SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Friday, 12 February 2016
http://maharashtratimes.indiatimes.com/edit/article/siachen/articleshow/50953536.cms
BRIG HEMANT MAHAJAN IN MAHARASHTRA TIMES
सियाचीन ग्लेशियरचे महत्त्व
When you go home tell them of us and say : for your tomorrow we gave our today.
इंग्रजीमध्ये हे प्रसिद्ध वाक्य आहे. भारतीय सैन्याविषयी
भारतीयांच्या मनामध्ये आदर आहे. भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन सीमेवर सध्या हे सैन्य तैनात आहे. तेथील अत्यंत कठीण अशा जागा आपण बघतो, त्यावेळी सैन्याविषयीचा आदर आणखी वाढतो. ‘सियाचिन ग्लेशिअर’ ही अशीच एक कठीण जागा. तेथे पाकिस्तान-चीनबरोबरच निसर्ग हा सर्वांत मोठा शत्रू आहे. तरीही, १९८४पासून भारताचे सैन्य तेथे तैनात आहे.
ग्लेशिअर आणि साधा डोंगर किंवा पहाड यांत फरक आहे. पहाड हे दगडापासून बनलेले असतात. ते एका जागेवर स्थिर असतात. ग्लेशिअर घट्ट बर्फापासून बनलेले असतात आणि स्थिर नसतात. एका जागेवरून दुसरीकडे ते प्रवास करतात. जेव्हा बर्फ पडण्याचे प्रमाण वितळण्यापेक्षा जास्त असते, तेव्हा ग्लेशिअर तयार होते. साधारणपणे एक ग्लेशिअर दिवसाला एक मीटर प्रवास करतो. भारतामध्ये जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सर्वांत जास्त ग्लेशिअर आहेत. यामध्ये उत्तराखंडमधील गंगोत्री ग्लेशिअरपासून गंगा नदीचा उगम होतो. सियाचिन ग्लेशिअर लडाख प्रांतामध्ये आहे. आमिर खानचा ‘थ्री-इडियट’ सिनेमा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लडाखमधील भेट यामुळे हा प्रांत काही काळात प्रसिद्ध झाला आहे.
जगातील क्रमांक दोनचा हा ग्लेशिअर
सियाचिनला जाण्याकरता सैन्याची परवानगी घ्यावी लागते. सियाचिनच्या ‘बेस कॅम्प’पर्यंत रस्ता आहे. तेथे वाहनाने जाता येते. लेहपासून ‘बेस कॅम्प’ दोनशे किलोमीटर दूर आहे. यानंतर मात्र चालत जावे लागते.
‘सियाचिन ग्लेशिअर’ ७६ किलोमीटर लांब आणि दीड ते अडीच किलोमीटर रुंद आहे. जगातील क्रमांक दोनचा हा ग्लेशिअर आहे. सियाचिनच्या दक्षिण पश्चिम सीमेला ‘सल्तारो’ नावाची पर्वतरांग आहे. यापलीकडे पाकव्याप्त काश्मीर आहे. उजव्या बाजूला अक्साई चीन आहे. १९७१च्या भारत-पाक युद्धानंतर ‘सिमला करार’ झाला आणि नियंत्रण रेषा (एलओसी) अस्तित्वात आली. यापूर्वी या रेषेला शस्त्रसंधी रेषा (सीझफासर लाइन) संबोधले जायचे. सियाचिन ग्लेशिअरच्या ‘एनजे ९८४२’ या पॉइंटपासून आखलेली ‘एलओसी’ स्पष्ट नव्हती. या पूर्ण ग्लेशिअरला भारत आपला समजतो. मात्र, पाकिस्तानला तो भाग त्यांचा आहे, असे वाटते. १९७१नंतर पाकिस्तानने सियाचिनच्या वेगवेगळ्या भागांवर ताबा घेण्याकरिता वेगवेगळ्या मोहिमा सुरू केल्या. सियाचिन हा भारताचा भाग असल्याने १३ एप्रिल १९८४ला भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन मेघदूत’ सुरू केले आणि पूर्ण ‘सियाचिन ग्लेशिअर’ आपल्या ताब्यात घेतला.
सियाचिनचे क्षेत्र तीन हजार चौरस किलोमीटर इतके आहे.. या ग्लेशिअरवर आणि सल्तारो पर्वतावर सैन्य तैनात करण्यात आले. या जागांना चौकी (फॉरवर्ड डिफेन्डेड पोस्ट) म्हणतात. या ग्लेशिअरची उंची १७ ते १८ हजार फुटांपासून २२ ते २३ हजार फूट उंच आहे. एवढ्या उंचीवर झाडे अजिबात नसतात. ‘बेस कॅम्प’ १२ हजार फूट उंचावर आहे. या भागात प्राणवायू कमी आहे. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. शरीराला या वातावरणाची सवय करण्याकरिता तीन आठवड्यांचा काळ लागतो. सवय नसेल, तर ‘माउंटन सिकनेस’, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, बेशुद्ध पडणे अशा गोष्टी होऊ शकतात. बेस कॅम्पपासून भारतीय सैन्याच्या सीमा छावण्या जवळपास ७० किलोमीटर दूर आहेत. या चौक्या खूप उंचावर असल्याने तेथपर्यंत चालणे फारच कठीण असते. या चौक्यांवर वर्षभर सैन्य तैनात असते. काही चौक्या २५ हजार फूट उंचावर आहेत. पृथ्वीतील सर्वांत उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट २९ हजार फूट उंच आहे. यावरून येथील कठीण परिस्थितीचा अंदाज बांधता येईल. ग्लेशिअर दररोज सरकत असल्याने त्यावर चालणे कठीण आणि धोकादायक असते. काही खड्डे (इंग्रजीमध्ये crevices) हे ३०० फूट खोल असतात. शिड्यांना जोडून त्यांना पार करावे लागते. तेथे बर्फाच्या भिंतीही (आइस वॉल) असतात. त्यांचा कोन ९० डिग्रीचा असतो. अशीच एक भिंत ‘१९ मद्रास रेजिमेंट’च्या जवानांवर कोसळली आणि एक ज्युनिअर कमिशन्ड् ऑफिसर (जेसीओ) आणि नऊ जवान बर्फाखाली गाडले गेले.
ग्लेशिअरचे तापमान सामान्यतः उणे ४५ ते ६० अंश सेल्सिअस असते. या ठिकाणी बर्फासह जोरदार वारे वाहतात. अशा हिमवादळातून वाट काढून पुढे जाणे धोकादायक असते. प्रत्येक जवानाच्या खांद्यावर १५ ते २५ किलोग्रॅम सामान असते. या ठिकाणी पायी जाण्यासाठी काही आठवडे, ते एक महिना लागू शकतो.
बारा हजार फुटावर युद्ध शाळा!
यासाठी ‘बेस कॅम्प’ येथे ‘सियाचिन बॅटल स्कूल’ ही प्रशिक्षण शाळा तयार केली आहे. येथे जवानांना तीन आठवडे खास प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या जवान किंवा अधिकाऱ्यालाच ‘सियाचिन ग्लेशिअर’वर जाता येते. सीमावर्ती चौक्यांवर जवानांना तंबूमध्ये किंवा बंकरमध्ये राहावे लागते. झोपण्यासाठी ‘स्लीपिंग बॅग’चा वापर केला जातो. एवढ्या उंचीवर भूकही लागत नाही आणि ‘रेडी टू इट’ पदार्थ खावे लागतात. येथे सर्व ठिकाणी बर्फच बर्फ असतो. या बर्फावर चुकून कधी ऊन पडले आणि आपण ते बघितले, तर कायमचे आंधळे होऊ शकतो. ‘पल्मनरी सेरेब्रल एडिमा’, फुफ्फुसे आणि मेंदूत पाणी तयार होणे अशा प्रकारचे पर्वतांवरील आजार होऊ शकतात.
कमी तापमानापासून वाचण्यासाठी खास बूट, हातमोजे, टोप्या, चष्मे आदी वस्तू या ठिकाणी वापराव्या लागतात. या ठिकाणी आठवड्यातून केवळ एक ते दोनदा हेलिकॉप्टर येऊ शकते. वातावरण खराब असल्याने ते दररोज येणे शक्य नसते. जवानांची प्रकृती खराब झाली, तर त्यांना हायपोबॅगमध्ये ठेवण्यात येते. (या ठिकाणी सामान्य ऑक्सिजनची स्थिती तयार केली असते.) एक जवान तीन ते चार महिने सीमावर्ती चौक्यांवर राहतो. काही अधिकारी आणि जवानांचे मृतदेह वीस वर्षांनंतरही सियाचिनमध्ये सापडलेले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ‘चार मराठा लाइट इन्फंट्री‘चा एक जवान होता.
सैन्य तैनात करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही
काही तज्ज्ञ सांगायचा प्रयत्न करतात, की सियाचिनवरील ताबा भारताने सोडून द्यावा. असे म्हणणे चुकीचे आहे. या ठिकाणी आपण सध्या उंचीवर असून पाकिस्तान खालच्या अंगाला आहे. त्यामुळे सर्व भागावर आपल्याला लक्ष ठेवता येते. तंत्रज्ञानाच्या मदतीने सियाचिनवर लक्ष ठेवता येईल, असेही काही तज्ज्ञ सांगतात. पण, वास्तवामध्ये ते शक्य नाही. ‘उपग्रहीय छायाचित्रण यंत्रणा’ माणसाला शोधण्याइतकी पुढे गेलेली नाही. मानवरहित हवाई वाहनाचा (यूएव्ही) वापर करता येतो. पण, त्यात उणिवा आहेत. त्यामुळे तेथे आपले सैन्य तैनात करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण, येणाऱ्या काळामध्ये नवे तंत्रज्ञान मिळत असेल, तर त्याचा वापर करून सियाचिनवर आपण चांगले लक्ष ठेवू शकू. आत्तापर्यंत दोन हजारांहून अधिक जवानांनी या ठिकाणी आपल्या प्राणांचे बलिदान केले आहे. पुढेही ते होत राहील. कारण सध्या तरी सैन्य तैनात करण्याशिवाय आपल्यासमोर दुसरा पर्याय नाही.
लेखक ब्रिगेडियर (निवृत्त) आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment