पाव शतकापूर्वी ज्याने बॉम्बस्फोटांच्या माध्यमातून सारी मुंबई हादरविली होती, नंतरच्याही काळात जो अनभिषिक्त सम्राटाच्या थाटात वावरत राहिला, लोकांची लूट करून मिळवलेला पैसा, त्या पैशाच्या साह्याने बळकावलेली शस्त्रे आणि मग त्याच शस्त्रांच्या भरवशावर पसरविलेली दहशत, ही ज्याच्या कार्यपद्धतीची निशाणी राहिली, त्या दाऊद इब्राहीमच्या मुसक्या आवळण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. परवा भारत सरकारच्या विनंतीवरून दुबई सरकारने केलेल्या कारवाईत दाऊदच्या सुमारे पंधरा हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवर आलेली टाच त्याचेच संकेत देणारी आहे. कालपर्यंत लोकांची लूट करून उभारलेल्या त्याच्या साम्राज्यावर कधी कुणी हात घालेल याची सुतराम शक्यता नसताना, किंबहुना या गुंडाने दहशतच तशी जबर निर्माण केलेली असताना संयुक्त अरब अमिरात सरकारने धाडसी पावलं उचलत या अंडरवर्ल्ड डॉनच्या साम्राज्याला बेधडक सुरुंग लावावा ही बाब त्या सरकारच्या हिमतीला दाद द्यावी अशीच आहे. भारत सरकारच्या यशातही या घटनेने भर घातली गेली आहे. निवडणुकीच्या काळात आश्वासने द्यावीच लागतात, ती पूर्ण थोडीच करायची असतात, असे आक्षेपार्ह विधान करणार्या कॉंग्रेसी नेत्यांच्या तुलनेत त्या आश्वासपूर्तीसाठी मनापासून धडपडणार्या कार्यकर्त्यांची फौज असलेला एक राजकीय पक्ष सत्तेत आल्यानंतर काय काय घडू शकते, याचा प्रत्यय आणून देणारे हे उत्तम उदाहरण आहे. काळे धन असो की मग बखुटं धरून दाऊद इब्राहीमसारखा गुंडा पकडून गजाआड करण्याचा मुद्दा, विषय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असल्याने आणि त्याचे परिणाम संबंधित देशांच्या सकारात्मक प्रतिसादावर, त्यानंतरच्या त्यांच्या सहकार्यावर अवलंबून असल्याने, कितीही ठरवले तरी सार्या बाबी आपल्या मनासारख्या घडतीलच असे नसते. म्हणूनच दाऊदची पंधरा हजार कोटींची संपत्ती जप्त करण्याची संयुक्त अरब अमिरात सरकारची कारवाई अधिकच महत्त्वपूर्ण ठरते. कधी बॉम्बस्फोट, तर कधी लोकांचे मुडदे पाडण्याचे काम. कधी शस्त्रांच्या जोरावर लोकांची लूट करून मांडलेला उच्छाद, तर कधी रक्ताचे पाट वाहून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. कधी आपल्याच धंद्यात गुंतलेल्या दुसर्या गँगमधील गुंडांचा काटा काढण्याचा डाव, तर कधी सामान्य माणसाचा बळी घेण्याचे षडयंत्र. १९९२-९३ च्या काळात मुंबईत दाऊद गँगने घातलेल्या धिंगाण्याने अक्षरश: शेकडो लोकांचे बळी घेतले. त्या बॉम्बस्फोटाने कित्येक लोक उद्ध्वस्त झालेत. कित्येकांच्या डोक्यावरचे मायेचे छत्र हिरावले गेले. अनेकांच्या वाट्याला कायमचे अपंगत्व आले. विव्हळणार्या वेदना अजूनही हृदयात कोरल्या गेल्यात कित्येकांच्या अन् एवढे सारे करून दाऊद मात्र पोलिसांच्या ससेमिर्याला हुलकावणी देत दूर कुठेतरी पाकिस्तान, सौदी अरबमध्ये जाऊन लपून बसलेला. इकडे पोलिसांना घटनेचे सारे धागेदोरे ठावूक असतानाही करता मात्र काहीच येत नाही, अशी अवस्था. कारण हवा तसा धिंगाणा घालून हा गुंडा दूर कुठेतरी पळून गेलेला. सर्वसामान्य लोकांच्या जिवाची जराही तमा न बाळगणारा दाऊद स्वत:चा जीव वाचविण्यासाठी मात्र जिवाचा आटापिटा करतो. पोलिस कारवाई टाळण्यासाठी या देशातून त्या देशात पळ काढतो, हे सारे जग अनुभवत आहे. आणि