Total Pageviews

Friday, 19 February 2016

देशबुडव्यांचे कारस्थान-जयंत बरडे

देशबुडव्यांचे कारस्थान आधी पुण्याची फिल्म इन्स्टिट्यूट, मग चेन्नईस्थित आयआयटी, नंतर हैदराबादेतील रोहित वेमुला प्रकरण व नुकतेच जे. एन. यू. मधील ‘अफजल गुरू प्रेम प्रकरण’ यांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यास, हे सर्व देश तोडण्याचे, बुडविण्याचे कारस्थान आहे. हे सहज लक्षात येते. विद्यापीठ नियमविरोधी व राष्ट्रद्रोही स्वरूपाची वर्तणूक विद्यापीठ परिक्षेत्रात करावयाची व कारवाई केल्यावर हिंसक धिंगाणा घालून केंद्र सरकार व मोदी शासनाविरुद्ध ‘शिमगा’ करावयाचा! आंबेडकर स्टुडण्ट्‌स असोसिएशन या मान्यता नसलेल्या संस्थेला समोर करावयाचे, दलित-दलितेतर असा वाद उभा करावयाचा व मग देशद्रोह्यांना पाठीशी घालण्याची मागणी करावयाची. रोहित वेमुला प्रकरण तर केवळ देशद्रोहाचे निलाजरे प्रदर्शन आहे. ३० जुलै २०१५ ला हैदराबाद शॉपिंग कॉम्प्लेक्समधे याकुब मेमन या देशद्रोह्याच्या फाशीविरुद्ध ‘नमाज-ए-जनाजा’मधे त्याच्या दहशतवादी कृत्याचे समर्थन करणारी भडकावू भाषणे झालीत. घोषणा कोणत्या? ‘...हर घरसे याकुब निकलेगा.’ याविरुद्ध फेसबुकवर मत व्यक्त करणार्‍याला वसतिगृहातच बेदम मारहाण करण्यात आली. या आधीही त्यांनी ‘अफजल गुरू’ संबंधात असेच केले होते. या लोकांशी रोहितचा संबंध होता. पण त्याने आत्महत्या करावी असे काही नव्हते. त्याचा मृत्यू कसा झाला? कुणी केला? व तो दलित असल्याचे भासवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी व का केला? आंबेडकरच्या नावाने काम करणार्‍या विद्यार्थी संघटनेने देशद्रोह्यांशी शय्यासोबत करावी? तोच प्रकार जेएनयूमध्ये घडला. इतक्या उघडपणे भारताच्या बर्बादीचे व भारताचे तुकडे करण्याची घोषणा व नारेबाजी करणार्‍यांना सरळ गोळी घालून अफजल गुरूच्या भेटीस पाठवावे अशी सामान्य जनतेची भावना अनुभवास येते. या देशद्रोही, भारताला अस्थिर व अप्रगतिकारक घटनेमागे कोणत्या शक्ती आहेत. अति डाव्या विचारसरणीचे तर निश्‍चितच आहेत. जेएनयू हा त्यांचा वंशपरंपरागत अड्डा आहे. हैद्राबादला ओवैसी व राष्ट्रविरोधी तत्त्वे आहेतच. पण याशिवाय ‘धर्मनिरपेक्षतावादी’ व अहिष्णुतेच्या नावाखाली पुरस्कार परत करू पाहणारा बुद्धिवादी या नावाने ओळल्या जाणारा एक वर्ग आहे. दूरदर्शनवरील ‘बहस’ मधे घसाफोड बकवास करणारे ‘विद्वान’, काही पत्रकार, वकिली चालत नाही म्हणून राजकारणात शिरलेले वकील, दूरदर्शनवरील विद्वान पत्रकार व काही लेखक, नट, या विद्वानांचा अड्डा म्हणजे दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर. भव्य बंगला, खाण्यापिण्याची सोय सर्व आतापर्यंत शासकीय खर्चाने! यांच्या सर्व मौजी, शौक, विद्वत्तेच्या नावाखाली पूर्ण करण्याची जुन्या शासनाने लावलेली सवय! मोदी शासनाने हे सर्व बंद करण्याचा प्रयत्न सुरू केला. परदेशातून एनजीओद्वारा मिळणारा, लक्षावधी रु. चा मलिदाही मोदींनी बंद केला. झाले! हे सारे ‘बुद्धीचे स्मगलर’ खवळले! आश्‍चर्य यांचे वा साम्यवाद्यांचे वाटत नाही. साम्यवादी या देशाशी १९४२ च्या आंदोलनात व चिनी आक्रमणाचे वेळीही एकनिष्ठ नव्हतेच! पण पणजोबा ते नातू ज्या नेहरू-गांधी घराण्यातील व्यक्ती पंतप्रधानपद भूषवित्या झाल्या, त्या गांधी परिवारातील पंतप्रधानपदाचा दावेदार राहुलने या देशद्रोह्यांचा आवाज बुलंद करण्याची जाहीर मागणी करावी? केवळ भाजपा व संघाला विरोध करण्यासाठी? जरा आठवा राहुलजी, तुमच्याच शासनाने संघाला गणराज्यदिन समारोहात संचलनाचे निमंत्रण दिले होते! ‘कन्हैयाच्या बासरीतून निघणारे- भारत की बर्बादी, भारत के टुकडे, अफजल गुरुजी की जय’ हे स्वर इतके कर्णमधुर व तुमच्या काळजाला भिडणारे वाटलेत? पण सत्तेच्या बाहेर राहायची पाळी आल्याबरोबर एवढी तडफड की हजारो निरपराध नागरिक, हजारो सैनिक, सीमेवर हौतात्म्य पत्करणारे शूर जवान यांचे बलिदान तुम्हाला ‘कवडीमोल’ वाटते? त्यांचे कुटुंबीय तुम्हाला काय म्हणतील? तुमच्या नेतृत्वातील अ. भा. कॉंग्रेसचे वर्णन कसे करावे? लक्षात घ्या. सत्य बाहेर येत आहे. जनता सत्यामागे जाईल पण जाण्यायेण्याच्या प्रक्रियेत तुमची व सार्‍या देशद्रोह्यांची गत फार वाईट होईल. जयंत बरडे

No comments:

Post a Comment