Total Pageviews

Sunday 9 July 2023

नेपाळी गोरखा वॅग्नर ग्रुप सैन्यदलात,भारता करता चिंतेचे कारण आहे का?

 


रशियात काही दिवसांपूर्वी वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवजेनी प्रिगोझिन यांनी बंडाचा झेंडा फडकावून क्रेमलिनच्या दिशेने चाल केली होती. मात्र, त्यांचे बंड एकाच दिवसात शमविण्यात आले. प्रिगोझिन सध्या बेलारूसमध्ये आहे.

प्रिगोझिन यांच्या वॅग्नर ग्रुप सैन्यदलाचे काय झाले? रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसनुसार वॅग्नरच्या सैनिकांवरील फौजदारी खटला मागे घेण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी जाहीर केले आहे की, वॅग्नरचे योद्धे रशियन सैन्यदलाशी करार करू शकतात आणि ते त्यांच्या कुटुंबाकडे परत जाऊ शकतात किंवा बेलारूसमध्ये थांबू शकतात. वॅग्नरकडे असलेली युद्धसामग्री, शस्त्रास्त्रे रशियन सैन्यदलाच्या ताब्यात दिली जाणार आहेत.

युक्रेन शिवाय वॅग्ननार सैन्य हे आफ्रिकेतल्या अनेक राष्ट्रांमध्ये रशियन सरकार करता वेगवेगळ्या प्रकारची कामे करत आहे ,ज्यामुळे रशियाचे राष्ट्रीय हित देशांमध्ये जपले जात आहे.

रशियात परिस्थिती कशीही असली तरी वॅग्नर ग्रुप आणखी वाढत असून, जगाच्या अनेक भागांतून या ग्रुपमध्ये भरती सुरू असल्याचे समोर आले आहे. नेपाळमधील गोरखा  वॅग्नर ग्रुपमध्ये सामील होत आहे. नेपाळमधील गोरखांना मॉस्कोत जायची गरज का भासली? रशियाच्या वॅग्नर ग्रुप सैन्यदलाचे  भरती होण्याचे काय फायदे आहेत? आणि याचा भारताशी संबंध काय, याचे विष्लेशन जरुरी आहे.

वॅग्नर ग्रुपमध्ये गोरखाची भरती?

गेल्या काही काळात नेपाळमधील गोरखा रशियामध्ये जाऊन वॅग्नर ग्रुपमध्ये सामील झाले आहेत. किती नेपाळी युवकांनी रशियाच्या खासगी सैन्यदलात सामील होण्याचा निर्णय घेतला, याची आकडेवारी समोर आलेली नाही. पण, नेपाळी युवक रशियात जात आहेत.

गोरखा हे नेपाळमधील योद्धे म्हणून ओळखले जातात. अनेक शतकांपासून त्यांनी आपल्या युद्धकौशल्याने पराक्रम गाजवला आहे. १८१५ सालापासून नेपाळी गोरखा ब्रिटिशांच्या खांद्याला खांदा लावून लढले. हीच प्रथा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सुरू राहिली. आता पण  नेपाळमधील १००० युवकांना ब्रिटिश सैन्यदलात अधिकृतपणे प्रवेश दिला जातो.

भारतात  अंदाजे ३५ हजार नेपाळी सैनिक

भारतीय गुरखा रेजिमेंटमध्ये नेपाळी सैनिकांची भर्ती केली जात होती.त्यात ६० टक्के सैनिक नेपाळी असतात तर ४० टक्के सैनिक भारतीय गुरखे असतात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, नोव्हेंबर १९४७ मध्ये  ब्रिटन-भारत-नेपाळ त्रिपक्षीय करारानुसार गुरखा रेजिमेंट ब्रिटीश आणि भारतीय सैन्यांमध्ये विभागल्या गेल्या. ६ गुरखा रेजिमेंट भारतात आल्या, ज्यामध्ये  ११ गुरखा रायफल्स आणखी एक रेजिमेंट वाढवण्यात आली.