सार्या जगाला हवा असलेल्या एका दहशतवाद्याला आसरा देण्याचे काम कुण्या पाकिस्तानचे सरकार करीत आहे, ही बाबही दाऊदच्या निमित्ताने जगाने अनुभवली आहे. अशा वेळी हतबल पोलिस यंत्रणेला बळ देण्यासाठीचा पुढाकार सरकारने घेणे अपेक्षित असताना, तसे घडत असल्याचेही आशादायी चित्र कालपर्यंत कुठे दिसत नव्हते. सीमेपलीकडे बसलेल्या दाऊदला आपण कसे पकडणार, असा भाबडा प्रश्न सरकारच्या चेहर्यावर उमटलेला दिसायचा. परवा पहिल्यांदा हेही चित्र बदललेले दिसले. प्रामाणिक प्रयत्न केले तर सारे जग साथीला उभे राहाते, याचा प्रत्यय अनुभवायला मिळाला. निवडणूक काळात दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या इराद्याने भारत सरकारने पावलं उचलली. आपल्या यंत्रणेला हुलकावणी देत पळून समुद्रापलीकडे गेलेला दाऊद तिकडे बसून वाकुल्या दाखवत आपल्याला खिजवतो. आपल्याविरुद्ध षडयंत्र रचतो. आपल्याच यंत्रणेला फितूर करून आपल्याच विरुद्ध वापरून घेतो. वर पुन्हा आपला त्याच्याशी काडीचाही संबंध नसल्याच्या आविर्भावात नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करतो. शिवाय, भारताविरुद्ध काही घडलं की बोट न लावताही गुदगुल्या होणार्या पाकिस्तानसारखे काही देश त्याला आश्रय द्यायाला तत्पर असतात. अशा स्थितीत दाऊदवर कारवाई होण्याची जराही कुठे शक्यता दिसत नसताना, केवळ वज्रनिर्धाराच्या जोरावर भारत सरकारने प्रयत्न आरंभावेत, संयुक्त अमिरात सरकारला पुराव्यांसह दाऊदच्या कारनाम्यांचे गाठोडे सोपवले जावे आणि कधी नव्हे एवढी गंभीर दखल घेत तिथल्या सरकारने बखुटं धरून दाऊदला पकडण्याची तयारी सुरू करावी… तमाम भारतीय जनांच्या मनात आनंदाची भावना निर्माण करणारा हा घटनाक्रम आहे. ज्यांनी त्या बॉम्बस्फोटाच्या वेदना अनुभवल्या, ज्यांनी त्यावेळच्या दंगलीच्या झळा सोसल्या, त्यांच्यासाठी तर दाऊदच्या संपत्तीवर पडलेला हा हातोडा म्हणजे मनात आनंदतरंग निर्माण करणारा क्षण आहे. ज्यांचे जीव बेचिराख करत दाऊदचे हे साम्राज्य उभे राहिले आहे, त्या प्रत्येक संबंधिताच्या मनात हीच भावना असणार. इतका धिंगाणा घातला तरी याचे कोणीच काही बिघडवू शकत नाही, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झालेली. तोही त्याच थाटात वावरला आजवर. आमची पोलिस यंत्रणा तर पुरती हतबल झाली होती अन् सरकारही हातावर हात धरून बसले होते. मनात प्रचंड संताप असूनही दाऊदला कुणी हात लावू शकेल, याची सामान्य नागरिकांच्या मनातली आशा तशीच धुळीस मिळाली होती. अशात एक दिवस बातमी येऊन धडकते ती, दाऊदच्या पंधरा हजार कोटींच्या संपत्तीवर अमिरात सरकारने हात घातल्याची. इकडे महाराष्ट्रातही दाऊदच्या काही ठिकाणच्या संपत्ती सरकारजमा करण्याची कारवाई सुरू झाली असल्याची वार्ताही आशा पल्लवीत करणारी आहे. कालपर्यंत बंदुकीच्या जोरावर लोकांना जेरीस आणणार्या दाऊदला पोलिस कॉलर धरून रस्त्याने ओढत नेत असल्याचे चित्र बघायला लोक आतुर आहेत. याबाबत पूर्णत: मावळलेल्या आशा कालच्या घटनेने पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत… अमिरात सरकारने उचललेल्या पावलांना आणि त्यांनी या कुख्यात गुंडाला दिलेल्या दणक्याला मनापासून दाद… अन् अमिरात सरकारकडून हा प्रतिसाद मिळवण्यासाठी आपल्या सरकारने चालवलेल्या धडपडीला सलाम!
No comments:
Post a Comment