श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांचे दिल्लीतील मुत्सद्दी, पानिपत युद्धातील पराक्रमी मराठा सरदार अंताजी माणकेश्वर गंधे यांची १८ जानेवारी रोजी २५४ वी पुण्यतिथी झाली.
नगर जिह्यातील कामरगाव हे सुपे परगण्यातील एक छोटं गाव. थोरले छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांनी बादशहाच्या मुक्त कैदेत असताना उत्तर हिंदुस्थानात याच कामरगावच्या अंताजी माणकेश्वर नावाच्या पोरसवदा मुलाची कर्तबगारी हेरली आणि शस्त्र-शाश्त्र आणि संगीतनिपुण अंताजीस थेट साताऱ्यात आपल्या पदरी ठेवून घेतले. अंताजींकडे कुलकर्णीपद सोपवले. पुढे रोज व प्रत्येक मोहिमेवर निघताना अंताजी थोरल्या छत्रपतींच्या कपाळी ‘गंध’ लावू लागले आणि छत्रपतींनी त्यांचे नामकरण ‘गंधे’ असे केले. कऱ्हे पठार प्रांतात वडीलबंधू हरी माणकेश्वर हे वतनदार म्हणून पुढे आले. अंताजी पाच वर्षांचे असतानाच पोरके झाला. चुलते नसोपंत लिंगोजींबरोबर ते दुष्काळामुळे उत्तर हिंदुस्थानात उदरनिर्वाहासाठी गेले. तिकडे शास्त्राचे व शस्त्राचे शिक्षण घेऊन तरबेज झाले. रामचंद्रपंत भट्टांनी थोरल्या छत्रपती शाहू महाराजांना अंताजीविषयी सांगितले.
१७-१८ व्या वर्षी अंताजी छत्रपतींच्या सेवेत दाखल झाले. कामगाव-पुणे येथे पेशव्यांकडे महाराजांनी पाठवले. उत्तर हिंदुस्थानची कानोजी भाषा, फार्सीवर प्रभुत्व, तलवारबाजीत निपुणता आणि शत्रूवर बोलण्यातून मात करण्याचे कसब या गुणांमुळे छत्रपतींनी पेशव्यांना हुकूम देऊन अंताजीची नेमणूक मराठय़ांचे दिल्लीतील मुत्सद्दी म्हणून केली. त्यासाठी त्यांना सात हजार स्वारांची मनसब दिली गेली. उत्तरेकडील राजकारणात शिंदे-होळकरांप्रमाणे सेनापती म्हणून अंताजींना महत्त्व प्राप्त झाले. अंताजी माणकेश्वर गंधे हे व्यक्तिमत्त्व अहंमन्य, धाडसी, पराकोटीचा स्वामी व देशभक्त. छत्रपतींच्या आदेशाशिवाय कुणालाही न जुमानणारा असा. १७२९ मधील महंमदखान बंगशाच्या लढाईत अंताजी आपल्या सैन्यासह लढले. १७५३ मध्ये दिल्ली येथे बादशहा अहमदशहा व वजीर सफदरजंग यांच्यातील समरप्रसंगी मराठय़ांतर्फे अंताजींनी बादशहास मदत केली व सफदरजंगास पराभूत केले. या लढाईत अंताजीच्या सैन्याने जाटास पळता भुई थोडी केली. बादशहाने अंताजी माणकेश्वराचे कामगिरीबद्दल कौतुक करून त्यांना सप्तहजारी मनसबदार तर केलेच, पण साहेब नौबत व मोत्यांचा चौकडा देऊन आणि उत्तरेतील महत्त्वाचे इटावा व फुपुंद हे परगणे जहागीर म्हणून दिले.
इ.स. १७५५ च्या जयपूर सेनापती अनिरुद्ध सिंग व सरदार दत्ताजी शिंदे यांच्या लढाईत अंताजींनी शिंद्यांच्या पाठीशी उभे राहून अनिरुद्ध सिंगाचा दारुण पराभव केला. इ.स. १७५७ च्या लढाईतही अहमदशाह अब्दालीस अंताजीने चांगलाच हात दाखवला, परंतु उत्तम कामगिरी असूनही अब्दालीच्या भारी फौजेपुढे अंताजीचा निरुपाय झाला. छत्रपतींच्या मर्जीतील कर्तबगार म्हणून अंताजी ठरत असतानाच पेशव्यांकडील भाऊबंदकीमुळे पेशव्यांचे निष्ठावान वकील हिंगणे यांनी अंताजींविरुद्ध कारस्थान सुरू केले. अखेर एका आदेशान्वये त्यांना उत्तरेतून परत पुण्यात पाठविण्यात आले. इ.स. १७५९ च्या अखेरीस अंताजी पुण्यास सदाशिवरावभाऊंकडे आले. उत्तरेतील मेरठ महाल वगैरे अंताजींकडे होते. ते त्यांच्याकडून काढून हिंगणे यांच्याकडे देण्यात आले. अंताजी मनातून दुखावला. परंतु छत्रपतींच्या निष्ठेपुढे दुसरे काही नाही हे एकच ध्येय ठेवले. हिंगणेंनी केलेले अंताजींवरचे सर्व आरोप चौकशीत खोटे ठरले. सदाशिवभाऊंनी हिंगणेंच्या अव्यवस्थ कारभाराला खारीज केले व अंताजींना निर्दोष ठरवून १७६० च्या आरंभी परत सन्मानाने उत्तर हिंदुस्थानात नियुक्त केले. पुन्हा १७६१ ला अब्दालीबरोबर युद्धाची मोठी ठिणगी पडली. पानिपतावर लढण्यासाठी शिंदे-होळकर, बाजी हरी, साबळे, पवार, विंचूरकर, पुरंदरे यांच्या बरोबरीने अंताजींनी मोठी कामगिरी केली. शेवटच्या क्षणी १४ जानेवारीस जी पळापळ झाली त्यात इतर सगळे पळाले, काही मारले गेले. मात्र अंताजी अंतिम क्षणापर्यंत लढत होते. संक्रांतीदिवशी एक लाख मराठा सैन्य रणागंणावर कोसळले. हतबल झालेले अंताजी परत येत असता १७ जानेवारी १७६१ च्या मध्यरात्री दिल्लीजवळच्या फारुखाबाद येथे काही जमीनदार आणि फितुरांच्या हल्ल्यात त्यांना मृत्यू आला. त्यांच्याच वंशातील शंकर गणेश व गणेश हरी पुढे देवास संस्थानात पंतप्रधान झाले, तर चिरंजीव सदाशिव माणकेश्वर गंधे उत्तर पेशवाईत मोठे सरदार झाले. जिवाजीराव शिंदे सरकारातही ग्वाल्हेरास आणखी एक गंधे वंशज हे परराष्ट्रमंत्री होते. बंगालचे इतिहास अभ्यासक सर यदुनाथ सरकार यांनी अंताजी माणकेश्वर गंधेंच्या पराक्रमाचे, राष्ट्रसेवेचे स्मरण सतत केले पाहिजे असे नमूद करून त्यांचा गौरव केला. महाराष्ट्रात मात्र मराठी सुपुत्र असूनही ते उपेक्षित राहिले.
स्मारकासाठी मदत हवी
नगर-पुणे महामार्गावर कामरगाव येथे अंताजींची मोठी गढी असून बुरुज व तटबंदी आहे. तेथे त्यांचे यथोचित स्मारक व्हावे यासाठी अंताजी माणकेश्वर गंधे स्मृती न्यासाने तत्कालीन आघाडी सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार केला. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. आता न्यासातर्फेच देणगी गोळा करून स्मारक उभारणीचा संकल्प सोडला आहे. विद्यमान राज्य सरकारकडून स्मारकासाठी सहयोग मिळावा अशी अपेक्षा न्यासाकडून व्यक्त केली गेली जात आहे
No comments:
Post a Comment