कारगिल युद्धाची वीरगाथा
कारगिल युद्धाला 23 वर्षे पूर्ण झाली. त्या पाश्र्वभूमीवर या युद्धामध्ये पराक्रमाची बाजी लावून विजय पताका फडकवणार्या सैनिकांचे स्मरण करणे औचित्याचे ठरते. अत्यंत खडतर परिस्थितीत जीवाची पर्वा न करता ज्या सैनिकांनी देशाच्या सुरक्षिततेला अबाधित ठेवले त्यांच्या शौर्यापुढे नतमस्तक होऊन भारतीय नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडताना आपण देखील तेवढेच तत्पर राहिले पाहिजे ही जाणीव या निमित्ताने सर्वांच्या मनात रुजवली गेली पाहिजे.
२६
जुलै कारगिल
विजय दिवस
या युद्धाची वीरगाथा आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात तेवढीच जीवंत आहे. पाकिस्तानी लष्कराचे जवान मे १९९९ मध्ये कारगिल सेक्टरमध्ये घुसखोरांच्या रुपात आले. त्यानंतर त्यांनी अनेक भारतीय शिखरांवर कब्जा केला. पाकिस्तानी लष्कराला भारतीय भूमिवरून हुसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय सुरू केले. यात भारतीय लष्कराचे सुमारे ३० हजार जवान सहभागी झाले. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केले. तेव्हापासून प्रत्येकवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.
जगभरात उंच पर्वतांमध्ये झालेल्या युद्धांपैकी कारगिल युद्ध एक ताजे उदाहरण आहे. सुरवातील पाकिस्तानने दावा केला होता, की त्यांचे केवळ ३७५ जवान ठार झाले आहेत. परंतु, नंतर स्पष्ट झाले, की पाकिस्तानचे किमान चार हजार जवान या युद्धात मारले गेले. भारतीय लष्करातील ५४३ अधिकारी आणि जवानांना या युद्धात वीरमरण आले . १३०० जवान जखमी झाले. कारगिल युद्धात ठार झालेल्या भारतीय जवानांचा वयोगट १९ ते २८ असा होता.
सौरभ कालियांमुळे मिळाली घुसखोरीची माहिती
कारगिल युद्धात अतिशय क्रुरपणे ठार मारलेल्या लेफ्टनंट सौरभ कालिया यांचे नाव आजही भारतीयांच्या जीभेवर आहे. मे १९९९ रोजी एका स्थानिक मेंढपाळाकडून मिळालेल्या माहितीनंतर बटालिक सेक्टरमध्ये लेफ्टनंट सौरभ कालिया आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर गेले होते. यावेळी पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामुळे तेथील घुसखोरी उजेडात आली.
पाकिस्तानी लष्कराने कालिया यांनी पकडून अतिशय क्रुरपणे ठार मारले. सौरभ यांचे वडील आजही त्यांच्या हत्येला दोषी असलेल्यांना शिक्षा होण्यासाठी मोठा संघर्ष करीत आहेत
कॅफ्टन विक्रम बत्रा म्हणाले -ये दिल मांगे मोर
कारगिल युद्धात शहिद झालेले कॅफ्टन विक्रम बत्रा यांचे सहकारी त्यांना शेरशाह असे म्हणत. केवळ १८ महिन्यांपूर्वी भारतीय लष्करात भरती झालेले बत्रा त्यांच्या ऐतिहासिक संदेशासाठी स्मरणात राहतात. बत्रा यांनी युद्धावर जाण्यापूर्वी सांगितले होते, की भारताचा विजयी ध्वज रोवून परत येईल किंवा त्यात लपेटून येईल.
त्यांच्या कंपनीला पॉईंट ५१४० पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यातून परत घेण्याचा आदेश मिळाला होता. त्यांनी शत्रूची दिशाभुल करण्यासाठी शिखराच्या दुसरीकडून चढण्याची योजना आखली होती. त्यात त्यांना यश आले. बत्रा यांनी पाकिस्तानी लष्कराच्या तीन जवानांना ठार मारले. परंतु, या लढाईत ते जखमी झाले. तरीही ते लढत राहिले. २० जून १९९९ रोजी सकाळी ३.३० वाजता त्यांच्या कंपनीने शिखर ताब्यात घेतले.
शिखर ताब्यात आल्यावर बत्रा म्हणाले होते, की ये दिल मांगे मोर. त्यांच्या याच शब्दांमध्ये त्यांची विरता दडलेली आहे. ८ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने एेतिहासीक यश मिळवित १६ हजार फूट उंचिवर असलेले ४८७५ शिखर परत मिळविले. परंतु, या मोहिमेत कॅप्टन बत्रा कामी आले.
४८७५ शिखर सर करताना बत्रा यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत येण्यास मनाई केली. तुमच्या मागे मुलंबाळं आहेत, असे म्हणत ते पुढे गेले होते.बत्रा यांना मरणोपरांत परमवीर चक्र प्रदान करण्यात आले आहे.
तुमच्या भविष्यासाठी भारतीय लष्कराने कुठे युद्ध लढले येथे येवून बघा
राजपूताना रायफल्समध्ये असलेले कॅप्टन विजयंत थापर यांना कारगिल युद्धात डर्टी डजन या १२ सदस्यीय टीमचे प्रमुख करण्यात आले होते. त्यांच्याकडे टोलोलिंग शिखर सर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. १२ जून १९९९ च्या रात्री विजयंत यांनी त्यांच्या प्लाटूनला लीड केले. टोलोलिंग सर केल्यानंतर त्यांना पिंपल्स आणि नॉल सर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास त्यांनी कठीण पर्वत चढून शत्रूच्या चौकीजवळ ठाण मांडला. शत्रूच्या चौकीवर जोरदार हल्ला केला. त्यांनी केवळ १५ मीटर अंतरावरून पाकिस्तानी लष्कराच्या अनेक जवानांचा खातमा केला. यात त्यांना वीरमरण आले.
बॅटल ऑफ थ्री पिंपल्समध्ये त्यांना शिखर ताब्यात घ्यायचे होते. विजयंत यांच्या प्लाटूनचे कमांडर मेजर पी. आचार्य शहिद झाले तेव्हा त्यांनी कमांड आपल्या हातात घेतली. २२ वर्षांचे विजयंत केवळ काही महिन्यांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांना मरणोपरांत वीरचक्र बहाल करण्यात आले.
पाकिस्तानी चौकीवर हल्ला करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या कुटुंबाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, की जर तुम्हाला शक्य असेल तर येथे येवून बघा तुमच्या भविष्यासाठी भारतीय लष्कराने कुठे युद्ध लढले. विजयंत यांचे वडील निवृत्त कर्नल वी. एन. थापर प्रत्येक वर्षी हजारो मैलांचा प्रवास करून मुलगा जेथे शहिद झाला होता तेथे जातात. मुलाला श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्याने दिलेला शब्द पाळतात.
त्यांना सोडू नका -मनोज पांडे यांचे अंतिम शब्द
खालूबर रिजलाइनला पाकिस्तानी जवानांच्या ताब्यातून सोडविताना कॅफ्टन मनोज पांडे शहिद झाले. कारगिल सेक्टरमधील खालूबर रिजलाइन अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाण होते. त्यावर पाकिस्तानी लष्कराने कब्जा केला होता. २३ जुलैच्या रात्री पाकिस्तानी जवानांनी कॅप्टन पांडे आणि त्यांच्या टीमवर तुफान गोळीबार केला. शत्रू पक्षाचे लक्ष विचलित करण्याची जबाबदारी पांडे यांना देण्यात आली होती. त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या दोन जवानांना ठार मारून पहिल्या पोझिशनवर कब्जा केला. त्यानंतर आणखी दोन जवानांना मारून दुसरे पोझिशन मिळविले. तिसऱ्या पोझिशनवर हल्ला करताना त्यांच्या खांद्याला आणि पायाला दुखापत झाली. जखमी अवस्थेतही त्यांनी शत्रूपक्षावर गोळीबार सुरू ठेवला. कॅप्टन पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चौथी पोझिशनही ताब्यात घेतली. यावेळी पाकिस्तानी लष्कराची एक गोळी त्यांच्या डोक्याला लागली. यात ते जागेवरच शहिद झाले. यावेळी त्यांचे अंतिम शब्द होते, ना छोडनू. ( नेपाळी भाषेचा मराठी अर्थ त्यांना सोडू नका) उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील रहिवासी २४ वर्षांचे पांडे यांना मरणोपरांत परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.
योगेंद्र यांनी रोवला टायगर हिलवर तिरंगा
ग्रेनेडिअर योगेंद्रसिंह यादव यांचे प्लॅटून घातक याला टायगर हिल्सवर ताबा मिळविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ४ जुलै १९९९ रोजी त्यांच्या प्लॅटूनने टायगर हिल्स ताब्यात घेण्यासाठी हल्ला केला. टायगर हिल्सची चढाई सरळ होती आणि टास्क तेवढाच कठीण. परंतु, त्यांच्या प्लॅटूनने अखेर टायगर हिल्सवर मानाने तिरंगा रोवला. यावेळी झालेल्या घमासान लढाईत योगंद्रसिंह यादव जबर जखमी झाले होते. त्यानंतर योगेंद्रसिंह यादव शहिद झाल्याचे वृत्त आले. सरकारने त्यांना मरणोपरांत परमवीरचक्र देण्याची घोषणा केली. परंतु, नंतर असे आढळून आले, की सुदैवाने योगेंद्रसिंह यादव जीवंत आहेत.
रायफलमॅन संजय यांनी पाकिस्ताने पाच जवान मारले
१३ जम्मू आणि काश्मीर रायफल्सचे रायफलमॅन संजय कुमार यांनी मुश्कोह घाटीतील पॉईंट ४८७५ सर करण्यासाठी ४ जुलै रोजी मोहिमेस सुरवात केली. परंतु, पाकिस्तानी लष्कराकडे असलेली अॅटोमॅटिक गनफायर त्यांच्या मोहिमेतील प्रमुख अडसर ठरली होती. जीवाची पर्वा न करता त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या जवानांवर जोरदार प्रहार केला. यावेळी त्यांनी पाकिस्तानी लष्कराचे तीन जवान ठार मारले. जबर जखमी झाले असतानाही ते लढत होते. पायाला गोळी लागली असतानाही त्यांनी पाकिस्ताचे पाच जवान ठार मारले. त्यांची एक मशिनगन आपल्या ताब्यात घेतली आणि ग्रेनेडच्या मदतीने चौकी उडवून लावली. त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले आहे
कॅप्टन अनुज नायर महावीर चक्र प्रदान
वेस्टर्न स्लोपवर १६,२५० फूट उंचिवर असलेले पॉईंट ४८७५ ताब्यात घेण्याची जबाबदारी कॅप्टन अनुज नायर यांना देण्यात आली होती. हल्ल्याच्या सुरवातीलाच त्यांचे कंपनी कमांडर जखमी झाले. त्यांनी हल्ल्याची जबाबदारी अनुज नायर यांना सोपविली. शत्रूपक्षाच्या तुफान गोळीबाराची पर्वा न करता ते कंपनीला पुढे मार्च करीत राहिले. त्यांनी पाकिस्तानी लष्कराचे तीन बंकर नष्ट केले. जेव्हा ते चौथा बंकर नष्ट करीत होते तेव्हा पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात तेथेच शहिद झाले. त्यापूर्वी त्यांनी पाकिस्तानचे नऊ जवान ठार मारले होते. त्यांना मरणोपरांत महावीर चक्र प्रदान करण्यात आले.
कारगिल हीरोने कृत्रिम पायांनी यश मिळवले
कारगिल युद्धात शौर्य गाजवलेले मेजर डी. पी. सिंह यांना गंभीर जखमी झाल्याने त्यांचा डावा पाय गमवावा लागला होता. परंतु त्यानंतरही पराभव न पत्करता त्यांनी कृत्रिम पाय बसवून धावण्याच्या क्षेत्रात नैपुण्य मिळवले. आज भारताचे अग्रणी ब्लेड रनर म्हणून (कृत्रिम पायांच्या मदतीने धावणारे धावपटू) म्हणून त्यांचे नाव घेतले जात आहे. सलग तीन मॅरेथॉन स्पर्धा जिंकणारे मेजर सिंह म्हणतात की, मला कृत्रिम पाय लष्कराने बसवून दिला आहे. त्याला ब्लेड प्रोस्थेसिस महटले जाते. एका पायाची किंमत साडेचार लाख रुपये इतकी आहे. मेजर सिंह यांचे नाव दोन वेळा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लिहिले गेले आहे. शारीरिकदृष्ट्या अपंग , अक्षम व अशक्त आहे म्हटल्याबद्दल त्यांना आक्षेप आहे. त्याऐवजी आपल्याला चॅलेंजर (आव्हाने स्वीकारणारा म्हणा) असे आवाहन ते करतात.
शस्त्रापेक्षा शस्त्र चालवणारा सैनिक जास्त महत्वाचा
द्रास गावामध्ये आता एक स्मारक बांधलेले असून तेथे अनेक पर्यटक भेटीसाठी जातात. तिथे गेल्यानंतर ही जी शिखरे आहेत ती दिसतात आणि नकळतपणे कारगिल युद्धामध्ये लढलेल्या सैनिकांपुढे आणि वीरगती मिळालेल्या शहिदांपुढे आपण नतमस्तक होतो. आपल्याकडे या पराक्रमाला किंवा सैनिकांच्या या बलिदानाला पाहिजे तसे महत्त्व दिले जात नाही. कितीही मोठे तंत्रज्ञान आले तरी युद्ध जे जिंकले जाते ते सैनिक जिंकतात .जे राष्ट्र आपल्या सैनिकांना विसरते ते राष्ट्र कधीही मोठे होऊ शकत नाही. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. त्यासाठी सक्षम सैन्यबल गरजेचे आहे. इतकेच नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाने देशप्रेम जागृत ठेवून आपले कर्तव्य पार पाडले तर या बहुआयामी धोक्यांना आपण परतवून लावू शकतो.
No comments:
Post a Comment