Total Pageviews

Thursday 25 February 2016

घराघरात अफजल नको,कॅप्टन तुषार महाजन, हनुमंतप्पा हवेत

घराघरात अफजल नको, हनुमंतप्पा हवेत नागपूरमधील युवा जागरण मंचाने गुरुवारी एका अतिशय उद्बोधक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सियाचीनमध्ये शहीद झालेले शूर जवान हनुमंतप्पा यांच्या कुटुंबीयांना सन्मान आणि हनुमंतप्पा यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी एक लाखाचा निधी अर्पण तसेच ‘जेएनयू का सच’ या विषयावर अ. भा. वि. प. चे राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंंबेकर यांचे व्याख्यान, असा हा कार्यक्रम आहे. देशाच्या राजधानीत एका आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या विद्यापीठात ‘तुम एक अफजल मारोगे, घर घर से अफजल निकलेगा’ किंवा ‘अफजल हम शरमिंदा हैं, तेरे कातिल जिंदा हैं’ अशा देशविरोधी घोषणा दिल्या गेल्याचे प्रकरण चालू आहे. अशा वेळी युवा जागरण मंचाचा हा कार्यक्रम म्हणजे ‘घर घर में अफजल नही, हनुमंतप्पा होगा’ अशी भावना व्यक्त करण्याचाच कार्यक्रम आहे. राजकीय फायद्यासाठी किंवा विरोधासाठी विरोध करायचा म्हणून राजकीय मंडळी काहीही म्हणत असली, तरी देशातील सर्वसामान्य नागरिकांची हीच भावना आहे. तीच भावना या कार्यक्रमातून नेमकेपणाने अभिव्यक्त होणार आहे. वास्तविक देशभक्ती हा चर्चेचा विषय असायलाच नको. मात्र, आपल्या देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा इतका अतिरेक झाला आहे की त्याच्या आडून देशद्रोही उजळ माथ्याने देशविरोधी विचार मांडतात आणि शब्दच्छल करत राजकारणी त्यांचे समर्थन करतात. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्या विचारांची चळवळ फार वर्षांपासून चालू आहे. साम्यवादी विचार हा एक राजकीय विचार आहे. देशभक्ती ही एक भावना आहे. साम्यवादी विचार मांडणार्‍यांमध्ये भगतसिंग यांच्यापासून अनेक जण आहेत. तसे देशविरोधी विचार आणि कृती करणारे नक्षलवाद्यांसारखेही लोक आहेत. सोयीने याची सरमिसळ करता येणार नाही. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ९ फेब्रुवारी रोजी, संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड अफजल याला फाशी दिल्याचा दिवस म्हणून त्याचे मातम करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यापीठ प्रशासनाने त्याला परवानगी दिली नसतानाही नियम मोडून हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे जे चित्रीकरण टीव्हीवरून प्रसारित झाले त्यामुळे सगळा देश व्यथित झाला. अफजलबाबत वर उल्लेख केलेल्या घोषणा तर देण्यात आल्याच, त्याशिवाय ‘भारत तेरे तुकडे होंगे, इन्शाल्ला, इन्शाल्ला’, ‘कश्मीर की आजादी’, ‘मोदी तू सुन ले आजादी’, ‘तोगडिया तू सुन ले आजादी’ अशा घोषणा दिल्या गेल्या. घोषणा देणार्‍यांचा आविर्भाव अत्यंत देशविरोधी, उन्मादक होता. या घोषणा देणार्‍यांमध्ये उमर खालिद आणि शेजारीच उभा असलेला कम्युनिस्टांच्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार स्पष्ट दिसतो. दोन दिवसांनी आणखी एक कार्यक्रम या जेएनयूमध्ये झाला. यातही ९ तारखेप्रमाणेच कन्हैया आणि उमर खालिद शेजारीच उभे आहेत. मात्र, घोषणा कन्हैया देतो आहे. या घोषणा मात्र टिपिकल साम्यवादी आहेत. ‘सामंतवाद से आझादी’, ‘मनुवाद से आझादी’, ‘संघवाद से आझादी.’ ९ तारखेचा व्हिडीओ आधी माध्यमांमध्ये आला. तो व्हायरल झाला. त्यावरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. उमर खालिद आणि इतर फरार झाले. पोलिस जेएनयूमध्ये गेले. त्यांना घोषणा देणार्‍यांपैकी कन्हैया सापडला. कन्हैया कुमारला अटक करताच देशद्रोह्यांचा निषेध करण्यापेक्षा देशातील तमात हिंदुत्वविरोधक एका सुरात ओरडू लागले. हुकूमशाही, आणिबाणी नाना शिव्याशाप देऊ लागले. जणू कन्हैया कुमार देशासाठी सत्याग्रह करूनच अटक झाला, अशा प्रकारचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाला. ११ तारखेचा घोषणा देतानाचा व्हिडीओ जाणीवपूर्वक प्रसारित करण्यात आला. कन्हैया कुमार आझादीच्या घोषणा देत होता, पण काश्मीरच्या आझादीच्या नव्हे तर मनुवादापासून आझादीच्या घोषणा देत होता, असे दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात आला. इंडिया न्यूज या टीव्ही वाहिनीने हे सगळे व्हिडीओ एकाच वेळी दाखवून त्यातील फोलपणा उघड केला आहे. आश्‍चर्य म्हणजे राहुल गांधी आणि कॉंग्रेस नेते जेएनयूमध्ये जाऊन, ‘जो आपकी आवाज दबा रहे है, वो लोग देशविरोधी है, असे विधान करून या देशविरोधी घोषणा देणार्‍यांचे समर्थन केले. कन्हैया कुमारवर अन्याय होत असल्याचा कांगावा करत राहिले. हैदराबादला रोहित वेमुला प्रकरणाशी हे प्रकरण जोडून मोदी सरकार देशातील सर्व विद्यार्थ्यांवर संघाचा कार्यक्रम थोपण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप केला. चढ्या आवाजात, आक्रमकपणे हा कांगावा करत मूळ देशद्रोही घोषणांचा विषय त्या गदारोळात बाजुला टाकण्याचा प्रयत्न या लोकांनी केला आहे. काश्मीरच्या आझादीच्या घोषणा देणे हा देशद्रोह नाही काय? अफजलला फाशी देण्याचा निर्णय सर्व स्तरावरच्या न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला होता. तो फेटाळण्याच्या निमित्ताने बराच कालापव्यय केला गेला होता. कॉंग्रेसचे सरकार केंद्रात असतानाच अफजलला फाशी दिली गेली होती. आता ‘अफजल हम शरमिंदा हैं, तेरे कातिल जिंदा हैं’ ही घोषणा देणे देशद्रोह नाही? ज्या सरकारने अफजलला फाशी देण्याचा निर्णय अमलात आणला, त्या युपीए सरकारमध्ये कोणताही निर्णय फिरवण्याचा अधिकार असलेले राहुल गांधी आणि त्या मंत्रिमंडळातील पी. चिदंबरम्‌सारखे मंत्री आता अफजलच्या संदर्भातील या घोषणांचे समर्थन करत असतील, तर त्यांच्या या भूमिकेतील फोलपणा लक्षात यायला वेळ लागत नाही. कन्हैया कुमारच्या निमित्ताने मोदी सरकारचा राजकीय विरोध करण्याच्या नादात देशविरोधी कारवाया करणार्‍यांना आपण पाठबळ देत आहोत, याचे भान या लोकांना राहिलेले नाही. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वी एक दुर्दैवी चित्र या देशात उभे राहिले. देशविरोधी घोषणा देणारा, अफजलच्या फाशीचा विरोध कसा योग्य आहे ते जाहीरपणे टीव्ही चर्चेत निर्लज्जपणे सांगणारा, पोलिसांना वॉण्टेड असणारा उमर खालिद जेएनयूमध्ये प्रकट झाला. मंगळवारी रात्री तो शरण आला. याच ९ फेब्रुवारी रोजी सियाचीनमध्ये देशाचे रक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करत असताना हिमस्खलन होऊन त्यात हनुमंतप्पा शहीद झाले. एकाच दिवशी देशात काश्मीरच्या आझादीच्या घोषणा आणि काश्मीरचे रक्षण करताना हौतात्म्य अशा दोन्ही घटना घडल्या. देशातील तरुणाईने काय करायचे? देशाने काय करायचे? कोणाचा आदर्श ठेवायचा? घराघरात अफजल जन्म घेणार की घराघरात हनुमंतप्पा जन्म घेणार? निव्वळ राजकीय स्वार्थासाठी देशातील विरोधी पक्षातले राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, कम्युनिस्ट हे सगळे या देशविरोधी घोषणा देणार्‍यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. ‘देशविरोधी घोषणांचे समर्थन कोणीही करू शकत नाही’, असे एक वाक्य तोंडाने म्हणायचे आणि त्यापुढे मात्र सगळी कृती, सगळा तर्क या देशविरोधी घोषणा देणार्‍यांना वाचविण्यासाठी खर्च करायचा, असा दुतोंडीपणा ही मंडळी करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर हनुमंतप्पा यांना अभिवादन करण्यासाठी सर्वसामान्य माणसांच्या मनातील भावना हनुमंतप्पा आणि इतर शहिदांना अखेरचा निरोप देताना प्रकट झाली ती प्रेरणादायी आहे. देशाच्या सीमेवरचे सैन्य जरी मनगटातील ताकदीने लढत असले तरी, त्या मनगटात ताकद येत असते ती आपल्या पाठीशी आपले देशबांधव आहेत या भावनेने. हनुमंतप्पा यांच्या हौतात्म्याला सलाम करताना देशबांधवांनी आपल्या भावना प्रकट केल्या, तर त्यातूनच सीमेवर प्राणपणाने लढणार्‍या सैनिकांच्या अंगी हजार हत्तींचे बळ संचारणार आहे. हनुमंतप्पा यांना अभिवादन आणि त्यांच्या कुटुंबीयांचा गौरव हा देशविरोधी कारवाया करणार्‍या देशद्रोही लोकांना आणि त्यांचे आडून, लपून समर्थन करणार्‍यांना सर्वसामान्य जनतेचा सज्जड इशाराच आहे! देशातील सर्वसामान्य जनतेचा देशभक्तीचा हुंकारच अशा कार्यक्रमातून सहजपणे प्रकट होत असतो, हे देशविरोधी कारवाया करणार्‍यांनी लक्षात घ्यावे!

No comments:

Post a Comment