या नेपाळी सैनिकांना सेवेदरम्यान आणि सेवानिवृत्तीनंतर भारतीय सैनिकांसारखेच फायदे मिळतात.अनेकदा भारतीय लष्कराची वैद्यकीय पथके नेपाळला भेट देतात. नेपाळी सैनिकांना निवृत्तीनंतरही भारतीय सैनिकांसारखेच पेन्शन मिळते. भारतीय लष्कर नेपाळच्या गावांमध्ये लहान पाणी आणि वीज प्रकल्पांसह कल्याणकारी प्रकल्पही चालवते. त्यामुळे नेपाळमध्ये भारतीय सैन्यमध्ये भरती होण्याकडे नेहमीच कल राहिलेला दिसतो.भारतात सध्या अंदाजे ३५ हजार नेपाळी सैनिक सात रेजिमेंटमध्ये सेवा देत आहेत.

वॅग्नरमध्ये भरती होण्याचे कारण काय?

रशिया आणि नेपाळमध्ये काही अधिकृत करार झालेला नाही. पण, अनेक नेपाळी युवक रशियातील खासगी सैन्यदलात भरती होण्यासाठी जात आहेत. नेपाळ सैन्यदलातून निवृत्त झालेल्या एका सैनिकाने दुबई येथे खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम केल्यानंतर मॉस्कोमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मॉस्कोमध्ये पर्यटक म्हणून गेल्यानंतर तिथे जाऊन अनेक रशियाच्या वॅग्नर ग्रुपमध्ये सामील झाले आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडीओंमधून नेपाळी युवकांनी रशियात सैन्याशी संबंधात प्रशिक्षण घेतले आहे.

पण नेपाळी गोरखांना रशियात जाऊन खासगी सैन्यदलात भरती होण्याची गरज का भासली, याची काही कारणे समोर येतात. १६ मे रोजी रशियाने रशियन नागरिकत्व प्राप्त करण्याच्या नियमांमध्ये शिथिलता आणली. रशियाने केलेल्या नव्या कायद्यानुसार जी व्यक्ती रशियन सैन्यदलात सेवा देतील, त्यांना रशियन नागरिकत्व बहाल केले जाईल. त्यासाठी त्यांचा रहिवासी परवाना विचारात घेतला जाणार नाही.

याशिवाय रशियन सैन्यात भरती होण्यासाठी परदेशी नागरिकांना आता रशियन भाषा यावी अशी अट नाही. यामुळे नेपाळी युवकांना रशियन खासगी सैन्यदल आकर्षित करत आहे. नेपाळमध्ये सध्या बेरोजगारीचा दर ११.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे अनेक गोरखा देश सोडून इतरत्र रोजगाराच्या शोधात जात आहेत. उच्च वेतन मुळे गोरखा वॅग्नर ग्रुपमध्ये जात आहे.

एक नेपाळी युवक रशियन विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी गेला होता. मात्र, त्याचा व्हिसा समाप्त झाला. मग त्याच्यासमोर त्यानंतर दोनच पर्याय होते- नेपाळमध्ये जाऊन बेरोजगार होणे किंवा रशियन सैन्यात भरती होणे. रशियन सैन्यात भरती झाल्यानंतर या युवकाला नेपाळी रुपयांमध्ये ५० हजार एवढे वेतन मिळत आहे, तसेच त्याला विमा सरंक्षण देण्यात आले आहे.

रशियात गेल्यामुळे तिथून युरोपमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होतो. नेपाळी गोरखांना चांगल्या जीवनशैलीची आस लागल्यामुळे हा मार्ग त्यांना अधिक जवळचा वाटतो. “मी फ्रेंच सैन्यदलात भरती होण्याचा विचार करत होतो. मात्र, त्यांची निवड प्रक्रिया लांबलचक आहे आणि युरोपमध्ये जाणे कठीण काम आहे. रशिया त्या तुलनेत खूप सोपे प्रकरण आहे”, अशी माहिती नुकत्याच वॅग्नरमध्ये भरती झालेल्या युवकाने माध्यमांना दिली आहे.

