Total Pageviews

Friday, 19 February 2016

हे काय? आता लोकशाहीची हत्या झाली तरी चालेल!-अफझल गुरूचा स्मृतिदिन साजरा करून हिंदुस्थानविरोधात घोषणा दिल्या-SAMNA EDITORIAL

हे काय? आता लोकशाहीची हत्या झाली तरी चालेल! Monday, February 15th, 2016 ज्यांनी अफझल गुरूचा स्मृतिदिन साजरा करून हिंदुस्थानविरोधात घोषणा दिल्या त्या सगळ्यांंना तत्काळ बेमुदत तुरुंगात पाठवायला हवे व यामुळे लोकशाहीची हत्या होत आहे असा कोणी गळा काढत असेल तर लोकशाहीची हत्या शंभरदा केली तरी चालेल. गोडसेंची जयंती व पुण्यतिथी कुणीतरी साजरी करतो म्हणून संसदेत हंगामा केला जातो. अफझल गुरूचा स्मृतिदिन साजरा केला म्हणून तोच हंगामा काँगे्रस व लालभाई का करीत नाहीत? म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण देशद्रोहाचा काळ सोकावता कामा नये. पाकिस्तान झिंदाबाद? हे काय? आता लोकशाहीची हत्या झाली तरी चालेल! दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जे सुरू आहे ते वेळीच रोखायला हवे. विद्यार्थ्यांचा एक गट या विद्यापीठात सरळसरळ देशद्रोही कारवायांत गुंतला आहे. संसद हल्ल्याचा दोषी अफझल गुरूच्या फाशीचा दिवस हा जणू क्रांती दिवस असल्याचे काही विद्यार्थी गटांना वाटते. ९ फेब्रुवारीस काही विद्यार्थ्यांनी ‘जेएनयू’ कॅम्पसमध्ये अफझल गुरूच्या स्मरणार्थ कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात हिंदुस्थानविरोधी घोषणा देण्यात आल्या. हे कृत्य सरळसरळ देशद्रोहाचे आहे व ज्यांनी अफझल गुरूचा स्मृतिदिन साजरा करून हिंदुस्थानविरोधात घोषणा दिल्या त्या सगळ्यांंना तत्काळ अटक करून बेमुदत तुरुंगात पाठवायला हवे व यामुळे लोकशाहीची हत्या होत आहे असा कोणी गळा काढत असेल तर त्यांचेही गळे दाबून लोकशाहीची हत्या शंभरदा केली तरी चालेल. भारतमातेची डोळ्यांंदेखत हत्या होण्यापेक्षा तुमच्या दळभद्री लोकशाहीची हत्या झालेली केव्हाही बरी. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हा देशद्रोही व माथेफिरू लोकांचा अड्डा झाल्याचे आतापर्यंत बोलले जात होते, पण ज्या प्रकारे अफझल गुरूची अनौरस पोरे तेथे भारतमातेच्या विरोधात धुडगूस घालीत आहेत ते पाहता हा फक्त देशद्रोह्यांचा अड्डाच नसून पाकिस्तान व चीनसारख्या देशांचे एजंट तेथे सरकारी पैशानेच देशविरोधी कारवाया करीत असल्याचे सिद्ध झाले आहे. संसदेवरील हल्ल्यातील आणखी एक आरोपी प्रो. गिलानी हा सबळ पुराव्याअभावी सुटला. हा गिलानीदेखील याच विद्यापीठातील एक चळवळ्या आहे व त्याच्याही चळवळीत विषारी फूत्कार आहेत; पण अशा लोकांवर कारवाई केली तर लोकशाहीची हत्या होते व राहुल गांधींसह सर्व एकजात फालतू सेक्युलरवादी देशद्रोह्यांच्या बाजूने उभे राहतात. ज्याने अफझल गुरूचा स्मृतिदिन साजरा केला त्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आता देशद्रोहाच्या आरोपाखाली पकडला गेला हे बरे झाले, पण त्या देशद्रोह्याचा बचाव करण्यासाठी आपल्याच देशातील पुढारी व संसद सदस्य पुढे येतात हे देशाचे दुर्दैव! देशद्रोह्यांचे समर्थन करण्यासाठी लोकप्रतिनिधीच पुढे येत असतील तर त्यांचे लोकप्रतिनिधी पदही रद्द करण्याची तरतूद कायद्यात व्हायला हवी. संसदेत प्रश्‍न विचारण्यासाठी गरीब खासदारांनी पैसे घेतले म्हणून अनेकांच्या खासदारक्या रद्द झाल्या. संपत्तीचा हिशेब चुकला म्हणून आमदारक्या-खासदारक्या रद्द होतात. जनतेसाठी आंदोलन करणार्‍या लोकप्रतिनिधींना गुन्हेगार ठरवून त्यांच्या आमदारक्या-खासदारक्यांवर टाच आणली जाते; पण देशद्रोहाचे समर्थन करणार्‍या लोकप्रतिनिधींना मोकळे रान मिळतेे. हे आता तरी थांबायला हवे. राष्ट्रविरोधी कृत्य सहन करणार नाही, अशा लोकांवर कडक कारवाईचे संकेत देशाच्या गृह मंत्र्यांनी दिले आहेत. हे झाले त्या नतद्रष्ट विद्यार्थ्यांबाबत, पण त्या देशद्रोह्यांना पाठिंबा देणार्‍या नेत्यांवर व राजकीय पक्षांवर काय कारवाई करणार आहात? देशाच्या सुरक्षेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी आमचे सैनिक रोज प्राणांची कुर्बानी देत आहेत तर याच देशात काही लोक देशद्रोही व दहशतवाद्यांच्या मृत्यूचा शोक साजरा करीत आहेत. सियाचीनमध्ये देशरक्षण करताना १० सैनिक बर्फाखाली गाडले गेले. त्यात सातारा जिल्ह्यातील सुनील सूर्यवंशी हा एक मराठी जवानही होता. मध्यंतरी सातार्‍याचाच कर्नल संतोष महाडिक कश्मीरात पाकड्या अतिरेक्यांशी लढताना शहीद झाला. आता दोन दिवसांपूर्वी कश्मीरमधील कुपवाडा भागात पाच दहशतवाद्यांचा खात्मा करताना नाशिक जिल्ह्यातील चांदवडचा शंकर चंद्रभान शिंदे आणि कर्नाटकातील विजापूरचा सहदेव मारुती मोरे या दोन मराठी वीरांनी हौतात्म्य पत्करले. देशासाठी आपल्या सैनिकांचे हे असे प्राणार्पण सुरू आहे व दिल्लीतील एका विद्यापीठात ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे दिले जात आहेत. हिंदुस्थानातच हे घडू शकते. पाकड्या अतिरेक्यांपेक्षा लोकशाही व स्वातंत्र्याचा फालतू अतिरेकच देशाचा गळा घोटीत आहे. ‘जेएनयू’मधील या वादग्रस्त घटनेसंदर्भात एक दुसरा व्हिडीओही आता व्हायरल झाला आहे. ज्या युवकांनी पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या तेच युवक ‘अभाविप’च्या आंदोलनातही सहभागी झाल्याचे या व्हिडीओमध्ये दिसते. म्हणजे वादंगापाठोपाठ आता ‘व्हिडीओ वॉर’देखील सुरू झाले आहे. तेव्हा हा व्हिडीओ खरा की संभ्रम वाढविण्यासाठी केलेली ही संगणकीय करामत, याचाही तपास व्हायला हवा. कारण ‘जेएनयू’मधील वादग्रस्त कार्यक्रमाला लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईद याचा पाठिंबा होता असे आता खुद्द केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनीच जाहीर केले आहे. ‘जेएनयू’भोवती पूर्वीपासूनच असलेल्या संशयाला पुष्टी देणाराच हा दावा आहे. खरे म्हणजे ज्या संस्थेत अफझल व याकूब मेमनसाठी प्रार्थना केल्या जातात त्या संस्थांचे ‘कोम्बिंग ऑपरेशन’ होणे गरजेचे आहे. या संस्था हिंदुस्थानात आहेत, कराची-लाहोरला नाहीत. विराट कोहलीच्या एका चाहत्याने पाकिस्तानात तिरंगा फडकवला या गुन्ह्याखाली त्या पोराला अटक करून तुरुंगात टाकले गेले व त्याच्यावर देशद्रोहाचा खटला सुरू झाला, पण इकडे हिंदुस्थानविरोधी नारे व ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची घोषणा देणार्‍यांना मांडीवर बसवून प्रेमाचा घास भरवला जात आहे. सरकारने कठोर कारवाई करायलाच हवी. लोकशाही व स्वातंत्र्याची धूळधाण करणार्‍यांना हातात बेड्या घालून दिल्लीच्या रस्त्यावर फिरवायला हवे. हिंदुस्थानात आणीबाणी आणली आहे काय, असा प्रश्‍न काही लालभाईंनी विचारला आहे. देशात पाकड्यांचे एजंट खुलेआम हिंदुस्थानविरोधी कामे करीत असतील तर आणीबाणीच काय त्यापेक्षाही कठोर कारवाई करावी लागेल या मताचे आम्ही आहोत. गोडसेंची जयंती व पुण्यतिथी कुणीतरी साजरी करतो म्हणून संसदेत हंगामा केला जातो. अफझल गुरूचा स्मृतिदिन साजरा केला म्हणून तोच हंगामा काँगे्रस व लालभाई का करीत नाहीत? म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण देशद्रोहाचा काळ सोकावता कामा नये. लोकशाहीचे काय करायचे ते नंतर पाहू, पण देशद्रोही सापांची पिले आधी चिरडा - See more at: http://www.saamana.com/sampadkiya/he-kay-ata-lokshahichi-hatya-zali-tari-chalel#sthash.ihgDJ9HK.dpuf

No comments:

Post a Comment