाशस्थ लक्ष्यांवर मारा
जमिनीवरून आकाशातील लक्ष्यावर प्रहार करू शकणार्या मध्यम पल्याच्या संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या क्षेपणास्त्रांना ‘आकाश क्षेपणास्त्र’ असे नाव देण्यात आले आहे. या महत्त्वाच्या कार्यात आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी या बर्याच खर्चीक उपक्रमाची सुरुवात केली गेली आहे. केवळ ५.८ मीटर लांब आणि फक्त ३५ सेंटीमीटर व्यासाच्या दंडगोलाकार क्षेपणास्त्राने ३० किलोमीटरचा टप्पा गाठला आहे. साधारणपणे १८ किलोमीटर उंचीवरील लक्ष्याचे या क्षेपणास्त्राने भेद करणे शक्य झाले आहे. घन इंधनाचा वापर होत असलेले हे अस्त्र ध्वनीच्या गतीच्या २.५ पट गतीने मार्गक्रमण करीत असल्याने, १८ किमी उंचीवरील लक्ष्य साधारणपणे २५ ते ३० सेकंदात गाठता येते. या क्षेपणास्त्रावर ५५ किलोग्रॅम वस्तुमानाचे स्फोटकाग्र आरूढ करता येते. अगदी १८,००० मीटर (साधारणपणे ५५ हजार फूट) उंचीवरून उडणारे ३० किमी अंतरावरील उडत असणारे शत्रुपक्षाचे विमान उडविण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.
प्रत्येक यंत्रणेत क्षेपणास्त्र डागण्यासाठी विशिष्ट प्रकारचे साहित्य Launcher असते. प्रत्येक लॉन्चरवरून एकाच वेळी तीन क्षेपणास्त्रं डागले जातात. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्याला योग्य दिशा देणे आणि त्याचे नियंत्रण करण्यासाठी एका खास रडारचा वापर करण्यात येतो. ‘राजेंद्र’ हे त्या रडारचे नाव. त्याच्या मदतीने ८० किमी टापून उडणारे विमान दिसू शकते. भारतीय लष्करातदेखील आकाशचा वापर केला जातो.
स्थलसेनेस उपयुक्त क्षेपणास्त्र
मुख्यत्वे पायदळाच्या युद्धात रणगाडे मोठ्या प्रमाणात विध्वंसक असल्याने शत्रुपक्षाचे रणगाडे नष्ट करणे फार महत्त्वाचे कार्य समजले जाते. त्यासाठी अनेक प्रयत्न सैनिक करीत असतात. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात अब्दुल हमीद हा भारतीय सैनिक हातात बॉम्बगोळा धरून शत्रुपक्षाच्या रणगाड्यासमोर गेला आणि आपल्या प्राणाची आहुती देऊन त्याने शत्रूचे गणगाडे कसे नष्ट केले, याचे रसभरीत वर्णन आपण वाचले आहे. (त्याच्या या शौर्याबद्दल त्याला मरणोत्तर ‘परमवीरचक्र’ दिले आहे. तेव्हा रणगाडे नष्ट करण्याला किती महत्त्व आहे, हे लक्षात येते. अशा महत्त्वाच्या कामासाठी आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने योग्य आणि प्रभावी अस्त्र निर्माण करणे आवश्यक असल्याचे पटले आणि त्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले. या प्रयत्नांचा परिपाक म्हणजे ‘नाग क्षेपणास्त्रा’ची निर्मिती, असे म्हणता येईल.
१.९ मीटर लांबीच्या दंडगोलाकार नाग क्षेपणास्त्राचा व्यास फक्त १९ सेंटीमीटर असल्याने त्याचे वस्तुमान केवळ ४२ किलोग्रॅम असते. त्यातून ८ किलोग्रॅम वस्तुमानाचे स्फोटकाग्राचे क्षेपण केले जाते. युद्धभूमीवर हे क्षेपणास्त्र नेण्यासाठी एक खास प्रकारचे वाहन वापरले जाते. या वाहनावर एका खेपेत चार क्षेपणास्त्रं ठेवले असतात. अस्त्र डागण्यासाठी खास प्रकारचे, धूर न सोडणारे इंजीन या वाहनातच असते. त्यामुळे हे क्षेपणास्त्र डागत असणारे ठिकाण शत्रूला कळू शकत नाही. या यंत्रणेत अवरक्त प्रारणाने Infrared शत्रूकडील मारक रणगाड्यांची स्थाने लक्षात येण्याची सोय असल्याने अंधारातसुद्धा शत्रुपक्षाकडील रणगाडे नेमके कुठे आहेत हे समजते. म्हणून नेमक्या मार्गाने नाग क्षेपणास्त्र सोडले जाते. आपण क्षेपणास्त्र सोडल्याबरोबर इंजीन पूर्णपणे बंद होत असल्याने आपले मारा करणारे स्थान शत्रूला कळत नाही. जमिनीवरून युद्ध करणार्या लष्कराला देण्यात येणार्या नाग क्षेपणास्त्राचा पल्ला साधारण ४ ते ७ किलोमीटरचा असतो. साधारणपणे प्रतिसेकंदाला २३० मीटर वेगाने हे क्षेपणास्त्र लक्ष्याकडे झेप घेतल्याने ते डागल्यानंतर २०-२५ सेकंदात लक्ष्यावर जाऊन धडकते.
हवेत उडत असलेल्या हेलिकॉप्टरमधून जमिनीवरील शत्रूच्या रणगाड्यांवर मारा करण्यासाठी वेगळ्या प्रकारची नाग क्षेपणास्त्रं विकसित करण्यात आली आहेत. ‘हेलेना’ HELINA या नावाने ती संबोधिली जातात. त्यांचा पल्ला ७ किलोमीटरचा असतो.
वरील सर्व वर्णनांवरून भारताची संरक्षणसिद्धता बरीच वाढली असल्याची खात्री पडते. आपले राष्ट्र शांतताप्रिय असल्याने इतर राष्ट्रांवर हल्ला करण्याचा आपला मुळीच हेतू नाही. परंतु, आपण एक ‘बलशाली राष्ट्र’ आहे, असे इतरांना पटणे अत्यंत आवश्यक असल्याने, आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मदत घेऊन अत्याधुनिक अस्त्र निर्माण करण्यावर बराच भर देत आहोत, हे पाहून प्रत्येक भारतीयाला आनंद होणार, हे निश्चित!
९९२२४०२४६५
No comments:
Post a Comment