जगणे शिकविणारे मरण
हरीश नांजप्पा या २६ वर्षीय तरुणाचे बंगळुरु-तुमकुर महामार्गावर एका अपघातात हृदयद्रावक निधन झाले, त्याने सारा देश हळहळला असेल. एका खाजगी कंपनीत नोकरीवर असणार्याद या तरुणाने मरणाच्या दाढेत असतानाही जे माणुसकीचे दर्शन सार्याए जगाला घडविले, त्याने सारे स्तिमित झाले आहेत. मरणासन्न अवस्थेत प्राणान्तिक वेदनेने विव्हळत असतानाही मानवहिताचा विवेक जागृत असणे, साधारण व्यक्तीचे काम नाही. ज्ञानेश्वनरीच्या १३व्या अध्यायात ७३१व्या ओवीत ज्ञानेश्वारांनी भौतिक जगात आसक्त सर्वसामान्य व्यक्तीचे वर्णन करताना, साप आणि बेडकाचा दृष्टांत दिला आहे. बेडूक सापाचिया तोंडीं | जातसे सबुडबुडीं | तो मक्षिकांचिया कोडीं | स्मरेना कांही? सापाच्या तोंडात अर्धा-अधिक गेलेला बेडूक (आता काही क्षणात मरणार असतानाही) समोर आलेली एखादी माशी जिभेने ओढून खाण्याचा प्रयत्न करीत असतो. हा बेडूक आणि आपल्यासह आपल्या अवतीभवती असणारे सर्वसामान्य यात फार फरक असेल असे वाटत नाही. मरण अटळ आहे हे माहीत असूनही मनुष्य मात्र आपण अमर आहोत, या थाटात वावरत असतो. भविष्याच्या सुखस्वप्नात रममाण होत असतो. क्षणाक्षणाने मरण जवळ येत असले, तरी हा मात्र वासनापूर्तीच्या मिथ्या आनंदाच्या पूर्तीसाठी आकाश-पाताळ एक करीत असतो. अशा लोकांसाठी ज्ञानेश्वीरांनी हा दृष्टान्त दिला आहे. हरीश नांजप्पा मात्र याला अपवाद ठरला. तसेही अपवादानेच नियम सिद्ध होत असतात. १६ फेब्रुवारीला हरीशचा अपघात झाला. ट्रकच्या मागच्या चाकात आल्याने त्याच्या देहाचे अक्षरश: दोन तुकडे झाले. पोटापासून खालचा भाग वेगळा होऊन काही अंतरावर बाजूला पडला. परंतु हरीश जिवंत होता. बघ्यांची गर्दी जमली. कुणी तरी रुग्णवाहिकेला निरोप दिला. बहुतांश लोक मात्र फोटो आणि व्हिडीयो रेकॉर्डिंग करण्यात गुंग झाले. अपघातानंतर सुमारे २० मिनिटे हरीश जिवंत होता. आपण मरणार हे त्याला समजून चुकले होते. त्यामुळे त्याने प्रथम पिण्यास पाणी मागितले आणि नंतर उपस्थितांना विनंती केली की, मी तर मरणारच आहे. परंतु, माझ्या शरीरातील अवयवांचे दान करून गरजूंना जीवन देण्यात यावे. रुग्णवाहिकेतही तो जोपर्यंत शुद्धीवर होता, हीच विनंती करीत होता. रुग्णालयात दाखल केल्यावर काही काळाने त्याने या जगाचा निरोप घेतला. त्याच्या देहाचे तुकडे झाले असल्यामुळे केवळ डोळे वगळता दुसर्याा कुठल्याही अवयवाचे दान होऊ शकले नाही. कारण ते अवयव सुस्थितीत नव्हते. त्याच्या दोन डोळ्यांनी मात्र दोन अंधांना दृष्टी देण्याचे कार्य केले. हरीश आज या जगात नाही; परंतु, त्याचे हे दोन डोळे आजही जिवंत आहेत आणि ज्यांना कधीही सृष्टीची विविधता बघता आली नसती, अशा दोघांना कल्पनातीत आनंदाची अनुभूती मिळणार आहे. मरणाएवढी कुठलीच भीती मनुष्याला नसते. मरणकल्पनेपाशी जाणत्यांचा देखील तर्क थांबतो. त्यांचे विचार कुंठित होतात. विवेकाचा स्पर्शही होत नाही. अशा स्थितीत हरीशला समाजातील दु:खी लोकांची आठवण यावी, शारीरिक व्यंगामुळे ज्यांचे आयुष्य वाळवंट झाले आहे, अशांच्या वेदना आठवाव्यात, ही एक विलक्षण घटना आहे. हरीशचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. त्याच्या शरीराचे अक्षरश: दोन तुकडे झालेले होते. पोटाखालचा भाग तुटून काही अंतरावर पडलेला होता. शरीरातून सतत रक्तस्राव होत होता. किती