भारतातील लेखानुसार नेपाळमधील लोकप्रिय गुरखा योद्धे रशियामधील ‘वॅगनर गटा’मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्याचे समोर आले आहे. ‘नेपाळी गुरखा रशियाच्या खासगी सैन्यदलामध्ये भरती झाल्याने भारतावर परिणाम होणार का ?’, याविषयीची माहिती या लेखात पाहूया.
१. वॅगनर गटावर रशियाच्या सैन्याच्या नेतृत्वाखाली काम करण्याची वेळ !
रशियाच्या वॅगनर गटाचे प्रमुख जवळजवळ बेपत्ता झाले आहेत. वॅगनर गटाने युक्रेनच्या युद्धात अनुमाने २१ सहस्र सैनिक गमावले आहेत. पूर्वीप्रमाणे त्यांना रशियाच्या सैन्यातील माजी सैनिक आता मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना सैनिकांची प्रचंड कमतरता आहे. त्यांनी रशियाच्या कारागृहातील कैद्यांना सैन्यात येण्याचे आवाहन केले. ‘२ वर्षे लढा. चांगली कामगिरी केली, तर तुमची शिल्लक राहिलेली शिक्षा माफ केली जाईल’, असे आवाहन त्यांनी केले आहे. रशिया-युक्रेन युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. या युद्धात रशियाचे अनुमाने १५ जनरल्स अधिकारी मारले गेले आहेत. यात वॅगनर सैन्यामुळे रशियाला विजय मिळाले आहेत. त्यासाठी वॅगनर गटाचे शौर्य आणि नेतृत्व कारणीभूत आहे. रशियाच्या सैन्याचे नेतृत्व आणि काम फारसे चांगले नाही. त्यांच्या हाताखाली वॅगनर गटाला काम करणे भाग पडत आहे. वॅगनर गट त्यांच्या हाताखाली आला, तर त्यांचीही क्षमता अल्प होण्याची शक्यता आहे.
२. वॅगनर गटामध्ये ‘गुरखा’ सैनिकांची भरती !
जगात १२ ते १३ देशांमध्ये वॅगनरचे सैनिक रशियासाठी काम करत आहेत. ते गणवेशात नसतात आणि गुपचूप कारवाया करतात. त्यामुळे ते चुकीची कामे चांगल्या पद्धतीने करू शकतात. त्यामुळे रशियाचे राष्ट्रीय हित साधण्यासाठी ते अनेक ठिकाणी काम करत आहेत. अशा वॅगनर गटामध्ये ‘गुरखा’ सैनिक भरती होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. ‘फर्स्टपोस्ट’च्या लेखातील माहितीनुसार गेल्या काही वर्षांत नेपाळमधील गुरखा सैनिक रशियाच्या वॅगनर गटामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांची आकडेवारी समोर आलेली नाही; पण नेपाळी युवक रशियामध्ये जात आहेत, हे उघड सत्य आहे. गुरखा हे ‘नेपाळमधील योद्धे’ म्हणून ओळखले जातात. अनेक शतकांपासून त्यांनी त्यांच्या युद्धकौशल्याने पराक्रम गाजवला आहे. ‘भेकडाप्रमाणे जगण्यापेक्षा मृत्यू बरा !’, हे गुरख्यांचे घोषवाक्य आहे. यावरून त्यांची रणांगणातील धाडसी वृत्ती दिसून येते.
३. नेपाळी गुरख्यांना रशियाच्या खासगी सैन्यदलात भरती होण्याची आवश्यकता का भासली ?
‘फर्स्टपोस्ट’च्या माहितीनुसार यासंदर्भात रशिया आणि नेपाळ यांच्यामध्ये काही अधिकृत करार झालेला नाही; पण अनेक नेपाळी युवक रशियातील खासगी सैन्यदलात भरती होण्यासाठी जात आहेत. नेपाळच्या सैन्यदलातून निवृत्त झालेल्या एका सैनिकाने परराष्ट्र विभागातील अधिकार्याला सांगितले, ‘‘दुबई येथे खासगी सुरक्षारक्षक म्हणून काम केल्यानंतर त्याने मॉस्कोमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मॉस्कोमध्ये पर्यटक म्हणून गेल्यानंतर तेथे जाऊन रशियाच्या खासगी सैन्यदलात भरती झालो.’’ वॅगनर गटामध्ये सहभागी होणारा हा एकटाच गुरखा नाही. सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या काही चित्रफितींमधून नेपाळी युवकांनी रशियाशी सैन्याशी संबंधित प्रशिक्षण घेतले असल्याचे दिसून आले आहे.
नेपाळी गुरखा रशियाच्या खासगी सैन्यदलात भरती होण्यास जात आहेत. याचा शोध घेतल्यास काही महत्त्वाची कारणे समोर येतात. सर्वप्रथम १६ मे या दिवशी रशियाने त्याचे नागरिकत्व प्राप्त करण्याच्या नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. ‘जे लोक रशियाच्या सैन्यदलात किमान एक वर्षासाठी सेवा देतील, त्यांच्यासाठी नागरिकत्वाची प्रक्रिया अधिक सोपी केली जाईल’, असे घोषित करण्यात आले आहे. रशियाने केलेल्या नव्या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीने किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्तीने रशियाच्या सैन्यदलात सेवा दिली, तर त्या व्यक्तींना रशियाचे नागरिकत्व बहाल केले जाईल आणि त्यासाठी त्यांचा रहिवासी परवाना विचारात घेतला जाणार नाही.
४. नेपाळी गुरखा चिनी सैन्यात भरती होऊ न देण्यासाठी भारताने प्रयत्न करणे आवश्यक !
सध्या चीनचा नेपाळवरील प्रभाव फार वाढलेला आहे. गुरख्यांच्या लोकप्रियतेमुळे काही वर्षांपासून चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मध्येही गुरख्यांची भरती केली जात आहे. ते वॅगनर गटात गेल्याने भारताला काही भेद जाणवणार नाही; पण ते चीनच्या सैन्यात गेले, तर भारताची हानी होऊ शकते. त्यामुळे भारताने नेपाळवर दबाव टाकून ‘नेपाळी गुरख्यांनी कुठल्याही परिस्थितीत चीनच्या सैन्यात प्रवेश घेता कामा नये’, असे सांगायला पाहिजे.’
गुरख्यांच्या शौर्यामुळे त्यांना अनेक वर्षांपासून ब्रिटीश आणि भारतीय सैन्यदलांमध्ये अधिकृतपणे प्रवेश दिला जातो. वर्ष १८१५ पासून नेपाळी युवक ‘गुरखा योद्धा’ म्हणून ब्रिटिशांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. त्या वेळी त्यांना ‘ब्रिटीश गुरखा’ म्हटले जात असे. हीच प्रथा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही चालू राहिली. प्रत्येक वर्षी अनुमाने १ सहस्र गुरखा तेथे जातात. भारतीय सैन्यामध्ये ‘अग्नीवीर’ संकल्पना (सैन्यामध्ये ४ वर्षांसाठी भरती होण्याची योजना) चालू झाली आहे. त्यामुळे नेपाळी गुरखा भारतीय सैन्यात येण्यास सिद्ध नाहीत. असे असले, तरी भारतात युवकांची काही कमतरता नाही. त्यामुळे भारताला दुसर्या देशातून सैनिक आणण्याची काही आवश्यकता नाही.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.
No comments:
Post a Comment