भारताने पाकिस्तानवर लक्ष्यभेदी कारवाई केली. नेमके त्याच दिवशी सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याचे सांगण्यात येत असलेल्या व अटक झालेल्या चंदू चव्हाण या भारतीय जवानाची गेल्या शुक्रवारी पाकिस्तानने सुटका केली. भारताबरोबर सौहार्दाचे संबंध निर्माण व्हावेत यासाठी चंंदूची सुटका करण्यात येत असल्याचे पाकिस्तानने सांगितले असले तरी तो त्या देशाने पांघरलेला एक मुखवटा आहे. मूळ धुळे जिल्ह्यातील बोरीविहार गावचे असलेल्या चंदू चव्हाण यांचे अचानक पाकिस्तानच्या हद्दीत निघून जाणे हेच अनाकलनीय होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या भांडणामुळे डोक्यात राख घालून चंदू चव्हाण यांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत. लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर कोणत्याही कारणाने का होईना चंदू चव्हाणांच्या रूपाने एक भारतीय जवान पकडला गेल्यानंतर पाकिस्तानी राज्यकर्ते व लष्कर यांना चेव येणे साहजिकच होते. पाकिस्तानी प्रसारमाध्यमे चंदू चव्हाणांना हेर ठरविण्यापासून अनेक दूषणे देऊन मोकळी झाली होती. चंदू चव्हाण यांना पाकिस्तानच्या हद्दीत अटक करण्यात आली हे सत्य असले तरी ते काही तिथे हेरगिरी करायला गेलेले नव्हते, त्यामुळे या निरपराध माणसाची सुटका करण्यात यावी, अशी बाजू भक्कम पुराव्यानिशी भारताने पाकिस्तानकडे लावून धरलेली होती.
भारताने केलेल्या लक्ष्यभेदी कारवाईनंतर पाकिस्तानवर दहशतवादी कारवाया कायमच्या संपुष्टात आणाव्यात म्हणून जागतिक दडपण मोठ्या प्रमाणावर येऊ लागले. दुसऱ्या बाजूला लक्ष्यभेदी हल्ल्याबाबत अमेरिकेसह प्रमुख देशांनी भारताला अजिबात दोष दिलेला नव्हता. या सर्वांचा परिणाम पाकिस्तानी लष्कर व राज्यकर्ते यांच्यावर होणे साहजिकच होते. त्यामुळे चार महिने बंदिवासात ठेवल्यानंतर उपरती झाल्यागत पाकिस्तानने चंदू चव्हाणांची सुटका केली आहे. या सदिच्छा कृतीच्या बदल्यात पाकिस्तानला भारताकडूनही काही अपेक्षा आहेतच! विविध गुन्ह्यांखाली अटक झालेले व न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेचा कालावधी पूर्ण केलेले ३३ पाकिस्तानी नागरिक अद्यापही भारतीय तुरुंगात असून त्यांची ओळखही पटली आहे. भारताने त्यांची सुटका करून त्यांना मायदेशात परत पाठवावे, अशी मागणी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी केली आहे. वरवर पाहता पाकिस्तानच्या मागणीत आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. मात्र याबाबत भारताने काटेकोर दृष्टिकोन बाळगूनच पावले उचलली पाहिजेत.
चंदू चव्हाण याच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडलेल्या कुलभूषण जाधव याचेही स्मरण होणे साहजिक आहे. हाही मूळ महाराष्ट्रातीलच. गेल्या वर्षी बलुचिस्तान प्रांतात हेरगिरी केल्याच्या आरोपावरून त्याला पाकिस्तानने अटक केली होती. कुलभूषण भारतीय नौदलाचा माजी सैनिक. निवृत्तीनंतर व्यवसायानिमित्त त्याची जगभर भ्रमंती सुरू झाली. त्यातूनच बलुचिस्तानला असताना पाकिस्तानने त्याला अटक करून डाव साधला. आपण हेरगिरीसाठी पाकिस्तानात आलो होतो, असे त्याच्याकडून पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी जबरदस्ती वदवून घेतलेले असले तरी तो हेर नाही, असेच भारताचे मत आहे. त्यादृष्टीने काही पुरावेही पाकिस्तानला सादर करण्यात आले, परंतु कुलभूषणची सुटका पाकिस्तानने केलेली नाही. पाकिस्तानात १९९० साली बॉम्बस्फोट घडविण्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावलेला सरबजितसिंग पाकिस्तानच्या तुरुंगात अनेक वर्षे खितपत पडलेला होता. तुरुंगात काही कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात सरबजितसिंग मरण पावला. त्याचा पाकिस्तानने खून केला, असा आरोप सरबजितसिंगच्या नातेवाइकांनी केला होता. त्याच्याही आधी १९७१ साली बांगलादेश मुक्तीसाठी पाकिस्तानविरोधात भारताने जे युद्ध केले त्याही वेळेस पाकिस्तानने जेरबंद केलेल्या भारतीय सैनिकांपैकी ५४ युद्धकैदी पुन्हा मायदेशात परतलेले नाहीत. ते त्या वेळेपासून पाकिस्तानी तुरुंगातच असल्याचा या सैनिकांच्या नातेवाइकांचा दावा आहे. पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी उदार होऊन काही नातेवाइकांना पाकिस्तानी तुरुंगामध्ये जाऊन हे कैदी आहेत का याची पाहणी करण्याची मुभा दिली होती, पण हाही पाकिस्तानचा एक पद्धतशीर कांगावाच होता. हे सारे लक्षात घेतले तर चंदू चव्हाणची सुटका करून पाकिस्तान एकदम सदिच्छेचा सज्जन अवतार बनला आहे, असा समज करून घेण्याचे कारण नाही. एका बाजूला लक्ष्यभेदी कारवाई करण्याबरोबरच दुसऱ्या बाजूला पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवत त्याला दहशतवादी कारवायांचा कायमचा बीमोड करण्यासाठी पावले उचलायला भाग पाडणे ही रणनीती भारताने अवलंबिली होती. नमते घेतलेल्या पाकिस्तानने चंदू चव्हाणची केलेली सुटका हे त्याचेच तात्पुरते ‘सदिच्छा’ फलित आहे
No comments:
Post a Comment