वेदना होत असतील त्याला! केवळ कल्पना केली तरी, अंगावर शहारे येतात. अशा स्थितीत तो दुसर्यांदचा विचार करतो आणि त्यांच्या जीवनात सुख परतावे म्हणून आपले अवयव दान करण्याची विनंती करतो. हे सर्वसामान्य व्यक्तीचे लक्षण नाही. असामान्य व्यक्तीच असे वर्तन करू शकते. या दृष्टीने हरीश असामान्य ठरतो. स्वार्थासाठी एकमेकांचे गळे कापण्यासही मागेपुढे न पाहाणारे आमच्या अवतीभवती आम्ही पाहतो. त्यात आमचाही समावेश असू शकतो. ‘मी नाही, तूच’च्या ऐवजी ‘तू नाही, मीच’ ही भावना आम्हाला जवळची आणि आवडीचीही असते. त्याग करायचा तो दुसर्यां नी. आम्ही मात्र स्वार्थात आकंठ बुडून बसणार. समाजात कुठलेही परोपकाराचे काम आले की, आमच्या घराची दारे-खिडक्या बंद होणार. अनंत कारणे सांगून परोपकारी कार्यात सहभाग देण्यात आम्ही टाळाटाळ करणार. अशा स्थितीत दुसर्याअ कुणाला अवयव दान करणे, ही कल्पनाही आम्हाला सुचू शकत नाही. आज अवयवदानाचे थोडेफार प्रचलन वाढले आहे. अवयव दानामुळे कुणाचा जीव वाचला, हा बातमीचा विषय होत आहे. सुस्थितीत असताना, हे दान केलेले असते. किंवा एखादा कोमात असताना त्याच्या नातेवाईकांनी विवेक वापरून घेतलेला हा निर्णय असतो. पण हरीश असामान्य स्थितीत होता. अशा स्थितीत त्याला हा विचार सुचणे, खरेच खूप काही शिकवून जाणारा आहे. कुणाच्या अवयवदानाचे मूल्य कमी करण्याचा हा विषय नाही. पण तरीही हरीशचे वेगळेपण मात्र उठून दिसणारे आहे. शेतीच्या कामात आईला मदत करून हरीश बंगळुरुला परत येत होता. आज त्याच्या आईची काय अवस्था असेल. हरीशला एक मोठा भाऊ आहे. तो बंगळुरुतच ऑटोरिक्षा चालवितो. पण आईकडे लक्ष देत नाही. हरीशच आईची काळजी घ्यायचा आणि आईला यापुढे तरी कष्ट करावे लागू नये म्हणून त्याची धडपड सुरू होती. आईला सुखात ठेवणे, हेच त्याचे ध्येय होते. काही महिन्यांपूर्वीच त्याने नवी मोटारसायकल कर्जाने घेतली होती. त्याला आई नेहमी बजावायची की, गाडी वेगात चालवू नको. त्याने मोटारसायकलच्या मागील भागावर लिहून ठेवले होते- ‘आई म्हणते वेग नको... लक्षात ठेव.’ पण शेवटी वेगाने जाणार्याि जड वाहनानेच त्याचा बळी घेतला. मरण म्हणजे सर्व काही संपले, असे नसते. मरणातही जगणे असते. एखाद्याचे मरण कितीही शोकान्त असले, तरी ते इतरांना जगणे शिकविणारे असते. ज्ञानेश्वचरांच्या उपरोल्लेखित दृष्टान्ताप्रमाणे आयुष्य जगणार्यां चे डोळे उघडणारे असते. जमिनीत गाडलेले बीज जसे स्वत: नष्ट होऊन एका वृक्षाला जन्म देते. तसे काही जणांचे मरण देखील इतरांना जगण्याचा खरा अर्थ गवसण्यासाठी मदत करणारे असते. आपल्या संस्कृतीत अशा मरणालाही जीवन म्हटले आहे. कवी सावरकर म्हणतात- तुजसाठी मरण ते जनन | तुजवीण मरण ते जनन | ते याच अर्थाने. आमचे मात्र जगणे इतरांना रक्तबंबाळ करणारे असते; मरणाचे सोडून द्या! आमच्यासारख्या अशा सर्व लोकांना हरीशने गदगदा हलवून जागे केले आहे. सारेच दीप कसे मंदावले आता, ज्योती विझू विझू झाल्या, की झड घालून प्राण द्यावा पतंगाने, असे कुठेच तेज नाही!, थिजले कसे आवाज सारे?, खडबडून करील पडसाद जागे, अशी कुणाची साद नाही? कवी अनिलांनी ही जी खंत व्यक्त केली आहे, तिला हरीशने आपल्या मरणाने उत्तर दिले आहे. ते उत्तर आमच्या जगण्याचे कारण व्हावे, यापलीकडे हरीशलाही जास्त काही नको असेल.
No comments:
Post a Comment