Total Pageviews

Saturday 20 February 2016

स्वातंत्र्याला ‘धोका’ कायम! संजय राऊत

रोखठोक : विद्यापीठात धोत्र्याच्या बिया! Sunday, February 21st, 2016 स्वातंत्र्याला ‘धोका’ कायम! संजय राऊत Rokhthok Ne Logoदेशातील अनेक विद्यापीठांत अस्वस्थ वातावरण आहे. राष्ट्रीय चारित्र्याचा नाश होऊन तेथे विषारी धोत्र्याच्या बियांचे पीक येत आहे. ब्रिटिश राजवटीविरोधात देशी-परदेशी विद्यापीठांतून अनेक विद्यार्थी क्रांतिकारक म्हणून पुढे आले. आता त्याच स्वतंत्र हिंदुस्थानच्या विद्यापीठातून देशविरोधी कारवाया घडत आहेत. राज्य बदलले तरी धोका कायम आहे! हिंदुस्थानातील शैक्षणिक वातावरण गेल्या काही दिवसांपासून बिघडले आहे. देशातील मोठ्या विद्यापीठातील अस्वस्थता आणि खदखद अशी बाहेर पडली आहे की, हिंदुस्थानवर पाकिस्तानने ‘बॉम्ब’ टाकण्याची गरज नाही. देशातील बहुतेक सर्व विद्यापीठांतून ‘मानवी बॉम्ब’ फिरत आहेत. हे चित्र राष्ट्रीय सुरक्षेसाठी भयंकर आहे. हैदराबाद आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठांची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. महाराष्ट्राच्या विदर्भातील तीन विद्यापीठे ही ‘माओवादी’ अतिरेक्यांनी गिळायला सुरुवात केल्याची माहिती धक्कादायक आहे. गडचिरोली येथील नव्याने स्थापन झालेले गोंडवाना विद्यापीठ, वर्धा येथील महात्मा गांधी विश्‍व विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठातही ‘माओवादी’ अतिरेक्यांनी पोखरायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांना, बुद्धिजीवींना ‘फितूर’ करून देश गिळण्याचे हे कारस्थान आहे. ब्रिटिश काळातील विद्यापीठे हे स्वतंत्र चळवळीची भूमिगत अड्डे होते व अनेक विद्यापीठांतून निघालेले तरुण हे ‘क्रांतिकारक’ म्हणून पारतंत्र्याच्या बेड्या तोडण्यासाठी कुर्बान झाले. अशा किती क्रांतिकारकांची नावे घ्यावी? आज त्याच स्वतंत्र हिंदुस्थानची विद्यापीठे देशविरोधी कारवायांचे अड्डे बनले व हिंदुस्थान मुर्दाबादचे नारे तेथे दिले जात आहेत. राज्य बदलले, धोका कायम! हैदराबाद व दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील घटना अस्वस्थ करणार्‍या आहेत. विद्यापीठातूनच राष्ट्रीय चारित्र्याचा खून होत आहे व आमचे राज्यकर्ते आजही ‘देशद्रोह’ म्हणजे काय? त्याचा अर्थ शोधण्यासाठी अंधारात चाचपडत आहेत. एका स्वतंत्र देशाला धोका परकीय शक्तीपासून नाही तर त्याच देशाच्या कायदेशीर नागरिकांपासून आहे. काँग्रेसच्या राजवटीत या देशद्रोह्यांची मुळे खोलवर रुजली, पण ती राजवट जाऊन दोन वर्षे झाली. मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवे राज्य आले, पण ‘धोका’ तोच आहे. हिंदुस्थानविरुद्ध ‘जंग’ लढण्याची भाषा कश्मीरात किंवा पाकिस्तानात होत नसून देशाच्या राजधानीत दिल्लीत सुरू आहे. उद्या हेच लोण मुंबई, पुणे, चेन्नई विद्यापीठांत पसरायला वेळ लागणार नाही. विष शरीरात जरा लवकरच भिनते व शुद्ध पाण्याचा निचरा होतो. अफझल गुरू व याकूब मेमनचे ‘पुण्यस्मरण’ करणारे लोक विद्यापीठाच्या आवारात सरकारी पैशावर मजा मारीत आहेत. हैदराबाद विद्यापीठात देशविरोधी कारवायांबद्दल फासावर गेलेल्या याकूब मेमनसाठी सहानुभूती दाखवणारे सोहळे झाले. याकूब मेमनच्या फाशीविरोधात विद्यार्थ्यांचा एक गट रस्त्यावर उतरला व विद्यापीठाचे काम त्यामुळे विस्कळीत झाले. रोहित वेमुला हा त्या विद्यार्थ्यांचा नेता. त्याला विद्यापीठातून बडतर्फ केले व त्या वादातून त्याने आत्महत्या केली. त्या आत्महत्येचे जोरदार राजकारण देशात सुरू आहे. आमच्या विद्यापीठांचे राजकीय अड्डे झाले, पण ते देशद्रोह्यांचे अड्डे झाले व देशविरोधी काम करणार्‍यांना पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधींपासून सीताराम येचुरींपर्यंत सगळेच नेते हैदराबादच्या विद्यापीठात पोहोचले. रोहित वेमुला या विद्यार्थ्याची जात कोणती? यावर सात दिवस राजकीय खल होतो व त्याच वेळी हिंदुस्थानच्या सीमेवर आमचे जवान दुश्मनांशी लढताना शहीद होत असतात व त्या शहीदांची जात फक्त राष्ट्रभक्ती हीच असते. लढणार्‍या, मरणार्‍या सैनिकांची जात कोणी विचारीत नाही. पण देशविरोधी फूत्कार सोडणार्‍यांना मात्र जात-धर्माची लेबले लावून ‘शहीद’ बनवण्याचा प्रयत्न होतो, हे निर्लज्जपणाचे लक्षण आहे. अफझलचे पुण्यस्मरण Students protest at JNUदिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रकार हैदराबादपेक्षा भयंकर आहे. संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार, ज्यास हिंदुस्थानच्या सर्वोच्च न्यायालयाने फासावर लटकवले. त्याच्या ‘पुण्यस्मरणा’चा सोहळा जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पार पडला व तेथे सरळ सरळ हिंदुस्थानविरोधी घोषणा झाल्या. त्यातील काही घोषणा पहा- – ‘‘अफझल तू हमारे अरमानों को मंझील तक पहुंचायेगा’’ या घोषणेचा अर्थ काय? तर अफझल हा हुतात्मा आहे व संसदेवर हल्ला करून तू आमचा लढा पुढे नेला आहेस. – ‘‘भारत की बरबादी तक जंग रहेगी! जंग रहेगी!!’’ म्हणजे काय? हिंदुस्थानचा संपूर्ण विनाश होईपर्यंत आम्ही लढत राहू. हिंदुस्थान मुर्दाबाद व पाकिस्तान झिंदाबादच्या उघड घोषणा येथे दिल्या व त्या घोषणा देणार्‍यांत सगळेच हिंदुस्थानी नागरिक होते. कन्हैया हा त्यांचा नेता. त्याला अटक केली. कश्मिरी विद्यार्थी या घोषणाबाजीत आघाडीवर. संसदेतील हल्ल्याप्रकरणी प्रो. गिलानी यास अटक झाली होती. अफझल गुरूला याच गिलानीने आश्रय दिला, पण नंतर तो सबळ पुराव्याअभावी सुटला. तो गिलानी या सर्व देशद्रोही गोंधळात पुन्हा सक्रिय झाला. आता त्यालाही अटक केली. या सगळ्या देशद्रोह्यांना अटक केल्याचे दु:ख काँग्रेस, कम्युनिस्ट व इतर राजकीय पक्षांना झाले. सियाचीनच्या हिमवादळात शहीद झालेल्या १० सैनिकांच्या घरी यापैकी कुणी गेले नाही, पण हिंदुस्थानविरोधी घोषणा देणार्‍यांवर कारवाई झाली म्हणून हे सर्व लोक विद्यापीठात गेले. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यास व एकात्मतेस धोका याच लोकांपासून आहे. अशा लोकांना विनाचौकशी जन्मठेपेच्या शिक्षेवर पाठवायला हवे. हे सर्व इतर देशांत घडले असते तर देशविरोधी घोषणा देणार्‍यांचे नामोनिशाणही दिसले नसते. जनतेच्या पैशातून! ‘भगतसिंग झिंदाबाद’चे नारे कुणी देत नाहीत, पण ‘अफझल गुरू अमर रहे’च्या घोषणा खुलेआम दिल्या जात आहेत. ‘२६/११’चा सूत्रधार डेव्हिड हेडली पुन: पुन्हा सांगतोय की, इशरत जहां ही लश्कर-ए-तोयबाची अतिरेकी व मानवी बॉम्ब होती. पण डेव्हिड हेडली खोटे बोलतोय व इशरत जहां निरपराधी आहे हे सिद्ध करण्याचा आटापिटा सुरू असतो. पाकिस्तानात सरबजीतला फाशी दिले. त्याला निरपराधी सिद्ध करण्यासाठी तेथे कितीजण पुढे आले? हिंदुस्थानच्या राजकारणात फितुरांचे उदंड पीक तरारले आहे व जेथे सकस पीक निघावे त्या विद्यापीठांतूनच धोत्र्याच्या बियांचे उत्पादन जोरात आहे. जनतेच्या करांच्या पैशांतून विद्यापीठांना अनुदान मिळते. विद्यार्थ्यांना स्वस्तात हॉस्टेल, शिक्षण, खाण्यापिण्याची सोय होते. त्याच देशाच्या पैशांतून देशविरोधी कारवाया सुरू आहेत. देशाचे हे विद्रूप चित्र आहे. राजकारण्यांनी ते जास्तच विद्रूप केले! – rautsanjay61@gmail.com

No comments:

Post a Comment