अग्निपथयोजनेनंतर भारतीय सैन्यदलातील भरती बंद

नेपाळी युवक वॅग्नर ग्रुपकडे वळण्याचे आणखी एक कारण भारताशी संबंधित आहे. या आधी भारतीय सैन्यदलात गोरखांची भरती होत होती. मात्र, भारताने अग्निपथयोजना सुरू केली आहे. या योजनेमुळे सैन्यदलातील कार्यकाळ कमी झाला असून, निवृत्तिवेतन आणि इतर सुविधाही मिळणार नाहीत. त्यामुळे  या योजनेवर नाराजी व्यक्त करत नेपाळने सैन्यभरती प्रक्रियेची २०० वर्षे जुनी परंपरा खंडित केली आहे.

वॅग्नर ग्रुपने रशियाच्या विरोधात बंड पुकरण्याच्या दिवसांपर्यंत बरीच लोकप्रियता मिळवलेली आहे. युक्रेनमध्ये लढत असताना बखमुत शहर काबीज करून वॅग्नरने आपल्या शौर्याचा दबदबा निर्माण केला. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार वॅग्नर ग्रुपकडून सैनिकांना चांगला पगार आणि भत्ते दिले जातात. एका वॅग्नर सैनिकाला जवळपास २,५०० डॉलरपर्यंत (भारतीय रुपयांमध्ये २.०४ लाख) पगार मिळतो. रशियातील इतर क्षेत्रांतील नोकरदाराची तुलना केल्यास सरासरी पगार एक हजार डॉलरपर्यंत (८१ हजार रुपये) मिळत असल्याचे समोर आले आहे. यासाठीच नेपाळी युवक रशियाची वाट धरत आहे.

हे चिंतेचे कारण का आहे?

नेपाळी गोरखा रशिया संबंधाकडे भारताने गांभीर्याने पाहिले आहे. जे युवक खासगी सैन्यदलात काम करून आले आहेत, आणी ते युवक अग्नीविर प्रक्रिये द्वारा भारतीय सैन्यामध्ये भरतीसाठी आले, तर त्यांना अर्थातच भरती केले जाऊ नये.

अग्निवीर भरती सुरु झाल्यानंतर नेपाळ सरकार/ नेपाळी गुरखा अतिशय नाखुश होते. त्यांना केवळ चार वर्षाकरिता भारतीय सैन्यामध्ये प्रवेश नको होता.  पहिल्याप्रमाणे पेन्शन देणारी भरती पाहिजे होती. आत्ताच नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांनी ही मागणी पुन्हा एकदा भारत सरकार समोर मांडली. परंतु  ही मागणी अमान्य झाली. कारण पेन्शन देणे  सरकारला परवडणारे नाही. यानंतर काही भारतिय राजकिय पक्षांनी ,गुरखा रेजिमेंटच्या काही भुतपूर्व अधिकाऱ्यांनी हीच मागणी केली आहे.

मात्र जर नेपाळी गुरखा रशियामध्ये गेले किंवा रशियाच्या बाजूने लढण्याकरता आफ्रिकेत गेले, तर यामुळे भारताला फारसा धोका निर्माण होऊ शकत नाही. नेपाळी गुरखा जर रशियात जात असतील तर त्यांना आपण थांबवू शकत नाही . मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये नेपाळी गुरख्यांना चीनी सैन्यांमध्ये प्रवेश करू देऊ नये,कारण तो भारताकरता मोठा धोका असेल.जर आपल्याला नोकर्या द्यायच्याच असतील ,तर आपण भारतीय तरुणांना नोकर्या देऊ शकतो, कारण आज सर्वात जास्त जरुरी ही भारतीय युवकांना आहे .

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment