Total Pageviews

Saturday, 22 July 2023

कारगिलची पुनरावृत्ती होईल का?


  

२६ जुलै रोजी कारगीलच्या युद्धाला23 वर्ष पुर्ण होत आहेत. यानिमित्ताने कारगील युद्धातुन आपण काय शिकलो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारगीलसारखे युद्ध भारतासमोर पुन्हा येऊ शकते का यावरही चर्चा होणे गरजेचे आहे. कारगीलच्या युद्धानंतर सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली "कारगील रिव्ह्यू कमीटीची" स्थापना करण्यात आली होती. कारगील युद्धादरम्यान आपल्या काय चुका झाल्या आणि यापुढे कोणती काळजी घेणे गरजेचे आहे हे तपासण्याचे काम या समितीचे होते. या समितीच्या अहवालात अनेक सुधारणा सुचविल्या होत्या. लवकरात लवकर सैन्याचे आधुनिकीकरण करणे, सीमेवरती रस्त्यांचे जाळे निर्माण करणे, सैन्यामधील रिक्त जागा भरण्यास या समितीने सांगितले होते. मात्र १६ वर्ष उलटुनही या समितीच्या सुचनांवर पुरेशी कार्यवाही करण्यात आली नव्हती. मात्र गेल्या वर्षभरात सैन्याच्या आधुनिकीकरणाला गती मिळालेली आहे. सैन्यदलाचे बजेट दरवर्षी २५ टक्क्यांनी वाढविले तरीही सैन्यदलाचे आधुनिकीकरण करण्यास दहा ते पंधरा वर्ष लागू शकतात. सध्याचे सरकार या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न करेल आणि सीमेवर रस्ते बांधण्यासाठी ठोस पावले उचलेल अशी अपेक्षा आहे.

लद्दाख १७ माऊंटन स्ट्राईक कोर 

ज्या लेह लद्दाख भागात कारगीलचे युद्ध झाले त्या भागात आपले सैन्य फार कमी होते. या भागात भारतीय लष्कराने सैन्याची संख्या आणि पेट्रोलिंग वाढविल्यामुळे या भागात पुन्हा कारगील युद्धासारखी परिस्थिती निर्माण होणे जवळपास अशक्य आहे. तो भाग आता सुरक्षित झाला आहे. मात्र लद्दाखच्या भारत-चीन सीमेवर अद्यापी सैन्याची संख्या फारच कमी आहे. त्या भागात कारगीलसारखी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे हे होऊ नये यासाठी १७ माऊंटन स्ट्राईक कोर नावाची एक नवी लष्करी तुकडी तयार करावी असे सुचवले होते.आजच्या घडीला पैसे मिळाले तरी आगामी तीन ते चार वर्षात ही तुकडी तयार होऊ शकते.

आंदमान निकोबार लक्षद्विप,मिनीकोय 

भारताकडे आंदमान आणि निकोबार तसेच लक्षद्विप,मिनीकोय हे दोन द्विपसमुह आहेत. आंदमान आणि निकोबारच्या ६५० बेटांपैकी केवळ २८ बेटांवरच मनुष्य वस्ती आहे. उर्वरित बेटांवर मनुष्यवस्ती नसल्यामुळे तसेच त्या भागात सैन्य नसल्यामुळे समुद्री लुटेरे   किंवा दहशतवादी तेथे आपले तळ बनवू शकतात अशी भीती आहे. त्यामुळे या बेटांवरती कोस्टगार्ड, नौदल,तसेच हवाई दलाच्या माध्यमातुन पेट्रोलिंग वाढविण्याची गरज आहे. अशी बेटे शत्रुने ताब्यात घेतल्यास ती बेटे परत मिळविण्याची ताकद आपल्या सैन्यात असणे गरजेचे आहे. आंदमान आणि निकोबारमध्ये सैन्याच्या दोन बटालियन्स तैनात करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक बेटावर सैन्य ठेवायचे असल्यास मोठ्या प्रमाणावर सैनिकांची तसेच पैशांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे सध्यातरी या भागात टेहाळणीचा पर्यायच लष्कराने स्वीकारला आहे. या भागात कुणीही आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडण्याची क्षमता भारतीय सैन्यामध्ये आहे.

अरबी समुद्रातील लक्षद्विप समुहावरही अशीच परिस्थिती आहे. सोमालियन चाचे, पाकिस्तान आणि मालदिव या भागातील दहशतवादी या भागातून जात असल्याची शक्यता गुप्तहेर खात्याने कायमच वर्तवली आहे. त्यामुळे या द्विपसमुहावरतीही लक्ष ठेवण्याची गरज आहे. मात्र ही बेटे आंदमान-निकोबर द्विपसमुहाच्या तुलनेत लक्षद्विप बेटे भारतीय सीमेपेक्षा जवळ असल्याने गरज पडल्यास दहशतवाद्यांना हुसकावण्यासाठी आपल्या सैन्याला लागणार्या बोटी आणि विमाने तयार आहेत. त्यामुळे या बेटाच्या सुरक्षेची जास्त काळजी करण्याची गरज नाही.

भारताच्या समुद्री सीमा आजही असुक्षित आहेत. २६/११च्या हल्ल्यानंतर कोस्टगार्ड, नौदल, पोलीसांकडे असलेल्या बोटी, रडारांची संख्या वाढलेली असली तरीही अजूनही किनारपट्टीवरून अतिरेक्यांची घुसखोरी, शस्त्रे, बनावट नोटा, अंमली पदार्थांची तस्करी सुरूच आहे. त्यामुळे सागरी सुरक्षा अजून सक्षम करण्याची गरज आहे.

कोणत्याही प्रकारचे युद्धाला चोख प्रत्युत्तर 


आगामी काळात कारगीलसारखी युद्धे कमी होतील आणि युद्धाचे स्वरूप बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ कारगीलसारख्या युद्धासाठीच तयार राहणे शहाणपणाचे ठरणार नाही. आपल्या शत्रुंनी कोणत्याही प्रकारचे युद्ध लादले तर त्या युद्धाला चोख प्रत्युत्तर देता आले पाहिजे. सध्या पाकीस्तानने भारताच्या अंतर्गत सुरक्षेची परिस्थिती गंभीर करून ठेवलेली आहे. काश्मीरमध्ये रोजच फडकणारे इसिस आणि पाकिस्तानी झेंडे पाहता काश्मीरमध्ये छुपे युद्ध पुकारण्यात आले आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो. याशिवाय ईशान्य भारतातील काही बंडखोरांनी नुकतेच आपल्या काही जवानांना ठार मारले होते. त्याला प्रत्यूत्तर म्हणून आपल्या सैनिकांनी म्यानमारच्या सीमेत घुसून बंडखोरांना यमसदनी पाठविले होते. ईशान्य भारतात दहशतवादी कारवाया करणार्या अतिरेक्यांचे ट्रे्निग कॅम्प मुख्यत्वेकरून म्यानमार मध्ये आहेत. चीन आणि बांग्लादेशमध्येही या दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत. अशा दहशतवाद्यांची घुसखोरी थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एखादा दहशतवादी आत आलाच तर, दहशतवादविरोधी कारवाई करून त्याला संपवले पाहिजे. 


भारत-पाकिस्तान सीमेकडे सर्वांचेच लक्ष असते. मात्र भारत-चीन, भारत-नेपाळ, भारत-म्यानमार, भारत-बांग्लादेश, भारत-श्रीलंका येथूनही दहशतवाद्यांची घुसखोरी कायमच सुरू असते. या सर्व सीमा सुरक्षित करण्याची गरज आहे.

चीन, पाकिस्तानसह भारताच्या इतर शत्रुंनी भारताच्या अंतर्गत सुरक्षेची अनेक आव्हाने आपल्यासमोर आहेत. यासाठी आपल्याला आपल्या सीमा अजून सुरक्षित कराव्या लागणार आहेत. अर्थातच गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या सीमा काही प्रमाणात सुरक्षित झालेल्या असल्या तरी अजूनही त्या पूर्णपणे सुरक्षित झालेल्या नाहीत. भारतासमोरील सुरक्षेची आव्हाने बहुआयामी आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धांना सामोरे जाण्यासाठी लष्कराची ताकद वाढविण्याची गरज आहे. कारगील दिवसाच्या निमित्ताने आपले सरकार या सगळ्या सुरक्षेच्या पैलूंवरती विचार करेल अशी अपेक्षा आहे. 

सैनिकांना विसरते 

कारगिल युद्धामध्ये लढलेल्या सैनिकांपुढे आणि वीरगती मिळालेल्या शहिदांपुढे आपण नतमस्तक होतो. पण आपल्याकडे या पराक्रमाला किंवा सैनिकांच्या या बलिदानाला पाहिजे तसे महत्त्व दिले जात नाही. कितीही मोठे तंत्रज्ञान आले तरी युद्ध जे जिंकले जाते ते सैनिक जिंकतात.कुठलाही देश किती सुरक्षित आहे हे त्याच्याकडे किती शस्त्रसाठा आहे यावरून ठरत नसते तर त्यांच्याकडे असणार्या सैनिकांवरून ठरत असते. एका म्हणी नुसार ‘देव आणि सैनिकांवर आपण सर्वच प्रेम करतो. पण जेव्हा आपल्याला किंवा देशाला धोका निर्माण झाले तेव्हाच त्यांची आठवण येते. ते संकट जाते तेव्हा आपण त्यांना विसरतो. जे राष्ट्र आपल्या सैनिकांना विसरते ते राष्ट्र कधीही मोठे होऊ शकत नाही. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. त्यासाठी सक्षम सैन्यबल गरजेचे आहे. इतकेच नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाने देशप्रेम जागृत ठेवून आपले कर्तव्य पार पाडले तर या बहुआयामी धोक्यांना आपण परतवून लावू शकतो. 


No comments:

Post a Comment